माधुरीचा अक्षै (भाग ४)

Submitted by nimita on 25 September, 2020 - 01:25

साहेबांना...नाही नाही ... रंजीच्या दादांना घरी येऊन आता जवळजवळ दोन आठवडे होत आले होते. त्यांच्या येण्यामुळे रंजीच्या कामांत जे थोडेफार बदल झाले होते तेही आता तिच्या अंगवळणी पडले होते. त्यातला सगळ्यात मोठ्ठा बदल म्हणजे आता रंजीला रविवारची सुट्टी मिळणार होती. ही सुद्धा दादांचीच कल्पना होती.

एक दिवस सकाळी जेव्हा रंजी ताईंच्या घरी गेली तेव्हा ताई त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या. दादांनी रंजीला ताईंकडे लक्ष ठेवायला सांगितलं आणि ते ऑफिसला निघून गेले. रंजीनी त्यांच्या खोलीत जाऊन बघितलं तर ताईंच्या कपाळावर चिकटपट्टी लावली होती. रंजी त्याबद्दल काही विचारणार इतक्यात ताई म्हणाल्या," अगं, काल संध्याकाळी तुझ्या दादांची ती सूटकेस लॉफ्ट वर टाकायला म्हणून शिडीवर चढले आणि पाय घसरून पडले.... कपाळावर छोटीशी जखम झालीये. काळजी करण्यासारखं काही नाहीये. होईल ठीक एक दोन दिवसांत . तुझ्या दादांनी औषध लावून दिलंय आणि गोळी पण देऊन गेलेत जाताना... जर जास्त दुखायला लागलं तर घेईन मी."

"आवं ताई, पन ती सूटकेस तर परवाच टाकली न्हवं का आपन वरती?" रंजी आठवायचा प्रयत्न करत म्हणाली. त्यावर तिला थोडंसं दटावत ताई म्हणाल्या,"ती नाही गं...अजूनही एक होती ना ... ती काल टाकली मी वर . आता तू बोलतच बसणार आहेस का ?...जा लवकर.. मस्तपैकी आलं घालून चहा कर आपल्या दोघींसाठी. आज मी ऑफिसला जाणार नाहीये. चहा पिऊन थोडा वेळ आराम करीन. जा तू - चहा कर पटकन ."

थोड्या वेळानी सगळं काम आटोपून रंजी घरी जायला निघाली तेव्हा ताई म्हणाल्या,"रंजे, उद्या रविवार आहे हे माहितीये मला.. खरं म्हणजे तुझा सुट्टीचा दिवस, पण उद्या रात्री घरी मोठ्ठी पार्टी आहे.. अगं, उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून आमचे सगळे नातेवाईक, ऑफिस मधले लोक- असे बरेच पाहुणे असतील. सगळं जेवण आम्ही बाहेरूनच मागवणार आहोत पण तरीही... तू येशील का जरा मदतीला? प्लीज ? पूर्ण वेळ थांबली नाहीस तरी चालेल. अंधार व्हायच्या आत जा घरी. "

ताईंचं बोलणं ऐकून रंजीला खूपच आनंद झाला. ती अगदी उत्साहानी तयार झाली यायला. "आवं ताई, पलीज कशापायी म्हनताय ? म्या येईन की नक्की... इतका चांगला दिस हाये उद्या... किती वाजता येऊ त्येवडं सांगा फकस्त.."

दुसऱ्या दिवशी ताईंच्या लग्नाचा वाढदिवस आहे हे कळल्यावर रंजीच्या अंगात नवीनच उत्साह संचारला. संध्याकाळी घरी गेल्यावर तिनी अशोकला पण सांगितलं त्याबद्दल... रंजीला अगदी मनापासून वाटत होतं की तिच्या ताई दादांना काहीतरी छानशी भेटवस्तू द्यावी ; पण नक्की काय द्यावं तेच सुचत नव्हतं तिला. "त्यांच्या कडं तर समदंच हाये... आपन अजून काय येगळं द्येनार?" अशोक म्हणाला. ,"आता मदत कराया जातीच हायेस ना...त्ये बी सुट्टीच्या दिवसाला....त्येच पुरेसं हाये की.... फकस्त त्येंना शुबेच्छा द्ये... इंग्रजी मदी काय म्हणत्यात? हां... हॅपी अनिव्हर्सरी !!"

अशोकच्या दृष्टीनी आता हा प्रश्न सुटला होता. पण रंजीला मात्र त्याची ही कल्पना फारशी पटली नव्हती. पूर्ण संध्याकाळ तिच्या डोक्यात तो एकच विचार घोळत होता...ताई आणि दादांना काय द्यायचं?

रात्री जेवताना अचानक तिला एक मस्त कल्पना सुचली....तिनी उत्साहात अशोक कडे बघितलं ; पण तो एकीकडे त्याच्या फोनवर कोणाशी तरी बोलत बोलत दुसरीकडे जेवण्यात मशगुल होता. त्याचं लक्षच नव्हतं रंजीकडे. पण त्याला असं गबाळ्या सारखं जेवताना बघून रंजी मात्र वैतागली. तो जमिनीवर फतकल मारून बसला होता . सगळं लक्ष त्या फोन मधे असल्यामुळे अर्धं अन्न जमिनीवर सांडत होतं .. त्याची ती लडबडलेली बोटं आणि ते मचामचा आवाज करत खाणं... तोंडात घास असताना बोलणं... सगळं असह्य व्हायला लागलं रंजीला. तिला एकदम तिच्या दादांची आठवण आली.. त्यांचं प्रत्येक काम कसं व्यवस्थित आणि नीटनेटकं असायचं. हा असा गावंढळपणा नाही करायचे ते कधीच ...त्यांच्याकडे बघितलं की नेहेमी कसं प्रसन्न वाटायचं !

तिला खूप वाटायचं की अशोक नी पण असंच टापटीप राहावं... एकदम जंटलमन बनून .. .अक्षै सारखं.....तिच्या दादांसारखं !!

पण अशोकशी त्या बाबतीत काही बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखं होतं... त्याच्या दृष्टीनी त्याच्या वागण्या बोलण्यात काहीच गैर नव्हतं. त्यामुळे मनातल्या मनात धुसफुसत राहण्याखेरीज रंजीकडे दुसरा पर्याय नव्हता . त्या रात्रीसुद्धा ती तशीच चिडचिड करत झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तिची लगबग सुरू झाली. संध्याकाळी ताईंकडे जायचं होतं. रंजीनी ठरवलं होतं की जाताना त्यांच्या साठी काहीतरी छान गोडाधोडाचं खायला करून घेऊन जायचं . आदल्या रात्री पासून डोक्यात तोच विचार घोळत होता. पण नक्की काय करावं हेच तिला सुचत नव्हतं. 'काय बरं आवडतं ताई दादांना?' ती खूप आठवायचा प्रयत्न करत होती... ताईंच्या तर फारशा आवडीनिवडी नव्हत्याच म्हणा... त्यामुळे दादांना काय आवडतं तेच बघायला हवं....तेवढ्यात रंजीला आठवलं- एकदा बोलता बोलता ताई म्हणाल्या होत्या की दादांना पाकातल्या पुऱ्या खूप आवडतात... मग काय ...रंजीनी अशोक ला वाण्याच्या दुकानात पिटाळलं ... वेलदोडे आणायला. अशोक परत आल्यावर म्हणाला," किती म्हाग हायेत गं येलदोडं.... पन् दादांसाटी पायजे म्हनून धा रुप्याचे आनले. पुरतील न्हवं ?" रंजीनी मोठ्या हौसेनी चांगल्या डबाभरून पुऱ्या करून ठेवल्या. अशोक ला मात्र त्यातल्या फक्त एकाच पुरीवर समाधान मानावं लागलं.... त्यावर जेव्हा त्यानी आपली नाराजी दाखवली तेव्हा रंजी त्याला म्हणाली," आदी माझ्या दादांसारका जंटलमन बनून दाखीव.. मंग तुला चांगल्या परात भर पुऱ्या द्येते करून."

तिच्या या फटकारण्या मुळे अशोक एकदम हिरमुसला.. थोड्याशा नाराजीच्या सुरातच तो म्हणाला," आगं, पन म्या काय कधी चुकीचं वागलोय ?? सांग की... समदं तू म्हंतीस तसंच तर करतुया..येकदम जंटलमन वानी.... आनी तरीबी ?आनी अजून येक - म्या कदी म्हनलो का तुला.. तू आसंच वाग आन् तसंच वाग ? मला तर तू जशी हायेस तशीच आवडत्येस..."

आपल्या या युक्तिवादाचा रंजीवर काहीच परिणाम होत नाहीये हे लक्षात येताच अशोक दोन पावलं पुढे सरकला ; रंजीला आपल्या जवळ ओढून घेत म्हणाला ," तू मेरी माधुरी और मैं तेरा अक्षै।"

अशोकच्या या लाडिगोडीमुळे रंजी पण थोडी पाघळली. डब्यातून अजून दोन पुऱ्या काढून त्याच्या हातात टेकवून ती म्हणाली," येकदा तू सोत्ता येवून बग माज्या दादांना.... मंग कळंल तुला - खरा जंटलमन कसा असतुया त्ये !!"

दुपारी जेवण झाल्यावर ती अशोकला म्हणाली," सांजच्याला यायला उशीर व्हईल म्हनून आत्ताच समदं ज्येवन बनवून ठिवलंय. तुला भुका लागल्या तर खाऊन घ्ये. " रंजी तिच्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे अजूनही काहीबाही सांगत होती ; तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली.. " ताईंचा फोन? आत्ता?" रंजी फोन उचलून घेत म्हणाली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय
छान चालूये कथा
नियमित भाग येत आहेत हे best

रंजीचा भ्रम लवकरच दूर होईल असे वाटतेय. >>> ह्म्म्म .

वो सुटकेस का घाव .. कुछ् तो गडबड है अभिजीत .
पंकज , एक काम करो , वो सुटकेस को फोरेन्सिक लॅब भिजवा दो .
डॉ. साळुन्खे चेक करके बतायेन्गे के उससे कोई सुराग मिलता है क्या .

डॉ. साळुन्खे चेक करके बतायेन्गे के उससे कोई सुराग मिलता है क्या . >> हा... हा... सुट केस चेक करके ये केस सुटेगा Biggrin