माधुरीचा अक्षै (भाग ५ अंतिम भाग )

Submitted by nimita on 25 September, 2020 - 21:21

"हॅलो रंजु, अगं, तुझ्याकडे थोडं काम होतं.. तू थोडी लवकर येऊ शकशील का? " पलीकडून ताईंनी विचारलं. त्यावर रंजी म्हणाली," आवं ताई, येवडंच ना ! येत्ये की म्या लौकर.."

"थँक्स रंजु, आणि हो, येताना तुझ्या पार्लर मधून मेकअप चं सगळं सामान घेऊन येशील का? माझ्याकडे ते ब्रश वगैरे काही नाहीयेत गं."

"आसं हाये व्हय !! सांजच्या पार्टी करता तुमचा मेकअप करायचा हाये व्हय ! बरं बरं... समदं सामान आनते म्या बरोबर. आज तुमाला येकदम परी वानी नटवत्ये बगा.. दादा तर बगतच बसतील तुमास्नी !!" रंजी उत्साहात म्हणाली.

संध्याकाळी स्वतः छान तयार होऊन, मेकअप चं सगळं सामान घेऊन रंजी ताईंच्या घरी पोचली. सवयीप्रमाणे तिनी बेल वाजवली ; आतून ताईंचा आवाज आला -" उघडंच आहे दार, ये आत." आत गेल्यावर रंजी बघतच राहिली - बाहेरची खोली खूपच छान सजवली होती...नवे झुळझुळीत पडदे, जमिनीवर उंची गालिचे, महागातली फुलं, मेणबत्त्या... अगदी एखाद्या राजवाड्यात गेल्यासारखं वाटत होतं रंजीला. पण ताई किंवा दादा कोणीच दिसत नव्हते. तेवढ्यात ताईंच्या खोलीतून त्यांनी तिला पुन्हा हाक मारली,"आत ये रंजु, आणि येताना मुख्य दार बंद करूनच ये. तुझे दादा बाहेर गेलेत."

"व्हय," दार बंद करून घेत रंजी म्हणाली.. बरोबर आणलेली पुऱ्यांचा डब्याची पिशवी तिनी दाराजवळच्या एका छोट्या स्टुलावर ठेवली. तिला स्वतःच्या हातांनी तो डबा दादा आणि ताई दोघांना द्यायचा होता.... तिच्या माधुरीताई आणि अक्षै दादांना !!! 'लै खुश व्हतील दोगं बी माझं ह्ये गिफट बगून..' रंजी स्वतःशीच बोलत ताईंच्या खोलीत गेली.

खिडक्यांचे पडदे बंद असल्यामुळे खोलीत तसा अंधारच होता. ताई बेडवर झोपल्या होत्या. रंजीला आत येताना बघून त्या उठून बसल्या. रंजी नी जरा घाबरतच विचारलं,"काय वो ताई? काय झालं? बरं वाटंना की काय तुमास्नी? आश्या आंधारात बसलायसा ? चला, हुटा बगू... म्येकप ला येळ लागंल." बोलता बोलता रंजी नी खिडक्यांचे पडदे बाजूला सारले. बाहेरच्या संधीप्रकाशानी खोली जणू उजळून निघाली. "ताई, तुमी तोंड धुऊन या तोपोत्तर म्या समदं सामान लाऊन ठिवते," रंजी म्हणाली.

ताई काही न बोलता उठून बाथरूम मधे गेल्या. काही मिनिटांतच टॉवेल नी चेहेरा पुसत त्या रंजी समोर येऊन बसल्या. रंजीनी बरोबर आणलेली vanity case उघडली आणि आतलं सामान ड्रेसिंग टेबल वर काढून ठेवलं. ताईंच्या दिशेनी वळून बघत ती म्हणाली,"ताई, तुमची साडी कोन्त्या रंगाची हाये? साडीच न्येसनार ना ...का दादांनी आनलेला त्यो नवीन मॅक्सि....." रंजीच्या तोंडून त्यापुढे शब्दच फुटेना !! तिची नजर ताईंच्या चेहेऱ्यावर खिळली होती... पण नजरेला जे दिसत होतं त्यावर विश्वास ठेवायला तिचं मन तयार होत नव्हतं !! ताईंचे डोळे लाल दिसत होते- नाही नाही....खूप वेळ रडल्यानंतर जसे सुजून लाल होतात तसे दिसत होते ; आणि.....

आणि त्यांच्या डाव्या गालावर बोटांचे वळ उठले होते .... ते काळे निळे पडलेले बोटांचे छाप बघून रंजी सुन्न झाली...तिनी विस्फारलेल्या नजरेनी ताईंच्या डोळ्यांत बघितलं.... पण त्यांना तिच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत होत नव्हती. तिची नजर चुकवत त्या घोगऱ्या आवाजात म्हणाल्या,"मेकअप नी हे डाग झाकले जातील ना गं रंजु? रात्रीच्या पार्टी मधे कोणाला दिसायला नको हे सगळं.... जमेल ना तुला माझा चेहेरा ठीक करायला ?" बोलता बोलता ताईंना रडू फुटलं; इतका वेळ मनाला घातलेला बांध फुटला आणि त्या दोन्ही हातांत आपला चेहेरा लपवून रडायला लागल्या. त्यांचं ते मन विदीर्ण करून टाकणारं रडणं ऐकून रंजी एकदम भानावर आली. तिला आपल्या ताईंची ही अशी केविलवाणी अवस्था अजिबात बघवत नव्हती. पण त्याहीपेक्षा जास्त ... या सगळ्या घटनांच्या मागचा खरा अर्थ लक्षात आल्यामुळे तिच्या जीवाचा संताप होत होता. खरं सांगायचं तर खूप द्विधा मनस्थिती झाली होती तिची. ताईंनी न सांगताच तिला त्या बोटांच्या खुणांमागचं खरं कारण कळलं होतं.... पण त्यावर विश्वास ठेवायला तिचं मन धजत नव्हतं.... तिचे दादा असं काही करतील हे तिला पटतच नव्हतं... त्यांना तर ती 'जंटलमन' समजत होती.... ताईंची इतकी काळजी घेणारा, त्यांच्यासाठी इतक्या महागाच्या भेटवस्तू घेऊन येणारा त्यांचा स्वतःचा नवरा असा त्यांच्या अंगावर हात टाकेल? कसं शक्य आहे हे? पण वस्तुस्थिती समोर दिसत होती.... ताई स्वतः जरी काही बोलत नसल्या तरी त्यांचा चेहेरा ओरडून ओरडून हे सत्य रंजीला दाखवून देत होता.

अचानक रंजीला काहीतरी लक्षात आलं. ताईंच्या समोर बसून त्यांचे हात हातात घेत तिनी विचारलं," ताई, खरं खरं सांगा... ही डोस्क्याची जखम शिडीवरून पडल्यामुळं न्हाई झाली ना? त्ये बी दादांनीच..." त्या पुढचे शब्द उच्चारायला देखील घाबरत होती रंजी !! पण तिचा तो प्रश्न ऐकून ताईंचा मात्र उरला सुरला संयम ही संपला. रंजीच्या कुशीत शिरून त्या हमसून हमसून रडायला लागल्या...रडता रडता एकीकडे त्यांचं मन मोकळं करत म्हणाल्या,"मी माझ्याकडून खूप प्रयत्न करते गं त्यांच्या मनासारखं वागायचा- त्यांना खुश ठेवायचा.... मला माहितीये - त्यांचं पण खूप प्रेम आहे माझ्यावर ; पण तरीही.... नक्की कुठे आणि काय चुकतंय तेच कळत नाहीये मला...." ताई अजूनही बरंच काही बोलत होत्या. त्यांचे ते शब्द त्यांच्या हुंदक्यांबरोबर रंजीच्या कानापर्यंत तर पोचत होते; पण तिच्या डोक्यात शिरत नव्हते. तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. तिच्या भावविश्वातला एक खूप मोठा इमला आज कोलमडून पडला होता...अगदी पत्त्यांच्या घरासारखा....ती आजपर्यंत ज्या दादांना 'जंटलमन' समजत होती त्यांचं खरं रूप आता तिला दिसलं होतं.

एकाच माणसाची दोन रूपं तिच्या डोळ्यांसमोर नाचत होती....जगासमोर अदबीने वागणारे, मृदु बोलणारे, ताईंची काळजी घेणारे 'जंटलमन' दादा....ते रूप खरं ? का - एका स्त्रीवर हात उगारून, तिला शारीरिक आणि मानसिक रित्या इजा करणारे , त्यालाच आपली मर्दुमकी समजणारे कोत्या मनाचे दादा ....हे रूप खरं ???

तेवढ्यात ताईंनी तिच्या हातावरची आपली पकड घट्ट करत तिला काहीतरी विचारलं. रंजी भानावर आली आणि तिनी ताईंच्या डोळ्यांत बघून त्यांना प्रश्न केला ," पन म्या म्हनते की कशाला लपिवताय ह्ये समदं लोकांपासून? बगू द्या की समद्यास्नी.... त्येंना बी कळल - दादा तुमच्या बरुबर कशे वागत्यात त्ये ... आनी आज तर तुमच्या लग्नाचा वाडदिवस.... आजच्या या खास दिवसाला बी जर त्ये असं वागत्यात तर मग तुमी कशापायी सांबाळून घ्येता ? कश्याला पदरात घालताय त्येंची चूक ?"

पण रंजीच्या या सगळ्या बोलण्याचा त्या क्षणी तरी तिच्या ताईंवर काहीही परिणाम होत नव्हता.. तिचं म्हणणं त्यांना पटवून देण्यासाठी ती अजून काहीतरी बोलणार इतक्यात आपले डोळे पुसत ताई तिला म्हणाल्या," इतकं सोपं नाहीये ते रंजु...आणि तेवढा सगळा विचार करायला आत्ता वेळ नाहीये माझ्याकडे. आत्ता तरी माझ्यासाठी आजची ही संध्याकाळ नीट पार पडणं महत्वाचं आहे . आजच्या या एका पार्टीवर बरंच काही अवलंबून आहे गं... माझ्या आई बाबांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य, माझी नोकरी आणि माझं करिअर , माझं सोशल स्टेटस....आणि अजूनही बरंच काही !!! त्यामुळे असा एकदम तडकाफडकी निर्णय घेणं शक्य नाहीये मला... नंतर शांत डोक्यानी विचार करून काय ते ठरवीन मी...आणि त्यावेळी तुझं आत्ताचं बोलणंही नक्कीच विचारात घेईन. पण आत्ता मी तुला जे सांगितलंय तेवढंच कर, प्लीज !! आज रात्रीच्या पार्टी साठी मला लवकर तयार कर.. थोड्याच वेळात पाहुणे यायला सुरुवात होईल.

रंजीला ताईंचं बोलणं काही फारसं पटलं नव्हतं पण त्या वेळी त्यांच्याशी काही बोलण्यात अर्थ नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. तिनी काही न बोलता ताईंच्या चेहेऱ्यावर एक नजर टाकली आणि ती कामाला लागली. आजपर्यंत पार्लर मधे तिनी बऱ्याच बायकांचे makeovers केले होते ... पण आजचा हा अनुभव खूप खूप वेगळा होता ... अवघड आणि तितकाच क्लेशदायक... आपल्या डोळ्यांतलं पाणी परतवत रंजी हळूहळू ताईंच्या चेहेऱ्यावरचे डाग मेकअप च्या आवरणाखाली लपवायचा प्रयत्न करत होती. आज जणूकाही तिचं सगळं कसब पणाला लागलं होतं..पण हे सगळं करताना एकीकडे तिला स्वतःचाच राग ही येत होता. ताईंचा हा हट्ट मान्य करून ती मनाविरुद्ध का होईना पण एका चुकीच्या कामात कोणाचीतरी साथ देतीये - ही जाणीव तिला अस्वस्थ करत होती. थोड्याच वेळात ताईंचा चेहेरा नेहेमीसारखा दिसायला लागला... पण त्यांच्या त्या रिकाम्या आणि भकास नजरेत ती नेहेमीची चमक मात्र आणता आली नाही रंजीला .....

आपलं काम पूर्ण झाल्यावर रंजी घरी परत जायला निघाली. निघताना ताईंचा हात आपल्या हातात घेत काळजीच्या सुरात म्हणाली," मी निगत्ये आता ...पन काय बी गरज वाटली तर लगीच फोन करा मला...मी हाये तुमच्यासंगं.... पन आत्ता जात्ये ; सायेब यायच्या आदी मला हितून निघाया हवं... त्ये जर समोर दिसल्ये तर म्या काय करेल माजं मलाच ठावं न्हाई.." तिच्या तोंडून नेहेमीच्या 'दादा' ऐवजी 'साहेब' ऐकून ताईंनी चमकून तिच्याकडे बघितलं.. त्यांच्या नजरेतला प्रश्न बघत रंजी खिन्न हसून म्हणाली," सोरी ताई, पन आता त्येंना दादा म्हनावंसं वाटत न्हाई हो !"

रंजी जड पावलांनी परत जायला वळली. मुख्य दार उघडताना तिची नजर तिथे ठेवलेल्या त्या डब्यावर गेली... तिनी स्वतःच्या हातांनी तिच्या दादांसाठी बनवलेल्या- खास त्यांच्या आवडीच्या पाकातल्या पुऱ्या !!! किती हौसेनी बनवल्या होत्या तिनी ... मनाशी काहीतरी ठरवून रंजीनी तो डबा उचलला आणि ती बाहेर पडली.

कोणीतरी झपाटल्यासारखी ती आपल्याच तंद्रीत चालत होती. पण तिचं मन मात्र कधीच घरी पोचलं होतं... तिच्या अशोकपाशी !! त्याचा तो भोळाभाबडा चेहेरा आठवला आणि रंजीला स्वतःचीच लाज वाटायला लागली.. 'माज्या अशोकची तुलना मी सायबांच्या बरुबर करत व्हते....त्येला त्येंच्या सारका 'जंटलमन' बनवायचा परयत्न करत व्हते !!'

रंजीच्या डोळ्यांत आता पश्चात्तापाचे अश्रू गोळा व्हायला लागले.

दारूच्या नशेत तिच्यावर हात उगारला म्हणून स्वतःलाच शिक्षा करून घेणारा तिचा गबाळा अशोक....तिची माफी मागत तिच्या कुशीत शिरून लहान मुलासारखा रडणारा तिचा गावंढळ अशोक.... तिला 'जशी आहे तशी' स्वीकारून तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा तिचा बावळट अशोक....

"आजिबात न्हाई..." रंजी स्वतःलाच दटावत म्हणाली..."माजा 'जंटलमन' अशोक....माज्या आयुष्यातला खराखुरा 'अक्षै' ... " रंजीला अशोकचं दुपारचं बोलणं आठवलं .." तू मेरी माधुरी और मैं तेरा अक्षै.." त्या अवस्थेतही रंजीच्या चेहेऱ्यावर हसू फुललं... 'कधी एकदा घरी जाते आणि अशोक ला बघते ' - असं झालं होतं तिला... पुऱ्यांचा डबा छातीशी घट्ट कवटाळून धरत तिनी धावत पळत घर गाठलं. आता त्या पुऱ्या खऱ्याखुऱ्या 'जंटलमन' ला खायला मिळणार होत्या !!!

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान शेवट!!
ताईने काहीतरी ठाम पावले उचलावीत हे बरे!

छान लिहिली आहेत कथा. "ताई- दादांच्या" नात्यात काहीतरी गडबड आहे हे आधीपासुनच जाणवत होतं. त्यामुळे शेवटचा भाग आधीच्या भागांप्रमाणे रंगला नाही. कदाचित आधीच्या भागात एक दोन वेळा ताईंच्या प्रतिक्रियांबद्दल लिहिले नसते तर शेवटच्या भागात जास्त धक्का बसला असता असे वाटले.