दैव - भाग २

Submitted by रूपाली विशे - पाटील on 2 November, 2020 - 12:32

( मनोगत - धन्यवाद रसिक वाचक मित्रमैत्रिणींनो! तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाने भारावून कथेचा पुढील भाग लिहिण्याचा माझा लहानसा प्रयत्न)

दैव - भाग २

"शुक् ... शुक् ...रूपाली ! "बिग बाजारच्या त्या गर्दीत माझ्या नावाचा पुकारा ऐकून मी मान वळवून पाहिलं तर तोच चेहरा पुन्हा एकदा समोर आला. योगायोग पण बघा कसा... बरोबर दहा वर्षाने... पुन्हा त्याच्याशी भेट...
माझ्याकडे पाहून तो तोंड भरून हसला पण ह्यावेळी तोंडात गुटखा मात्र नव्हता आणि दातांवरच्या लाल- पिवळ्या रंगाची कलाकुसरसुद्धा कमी झालेली दिसत होती आणि सोबत कुणी टारगट मित्र कंपनी पण दिसत नव्हती. त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाले,

" अरे .. तू! आज इथे कुठे दौरा?"

मागून ' बाबा- बाबा ' अशी हाक ऐकू येताच माझं आवाजाच्या दिशेने लक्ष गेलं. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये असलेल्या स्त्रीकडून साधारण दोन वर्षाच्या बाळाला आपल्याजवळ उचलुन त्याचा पापा घेत तो म्हणाला, " ही माझी मुलगी ... आर्या आणि ही सुप्रिया... माझी बायको!"

" नमस्कार भावोजी !" माझ्या पतींना दोन्ही हात जोडत तो म्हणाला. दोन्ही हातात खरेदीच्या पिशव्या सांभाळत माझ्यासोबत उभ्या असलेल्या माझ्या पतींना ओळखायला त्याला कठीण गेलं नसावं हे मी ओळखलं. म्हणजे त्याच काय आहे.. तसं पण एक संसारी पुरुष दुसऱ्या संसारी पुरुषाला बरोबर ओळखता येतो... त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव समजून येतात ना... नाही का? मी मनातल्या मनात हसत विचार करत होते.

" सुप्रिया... तुला सांगतो मॉनिटर होती वर्गात ही माझी मैत्रिण.. आणि जर कुणी थोडं जरी मस्ती करताना हिला दिसलं ना की फळ्यावर नाव लिहून ठेवायची ... माझं नाव तर पहिलं असायचं... मग सरांचा ओरडा खायला लागे... हो ना रूपाली?" तो हसत माझी ओळख पत्नीला करून देत होता.
त्याच्या त्या ओळख परेडच्या कार्यक्रमात पतीदेव गालातल्या गालात हसत होते हे मात्र माझ्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही.

" तुम्ही खूप खोड्या करत असणार? मग लिहिणार नाही का तुमचं नाव फळ्यावर?" त्याची पत्नी गोड हसत म्हणाली.

तिच्या ह्या उत्तरावर मात्र मला हसू आलं.

" मुलीचा वाढदिवस आहे परवा ...म्हटलं तिच्यासाठी चांगले कपडे घ्यावे म्हणून आलो होतो येथे!..."

" अरे वा... छान ! " त्याच्या लेकीला चॉकलेट देत वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करत थोडीफार ख्याली- खुशाली विचारत आम्ही निरोप घेतला.

" भारीच ओळख करून दिली तुझ्या मित्राने तुझी त्याच्या पत्नीला!" म्हणजे लहानपणापासून दुसऱ्यांना विनाकारण छळायचं ही सवयच आहे वाटतं बाईसाहेबांची!" हसत- हसत माझी टर खेचणाऱ्या पतीदेवांवर एक लटक्या रागाचा कटाक्ष टाकत म्हटलं ... "पुरे झाली चेष्टा... चला आता निघूया... उचला त्या पिशव्या".

तिथून निघाले पण डोक्यात त्याचेच विचार येत होते. दहा वर्षांपूर्वीचा तो हाच ' सुमित म्हेत्रे ' आज संसारी माणूस... एक मायाळू पिता.. एक प्रेमळ पती... म्हणून माझ्या समोर आला होता. चला! म्हणजे सुदैवाने त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली तर!..

×××× ×××× ××××

" रूपाली... माधव नानांच्या संस्थेचे ऑडिट रिपोर्ट तयार झाले का? आज ते घ्यायला येणार आहेत... सगळे पेपर तयार ठेव!" बॉसची आज्ञा शिरसावंद्य मानून मी रिपोर्ट तयार करायला लागले.

'माधव नाना ' शहरातले एक प्रसिद्ध जेष्ठ समाजसेवक. शहरातील सगळ्या वर्गातील लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते. तळा-गाळातील गरीब , कष्टकरी , वंचित लोकांसाठी ते ' देव माणूस' होते. त्यांच्या सेवाभावी संस्थेचे ऑडिट चे काम मी बघत असे. मला त्यांच्या समाजकार्याचे नेहमी कौतुक वाटे.

" या नाना... कसे आहात?"

" उत्तम! फक्त तेवढी गुडघेदुखी मध्येच उगवते.. तेवढं सोडलं तर देवाच्या कृपेने सारं सुरळीत चाललयं माझं!" माझ्या समोरच्या खुर्चीवर बसत नाना म्हणाले.

त्यांना रिपोर्टवर कुठे कुठे सह्या करायच्या हे सांगत असतानाच त्यांनी कुणाला तरी फोन लावला. फोन वर म्हणाले , " अरे सुमित, गाडीत पिशवी आहे ना त्यात आपल्या संस्थेचे स्टॅम्प राहिलेत ते घेवून ये बरं..."
'सुमित' नाव कानावर पडताच मी जरा चमकले.
टेबलावर स्टॅम्प ठेवल्याच्या आवाजाने मी फाईल मधून डोकं बाहेर काढलं तर 'सुमित म्हेत्रे' माझ्यासमोर उभा..

" अरे.. तू इथे?" मी चकीत होत विचारलं.

" हो.. नानांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे मी" असं म्हणून तो तिथून गेला.

" तू ओळखतेस... सुमितला?"

" हो.. नाना सातवीपर्यत एकाच शाळेत.. एकाच वर्गात होतो आम्ही.. तुमच्याकडे काम करतो का आता?".

" हो... तुला त्याचा भूतकाळ ठाऊक असेलच!"

" हं.. हो... पण दहा वर्षांपूर्वीचा तो' सुमित' नाही दिसत मला आता.. 'वाल्याचा वाल्मिकी केला तुम्ही नाना... धन्य आहात तुम्ही! खूप पुण्याचं काम केलंत तुम्ही"...

"अगं ..माझं कामच आहे ते तळा-गाळातल्या लोकांना आधार द्यायचा आणि वंचित लोकांना मार्ग दाखवायचा... माझं कर्तव्य समजूनच करतोय मी!"

" कसं केलतं नाना तुम्ही हे सारं?" माझं कुतुहूल काही शमत नव्हतं.

"आपल्या शहरातील पोलिस इन्स्पेक्‍टर चंद्रकांत पाटील आहेत ना... त्यांचे खरे उपकार आहेत सुमितवर.. खरंतरं खूप कडक शिस्तीचा माणूस इन्स्पेक्टर चंद्रकांत पाटील .. पण आतून अगदी फणसासारख्या मऊ हृदयाचा... रोज गुन्हेगाराची गाठ पडते त्यांची... गुन्हेगार म्हणून कोण किती पाण्यात आहे ह्याची चांगलीच पारख आहे त्यांना... सुमित जरी गुन्हे करायचा ना पण त्यांनी त्याच्यामधला एक हुशार, प्रामाणिक मुलगा ओळखला. परिस्थितीमुळे गुन्हेगारी विश्वाच्या वाटेवर निघालेल्या सुमितला माझ्या हवाली करीत ते म्हणाले.. " नाना! तुम्ही सुमितला पदरात घ्या.. तुम्ही त्याचे आई-वडील बना..तुमच्या सानिध्यात राहिल्याने काही सकारात्मक बदल नक्कीच त्याच्यात होतील.. असं म्हणत त्यांनी त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. सहा महिने व्यसनमुक्ती केंद्रात राहिला तो... पण मुळात चांगला स्वभाव असल्याने माणसांत यायला त्याला जास्त वेळ लागला नाही. माझ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून ठेवलाय मी त्याला कामाला ...आमच्या संस्थेच्या आधार केंद्रांत असणाऱ्या अनाथ सुप्रियाशी लग्न लावून संसाराच्या वाटेवर नेऊन सोडलयं त्याला... संसारवेलीवर एक फूल पण उमललं आहे त्याच्या... दोघेही समाधानाने नांदत आहेत... अजून काय हवं ? माझा आशीर्वाद तर कायम असेल त्याला!" असं म्हणत नाना खुर्चीवरून ऊठू लागले.

" बरं .. निघू मी आता?"

" हो .. हो .. नाना तब्येतीची काळजी घेत जा आणि धन्यवाद तुम्हांला ....माझ्या भरकटलेल्या वर्गमित्राला योग्य दिशा दाखवलीत! देव तुम्हांला दिर्घायुष्य देवो!".

माझे धन्यवाद आणि शुभेच्छा स्वीकारत नाना ऑफीसमधून बाहेर पडले. त्यादिवशी मात्र माझ्या डोक्यात कुठल्याच प्रश्नांनी फेर धरला नाही... मनाच्या गाभार्‍यात खूप समाधान मात्र वाटलं ...
×××× ××××× ××××

केळवा बीच ... माझं नेहमीचं आवडतं ठिकाण... शांत-निवांत सागर किनारा... सोनेरी संध्याकाळ आणि सोबतीला गप्पा मारायला आपला आयुष्याचा जोडीदार.. बस ! एवढीच सुखाची कल्पना... क्षितिजा पलिकडे मावळतीला जाणारा सूर्यदेव आणि तिच्यावर उमटलेली संध्या प्रकाशाची लाली... मला नेहमीच आकर्षण वाटतं त्याचं... सुरुच्या बागेत गप्पा मारत आम्ही उभयतां बसलो होतो. अचानक जवळून लहान चिमुकल्या बाळाच्या बोबड्या बोलांनी माझं लक्ष वेधले.

" शुक्... शुक्.. सुमित !"

"अरे... रूपाली ! तू इथे ?"

"कसा आहेस?"

" छान"!

" कश्या आहात ताई?" त्याच्या पत्नीचा मंजुळ आवाजातला प्रश्न...

" मी मस्त! तू कशी आहेस ?

"मी पण मजेत आहे... केळव्याची शितलादेवी आमची कुलदेवता म्हणून आलो होतो देवीची ओटी भरायला जोडीने...!"

" कसं चाललंय तुझं सुमित?"

" नानांच्या आशिर्वादाने सारं काही सुरळीत चाललयं...!"

"ए बाबा... मला लाल फुगा पाहीजे! दे ना मला"! त्याच्या लेकीचे बोबडे बोल मी कौतूकाने ऐकत होती त्याच्या गळ्यात पडून त्याच्या गालावर आपल्या नाजुक हाताने त्याची लेक चापट मारत होती आणि बाप-लेकीचं उतू जाणारं प्रेम त्याची पत्नी अतिशय कौतुकमिश्रीत नजरेने पाहत होती.

" खूप गोड आहे तुझी लेक.. तिच्या गालांवरच्या खळ्या सांगातायेतं बरं.. आपल्या बाबाची लाडकी आहे म्हणून"!

" हो गं .. रुपाली! आईच परत आलीयं माझी...माझ्या आयुष्यात... परत एकदा जन्म घेऊन... तिला हसताना पाहीलं ना की माझी आईच येते डोळ्यासमोर... तिच्या डोळ्यात आईच प्रेम शोधतोय गं .!" भावूक होत डोळ्यांतले अश्रृ लपवित तो म्हणाला.

" सुमित... एक वाईट स्वप्न म्हणून नकोसा वाटणारा भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न कर... बघ ... देवाने तुझ्या लेकीच्या आणि सुप्रियाच्या रुपाने आनंद आणला आहे की नाही? हा जो आपला चेहरा आहे ना ..तो आपल्या मायेच्या, प्रेमाच्या, लाडक्या व्यक्तींच्या प्रेमळ आणि नाजूक चापटा खाण्यासाठी आहे ... गुन्हेगार म्हणून पोलिस आणि लोकांकडून फोडून घेण्यासाठी नाही दिलायं निसर्गाने... ... एवढं मात्र लक्षात ठेव!"

" आणि बरं का सुप्रिया .. चांगला घट्ट मुठीत पकडून ठेव बरं तुझ्या नवऱ्याला... बिल्कूल सोडू नकोस ... हा .. पण सोबत प्रेमाची, मायेची आणि विश्वासाची मिठी पण सैल पडू देऊ नकोस बरं ! आणि दोघेही ओळख ठेवा बरं!" असा प्रेमळ सल्ला देत आम्ही एकमेकांचा निरोप घेतला . दूरवर तिघेही नजरेआड होईपर्यंत मी समाधानाने त्यांच्या पाठमोर्‍या आकृतींकडे पाहत होते.. त्यांचे भावी आयुष्य सुखाचे जावो म्हणून मनोमन देवाला प्रार्थना करत होते....

" दुसऱ्यांना दिलेला सल्ला आपण स्वतःही आचरणात आणायचा असतो ...असं मी म्हणत नाही... तर कोणी महान व्यक्तीने म्हटलं आहे बरं... नाहीतर लोकां सांगे ब्रम्हज्ञान... आपण.........." माझ्या डोक्यात टपली मारत...मला चिडविण्याची एकही संधी न सोडता पतीदेव म्हणाले...

" पूरे आता... किती हा दुष्टपणा...! " मी लटक्या रागाने म्हणाले.

" राणीसाहेब...चला निघूया आता.. तुमच्या आवडीचा फालुदा खायला!"

मग काय ... .. डाएट को मारो आज गोली... दोन फुल ग्लास फालुदा ...ती रम्य सोनेरी संध्याकाळ... सूर्यकिरणात लांब होत जाणाऱ्या स्वतःच्या सावल्या आणि दूरवर कानावर पडणारे लतादिदींच्या सुमधुर आवाजातले " जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गीत...

"सुख ... सुख म्हणजे अजून काय असतं हो?"

धन्यवाद!
समाप्त!

रुपाली विशे- पाटील

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

धन्यवाद सुखदा...

धन्यवाद विनिताजी... तुमच्या प्रतिसादाबद्दल..
कथेचा पहिला भाग जवळपास वास्तवात घडला आहे.. काही काल्पनिक प्रसंग सोडले तर...
कथेचा दुसरा भाग मी माझ्या कल्पनेनुसार रचला. जर खरचं त्याच्या आयुष्यात असं सकारात्मक घडलं असेल तर तो खूप सुदैवी असेल. दुसऱ्या भागातलं माधवनानाचं वास्तवातलं पात्र मी जवळून पाहिलयं... त्यांचे निस्वार्थी समाजकार्य पाहीलयं...
कॉलेजपासून ते नोकरी करे पर्यंत रेल्वेच्या प्रवासात , कामाच्या ठिकाणी एवढ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती भेटल्या की मला आता खरचं कथेत त्यांच व्यक्त्तीचित्रण करावसं वाटतं. तुम्ही मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद विनिताजी...

प्रतिसाद समजून घेतल्याबद्दल धन्स रुपाली Happy
समाजसेवक खूप करतात, पण बरेचदा नेकी कर...असे असते. कारण समोरचा सकारात्मक प्रतिसाद देईलच असे नाही.

लिहीत रहा Happy

खूप छान लघुकथा. फारच लवकरच समाप्त झाली. असो, पहिल्याच प्रयत्ना बद्दल हार्दिक अभिनंदन. तुमच्या कथेतील कल्पनेनुसार समाजातील गुन्हेगार असेच सुधारावेत हीच सदिच्छा. पुढील कथेसाठी हार्दिक शुभेच्छा.