बांद्रा वेस्ट -३

Submitted by मिलिंद महांगडे on 21 October, 2020 - 21:51

 " बार,  बार दिन ये आए... बार बार दिल ये गाए..... तु जिये हजारो साल....  हे बड्डे बॉय .... काय  झाला   ...?  मुड का गेलाय? " माँट्या त्याला विचारत होता ,  पण रॉड्रीकने त्याला काहीच उत्तर दिलं नाही.  तो तसाच डोकं धरुन बसला होता.   माँट्याने आजुबाजुला पाहीलं ,  चार - पाच कागद पसरलेले.  एक मळकं एन्व्हलप त्याच्या बाजुला पडलेलं , रॉड्रीकचं वॉलेट त्याच्या समोर होतं .  त्यातले सगळे पैसे,  व्हिजीटींग कार्डस्,  कागदाच्या चिटोऱ्या समोरच्या टिपॉयवर पसरलेल्या ... ह्या सर्वांच्या मधे रॉड्रीक दोन्ही हातांनी आपलं डोकं धरुन बसला होता.
" अरे काये हे....?  बोल ना भाई.... बरा वाटत नाय का तुला ...? कालची उतरली नाय काय अजुन ....?   " माँट्याला कळेना नक्की काय झालं ते... रॉड्रीकने त्याच्याकडे न बघताच त्याला ते चार कागद वाचायला दिले.  माँट्याने ते घेतले,  त्यावर नजर फिरवली आणि हताश होऊन तो म्हणाला,  " अरेरे.....,  काय हे... सगळं इंग्लिशमधे लिवलाय .  साल्या तुला तर माहीतीआय की आपला पंगाय इंग्लिशशी...!  शाळेत पण आपण तुझा पेपर उतरवुन पास झालोय....,  आयला तु शाळा सोडलीस आणि  मग मला पण सोडायला लागली तुझ्यामुळे.   नायतर मला लय शिकायचा होता... "
" गप यार माँट्या , आयला माझी लागलीय फुल टु आणि तुझा काय चाल्लंय .... " रॉड्रीक वैतागुन म्हणाला.
" ओके.. सॉरी बॉस ,  पण झाला काय ते तर सांगशील  ?  " रॉड्रीकने एकवार त्याच्याकडे पाहीलं ,  माँट्या म्हणजे मनोज म्हात्रे ...  पण त्याला मनोज म्हात्रे म्हणून कोणी ओळखायचं नाही. रॉड्रीकचा शाळेपासुनचा एकमेव मित्र...! कुरळे केस ,  त्यातल्या काही झिपऱ्या कलर केलेल्या, गव्हाळ वर्ण,  खुरटी दाढी आणि मिश्या,  बाकदार नाक,  एका कानात सोन्याची बाळी घातलेली , उंची रॉड्रीकपेक्षा थोडी कमी ,  त्याचं चिंबई व्हिलेजमधे गॅरेज होतं. माँट्याचं गॅरेज अख्ख्या बांद्र्यात फ़ेमस होतं.  माँट्या बाईक असा चालवायचा कि रस्त्यावर फक्त त्याची सत्ता असावी . रॉड्रीकचा सच्चा यार...! फक्त अभ्यासात कच्चा होता आणि जेवढी काही शाळा शिकला ती रॉड्रीकच्या जिवावर...!  बाकीच्या दुनियादारीच्या गोष्टी करण्यात मात्र माँट्या पटाईत होता.  त्याला कोणतं काम सांगितलं आणि ते झालं नाही असं आजवर कधी झालं नव्हतं. त्याच्यासाठी काहीही करायला माँट्या सदैव तयार असायचा ,  त्यामुळेच माँट्या आल्यावर रॉड्रीकला जरा बरं वाटलं होतं खरं,  पण त्याच्यापुढे जो पेच पडला होता त्यात माँट्या  त्याला काही मदत करु शकेल याबाबत मात्र तो साशंक होता.
"  बस... सांगतो तुला डिटेलमधे. " रॉड्रीकने त्याला बसायची खुण केली .
" माँट्या ,  आय ऍम दि ओनर ऑफ नाईन्टी नाईन क्रोरस्...!  आय मिन,  आय वॉज... " रॉड्रीक हताश होऊन म्हणाला...
" हो का ...?  मग मला दे ना थोडे... गॅरेजचा कर्जा तरी फिटेल. " माँट्या  गमतीने हसत हसत  बोलला. रॉड्रिक  अधून मधून कधीतरी माँट्याची फिरकी घ्यायचा . आत्ताही तसंच  काहीसं असेल असं  त्याला वाटलं . 
" माँट्या ,  आय ऍम सिरीयस.... खरंच माझ्याकडे गोल्डचा खजिना आहे , ज्याची आत्ताची किंमत जवळपास नाईन्टी नाईन क्रोरस् आहे . " रॉड्रीकच्या बोलण्याचा सुरच असा काही होता की माँट्या  झटक्यात मस्करीच्या मुडच्या बाहेर आला...
" आयला काय सांगतोस काय ...?  खरा का काय ...?  " त्याला अजुनही विश्वास बसेना ,  आणि कसा बसेल ? ज्या माणसाकडे नीट  धड नोकरी नाही ,  आयुष्याच्या बाबतीत जो सिरियस नाही , ज्याचे आतापर्यंत कधी कधी खायचे वांदे असायचे तो आज अचानक म्हणतोय  कि त्याच्याकडे नव्व्याण्णव  करोड रुपये चा खजिना  आहे  !  
" हो रे बाबा... गॉड प्रॉंमिस ... "
" नाईन्टी नाईन करोड चा सोन्याचा खजिना  ...?  " माँट्याचे डोळेच फिरायचे बाकी राहीले होते... " कसला  ...?  आणि कुठुन आला ...?  "
" ती एक मोठी स्टोरी आहे.... तुला आता कशी सांगु ते कळत नाही. "
" सांग ना यार... एवढा श्रीमंत झालायस तु आता ... "
" अरे इडियट ... मी नाईन्टी नाईन क्रोरस् चा मालक होतो, पण आता नाही.  माझ्या नशीबातच नव्हते वाटतं ते... बॅडलकच खराब...! ”
" हे बघ... तु काय बोलतो आपल्याला कायपण कळत नाय .  नीट सुरुवातीपासुन सांग... " माँट्या म्हणाला. नैराश्येचा एक उसासा टाकुन रॉड्रीकने त्याची कहाणी  सांगायला सुरुवात केली.
" ऐक... १९२० मधे आपल्या बांद्रा एरीयात कार्टर नावाचा कलेक्टर होता."
" कार्टर....?  तो  आपल्या  कार्टर रोडला रायचा  काय ...? " माँट्याने मधेच तोंड घातलं. 
" इडियट... तो कलेक्टर होता.  त्याच्यामुळे त्या रोडला कार्टर रोड नाव पडलं... " रॉड्रीक वैतागुन म्हणाला.
" ओह !  सॉरी सॉरी .... माय मिस्टेक....  बरं पुढे सांग.  "
" ओके,  तर त्या कलेक्टरकडे माझे आजोबा काम करायचे. ते कार्टरचे एकदम विश्वासु नोकर होते.  एकदा त्या कलेक्टरने  वसई फोर्टवर काहीतरी खोदकाम काढलं . त्यात त्याला बरंच मोठं ट्रेजर मिळालं.  ट्रेजर म्हणजे खज़ाना....! त्याचा काही भाग त्याने आजोबांकडे दिला. सांभाळण्यासाठी ,  पण नंतर कार्टरला इम्मिजिएटली इंग्लंडला बोलावला . ऑर  मे  बी त्याची ट्रान्स्फर झाली असावी .  माझे आजोबा त्याला तो खजाना देऊ शकले नाहीत आणि तेव्हापासुन तो आमच्याकडेच आहे... "
" तुमच्याकडे आहे म्हणजे ....?  आत्ता इथे आहे...?  " माँट्या डोळे मोठे करुन घाबरलेल्या स्वरात म्हणाला...
" हो.... आणि ते त्यांच्या कपाटाच्या आत ठेवलेलं आहे. . "
" आईचा घो... सहीच रे.... " जोसेफ अंकल लय डोकेबाज माणुस… ”
" ते आहे रे... पण माझा प्रॉब्लेम झालाय आता मोठा... बिग प्रॉब्लेम... ",  रॉड्रीक वैतागुन म्हणाला...
" आता काय अजुन ... "
"  कम विथ मी.... दाखवतो तुला.  " असं म्हणुन रॉड्रीक आत जायला निघाला.  त्याच्या मागोमाग माँट्याही गेला. ते दोघे रॉड्रीकच्या डॅडच्या रुममधे गेले,  तिथं जास्त काही सामान नव्हतं.  त्यांच्या मृत्युनंतर तर ती बहुतेकवेळा बंदच असायची .  एक प्रकारचा कुबट वास त्या रुममधुन येत होता,  छताला जाळीजळमटे लागली होती.
" अरे काय अवस्था झालीय अंकलच्या रुमची . साफसुफ तरी करत जा... " माँट्याने आपला एक फुकटचा सल्ला देऊन टाकला.  रॉड्रीकने त्यावर एक थंड कटाक्ष त्याच्यावर टाकला.  " सॉरी ... सॉरी ... " म्हणत ते एका मोठ्या भिंतीशी लागुन असलेल्या कपाटापाशी आले. रॉड्रीकने चावीने ते कपाट उघडलं. त्यात काहीच सामान नव्हतं.... "  आता मजा बघ... " म्हणत त्याने उजव्या बाजुला वर कोपऱ्यात असलेलं लहानसं बटण दाबलं. ते एरवी कुणाला दिसलंही नसतं.  ते बटण दाबल्या दाबल्या कपाटाच्या मागची बाजु आपोआप सरकली. त्यात भिंतीच्या आत पलीकडे आणखी एक लहानशी खोली होती.
" आईचा घो.... काय हे....?  " माँट्या शॉक बसल्यासारखा पहातच राहीला.
" हे तर कायच नाय... आत ये,  बेशुद्धच पडशील... " म्हणत रॉड्रीक त्या गुप्तखोलीच्या आत शिरला... पाठोपाठ माँट्याही थोडा घाबरत आत शिरला.
" हा तर साला अलीबाबा आणि चाळीस चोर मधल्या गुहेसारखा प्रकार दिसतोय.... " माँट्या त्या गुप्त खोलीत शिरत म्हणाला. " अरे हा दरवाजा आपोआप परत बंद होणार नाही ना ?  आयला नायतर लटकायचो आपण इथेच....!  "
" नाय रे बाबा.  डोन्ट वरी.... "
आत गेल्यावर  तिथं एक लहानसं लाकडी टेबल ठेवलेलं दिसलं आणि त्याच्यावर एक  जुना ट्रंकवजा  मोठा लाकडी  पेटारा ठेवलेला होता.  तो बराच जुना असावा असं त्याच्या ठेवणीवरुन आणि त्यावरील नक्षीवरुन दिसत होतं.
" वॉव.... सही आहे रे हे...?  यात आहेत खजाना  .. .?
" हो... "
" तुला कसं माहीत...?  "
" अरे डॅडच्या च्या  लेटर मधे लिहीलंय तसं .... "
" आयला... सही ना मग... आता काय प्रॉब्लेम आहे... तो पेटारा उघड ना ... "
" इटस् नॉट सो ईजी....  लुक ... हा पेटारा एका पर्टिक्युलर सिस्टीमनेच उघडता येणार आहे.. "
" म्हणजे ...? "
" ह्या पेटाऱ्यावर एक गॅजेट बसवलंय ... इथे सेंटरला एक स्कॅनर आहे. त्यात फक्त एक एक्सक्लुजीव्ह १० रुपीज् नोट ठेवायची आणि हे लाल बटण दाबायचं.  ती नोट स्कॅन झाली की त्यानंतरच हा पेटारा उघडणार ....!  "  
  माँट्या त्या अजब यंत्राकडे डोळे विस्फारून बघत म्हणाला , " हे सगळं जोसेफ अंकलनी बनवलं ....?  मानलं यार....  पण मग तुझा प्रॉब्लेम काय आहे आता...?  " त्याच्या  डोक्यात अजुनही काही प्रकाश पडेना.
" ओह गॉड....!  आता तुला कसं सांगु....?  लिसन .... डॅडच्या डेथच्या आधी एकदा त्यांनी मला बोलावलं आणि एक १० रुपीज् नोट माझ्या हातात ठेवली.  मला बोलले की, ही नोट सांभाळुन ठेव.  धिस नोट विल चेंज युअर फेट  आणि यार ती नोट काल रात्रीपर्यंत माझ्याकडे होती. आता  ती गेली . आता काहीच उपयोग नाही . आय ऍम लुजर ,  बिग लुजर....! " रॉड्रीक अगदी हताश होऊन बोलत होता. 
" ती नोट गेली म्हणजे....?  कुठे गेली ...?  " माँट्याने एकदम घायकुतीला येऊन विचारलं. 
" अरे काल रात्री,  आपल्या पार्टीनंतर मी बांद्रा स्टेशनवरुन घरी जायला रिक्शा पकडली . त्या च्यु कडे चेंज नव्हती त्यामुळे मी नशेत पाकीटात न बघताच ती नोट त्याच्या हातात ठेवली आणि चुकुन ती नोट त्या रिक्शावाल्याकडे गेली... " असं म्हणुन रॉड्रीक डोक्यावर मारुन घेऊ लागला. 
" अरे ए पागल झालाय का ?  ... तु काय टेंशन घेऊ नको.  आयला एक नोट गेली तर काय झालं.  दुसरी तशीच दहा रुपयाची नोट लाव आणि मार स्कॅन च्यामायला ...!"
" माँट्या,  तुला वाटतंय का की मी हे केलं नसेल....!  नो युज...! तीच नोट लागणार.... " रॉड्रीक नकारार्थी मान हलवत म्हणाला... खरं तर त्याला स्वतःचाच खुप राग येत होता.  त्याच्या स्वतःच्याच मुर्खपणामुळे त्याने ती इतकी महत्वाची,  आयुष्य पालटवुन टाकणारी नोट घालवली होती. रॉड्रीक स्वतःलाच दोष देत असताना माँट्या एकदम जोरात ओरडला , "  आयडीया...!  " दचकुन रॉड्रीक त्याच्याकडे पाहु लागला...
" किती सिंपल आहे...?  कशाला पायजे नोट अन् बिट... आयला दोन हातोडे मारु आणि फोडुन टाकु तो पेटारा...!  थांब.... माझ्या गॅरेजमधुन एक हातोडा आणतो ... एक घाव दोन तुकडे. ...!
" ए बाबा.... तसलं काय करु नको... डॅडने त्यात अशी सिस्टीम केलीय की तो पेटरा  जर दुसऱ्या कुठल्या मेथडने ओपन करायचा ट्राय केला तर त्यात असलेल्या सगळा खजिना डिस्ट्रॉय होऊन जाईल   किंवा ... आपल्या काही कामाचा  उरणार नाही. . "
" म्हणजे... असं काय होईल...?  " प्रश्नार्थक मुद्रेने माँट्या त्या पेटाऱ्याकडे पाहु लागला. 
" अरे त्यात चार कॉर्नरला काही केमिकल्सच्या बॉटल्स आहेत  आणि त्या  फार सेंसिटीव्ह आहेत . तो पेटारा जरासा हलवला ना तरी प्रॉब्लेम  होईल . जरा काही गडबड झाली तर ते बॉटल्स मधलं केमिकलची  गोल्ड बरोबर रिऍक्शन  होऊन दुसराच एखादा फालतू मेटल तयार होईल जो आपल्या काही  कामाचा  राहणार नाहीत . सो प्लीज डोंट डु धिस.... “ रॉड्रिक अत्यंत गंभीरपणे माँट्याला समजावत म्हणाला . 
“ बाप रे … डेंजरस  आहे हे   ! “  माँट्या त्या पेटाऱ्याकडे भयमिश्रित नजरेने बघत म्हणाला . 
“ आयला आपला डॅड पण यार असा आहे ना... काय गरज होती हा फालतुपणा करायची...?  "  रॉड्रीक वैतागुन म्हणाला.
" भलतीच सिक्युरीटी केलीय रे... जोसेफ अंकल हॉलीवुडचे पिक्चर जास्त बघायचे वाटतं.  " माँट्या अजुनही त्या पेटाऱ्याकडे बघत होता ...
" मला हा खजिना  मिळू नये  म्हणुन डॅडने हे सगळं केलंय .... आय नो.   "
" नाय रॉडी ,  तु नीट विचार नाय केला. आता बघ हा पेटारा फक्त तुला आणि तुलाच मिळावा अशी जोसेफअंकलची इच्छा असावी ,  त्यामुळे त्यांनी आधीच तुला त्याची कल्पनाही दिली होती. आणि ही संपत्ती दुसऱ्या कुणाच्या हाती लागु नये म्हणुन ही असली भारी सिस्टीम तयार केली. "
" अरे पण मला त्याचवेळी ह्याबद्दल का सांगितलं नाही ...?  हे सगळे पझल्स कशाला ...?  "
" ते काही माहीत नाही बाबा …  पण त्यांनी ह्या खजिन्यासाठी योग्य ती सिक्युरीटी तर तयार केलीय... "
" तीच तर आता नडतेय ना.... " मराठी फिल्ममधला हिरो जसा 'डॅम इट 'करतो तसं काहीतरी रॉड्रीकने केलं.
" रॉडी, मला वाटतं आता एकच ऑप्शन आहे..."
" काय ...?  टेल मी ... " रॉड्रीक अधीर होऊन म्हणाला...
" ती दहा रुपयांची नोट शोधायची .... " माँट्याच्या डोळ्यात एक प्रकारचा निर्धार दिसत होता.
" व्हॉट...?  आर यु सिरीयस..?  तुला कळतंय का तु काय बोलतोयस...?  ती नोट काल रात्री माझ्याकडुन एका रिक्षावाल्याकडे गेलीय... आणि आता ती नोट कुठे  असेल गॉड नोज…!  "
" तु निगेटीव विचारच जास्त करतोस... आता गप्प बस,  चल ... बघु आपण ... कायतरी करु .. चल... " माँट्या  एकदम इरेलाच पेटला.
" हॅव यु टोटली लॉस्ड इट...?  " रॉड्रीक स्वतःच्या डोक्याकडे बोट दाखवत ओरडला... अरे एवढ्या मोठ्या मुंबईत ती नोट कुठे शोधणार...?  "
" ढुंढनेसे तो भगवान भी मिलते है... ये नोट क्या चीज़ है....! चल... " माँट्या  त्याला खेचतच बाहेर घेऊन आला.  रॉड्रीकला हा सगळा प्रकार जवळजवळ अशक्यच वाटत होता पण माँट्याच्या बोलण्याने त्याच्याही मनात मिणमिणता का होईना पण आशेचा दिवा पेटला. कपाट व्यवस्थीत बंद करुन ते दोघे बाहेर आले... आता सुरु होणार होता त्या नोटेचा दिशाहिन शोध...!
क्रमशः 

माझी वेबसाईट - एकदा नजर टाका -

https://kathakadambari.com

लडाखचे  प्रवासवर्णन

Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1

 
माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

 

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users