आठवी माळ- स्थिरता, शांतता (Stillness, calmness)

Submitted by पूजा जोशी on 26 October, 2020 - 06:00

गेल्या सात दिवसात आपण ज्या वेगवेगळ्या शक्ती बघितल्या त्या सगळ्या शक्तींच मूळ जर कशात असेल तर ते आपल्या विचारात आहे. आपल्या मानसिक स्वास्थ्यात आहे.

सुदृढ शरीरासाठी जशी आपल्याला व्यायामाची, हालचालीची गरज आहे तसंच मानसिक स्वास्थ्यासाठी, मन स्थिर-शांत असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि ह्याच शक्तीचा आपण आज मागोवा घेणार आहोत.

“The body benefits from movement, and the mind benefits from stillness.” Sakyong Mipham

ऑफिसमध्ये साहेब एका कर्मचाऱ्यावर ओरडले आणि त्या कर्मचाऱ्यांनी पण उलटून उत्तर दिलं. शब्दाने शब्द वाढत गेला आणि एक मोठं भांडण झालं. हा प्रसंग डोक्यात घेऊन आपण घरी येतो. डोक्यात विचारांचं चक्र चालूच असतं.

साहेबांनी असं वागायला नको होतं,
आपल्या सहकार्याने उलट उत्तर करायला नको होतं, उद्या साहेब मला ओरडले तर काय होईल, मी त्या सहकार्‍याच्या जागी असते तर मी काय केलं असतं. काही वर्षापूर्वी मला दुसरे एक साहेब असेच ओरडले होते. आजकाल कोणी कोणाच ऐकूनच घेत नाही.......

विचारांची एक न थांबणारी मालिका सुरू होते आणि त्या विचारांनी आपण अस्वस्थ होतो. दुःखी होतो. चिडतो. आपल्यावर त्याचा ताण येतो.

आता गंमत बघा. प्रसंग घडला सकाळी, तोही ऑफिसमध्ये. बरं त्याच्यात आपण सामील नव्हतोच! दुसऱ्या दोन व्यक्तींमध्ये झालेला वाद घेऊन कितीतरी वेळ आपण किती उलटसुलट विचार करत राहतो. आणि मग त्या विचारांचे कधी तरंग उठतात. कधी मोठ्या लाटा होतात. तर कधी त्यांची मोठी वादळे होतात.

आणि या विचारांच्या लाटांमुळे आपल्या आनंदाची - प्रसन्नतेची नौका डगमगायला लागते. आपल्या मनाची नौका सांभाळण्यासाठी लागते ती स्थिरता.

समुद्राच्या पाण्यात नौका जर उभी करायची असेल आणि न डगमगता, न वाहून जाता एका जागी स्थिर उभी करायची असेल तर पाण्यात खोलवर नांगर टाकावा लागतो. तसेच जर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहायचं असेल आपली सारासार विचार करण्याची शक्ती आणि निर्णय क्षमता अबाधित ठेवायची असेल तर आपल्यालाही आपल्या आतमध्ये खोलवर एक नांगर टाकावा लागतो.

Eckhart Tolle त्यांच्या 'Stillness Speaks' या पुस्तकात म्हणतात 'When we lose touch with our stillness we lose touch with our self'

आपला आपल्याशी असलेला सुसंवाद बिघडतो. मग आपलं कामातलं कौशल्य कमी होतं. एकाग्रता कमी होते. निर्णय घेताना आपण गोंधळतो.

मग स्वतःला स्थिर करण्यासाठी काय करायचं?

**वर्तमानात जगायचं Here & Now* *
याचा उल्लेख मागच्या एका लेखामध्ये येऊन गेला आहे. भूतकाळातील घटनांच्या आठवणी किंवा भविष्यात काय घडेल याची चिंता आपली वर्तमानात स्थिरपणे जगण्याची शक्ती कमी करतात. जे घडून गेलं त्यात काही शिकण्यासारखं असेल ते शिकून, मग तो विचार सोडून द्या. भविष्यात काय होणार आहे त्या उलट-सुलट कल्पनांनी आपला आत्ताचा आनंद घालवू नका.

* *विचारांचं भान ठेवायचं* *
सतत आपल्या मनात चालणारे विचार तपासत राहायचं. दिवसातून शंभर वेळा स्वतःला विचारायचं मी कुठे आहे? काय काम करते आहे? आणि विचार काय करते आहे? जर आपले विचार नकारात्मक असतील तर ते सोडून द्यायचे. आपण स्वयंपाक करताना जर ऑफिसचा विचार करत असू तर मन जाणीवपूर्वक परत स्वयंपाकात गुंतवायचं. आपण जे काम करतोय ते कितीही छोटं असलं तरी त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करायचं.

विचारांचा भान आलं की आपण विचारांच्या अधीन होत नाही. आपण त्यांना हवं तसं सकारात्मक पद्धतीने वळवू शकतो.

**अतिविचार करणं टाळायचं* *
विचार करून माझा डोकं दुखतयं. अशा प्रकारची वाक्य आपण कितीतरी वेळा ऐकतो किंवा अनुभवतो. कोणत्याही गोष्टीचा, प्रसंगाचा, व्यक्तीचा अति विचार करणे जाणीवपूर्वक थांबवले पाहिजे. आपलं मन अशावेळी खूप हट्टीपणाने तेच तेच विचार करत राहतं.

लहान मुलं हट्ट करत असतात तेव्हा आपण काय करतो? त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवतो. अगदी तेच करायचं. जाणीवपूर्वक आपलं मन दुसऱ्या एखाद्या आपल्या आवडीच्या कामांमध्ये गुंतवायचं. एखाद छान गाणं ऐकायचं. आवडतं पुस्तक वाचायचं. विनोदी पिक्चर बघायचा. नाहीतर सरळ घराबाहेर पडून मस्त फिरून यायचं. मोकळ्या हवेत जाऊन भरभरून श्वास घेतला की अर्धे अधिक विचार वाऱ्यावर उडून जातील.

* *विशेषण टाळायची*
कुठल्याही प्रसंगातील भावना आणि तथ्य यांची सरमिसळ टाळायची. Just look & listen.

Eckhart Tolle म्हणतात 'our unhappiness arises not from a situation but from our thoughts about that situation'.

समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगितले की मी उद्या फोन करून निर्णय कळवतो. आपण वाट बघत राहतो पण त्या व्यक्तीचा फोन येत नाही.

मग आपल्या मनात घालमेल सुरू होते. एखाद्याला चिंता वाटते की अरे या व्यक्तीला काही झालं असेल का ? फोन का नाही केला? एखाद्याला राग यायला लागतो की लोक आज काल शब्द पाळत नाही, दिलेली वेळ पाळत नाही. एखाद्याच्या डोक्यात तर्कवितर्क सुरु होतात का फोन येत नसेल? काय कारण असेल

फोन आला नाही एवढंच सत्य आहे. आपल्याला तिथेच थांबता येईल का?

पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या भावना, मत, अपेक्षा यांचा परिणाम आहे. तथ्य आणि भावना गुंतल्यामुळे आपल्या मनात अशाप्रकारे नको ते विचार सुरू होतात.

* *बदल स्वीकारायचा* *
Don't resist the change.
जीवनामध्ये परिस्थितीमध्ये जे बदल होतात ते सर्वप्रथम स्वीकारायचे. एखादा बदल थांबवणे आपल्या हातात असेल तर जरूर प्रयत्न करायचा.पण जर थांबवणे आपल्या हातात नसेल तर त्याचा विचारही सोडून द्यायचा. मग ते बदल आपल्याला आवडणारे नसतील तरीही. उलट बदलणाऱ्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करत जायचे.

सद्य परिस्थितीचे उदाहरण घ्या ना. कोरोना आल्यापासून जगभरात कित्येक बदल झाले. प्रत्येकाने आपल्या कामाच्या वेळा, कामाच्या सवयी, पद्धती, घरादाराची अधिक साफसफाई, स्वतःच्या स्वास्थ्याची अधिक काळजी असे एक ना अनेक बदल आपण आपल्या मध्ये घडवून आणले.

**आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं**
जेव्हा विचार खूप त्रास देतात ना तेव्हा जाणीवपूर्वक आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. अगदी थोडावेळ का होईना पण आपल्या उच्छवासाकडे आणि आत येणाऱ्या श्वासाकडे लक्ष ठेवायचं. मग विचारांची साखळी आपोआप तुटते. श्वासाचा हे तंत्र किंवा कुठलाही प्राणायाम आपण जितका नियमितपणे वापरू तितकी आपल्यामध्ये स्थिरता वाढते. गीतेमध्ये सांगितले आहे की योगासने आणि प्राणायाम यांच्यामुळे स्थिरता वाढवण्यात मदत होते.

आता आपण स्थिरतेचे आपल्या दैनंदिन जीवनातील फायदे बघूया

- आपलं वागणं,बोलणं, विचार करणं खूप संयमित होतं
- आपल्याला शांत गाढ झोप लागते
- आपली निर्णयशक्ती सुधारते
- आपल्यातली कल्पकता आणि निर्माणशक्ती वाढते
- आपला काम करण्याचा निर्धार वाढतो
- कामातील एकाग्रता आणि कौशल्य वाढतं
- थकवा कमी होऊन ऊर्जा वाढते
- नकारात्मक किंवा त्रास देणाऱ्या गोष्टी आपण सहज सोडून देतो
एकंदरीतच प्रसन्नता किंवा आनंदी वृत्ती वाढते

Eckhart Tolle म्हणतात 'If we get our inside right, our outside will fall in place automatically'.

तेव्हा जर आपल्या बाहेरचं जीवन, आजूबाजूची परिस्थिती सुधारायची असेल तर आधी स्वतःमध्ये स्थिरता वाढवण्याचा प्रयत्न करूया.

भारती दंडे - पूजा जोशी
पहिली माळ - घटस्थापना
https://www.maayboli.com/node/77105

दुसरी माळ- सृजनशीलता,नवनिर्मिती, कल्पकता ( Creativity)
https://www.maayboli.com/node/77108

तिसरी माळ- जतन,संवर्धन,सांभाळ
https://www.maayboli.com/node/77109

चौथी माळ-' सुटसुटीतपणा, सोडून देण्याची वृत्ती' (Let go)
https://www.maayboli.com/node/77111

पाचवी माळ- संतुलन , समन्वय (Balance)
https://www.maayboli.com/node/77112

सहावी माळ- स्वतःची ओळख, स्वतःचा स्वीकार स्वयंपूर्णता (self awareness, self acceptance)
https://www.maayboli.com/node/77113

सातवी माळ- स्मितहास्य, प्रसन्नता, आनंद (Joy, Smile, Happiness)
https://www.maayboli.com/node/77114

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults