माधुरीचा अक्षै (भाग २)

Submitted by nimita on 23 September, 2020 - 01:40

ताई पण बहुतेक तिचीच वाट बघत होत्या. त्यांनी लगेच दार उघडलं आणि रंजीच्या हसऱ्या, उत्साही चेहेऱ्याकडे बघत विचारलं," आणलंस का?" रंजीनी होकारार्थी मान हलवत आपल्या छोट्या पिशवीतून तिचं आधार कार्ड काढलं आणि ताईंच्या हवाली केलं. काल जेव्हा रंजी कामाचं ठरवायला आली होती तेव्हाच ताईंनी सांगितलं होतं-' आधार कार्ड चेक केल्यावरच कामावर ठेवीन.' ताईंचं हे वाक्य ऐकून खरं म्हणजे रंजीला थोडासा राग च आला होता त्यांचा...'म्हंजे मी काय कुनी चोर, डाकू हाये व्हय ? इतक्या घरांमंदी कामं करत्ये पन अजून कोनीबी माज्यावर आसा संशय घ्येतला न्हाई....' रंजी हे सगळं त्या ताईंना ऐकवणारच होती तेवढ्यात ताईंनी तिच्या समोर त्यांचं आधार कार्ड धरलं आणि म्हणाल्या," हे बघ, हे माझं कार्ड आहे. नीट चेक करून घे नाव आणि फोटो." त्यांच्या या कृतीमुळे रंजीला अगदी ओशाळल्यागत झालं होतं. तिचा तो गोरामोरा चेहेरा बघून त्या ताई म्हणाल्या होत्या," अगं, त्यात चुकीचं काय आहे ? तुला पण हक्क आहेच की खरं खोटं पडताळून बघायचा." हे असं काहीतरी पहिल्यांदाच अनुभवलं होतं रंजीनी !!

ताईंच्या या अशा विचारांनी आणि वागण्यानी रंजी खूपच प्रभावित झाली होती ; त्यांच्या घरी काम करायचा तिचा निर्णय अजूनच पक्का झाला होता.

ताईंनी रंजीचं आधार कार्ड नीट तपासून पुन्हा तिच्या हवाली केलं आणि तिला घरात घेतलं. रंजीला सगळ्या कामाचं स्वरूप समजावून सांगत ताई म्हणाल्या,"आज तू नुसतं बघ मी काय आणि कसं करते ते. जर काही शंका असल्या तर आजच विचारून घे ; म्हणजे उद्यापासून तुला नीट काम सुरू करता येईल." रंजीला हे एकदम पटलं... नाहीतर इतर वेळी पहिले काही दिवस 'हे कुठेय ? ते कुठे ठेवू ? कसं करू?'- हे असे प्रश्न विचारण्यातच अर्धा वेळ जायचा. रंजी अगदी लक्ष देऊन ताईंचं बोलणं ऐकत होती; सगळं काम नीट समजावून घेत होती. का कोणास ठाऊक पण तिला वाटत होतं की 'आपल्या कामावर या ताई खुश व्हायला हव्या. त्यांना कुठेही तक्रारीला जागा मिळू नये.'

तिला त्यांची काम करण्याची पद्धत एकदम आवडली.. सगळं कसं अगदी व्यवस्थित पण तरीही अगदी शिस्तबद्ध ! पुढच्या एक दोन दिवसांत रंजीनी सगळं काही समजून घेतलं आणि ती ताईंच्या घरात रुळली. खरं म्हणजे तसं जास्ती काम नसायचं. दोन माणसांचं असं कितीसं काम असणार ! आणि त्यातून साहेब - म्हणजे ताईंचा नवरा - ते तर महिन्यातले बरेचसे दिवस बाहेरगावीच असायचे. फिरतीची नोकरी होती त्यांची. ताई पण एका मोठ्या कंपनी मधे नोकरी करायच्या.

हळूहळू तिचं आणि तिच्या ताईंचं नातं अजूनच खुललं. खूप काही शिकली रंजी तिच्या ताईंकडून !! घरात आणि आजूबाजूला स्वच्छता, साफसफाई पाळणं ; स्वतः नीटनेटकं राहणं इतकंच नव्हे तर स्वैपाकाच्या वेगवेगळ्या रेसिपीज सुद्धा शिकवल्या तिला ताईंनी. तिच्या ताई जरी पैसेवाल्या असल्या तरी उधळपट्टी करणाऱ्या नव्हत्या. घरात असलेल्या वस्तूंचा योग्य आणि पुरेपूर वापर कसा करायचा हे रंजीला आता लक्षात आलं होतं. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून की काय पण हळूहळू तिच्या घराचाही कायापालट होत होता. घराची दारं आणि खिडक्या आता रंजीच्या जुन्या साड्यांच्या
पडद्यांनी सजली होती. अशोकच्या जुन्या कपड्यांची आता पायपुसणी झाली होती. ताईंच्या घरातल्या रंगीबेरंगी प्लास्टिक च्या कॅरी बॅग्स रंजी घरी घेऊन यायची- ताईंनी शिकवल्याप्रमाणे त्यांपासून ती खूप सुंदर फुलं बनवायची. घरातल्या जुन्या डबे- बाटल्यांना नटवून त्यात ती फुलं सजवून ठेवायची.तिच्या इतर मैत्रिणींना पण तिनी अशी फुलं बनवायला शिकवली होती.इतकंच नव्हे तर ताईंच्या वाढदिवसाला अशा फुलांचा एक छानसा गुच्छ बनवून त्यांना दिला होता रंजीनी...

ताईंचं बघून बघून रंजीनी घरातल्या तुटलेल्या बादल्या, प्लास्टिकच्या बरण्या वगैरे वापरून एक छोटीशी किचन गार्डन पण बनवली होती. तिच्या त्या बागेत बहरून आलेली कोथिंबीर, पुदिना, आलं, गवती चहा बघून अशोक पण खूप खुश झाला होता. एक दिवस रंजी संध्याकाळी घरी आली तेव्हा अशोक तिला त्यांच्या खोलीमागच्या छोट्याशा जागेत घेऊन गेला.... तिथे तिच्यासाठी एक सरप्राईज होतं... अशोकनी त्याच्या वर्कशॉप मधली जुनी खराब झालेली मोठी टायर्स मधे कापून त्यांत माती भरून ठेवली होती- खास रंजीची बागकामाची हौस पुरवण्यासाठी !! अशोकची ती धडपड बघून रंजीचे डोळे पाणावले... त्याच्यावरच्या प्रेमानी तिचा ऊर भरून आला...मग त्या दोघांनी मिळून त्या जगावेगळ्या कुंड्यांमधे वेगवेगळी झाडं लावली.

तिच्या ताईंना पण खूप कौतुक वाटायचं तिचं ... रंजी इतर कामवाल्यांसारखी नव्हती. तिचे विचार, तिचं वागणं सगळं वेगळंच होतं. खूप समजूतदार, प्रामाणिक आणि मनमिळाऊ स्वभाव होता तिचा.

बऱ्याच वेळा ताईंना त्याचा प्रत्यय आला होता. जेव्हा तिच्या पगाराबद्दल बोलणं झालं होतं तेव्हा रंजी म्हणाली होती," ताई, मला दर म्हैन्याच्या पंदरा तारखंला द्या माजा पगार... सुरुवातीला समदं पैसं हातात आलं की इकडं तिकडं खर्च व्हतात आनी मंग म्हैना अखेरला लै तंगी होत्ये... म्हनून आता ही आयडियाची कल्पना करून बघनार हाये मी. चालेल ना तुमाला ?" तिची ही आयडिया ची कल्पना तिच्या ताईंना पण खूपच आवडली.

सुरुवातीला एक दिवस रंजी कामावर आली तेव्हा तिच्या पिशवीत प्लास्टिक चे रिकामे डबे दिसले .. त्याबद्दल जेव्हा ताईंनी तिला विचारलं तेव्हा रंजी म्हणाली ," म्या कदी बी कोनाच्या घरचं उरलेलं अन्न न्हाई घेऊन जात ताई... आमी गरीब असलो तरी भिकारी न्हाई. आमच्या सोताच्या पैशातून मिळणारी मीठ भाकर च गोड हाये आम्हास्नी. पन आसं सांगितलं तर लोकांना वाटतंय की मला लै माज हाये; म्हनून म्या काय करते की जेव्हा पन कुनी काई उरलं सुरलं द्येतात ना त्ये समदं घेऊन जाते आनी त्या सिग्नल च्या चौकातल्या भिकाऱ्यांना नेऊन द्येते. तेवडंच त्यांचं बी पॉट भरतं." रंजी आपल्याच तंद्रीत बोलत होती.."तसं तर म्या कोनाच्याबी घरी चा-कॉफी बी न्हाई घ्येत...फकस्त तुमच्याकडेच पिते..." तिच्या या कबुलीवर ताईंच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसलं तशी रंजी पुढे म्हणाली," त्येला कारन बी तसंच हाये.... म्या पैल्यांदा ज्येनच्याकडं कामाला व्होते ना त्या बाई काय करायच्या..त्येंचा चा करून जो चोथा उरायचा ना, त्यात पानी आनी अगदी नावाला दूध घालून माझ्यासाटी आणि त्येंच्या वॉचमन साटी येगळा चा बनवायच्या. म्या तर सरळ सांगून टाकलं त्येना का म्या चा पीतच न्हाई... अजून एक आजी हायेत - त्या त्यांच्या घरच्या नोकरांना तुटलेल्या कपात चा द्येत्यात.... म्हनून त्येंच्याकडं बी काईच खात पीत न्हाई म्या." हे सांगत असताना रंजीच्या चेहेऱ्यावर मिश्र भाव दिसत होते. एकीकडे अशा दुजाभाव करणाऱ्या लोकांबद्दल राग होता तर दुसरीकडे त्यांच्या वागण्यामुळे होणारं दुःख, जीवाची होणारी तगमग दिसत होती. त्या रागाच्या भरातच ती तणतणत म्हणाली ,"आसं कसं वागत्यात हो ताई ह्ये लोक? ह्यांच्या घरी कोन पावने आले ना तर त्ये नको नको म्हनत असताना बी जबरदस्ती नी त्येंना आल्याचा मस्त चा पाजत्यात आनी जोडीला चार बिस्किटं बी ठ्येवत्यात ; पन रोज यांची कामं करनाऱ्या आमच्यासारख्या गरीबांना येक कप चा पाजला तर ह्यांची जागिरी वायाला जात्ये !!"

रंजीचं ते बोलणं ऐकून तिच्या ताईंचेही डोळे पाणावले...'खरंच, असं कसं वागू शकतात लोक ? आणि हे म्हणे 'सुशिक्षित आणि सुसंस्कृत' !!' ताईंच्या मनात आत कुठेतरी काहीतरी पिळवटून निघत होतं. पण रंजीच्या हाकेनी त्या भानावर आल्या.. रंजी म्हणत होती- "पन तुमी तसलं काय बी न्हाई करत...माझ्यासाटी येगळा चा बी न्हाई आनी येगळा कप बी न्हाई....म्हनून मला तुमच्याकडं काम कराया लै आवडतं." रंजीच्या डोळ्यांतून तिच्या ताईंबद्दलचा आदर, प्रेम, आत्मीयता अगदी ओसंडून वाहत होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहीले आहे. छान देवाण घेवाणीतून फुलणारे आगळेवेगळे नाते. माझ्याकडे एक शुभांगी म्हणुन होती. फार आवडायची मला. आमची मैत्री झाली होती.