हवे तसे ना रंग मिळाले

Submitted by निशिकांत on 12 October, 2020 - 01:20

परस्परविरोधी रंगांनी
सुखदु:खाच्या बरबटलेला
हवे तसे ना रंग मिळाले
आयुष्याच्या कॅन्व्हासाला

बाळपण किती रम्य निरागस!
प्रेमाचा वर्षाव होतसे
केंद्रस्थानी मीच मी सदा
कुटुंब मजभोवती फिरतसे
दिवस उडाले भुर्र्कन कसे?
किती विचारू इतिहासाला?
हवे तसे ना रंग मिळाले
आयुष्याच्या कॅन्व्हासाला

तारुण्याच्या उंबरठ्यावर
पुलकित होतो उन्मादाने
अधीरता केवढी मनी ती!
स्वप्न उद्याचे रंगवल्याने
रंग गुलाबी जिकडे तिकडे
मला लागले दिसावयाला
हवे तसे ना रंग मिळाले
आयुष्याच्या कॅन्व्हासाला

आयुष्याच्या शिखरावरती
तारुण्याला खूप भोगले
रेंगाळाया जरी विनवले
नियतीने नाहीच मानले
सुरकुतलेला प्रवास पुढचा
भकास होता जगावयाला
हवे तसे ना रंग मिळाले
आयुष्याच्या कॅन्व्हासाला

तरुणाई अन् बाल्यावस्था
येते आणिक निघून जाते
वृध्दावस्था कायमस्वरुपी
मुक्कामी आलेली असते
गुदमर घुसमट सोडुन जाती
श्वास लागता थांबायाला
हवे तसे ना रंग मिळाले
आयुष्याच्या कॅन्व्हासाला

दिला कुंचला माझ्या हाती
तुझे चित्र काढण्या आयुष्या
रंग सर्व पण तुझियापाशी
बनवलेस बाहुले मनुष्या
जसे पाहिजे जगू न शकलो
लाथ मारतो आयुष्याला
हवे तसे ना रंग मिळाले
आयुष्याच्या कॅन्व्हासाला

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users