चालू प्रवास आहे

Submitted by निशिकांत on 1 November, 2020 - 08:32

रस्ताच देश चुकला माझा कयास आहे
हा कोणत्या दिशेने चालू प्रवास आहे

गरिबास भूक छळते भाळी उपास आहे
लोकास मोजक्या का पक्वान्न खास आहे?

नुसत्या सरासरीला रंकास मोजती अन्
उत्पन्न राव घेती कसला विकास आहे?

या राजकारण्यांनी लफडी हजार केली
करण्यास माफ त्यांना होतो तपास आहे

शेतीप्रधान देशी का "जय किसान" नारा?
शेती कसून, कसतो नरड्यास फास आहे

रडतोय तो मृतात्मा पाहून चोर सारे
"हे राम" ज्योत करते विझण्या प्रयास आहे

पडलेत वळचणीला श्रीमान सत्त्यवादी
छाटून पंख त्यांना केले खलास आहे

तरुणास वाव द्यावा नेते जरी म्हणाले
खुर्चीस मात्र वारस केले मुलास आहे

जे जे घडूनये का "निशिकांत" तेच घडते?
समजाव तू तुला रे सारे झकास आहे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users