कंदील--लघुकथा ( वीकएंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 4 October, 2020 - 00:27

माझ्या लाहानपणची गोष्ट आहे, आम्ही सर्व भावंडे आमच्या मावशीच्या गावी उन्हाळयाच्या सुट्टीत रहायला जात असू. ते गाव अगदी लहान खेडे होते. असेल शंभर सव्वाशे घराची वस्ती. खूप मज्जा यायची त्या काळात. आमच्या मावशीचे घर चार बुरुजांच्या एका गडीवर होते. एकदम प्रशस्त! घरी जाण्यासाठी रस्त्यापासून एक दगडांचा चढाव होत. या चढावाला चोप म्हणत असत. दोन तीन वेळा दिवसातून चढ उतार झाला की भरपूर व्यायाम होत असे.
गावाच्या बाहेर एक मारुतीचे मंदीर होते. त्या मंदिरापासून दोन फर्लांगावर गाव होते. गावात जायला कच्चा रस्ता होता. गावात वीज किंवा रस्त्यावर दिवे पण नव्हते. सर्वांना अंधारात वावरायचा सराव होता. गावात अंधार पसरलेला असूनही अंधारात लपवण्या सारखी कामे होत नसत. गाव बाळबोध संस्कृतीचा होता. एकूणच सर्वजण हसून खेळून रहात असत.
या मंदिरात पंधरवाडी एकदशीला भजन किंवा किर्तन व्हायचे. किर्तन झाले तर नेहमी ते वारकरी संप्रदायाचे असायचे. मला हे किर्तन अगदी लहानपणी पण खूप आवडायचे. दहा बारा लोक गळ्यात टाळ अडकवून उभे रहात आणि मध्यभागी किर्तनकार उभा असे. किर्तनकार एका अभंगाने सुरुवार करी. नंतर त्या अभंगाची शेवटची ओवी मागे उभे राहिलेले बरेच जण वेगवेगळ्या चालीत्/रागात गायचे. मी किर्तनातला हा प्रकार खूप एन्जॉय करायचो अगदी तन्मय होऊन.
पखवाज वाजवणारा एक माणूस पंचेविशीतला असावा. अंध होता तो. त्याचे खरे नाव काय होते ते मला शेवटपर्यंत कळाले नाही कारण त्याच्या आईवडिलापासून गावातले सर्व लोक त्याला आंधळ्या म्हणूनच बोलावत असत. त्यालाही त्याचे कांही वाटत नसे. लाकडाच्या स्टँडवर ( ज्याला घोडी म्हणतात ) पखवाज ठेवून तो वाजवत असे. किर्तन दोन एक तास चालायचे. तेवढा वेळ हा पाट्ठ्या उभा असायचा.
एकेदिवशी किर्तन संपवून सगळे घरी जायला निघाले. अर्थात अंधार होताच. हा अंध माणूस सवयीप्रमाणे न अडखळता चालत होता. इतक्यात समोरून उलट दिशेने चार पाच तरुण पोरांचे टोळके आले. त्यात त्या गावच्या पाटलांचा मुलगा पण होता. गावात पाटील म्हणजे भलतेच प्रस्त असते. पाटलांच्या घरातील अगदी लहान मुलांना पण गावातील सारेजण "मालक"असे संबोधीत. या टोळक्यातील एकाचा धक्का त्या अंध माणसास लागला आणि तो खाली पडला. लोकांनी त्याला उठवले. पाटलांच्या उर्मट पोराने उलट दटावले की "अंधळ्या दिसत नाही का रे!" हा काय प्रश्न झाला का? पण पाटलांचा पोर ना तो!
पुढच्या एकादशीला किर्तन संपल्यावर पुन्हा लोक घरी जायला निघाले. पखवाज वाजवणार्‍या मुलाच्या हातात यावेळी कंदील होता. पुन्हा रस्त्यात ते टोळके भेटले. पाटलांच्या उद्दाम पोराने हसून विचारले "आंधळ्या हातात कंदील कशाला घेतलास रे! तू तर आंधळा ना ! आंधळ्याने शांतपणे उतार दिले की 'मालक गेल्या एकादशीला आपला मला धक्का लागला होता आणि मी खाली पडलो होतो. हा कंदील डोळस लोकांसाठी आणलाय मी. त्यांना दिसावे की कोणी तरी अंधारात उलट दिशेने येत आहे म्हणून."

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसिद्ध कीर्तनकार 'बाबा महाराज सातारकर' यांनी आपल्या 'संत तेथे विवेक' या प्रवचनात काहीसा असाच दृष्टांत दिला आहे!
https://youtu.be/Z9lU6QqCEKU?t=854