नववी माळ- प्रेम, दया, सहानुभूती (Love, Compassion)

Submitted by पूजा जोशी on 26 October, 2020 - 06:01

आपल्या सगळ्यांमध्ये जन्मतः असलेली आणि चमत्कार घडवून आणण्याची क्षमता असलेली आणि तरीही सर्वात जास्त दुर्लक्षित असलेली शक्ती म्हणजे आपल्यातली प्रेम करण्याची शक्ती.

प्रेमाची महती कितीतरी संतांनी सांगितलेली आहे. अनेक कवींनी त्याच्यावर काव्य रचलं आहे. अनेक गुरूंनी ते वेगवेगळ्या प्रकारे समजावलं आहे आणि तरीही आपल्याला ही शक्ती पूर्णपणे कळलेली नाही.

प्रेम म्हणजे काय ते समजून घेण्याआधी आपण स्वतःला एक प्रश्न विचारू या. आपल्याला प्रेमाचा अनुभव कुठे कुठे येतो?आपण कोणावर प्रेम करतो?

आई-वडील, आजी आजोबा आपल्या मुलांवर नातवंडांवर प्रेम करतात. पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम असतं. भावंडांमध्ये प्रेम असतं. नातेवाईकांमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये. कोणी प्राण्यावर अतोनात प्रेम करतं तर कोणी साहित्यावर प्रेम करतं. कोणाचं निसर्गावर प्रेम असतं तर कोणाचं स्वतःच्या देशावर....

पण कितीजण स्वतःवर प्रेम करतात?

माझं माझ्यावर प्रेम आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारून बघा आणि या प्रश्नाचे उत्तर स्वतःकडे ठेवा.

आता आपण बघूया प्रेम म्हणजे काय?

प्रेम म्हणजे निस्वार्थी, निरपेक्ष भावनेने समोरच्याला स्वीकारणं. त्याला समानतेने, सहानुभूतीने वागवणं. त्याचा आदर करणं. त्याचं रक्षण करणं. त्याच्या आनंदाचा/ हिताचा विचार करणं आणि त्याला स्वातंत्र्य देणे.

आता या व्याख्येनुसार परत स्वतःला विचारा की मी खरंच कुणावर प्रेम करतो? आणि प्रामाणिकपणे उत्तर शोधा.

जे कृष्णमूर्ती म्हणतात प्रेमाची ही व्याख्या बघितली तर आपल्या लक्षात येईल की आपल्यातला एकही जण स्वतःवर किंवा दुसऱ्यांवर खऱ्या अर्थाने निरपेक्ष प्रेम करत नाही.

Charity begins at home तसंच प्रेम आणि सहानुभूती ची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. I love myself असं किती लोक म्हणतात?

आपण स्वतःवर किती टीका करत असतो ....मला खूप राग येतो, माझे केस कुरळे आहेत, मी थोडी जाडी आहे...... स्वतःच्या हातून चूक झाली तर आपण किती अपराधी वाटून घेतो. दुसऱ्यांशी तुलना करून आपण स्वतःलाच दु:खी करत असतो. आपल्यातले किती जण स्वतःच्या शरीराकडे तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. या सगळ्याचं कारण आपण आपल्यावर प्रेम करत नाही.

आपण स्वतःवर का प्रेम करू शकत नाही:-
- स्वतःवर प्रेम करायचं असतं हे आपल्याला माहितीच नाही.

- स्वतःवर प्रेम करा हे शाळेत किंवा घराघरात शिकवले जात नाही.

- आपल्याला बऱ्याचदा शिकवलं जातं की आपण स्वतःला शेवटी ठेवायचं, आधी दुसऱ्यांसाठी जगायचं, दुसऱ्यासाठी त्याग करायचा. त्यामुळे आपण कधी स्वतःला प्राधान्य देत नाही.

- आपण स्वतःच्या आनंदासाठी जगत नाही. आपण समाजाने आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून जगत असतो. दुसऱ्याच्या नजरेत आपण यशस्वी व्हावं, चांगलं व्हावं अशी आपली धडपड असते. त्या नादात आपण आपल्याला काय हवंय हे विसरून जातो.

- बरेच जण एकटेपणाला घाबरतात. म्हणून ते कायम दुसऱ्यांच्या कलाकलाने जगत राहतात स्वतःच्या इच्छा, भावना मारून.

- आपण मोठे होतो तसा बर्‍याचदा आपल्याला शिकवले जात भावनांना आवर घालण्यासाठी. राग दाखवायचा नाही, स्वतःसाठी हट्ट करायचा नाही. मग आपण मोठेपणी तसंच वागतो. आपल्या भावनांशी आपण प्रामाणिक नसतो. त्या आपण प्रामाणिकपणे व्यक्त करत नाही आणि मग आतल्या आत आपण धुमसत राहतो.

You can heal your life या पुस्तकामध्ये Louis Hay म्हणतात, ' You have been criticizing yourself for years & it has not worked. Try approving of yourself & see what happens'.

स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं?

आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो म्हणजे काय करतो? सगळ्यात आधी आपण त्यांच्यासाठी वेळ देतो. आपण त्यांना चांगला आहार देतो जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगले राहील. ते आनंदी रहावेत, उत्साही रहावेत म्हणून वेगवेगळे प्रयत्न करतो. त्यांच्याबरोबर खेळतो. गप्पा मारतो. गोष्टी सांगतो. त्यांचे छंद जोपासतो. कधी प्रेमाने तर कधी कडक शब्दात त्यांना समज देतो. शिस्त लावतो. त्यांना मिठी मारतो. त्यांना कुशीत घेतो. त्यांना अंजारतो गोंजारतो.

अगदी हेच सगळं अपेक्षित आहे आपण स्वतःवर प्रेम करताना. We have to do re-parenting or self-parenting ... प्रेमाची शक्ती जागवायची असेल तर आधी सुरुवात स्वतःपासून करायची आहे. स्वतःवर प्रेम करायचं आहे. स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थीपणा नाही.

स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं
- स्वतःचा आदर करायचा ,
- स्वतःला आहे तसं स्वीकारायचं
- स्वतःच्या शरीराची विचारांची काळजी घ्यायची
- स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहायचं
- चूक झाली तर स्वतःला माफ करायचं
- स्वतःला सहानुभूतीने वागवायचं
- जे आपल्या हिताचं आणि आनंदाचा नाही ते सोडून द्यायचं
- स्वतःशी सतत संवाद साधायचा
- स्वतःचे छंद जोपासायचे
- स्वतःसाठी वेळ द्यायचा

आरशात बघून रोज स्वतःला एक छान स्माईल देत जा. आपल्या केसांवरून, चेहऱ्यावरून, त्वचेवरून रोज प्रेमाने हात फिरवा. चांगलं काम केलं तर स्वतःला शाबासकी द्या.चूक झाली तर त्यातून शिकून स्वतःला माफ करून पुढे जा. स्वतःच्या शरीराचं संगोपन करा. स्वतःच्या विचारांचा सांभाळ करा. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. स्वतःशी छान गप्पा मारा.

इथे एका प्रसिद्ध कवितेचा उल्लेख करावासा वाटतो. कविता खरं तर खूप मोठी आहे पण त्यातला एक भाग इथे देत आहोत.

'As I Began to Love Myself ~ A Poem on Self Love '

As I began to love myself I freed myself of anything that is no good for
my health – food, people, things, situations, and everything that drew
me down and away from myself. At first I called this attitude
a healthy egoism. Today I know it is LOVE OF ONESELF.

जर आपण स्वतःला चा पूर्ण स्वीकार करू शकलो आणि स्वतःवर प्रेम करू शकलो तरच आपण दुसऱ्यांवर निस्सीम प्रेम करू शकतो. मग हा दुसरा म्हणजे आपल्या घरचे लोक असतील, नातेवाईक असतील, शेजारी , मित्र-मैत्रिणी, ऑफिसमधील सहकारी, आपल्या घरी काम करणारी बाई किंवा ड्रायव्हर असेल किंवा रस्त्यावरचा अनोळखी माणूस सुद्धा असेल. कारण खऱ्या प्रेमामध्ये भेदभाव नाही.

जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण समानतेने वागणूक देतो. सगळ्यांकडे माणूस म्हणून बघायला लागतो.

जिथे जिथे वाजवीपेक्षा जास्त दुःख आहे, राग आहे, असुरक्षितता आहे, स्वार्थ आहे, हिंसा आहे, तिथे तिथे प्रेमाचा अभाव जास्त आहे. जर तुमच्या आजूबाजूला अशी एखादी व्यक्ती असेल की जी खूप रागीट आहे, खूप दुखी आहे, खूपच असुरक्षित आहे, तर समजून चला की त्या व्यक्तीचे स्वतःवर प्रेम नाही किंवा त्याला त्याच्या आयुष्यात प्रेम मिळालेलं नाही. अशा व्यक्तींचा राग करू नका, त्यांच्यावर टीका करू नका. त्यांच्यासाठी आपल्या मनात ही जाणीव ठेवा की त्यांना पुरेसं प्रेम मिळालेलं नाही आणि त्यांच्यासाठी सहानुभूती बाळगा.

प्रेमाने माणसाचा कायापालट होतो. प्रेमाने मोठे मोठे आजार बरे होतात. शरीराच्या आणि मनाच्या ही जखमा भरून येतात. जे औषधोपचाराने, उपदेशाने, शिक्षेने, पैशाने होत नाही ते ते सगळं प्रेमाने साध्य होतं. करून तर बघा

भारती दंडे - पूजा जोशी
पहिली माळ - घटस्थापना
https://www.maayboli.com/node/77105

दुसरी माळ- सृजनशीलता,नवनिर्मिती, कल्पकता ( Creativity)
https://www.maayboli.com/node/77108

तिसरी माळ- जतन,संवर्धन,सांभाळ
https://www.maayboli.com/node/77109

चौथी माळ-' सुटसुटीतपणा, सोडून देण्याची वृत्ती' (Let go)
https://www.maayboli.com/node/77111

पाचवी माळ- संतुलन , समन्वय (Balance)
https://www.maayboli.com/node/77112

सहावी माळ- स्वतःची ओळख, स्वतःचा स्वीकार स्वयंपूर्णता (self awareness, self acceptance)
https://www.maayboli.com/node/77113

सातवी माळ- स्मितहास्य, प्रसन्नता, आनंद (Joy, Smile, Happiness)
https://www.maayboli.com/node/77114

आठवी माळ- स्थिरता, शांतता (Stillness, calmness)
https://www.maayboli.com/node/77115

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults