दैव

Submitted by रूपाली विशे - पाटील on 1 November, 2020 - 06:02

(मनोगत - नमस्कार रसिक वाचक मित्र- मैत्रिणींनो! मी पहिल्यांदाच कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सदर कथेवर तुम्ही केलेल्या सूचना मला स्वागतार्ह आहेत. )

दैव !

"शुक ..शुक.. रूपाली !".. ह्या हाकेने मी क्षणभर जागच्या जागी थबकले. एकमेकांना अश्लिल भाषेत शिव्या देत रस्त्याच्या मधोमध चालणाऱ्या त्या सात ते आठ टारगट दिसणाऱ्या मुलांच्या घोळक्याला टाळून मी झपाझप पावले उचलत ऑफिसच्या दिशेने निघाले होते आणि.. आणि .. अचानक त्या मुलांमधून माझ्या नावाचा पुकारा ऐकून माझे अवसान गळाले. त्या घोळक्यात माझ्या ओळखीचे कुणी असण्याचा प्रश्नच नव्हता. पण मग माझं नाव कोणी उच्चारलं असेल? एक क्षण थांबून मी मान वळवून पाहिले पण ओळखीचा एकही चेहरा दिसत नव्हता. तेवढ्यात त्या घोळक्यातून एक ठेंगणा पण गोर्‍या चेहऱ्याचा मुलगा पुढे आला. तोंडातला गुटखा थुंकत माझ्याकडे पाहून तोंड भरुन हसला. त्याचे ते गुटखा खाऊन लाल - पिवळे झालेले दात पाहून मला कसंतरीच वाटलं. नेमकी त्यादिवशी रस्त्यावर वाहतूक पण तुरळकच होती. मनातून खूप घाबरले होते मी...

" मी ... मीच हाक मारली तुला रूपाली! ओळखलं नाहीस का मला?" त्याच्या त्या अवताराकडे पाहून माझ्या घश्यातून आवाज फुटतच नव्हता. स्वतःला सावरत मी म्हणाले , "माफ कर पण.. मी तुला खरचं ओळखलं नाही "आणि भराभर पाय उचलू लागले.

" रूपाली , एक मिनिट थांब! मी.. मी.. सुमित म्हेत्रे , सातवी ब, आता तरी लक्षात येतेयं का माझं नाव? " मी नाव ऐकून क्षणभर थांबले. क्षणात दहा वर्षांपूर्वीचा चेहरा डोळ्यासमोर आला. वर्गात नेहमी खोड्या काढणारा, वकृत्व स्पर्धेत हिरीरीने भाग घेणारा, पहिल्या दहा मुलांच्यात नंबर मिळविणारा, गोबऱ्या गालांचा माझा वर्गमित्र असणारा निरागस 'सुमित म्हेत्रे' हा कसा असू शकेल? माझ्या चेहर्‍यावरचा गोंधळ त्याने ओळखला असावा. मग त्याने वर्गातील इतर मित्र-मैत्रिणींची नावे घेण्यास सुरुवात केली. त्याला बोलताना मध्येच थांबवित मी म्हणाले, "हो.. आलं लक्षात माझ्या... आठवलं मला तुझं नाव... कसा आहेस?" काहीतरी विचारायचं म्हणून उगाच आपलं विचारलं. खरं तर त्याच्याशी संवाद वाढविण्यात मला काडीमात्र रस नव्हता कारण त्याचा तो मवाल्यासारख्या अवतार आणि तसाच दिसणारा त्याचा मित्र परिवार त्याला कारणीभूत होता. तो आपल्या सोबत चालू नये म्हणून मी त्याला थोडं टाळून पुढे चालत होते.उगाच कुणी ओळखीच्या व्यक्तीने त्याच्या सोबत पाहिलं तर विनाकारण गैरसमज व्हायचा आणि मला ते नको होतं.

" मी सातवीत असताना बाबांची बदली झाली आणि इथे आलो. नंतर आपली शाळा सुटली आणि मग सगळे मित्र- मैत्रिणी आणि मैत्री पण सुटली. तुला रोज स्टेशनवर बघतो मी! नऊच्या सुरत शटलने येतेस ना तु?".
बापरे! म्हणजे हा रोज आपल्या पाळतीवर आहे की काय ? मनात उगाच शंका आली.

"हो .. हो .. त्याच ट्रेनने येते मी. बरं..मी जरा घाईत आहे , निघते मी आता."

" ठीक आहे.. पण ओळख ठेव बरं!".
हुश्श! सुटले बाबा एकदाचे !
मनोमन असं म्हणाले खरं पण पूर्ण दिवस त्याचेच विचार डोक्यात फिरत होते. चांगली सरकारी नोकरी असलेले वडील, आई आणि दोन भाऊ असे चौकोनी मध्यमवर्गीय असणारे कुटुंब.. मग हा असा उनाडसारखा का फिरतोय? मी त्याला त्याचे शिक्षण, नोकरी या बद्दल काही विचारलं सुद्धा नाही कारण त्याच्या एकंदरीत देहबोलीवरून त्याची काही विचारपूस करावी हे मला सुचलंच नाही.

×××× ×××× ××××

रोजचा रहाट गाडा चालू होता. दिवस भराभर उलटत होते. रोजच्या धावपळीत मी तो प्रसंग विसरूनही गेले. एके दिवशी बँकेत काही कामानिमित्त गेले असताना बँकेच्या खाली एका दुकानाजवळ तो दत्त म्हणून उभा. आता त्याला कसं बरं टाळावं हा विचार करतच होते तेवढ्यात स्वारी पुढ्यात येऊन उभी राहिली.

"बँकेत आली होतीस?"

"हो, काम होतं थोडं, तू पण बँकेतच आला होतास का ? " काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं.

" बँकेत आलो तर रात्रीचा येईन दरोडा घालायला ... दिवसा काय काम माझं बँकेत?" खो - खो हसत आपले लाल - पिवळे दात दाखवत तो म्हणाला.

काय बोलतोयं हा...मस्करी तरी बँकेच्या खाली उभा राहून करत जाऊ नकोस रे बाबा! मनातल्या मनात असं म्हणत तिथून मी काढता पाय घेतला.

××××××× ×××××××

"काय गं .. रुपाली.. दुपारी बँकेच्या खाली कुणासोबत गप्पा मारत होतीस?" संध्याकाळी स्टेशनवर विणा मावशीने अचानक माझ्यावर प्रश्नाचा बॉम्ब टाकला. विणा मावशी म्हणजे माझ्या सोबत प्रवास करणाऱ्या माझ्या सहप्रवासी. त्या सरकारी खात्यात नोकरी करीत होत्या.
विणामावशींनी अचानक विचारलेल्या प्रश्नावर मी जरा गडबडले. ज्या गोष्टींची भीती वाटत होती ती प्रत्यक्षात घडली तर!

" तुम्ही बँकेत आल्या होत्या का मावशी? एक जुना वर्गमित्र भेटला होता. थोडीशी ख्याली - खुशाली विचारत होता बाकी काही नाही."

" तुझी खूप मैत्री आहे का त्याच्याशी ?" वीणा मावशीचा प्रतिप्रश्न ऐकून मला त्यांचा खूप राग आला होता. एवढ्या चौकश्या करायची काही गरज होती का? त्यांच्या बोलण्याचा आलेला राग गिळत मी म्हणाले,

" माझ्या शाळेत होता तो सातवीपर्यंत. वडिलांची बदली झाली आणि मग त्याने शाळा बदलली आणि आता एवढ्या वर्षात अचानक असा भेटला. बाकी जास्त काही मैत्री नाही."

माझ्या चेहर्‍यावरचा राग मावशींनी जाणला असावा ," वाईट नको वाटून घेऊस गं .. ठीक आहे ...पण आता पुढे जर तो तुला भेटला तर त्याच्याशी जास्त बोलत बसू नकोस. कुणी तुला त्याच्याशी बोलताना पाहिलं तर तुझ्याविषयी गैरसमज होईल आणि विनाकारण तुला त्याचा त्रास होईल".

" काय झालं मावशी ? त्याला तुम्ही ओळखता का?" मी कुतुहलाने मावशींना विचारलं.

" हं.. ओळखते म्हणजे त्याचे वडील माझ्या खात्यातच कामाला आहेत. मोठी दुर्दैवी कहाणी आहे त्यांच्या कुटूंबाची" मावशी हळव्या होत म्हणाल्या.

"तुला सांगितलं नाही का त्याने?"

"नाही हो मावशी, एवढी पण मैत्री नाही त्याच्याशी आणि एकंदरीत त्याचा अवतार पाहून मला त्याच्या परिस्थितीची पुसटशी कल्पना आली होती. पण त्याला काही विचारण्याची माझी हिंमत झाली नाही. जवळ-जवळ दहा वर्षाने त्याच्याशी भेट झाली आहे. मी तर पहिल्यांदा त्याला ओळखलेच नाही!!"

" त्याच्या आईने दोन्ही मुले शाळेत असतानाच नवर्‍याच्या व्यसनापायी आत्महत्या केली. मुलं लहान म्हणून वडिलांनी दुसरं लग्न केलं पण सावत्र आईने पोरक्या झालेल्या मुलांना माया लावायचं सोडून त्यांचा छळ मांडला. मुलांविरुद्ध नवऱ्याचे कान भरायला सुरूवात केली. आईच्या मायेला पारखी झालेली दोन्ही मुले अभ्यासात मागे पडत गेली. घरात जावे तर सावत्र आई आणि वडिलांचा मार खावा लागायचा. शेवटी नाईलाजास्तव दोघेही बाहेर मन रमवू लागली. वादळाच्या गर्तेत सापडलेल्या बोटीसारखी दोन्ही मुलांची अवस्था झाली. त्यात भर म्हणजे संगत वाईट लागली.लहान वयातच दोन्ही मुले व्यसनांच्या आहारी गेली. मोठा मुलगा तर हाफ मर्डर च्या गुन्ह्यात जेलमध्ये गेलायं आणि हा असाच कुठे मारामाऱ्या कर, भुरट्या चोऱ्या कर ...असल्या गुन्ह्यात पोलीस चौकीत पाहुणचार घेऊन येतो. म्हणून सांगते, तुला त्याच्यापासून शक्यतो लांब रहा", मावशी पोटतिडकीने सांगत होत्या. परंतु त्यांच्या बोलण्यात त्या दोन्ही भावंडाबद्दल सहानुभूती वाटत होती हे मात्र मला जाणवत होतं. हे सारे ऐकून मला एक क्षण काही सुचलंच नाही. हाच तो मुलगा जो पहिल्या दहामध्ये नंबर मिळवायचा. हसरा, खोडकर, शाळेत होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारा तो माझा वर्गमित्र आज भुरटा चोर, गुन्हेगार बनला होता? शाळेतल्या गॅदरिंग मध्ये पोलिसांची भूमिका करणाऱ्या त्याच्या अभिनयाला दाद देत टाळ्या वाजविताना आमच्या कुणाच्याही मनात असा विचार आला नसेल की आज जी पोलिसाची भूमिका तो करतोय आणि त्याच्या हातात आहे जी बेडी आहे ती भविष्यात त्याच्या हातात गुन्हेगार म्हणून पडेल?.
नशिबाचे फासे कधी उलटे पडतील हे नियती शिवाय कुणीच जाणू शकणार नाही. दोन दिवस माझ्या डोक्यात त्याचेच विचार फिरत होते. खरंतर मानवी जीवन घड्याळाच्या काट्यावर अवलंबून असते. रोजच्या कामाच्या व्यापात मी हळूहळू गुंतत होते. त्यामुळे त्याचे विचार डोक्यातून मागे पडत चालले होते आणि अचानक एके दिवशी सोशल मीडियावरील एका वादग्रस्त पोस्टमुळे शहरात दंगल उसळली. एरव्ही शांत असणाऱ्या शहरात दोन समाजामध्ये तणाव वाढला. समाजकंटकांकडून दंगलीत मालमत्तेची तोडफोड तसेच दगडफेक करण्यात आली. शहरातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं. दंगलीचे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर गेले. स्थानिक राजकारण पण जोरात पेटलं. रस्यावरून पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाच्या गाड्या फिरू लागल्या. सगळीकडे दंगलीच्या घटनेच्या चर्चा चघळल्या जात होत्या. त्याला माझं ऑफिस काही अपवाद नव्हते. असेच एके दिवशी जेवणाच्या सुट्टीत वृत्तपत्रे चाळत असताना शहरातून जे स्थानिक वृत्तपत्र निघायचे त्यावर माझी नजर गेली आणि मुख्य पानावरील बातमी वाचताच मी खूप अस्वस्थ झाले.
'शहरात झालेल्या दंगलीमध्ये दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या माथेफिरू समाजकंटकांना अटक' या मथळ्याखाली आरोपींचे फोटो आणि त्यांची नावं होती. त्या चार फोटोमधला एक ओळखीचा चेहरा बघून मला काही सुचेना. माझ्या चेहर्‍यावर अस्वस्थता वाढलेली पाहून ऑफिसमधले माझे सहकारी म्हणाले," काय झालं रूपाली ? तुला बरं वाटत नाहीये का ?" मी त्यांना वृत्तपत्रातील बातमी आणि फोटो दाखवीत सगळी कहाणी ऐकवली. त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर माझं मन अजूनच बधीर झालं. त्यांनी जे सांगितलं ते असं.. समाजात घडणारी दंगल म्हणजे एक प्रकारचं घाणेरडं राजकारण असतं. कधी - कधी स्वतःच्या राजकीय फायद्यासठी अश्या दंगली घडविल्या जातात आणि दगडफेक, दंगल माजविणारे गुन्हेगार हे राजकारण्यांचे पाळलेले भाडोत्री गुंड असतात, जे पैशासाठी कोणतेही काम करायला तयार असतात. गुंड प्रवृत्तीची हिचं मुले गुन्हेगार म्हणून जेलमध्ये जातात आणि परत राजकारण करणारे लोक त्यांना जामिनावर सोडवून आणतात आणि आपल्या राजकीय स्वार्थापोटी त्यांचा मोहरा म्हणून वापर करतात.

अरेरे! किती दुर्दैवी आहे सगळं. त्या बातमीने माझा पूर्ण दिवस खिन्न मानसिक अवस्थेत गेला.

योग्य वयात चांगली संगत व योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने माझ्या वर्गमित्राचे ऐन तारुण्यातील आयुष्य अकाली कोमजुन गेल्यासारखं वाटत होतं. पण फक्त एवढेच कारण होतं का नियतीने माझ्या वर्गमित्राला चुकलेल्या वाटेवर आणून ठेवायला? एक हुशार, हसरा, उत्साही मुलगा असा वाया जात असलेला पाहून मन खूपच विषण्ण झालं होतं. मनात त्याच्याबद्दल जेवढी सहानुभूती वाटत होती तेवढीच त्याच्याबद्लच्या भीतीने सुद्धा जागा व्यापली होती. पुढे कुठेही तो आपल्या समोर येता कामा नये आणि यदा-कदाचित जर समोर आलाच तरी आपण त्याला टाळायला हवे, हे मात्र मी ठरवून टाकले होते. एक सामान्य व्यक्ती म्हणून अजून काय करू शकणार होते? त्याला ओळख दाखवून उगाच लोकांच्या नजरेत कशाला प्रश्न निर्माण होऊ द्यायचे? पांढरपेशा समाजात राहताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो हे मात्र खरं..

××××× ××××× ××××

अशीच एक शनिवारची दुपार ...प्लॅटफॉर्म क्रमांक एक... मी मुंबई-अहमदाबाद पॅसेंजर ट्रेन ची वाट बघत पेपरात डोकं खुपसून बसले होते.

"साला..××× चोरी करता है ?पाकीट मारता है? मारो ××× ××× जोर-जोरात शिव्यांची लाखोली वाहणारा आवाज आणि गोंधळ वाढल्याने काय चाललंय म्हणून बघायला मी पेपर वरून नजर हटवली ..आणि समोर घडणारे दृश्य पाहून मी सुन्न झाले. प्लॅटफॉर्मवर जमलेले लोक लाथाबुक्क्यांनी एका व्यक्तीला मारहाण करीत होते. कुतुहूल वाढले म्हणून तिथे नजर फिरवली तर .. तर.. दुर्दैवाने ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तीच निघावी जी माझा वर्गमित्र म्हणून मला ज्ञात होती... 'सुमित म्हेत्रे'!

तो गुन्हेगार बनला होता.. रंगेहाथ पाकीट मारताना पकडला गेला होता. त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा पब्लिक त्याला देत होती. मार खातानाही त्याच्या चेहऱ्यावर एका गुन्हेगाराजवळ असतो तसा निगरगट्टपणा दिसत होता. कदाचित त्याला या गोष्टींची सवय झाली होती. गोंधळ वाढलेला पाहून रेल्वे पोलीस आले. त्यांनी त्याला त्या संतापलेल्या पब्लिकच्या तावडीतून बाहेर काढलं. त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आणि दोन कानफटात लगावून देत त्याला जागेवरून उठवलं आणि हे .. हे नकोसं वाटणारं दुर्दैवी दृश्य लांबून माझ्या नजरेस पडत होतं. मला क्षणभरही तिथे थांबावसं वाटत नव्हतं...पण जाणार तरी कुठे ? नाईलाजाने होते त्या जागेवरच बसून राहिले. एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवरच रेल्वे पोलीस चौकी होती तिथे आता त्याची रवानगी होणार होती. आजूबाजूचे लोक त्याला खूप शिव्या घालत होते. त्यांचे शिव्या घालणे स्वाभाविकच होते. गुन्हा तर त्याने केला होता मग त्याचे परिणाम तर भोगावेच लागणार! माझ्या समोरून पोलिस त्याला घेऊन जात होते. मी जाणीवपूर्वक तिथे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते पण डोळ्याच्या कोपऱ्यातून नजर मात्र त्याच्याकडेच लागली होती . मलूल झालेला चेहरा, नाका-तोंडातून वाहणारे रक्त .. पण एवढा मार खाऊनही चेहर्‍यावर बेपर्वाईचे भाव...

एक क्षण .. फक्त एक क्षण... त्याची नजर माझ्यावर पडली. तो चमकला ... बावरला.. त्याने नजर खाली झुकवली. कुठेतरी त्याच्या डोळ्यात मला चमकणारे अश्रू दिसले. त्याची नजर मला केविलवाणी भासली ...की मला फक्त तसा भास झाला? मला काही समजत नव्हतं.पण एक सत्य मात्र उमगलं होतं, गुन्हेगार म्हणून जन्माला कुणीचं येत नसतं. चुकीच्या वाटेवर पडणारं पहिलं पाऊल सावरणारं कुणी नसलं की मग आयुष्याची अशी वाताहत होते हे मात्र खरं! दोष तरी कुणाला द्यावा ? दोन चिमुकल्यांना पोरकं करून आत्महत्या करणाऱ्या त्याच्या सख्ख्या आईला की डोक्यावर नकोशी असलेली मुलांची जबाबदारी टाळणाऱ्या सावत्र आईला की त्याचे वडील स्वतः जबाबदार होते ही सारी परिस्थिती निर्माण व्हायला ...की मग तो स्वतः च अशा वादळात भरकटलेल्या नावेसारख्या आपल्या आयुष्याला कारणीभूत होता? त्याला कधीच काय चुकीचं .. काय योग्य...हे समजलं नसेलच का? ज्या वाटेवरून आपण चालतोय ती वाट आपल्या आयुष्याचा -हास करणाऱ्या शेवटाकडे आपल्याला घेऊन चाललीयं हे त्याला सुचलंच नसेल का?

प्रश्न .. प्रश्न आणि प्रश्नच! डोक्यात चालू असणारे प्रश्नाचे विचारचक्र काही थांबायचे नाव घेत नव्हते. गाडीच्या हॉर्नने मी भानावर आले आणि जड पावलांनी आणि जड अंतःकरणाने गाडीच्या दिशेने चालू लागले ...आपल्या पुढील प्रवासासाठी....

समाप्त

धन्यवाद..

रूपाली विशे- पाटील
×××× ××××× ××××

टिप- वरील कथा काल्पनिक असून जर नाव आणि घटनेत काही साध्यर्म आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहेस
या कथेचा एक पुढचा भाग पण येऊदे.या माणसाचं पुढे काय झालं?त्याच्याशी बोलण्याची,सुधारण्याची संधी मिळाली का?

@ अज्ञातवासी - माझ्या पहिल्या कवितेवर आणि पहिल्या कथेवर पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार...
@ श्रद्धा - धन्यवाद श्रद्धा
@ वीरू - धन्यवाद .. वीरुजी तुम्ही कथा लिहायला लागलात आणि कथा लिहायला मला प्रेरणा मिळाली तुमच्याकडून..
@ अनु - धन्यवाद.. कथेतील पात्र तसे वास्तवात आहे. पण पहिल्या प्रसंगानंतर त्या पात्राची परत तशी भेट झाली नाही. पण स्थानिक पेपरात नेहमी त्याच नावं आरोपी म्हणून असायचं आणि आता मी जुनी नोकरी हि सोडली. आता त्या स्टेशनवरचा प्रवास ही संपला त्यामुळे पुढे त्याचं काय झालं ह्याची कल्पना नाही. पण त्याची परिस्थिती हाताबाहेर गेली होती हे मात्र निश्चित..
@ अस्मिता - धन्यवाद.. आपण खरचं हतबल असतो परिस्थितीपुढे.
@ मृणाली आणि सामो - प्रोत्साहनासाठी धन्यवाद.

सुंदर कथा. तंतोतंत प्रसंग नजरेसमोर उभे राहिले. कथा जरी काल्पनिक असली तरी वास्तववादी आहे. समाजात खूप गुन्हेगार असे आहेत जे त्यांना मान्य नसले तरी आपोआपच या विश्वात ओढले जातात. पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.

@ मनस्विता - धन्यवाद प्रतिसादाबद्दल...
@ शशांकजी मनापासून धन्यवाद तुमचे..
@ किशोरजी तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनपर प्रतिसाद साठी धन्यवाद..
@ सामो - खरचं ! परतीची वाट खूप बिकट असते अश्या परिस्थितीत...

>>बिकट असते>> नाही रुपाली बिकट नाही. प्रेतच येतं या वाटेवरुन अर्थात मी अंडरवर्ल्ड गँग्ज बद्दल बोलते आहे.

सामो - भयानक वास्तव आहे ते....
लावण्या - धन्यवाद
किल्ली - धन्यवाद.... कथेतल्या पात्राचं पुढे काय झालं काही कल्पना नाही पण त्याच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक घडलं असेल अशी कल्पना करून कथेचा दुसरा भाग लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन...

प्रोत्साहनासाठी मनापासून आभार तुमचे च्रप्स आणि सनव...
धन्यवाद king_of net - आपल्या ओळखीत किंवा आजूबाजूला घडताना हे पाहीलं की खूप वाईट वाटतं.

अस वाटलच नाही की कथा वाचतोय. कदाचित तुमच्या आयुष्यात घडलेली सत्यघटना असु शकेल असच वाटत होतं.
छान लिहीलेय. पुलेशु.

धन्यवाद जेम्स बाँन्ड - तशी कथा वास्तवातील पात्रावरच आधारित आहे.. काही प्रसंग काल्पनिक आहेत एवढचं...

छान कथा. माहितीत असच एक उदाहरण खूप वर्षांपासून बघतेय. फक्त फरक एवढाच आहे की मोठा मुलगा गुन्हेगार झालाय पण लहान मुलगा सतत व्यसनी वातावरणात राहून कदाचित त्याचा उबग येऊन निर्व्यसनी राहिला. नोकरी करून वेगळा राहून आपल्या कुटुंबासोबत छान राहतोय.
त्यामुळे रिलेट झाली कथा.

Pages