कविता मनातली

Submitted by Sameer Jirankalgikar on 18 October, 2020 - 01:03

कधी गोमटी, कधी साजिरी.
कधी नखऱ्याची नार नवेली.
कधी अल्लड
ही अवखळ कुठली.
कविता मनातली.

बंडखोर ही रान पेटवी.
वीज नभातुन कडाडलेली.
कधी तप्त ऊन, कधी चांदणओली.
कविता मनातली.

अभंगवाणी, कधी विराणी.
भावगीत अन् गझल नशीली.
कधी ओवी झाली, झरझर झरली.
कविता मनातली.

कधी प्रेमाची अन् विरहाची,
डोळ्यामधुनी कधी ओघळली.
कधी फुलातुन खुदकन हसली.
कविता मनातली.

कधी बासरी घननीळाची.
तांडव होऊन कधी नाचली.
कधी टाळ मृदुंगातून उमटली.
कविता मनातली.

- समीर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults