स्वप्न-सरोवर

Submitted by अपूर्व जांभेकर on 22 September, 2020 - 07:38

हळूच उमलले फूल एकदा, तळ्याकाठच्या त्या वेलीवर
डोकावूनी पाहत आहे, खोल स्वतःला... किती काळचे...

रवी उदयाचा नूतन वायू, स्वैर खेळतो जलपटलाशी
तरंग उठती वरवरले जरी, अंतरंग तरी अभंग सुस्थिर -।।१।।
हळूच उमलले फूल एकदा...

माध्यान्ही मग लाट उन्हाची, पेटते पाकळी-पाकळी
आश्चर्य किती पण तळ्यातले 'ते', ध्यान लावूनी शांत समांतर -।।२।।
हळूच उमलले फूल एकदा...

कातरवेळही सरून जाते, क्षितिज कुशीतून येते रजनी
मिटल्या डोळ्यांनी उतरून खाली, पाण्यात होतसे भेट अखेर -।।३।।
हळूच उमलले फूल एकदा...

कुरणांचे दागिने भरजरी, लतिका-कलिका अन्य कितीतरी
परंतु माणिक एक टपोरा, खुलवीत आहे पुन्हा सरोवर -।।४।।
डोकावूनी पाहत आहे, खोल स्वतःला... किती काळचे...

© अपूर्व संजीव जांभेकर

Group content visibility: 
Use group defaults