स्त्रीत्वाचे देणे

Submitted by रूपाली विशे - पाटील on 2 October, 2020 - 11:54

२०१२ साली घडलेले दिल्लीचे निर्भयाकांड, हैद्राबादचे दिशा अत्याचार प्रकरण किंवा काल परवा घडलेली हाथरसची घटना. देशात स्त्रियांवरील अत्याचारांची मालिका संपता संपत नाही आहे.

मुलीला गर्भातच उखडून फेकणारा आपला विवेकशून्य बनत चालेला समाज जो पर्यंत स्त्री कडे भोगवस्तू न बघता आपल्या सारखीच हाडामासाची व भाव- भावना असलेली सजीव प्राणी आहे ह्या दृष्टीकोनातून बघणार नाही तो पर्यंत स्त्रियांवरील अत्याचार बंद होतील अशी आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही.

अनादि काळापासून स्त्रीत्वाचे मानसिक व शारीरिक शोषण केले गेले आहे. स्त्रीत्वाचा आदर आणि सन्मान झाला असेल तर तो फक्त शिवरायांच्या स्वराज्यात. आज जर स्त्रियांवरील अत्याचाराला आळा घालायचे असेल तर शिवरायांसारखे कठोर शासन हवे.

स्त्रियांवरील अत्याचारांच्या संवेदनशील घटनांवर व्यक्त होण्यासाठी शब्दसुद्धा निशब्द होतात. सदर घटनेत अभागी ठरलेल्या पिडीत कन्येस श्रद्धांजली...

स्त्रीत्वाचे देणे

परिटाच्या निर्भत्सनेने श्रीरामाने त्यागलेली
तव कारणे मनोमनी दुखावलेली
आत्मसन्मान रक्षिण्या देऊनी अग्निपरिक्षा
भूमातेच्या गर्भात सामावलेली श्रीरामाची जानकी मी...

द्युतक्रिडेच्या कपटी डावात अन् अपमानास्पद
वस्त्रहरणाच्या खाईत लोटलेली
दुःशासनाच्या रुधीराने बांधीन मी कुंतले
प्रतिज्ञा पणास नेणारी अन् भरदरबारी
पुरुषार्थ हरलेल्या पांडवांची द्रौपदी मी....

पदोपदी पाहूनी अपमान पतीचा अन् पाहुनी
राधेयाचे कवचकुंडलांचे दान त्या कपटी इंद्रास
क्षणोक्षणी अश्रृ ढाळणारी कर्णाची वृषाली मी...

स्वप्नाळू नयनांची.. नभी उंच भरारी घेऊ पाहणारी
अन् क्षणात त्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या
हैवानांच्या हाती संपलेली
भारतमातेची अभागी कन्या ' निर्भया' मी....

पवित्र स्त्रीत्वाचे देणे आज घडीस
ठरू पाहे स्त्री जीवनास एक शाप
संवेदनाशून्य समाजमन जगी हे
मग निदर्यी कर धजावती करावया पाप...

नको मज पूजा-अर्चा
देऊनी मज देवीचा मान- सन्मान
अवकाशी झेपावू पाहणारा मी जणू एक विहंग
नका छाटू पंख तयाचे ठेवा फक्त हे भान...

‌सौ. रुपाली विशे - पाटील
.

Group content visibility: 
Use group defaults

संध्याजीत जी , सामो, किशोरजी, अस्मिता, नादिशा, तेजो, वर्णिता
तुम्हां सर्वांना मनापासून धन्यवाद.