आठवणीतल्या गारा

Submitted by नलिनी on 16 December, 2007 - 14:53

3.jpg2.jpg

मला पावसाचं आकर्षण तर नेहमीच आहे पण त्याहून जास्त आकर्षण आहे ते गारांचं. ह्या फोटोतल्या गारा, माझ्या इथल्या वास्तवातल्या पहिल्याच गारा. माझ्या नकळत मी केव्हाच दाराशी आले होते. एक दोन गारा उचलून केव्हाच तोंडात टाकल्या होत्या. दुसर्‍याच मिनिटाला मी पावसात भिजत होते. प्रोफेसर गॅरेज मध्ये काहीतरी घेण्यासाठी आले होते. माझ्यात दडलेलं लहान मुल पाहताना अगदी खुष झाले. हसत हसत जातानाच गारांच्या पावसात भिजणे पुरे हे सांगुनही गेले, "I will not recommand this!". त्यांची आज्ञा 'सर आँखोपर' मानत मी शहाण्या मुलासारखी खिडकीच्या आतुनच उर्वरीत पावसाचा आनंद लुटला.
हातातली गरम कॉफी केव्हाच थंड होऊन गेली होती. पाऊसपण उघडला होता पण मन भुतकाळातल्या गारा वेचायला केव्हाच घरी पोहचले होते.

ह्यापुर्वीही किती तरी वेळा गारा पडताना पाहिल्यात, मातीत माखलेल्या गारा चक्क धुवून खाल्ल्यात मी. अगदी हव्याहव्याशा वाटणार्‍या ह्या गारा मला एकदा अगदी नकोश्या वाटल्या होत्या, त्याच माझ्या आठवणीतल्या गारा!

चार पाचच्या सुमारास अगदीच झाकाळून आलं होतं. पटापट अंगणातल्या वस्तू आडोशाला टाकल्या. विळा, बारदाणा उचलून घास कापायला निघून गेले. लवण्या-लवण्याच विळा यंत्रासारखा चालत होता. निवांत, व्यवस्थित, बसून घास कापायला वेळच कुठे होता? दोन वाफे घासाचे कापून झाल्यावर लक्षात आले की इतकावेळ वाकलेली असल्याने म्हातारीसारखी वाकले होते. तसाच वाफ्यातला घास गोळा करून बारदाण्यात रचला, ओझं बांधल. दुसर्‍या वाफ्यातला घास गोळा करून ठेवला. रस्त्याने जाणार्‍या एका काकांनी ओझं डोक्यावर घ्यायला, ओझ्याला हात लावला(मदत केली). तो घास घरी आणून गोठ्यात एका कोपर्‍यात टाकला. दुसर्‍या ओ़झ्याला हात लावायला आई बरोबर आली. तोही घास आणून टाकला. ओझं टाकायला आणि पाऊस पडायला एकच वेळ झाली. घरी आई शिवाय दुसरे कोणीच नव्हते. ह्या जोराच्या पावसात गायी गोठ्यात घ्यालया आईला जमणे शक्यच नव्हते. तिने पटकन एक पोते उचलून त्याचं घोंगडं (शेतकर्‍यांची छत्री) करून दिलं. तुर्तास डोके न भिजण्याची ही व्यवस्था. म्हशींना मागे ठेवत आधी वासरं आत घेतली. मग गायी आत आणून बांधल्या सर्वात शेवटी म्हशींना दावणीला बांधले. पाऊस पडायला लागला की गाय चालत नाही ती पळतच असते आणि म्हैस मस्त बागेत फिरायला निघाल्याच्या ऐटीत चालत असते. आ़जी नेहमी म्हणायची उन्हाळ्यात गाय म्हशीला म्हणते, "आता कसा तवा तापतो?" आणि ह्याचा बदला म्हैस पावसाळ्यात घेते. ती गायीला म्हणते, "आता कसा विळा वाकतो?" सगळ्या जनावरांना चारा घालून आई आणि मी दोघेही घरात गेलो.

ओले कपडे बदलेपर्यंत आईने कंदिल, चिमण्या (न उडणार्‍या) साफ करून रॉकेल घालून सज्ज करुन ठेवले. लाईट(वीज) हमखास जाणार. मुळाप्रवरेने खंडीत नाही केली तरी ह्या असल्या वादळी पावसात नक्कीच कुठेतरी झाड कोसळणार, झाड नाहीच कोसळले तर विजेचा एखादा खांब तरी आडवा होणार. ह्याने सुद्धा साथ दिली तर डिपीवर फ्युज उडणार. सगळेच ग्रह चांगले असले तर घराजवळच्या तारींवर नारळाची एक तरी झावळी पडणार. काय सांगावे, सगळेच एकाच वेळी जुळून येऊ शकते आणि पुढचे दोन-तीन दिवस विजप्रवाहच खंडीत राहू शकतो. 'बोअरवेल' (कुपनलिका) ची मोटर सुरु करुन पाण्याचा माठ भरुन ठेवला, हांडे. तपेले, बादल्या, पिंप सगळे भरुन ठेवले. विहिरीवरचे दोन्ही हौद भरुन घेतले. चला, लाईट असो नसो पुढच्या दोन दिवसांची पाण्याची काळजी मिटली होती. विहिरीतून पाणी शेंदायची गरज पडणार नाही.
लाईट आहे तोवरच स्वयंपाक करुन घ्यायला हवा म्हणून आईने पिठ मळायला घेतले आणि मी मसाला वाटायला पाटा धूतला. मोठा भाऊ भिजतच घरी आला होता, मला गायी गोठ्यात घ्यायला मदत होईल म्हणून. काय पण त्याचा पायगुण? तो आला आणि लाईटने गुडबाय म्हटले. कंदिलाच्या उजेडात पटापट स्वयंपाक उरकला. आम्ही तिघेही पुढे पढवीत जाऊन बाकिच्यांची घरी यायची वाट पहात बसलो. बाहेर बर्‍यापैकी अंधार पडला होता. थोड्यावेळात लहान भाऊ आणि बाबा आले, तेही पुर्ण भिजुनच. आजोबा अजूनही आले नव्हते. त्यांची काळजी वाटायला लागली. एव्हाना ओढ्यांमधून पाणी वहायला लागलेले असणार, रस्त्यांवर बराच गाळ झालेला असणार. आजोबा कुठे अडकले हे समजायला काहिच मार्ग नव्हता. कुठे गाडी घसरली असेल का? गाडी लोटत आणत असतील का? कुणाकडे आडोश्याला तर थांबले नसतील? नाना प्रश्न ते घरी आल्यावरच संपले. मग कुठे जीव भांड्यात पडला.

बराच उशीर झाला होता, पाऊस उघडायचे नाव घेत नव्हता. सगळ्यांची वाट पहाण्यात गायी पिळायच्या (दूध काढायचे) राहून गेले होते. वासरांनी एका सुरात हाका मारायला सुरवात केली. बाबांनी घरी आल्याबरोबरच मुळाप्रवरा रात्रभर वीज खंडीत ठेवणार असल्याची वार्ता दिलेली असल्याने लाईटची वाट पहाण्यात काही राम नव्हता. बॅटरीच्या (विजेरीच्या) उजेडात दूध काढायला आम्ही तिघे गेलो. दूध काढून चारा घालून गोठ्याच्या बाहेर पडलो तर चक्क गारा पडत होत्या, त्याही बोरांएवढ्या. चहापुरते दूध काढून घेऊन दुधाच्या बादल्या झाकून, अडकवून ठेवल्या. आम्हा सगळ्यांना एक वाईट खोड होती, ती म्हणजे सगळ्यांना चहा ताज्याच दुधाचा हवा असायचा. दूध बिनपाण्याचे तापवू नये (असे केल्यास गाय आटते असे म्हणतात) म्हणून नाईलाजास्तव आई त्यात चमचाभर पाणी घालायची. ताज्या दुधाच्या चहाला फक्की (चहापावडर) जास्त लागते आणि चहा जास्तवेळ उकलू द्यावा लागतो. (कोण म्हणतय ते? की झाले चहापुराण सुरू).
जरावेळाने जस्तीच्या २ चिमण्या लावून जेवायला बसलो आणि लहान भावाच्या डोक्यात वीज चमकून गेली...

नलुताई, तु नव्या घासाकडे चक्कर मारला होता का गं, आज?
हो, का रे?
काही नाही गं? घास किती वाढलाय?
आलाय दोन पानांवर.
आता मरा!
का रे?
अगं, ह्या पावसात आणि त्यातल्या त्यात ह्या गारांच्या पावसात तो राहील का आता?

पुढचा घास(जेवणाचा) घश्यातच अडकला माझ्या.

कसं बसं जेवण उरकुन भांडे गोळा करुन ठेवुन पढवीत बैठक मारली, आम्ही सगळ्यांनी.
लहान भावाची तणतण सुरू झाली होती. पाऊस उघडेपर्यंत काहिच करता येणार नव्हते. केलेली सगळी मेहनत आणि झालेला खर्च पावसाच्या पाण्यात वहाताना दिसत होतं. घास(alfalfa) हे खास दुभत्या जनावरांसाठी लावलेलं एक गवत. ह्यांच खातत्रीशीर (तीन वर्ष पुर्ण झालेल्या घासाची महाशिवरात्रिला शेवटची कापणी करून बीयाण्यासाठी सोडला जातो) बी महाग असतं. हजार, दोन हजार रुपये पायली. (एक पायली म्हणजे ५ किलो) घास हा गादीवाफे पद्धतीने लावला जातो त्यामुळे नांगरटी नंतर दोन तीन वेळा काकर्‍या घालून हारू फिरवला जातो. (मोठमोठ्या ढेकळांची माती होऊन जमीन सपाट होण्यासाठी). त्यानंतर वाफे बांधले जातात. हे वाफे तीन वर्ष टिकायला हवेत ह्या दृष्टीकोनातून जास्तीची मेहनत घेऊन भरभक्कम बनवले जातात. वरंभे, दंड बांधून झाल्यावर घास पेरला जातो. फार कमी जणांना हे जमते कारण एकसारखा, जास्त पातळ , जास्त दाट होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते. हे काम माझे बाबा स्वतः करतात. मग त्यावर हलक्या हाताने माती खाली-वर करावी लागते. बी टाकलेल्या जागेवरून हलू नये. खूप खोलवर जावू नये किंवा मातीवर राहू नये अशी विशेष काळजी घेतली जाते. वरंभ्यावर मिरची, लसूण, धने लावले जाते व पाण्याच्या दंडाला पपई, गवतीचहा. असे सगळे काही-बाही लावून झाले की मग वाफ्याच्या तोंडाला पोते लावून पाणी दिले जाते. एवढी मेहनत करुन लावलेला एक एकर घास हातचा जाणार ह्याने सगळेच अस्वस्थ झालो होतो.

रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास पाऊस उघडला. लहान्याची तगमग सुरुच होती, पण घरात बसून. जनावरांना शेवटचा चारा घालायला मी आणि मोठा भाऊ दोघेच गेलो होतो. त्याला म्हटलं चल बॅटरीच्या उजेडात घासाला एक चक्कर तरी मारून येऊ. घरात न सांगता जाणेच योग्य होते, आईबाबा दोघेही ह्या अंधारात जाऊ देणार नव्हते. भावाने शेतावर बॅटरी फिरवली. सगळे वाफे तुडूंब भरले होते. वाफ्यांच्या कडेकडेला दोन पानावरचा घास तरंगताना दिसत होता. घास उपटून आलाय की काय, काहीच कळत नव्हते.

मला पाण्यात उतरून पहायची इच्छा झाली पण भावाने चिखलात उतरायला नकार दिला कारण कडेच्या काही वाफ्यांमध्ये बोरीची, विलायती चिंचेची काटे असण्याची शक्याता जास्त होती. त्याच्या पायाला जळवाताच्या मोठमोठ्या भेगा असल्याने तो स्वतः चिखलात उतरायला तयार नव्हता. मी त्याला न जुमानता चप्पल एका कोपर्‍यावर सोडून शेतात उतरले. पाण्याच्या दंडाच्या बाजुने जमेल तिथे पायाने वरंभे मोडायला सुरवात केली. कधी एका पायाने तर कधी दोन्ही पायाने दंडाचे बारे मोडले. पाणी वाफ्यातुन दंडात काढले, एका दंडातुन दुसर्‍या करत बाजुच्या उसाच्या शेतापर्यंत एकुण ६०-७० वाफे मोडले. इतका वेळ साचून अडकून पडलेल्या पाण्याला प्रवाहाची दिशा सापडली होती, खळखळत ते मार्गस्थ झाले होते. शेवटच्या एक दोन वाफ्यांना तोडण्यासाठी भावाने पाय घातला आणि ओरडलाच
बावळट.. मुर्ख.. मरायचय का तुला? किती थंड आहे हे पाणी !
असणारच ना? गारांचं पाणी काय गरम असणार?

ओढतच त्याने मला शेताबाहेर काढलं. घरी जावून पाय धुतले. त्याने आईला आधी चूल पेटवायला सांगितली आणि माझी करामत तिला ऐकवली. मग काय विचारता? तिने तर मला फैलावरच घेतले. माझे कुणाकडेच लक्ष नव्हते. अंगात थंडी भरली होती. दात वाजायला लागलेले. पायांना तर संवेदनाच उरली नव्हती. तासभर चुलीसमोर शेकल्यावर माझ्यातल्या थंडीने पोबारा केला. एक शब्दही न बोलता मी गुपचूप आंथरुणात शिरले.

सकाळी उठल्यावर कालच्या सोडलेल्या चपला आणायला आणि कालची मेहनत कुठवर फळाला आली हे बघायला पळाले. दोन पानावरचे ते इवलेशे जीव, तग धरुन बसले होते. दोन दिवसात जरा ऊन पडल्यावर त्यांनी माना धरल्या. आजुबाजूचे सगळ्यांचे महिनाभरापुर्वी पेरेलेले घास नेस्तनाबूत झाले होते. येणार्‍या जाणार्‍यांना आमचाच घास कसा वाचला(टिकला) ह्याचे आश्चर्य वाटत होते. कित्येकांनी तर आईला घरी येऊन विचारले, "वहिनी, तुमचा घास कसा हो वाचला". मग काय, मातोश्री माझ्यावर किती ओरडल्या होत्या हे विसरुन 'तारिफोके फुल' उधाळायला लागल्या. आईनेच अगदी अलगत, मायेची फुंकर घालत पायातले ५-६ काटे कढले.. अशाप्रकारे हे आमचे घासपुराण, गारापुराण सुफळ संपूर्ण झाले.
आजही आठवण झाली तरी मला माझे पाय क्षणभर गारठल्यासारखे जाणवतात.

Alfalfa_001.jpgAlfalfa_002.jpg

गुलमोहर: 

आणि फक्की.. वर हिरवीकंच चित्रं. नलिनी किती धन्यवाद देवू तुला.. वाचतांना कसं समृद्ध वाटलं. Happy असंच अजून येवू दे.

नलिनी छान लिहीलय.

डॉ. नलिनी,
हे सगळे तुझ्याकडुन प्रत्यक्ष ऐकले होतेच. पण आज वाचताना सगळे परत डोळ्यासमोर उभे राहिले.
मुंबईत कुठल्या गारा ? मी आजोळी बघितल्या होत्या पण त्यावेळी आजोबांनी बाहेर जाऊ दिले नव्ह्ते.
पहिल्यांदा वेचल्या त्या केनयामधे.
हुरडा खायला येणार आहेस ना ?

डॉक्टरिणबाई खुप छान वाटले वाचुन. फोटो पण खुप छान आहेत. फोटोतल्या गारा गोळा करायला यावेसे वाटते आहे.

खुपच छान आणि आम्हा शहरी लोकांच्या दृष्टीने अगदीच वेगळा अनुभव आहे हा!
तुमच्या प्रसंगावधनाला आणि धैर्याला दाद दिली पाहिजे. मी तरी अजून गारा कशा असतात हे प्रत्यक्ष कधी पाहिलेले नाही. आमच्या मुंबईत हा प्रकार जवळपास नाही असे म्हटले तरी चालेल. पण गारपिटीमुळे होणार्‍या नुकसानीबद्दल वृत्तपत्रातून वाचलेले आठवतेय.
अतिशय सहजसुंदर शब्दात आपण केलेले वर्णन आवडले.
पुढील लेखनास शुभेच्छा!

तुम्हाला प्रत्यक्श्य आलेला अनुभव असल्याने मस्त उतरले आहे.

फार सुरेख लिहीलय. गुरहशी.न्बद्दल ईतक अचूक वर्णन. अर्थात स्वानुभव आहे म्हणूनच म्हणा. खूपच आवडल.

दिव्या, चिन्नू, दिनेशदादा, वर्षा, प्रमोद, arc, सव्या, आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपुर्वक आभार.
चिन्नू, अगं असे अजुन बरेच शब्द आहेत जे नेहमीच्या वापरात असतात. पुढच्या लेखांत नक्की वापरण्याचा प्रयत्न करेन मी.
दिनेशदादा, हो हुरडा खायला येतेय मी.
वर्षा, गारा (फोटोतल्या) पाठवुन देऊ का?
प्रमोद, माझ्या आठवणींसोबत शेतकरी जीवनाबद्दल लिहावेसे वाटले म्हणुन हा खटाटोप. आपणास हे लिखाण आवडले ह्याचा खरच आनंद होतोय.
सव्या, पुढचे ललित खास गुराढोरांबद्दल लिहायचा विचार करतेय.

नलु मस्तच वर्णन!
घासाचा एक वेगळाच वास येतो..ऽशिच अस्सल मायमातितिल अजुन वर्णने येवु द्या!!

किती उशीर झाल हे सुंदर लिखाण वाचायला? किती आणि कसा.... कुणास ठाऊक.
नलिनीताई (चालेल?) फार सुंदर, अनुभवसमृद्ध लिहिलय. कितीतरी नवीन शब्द!
छानच!

नलीनीताई,
येउ द्या पुढचं बिगीबिगी!