शोध

Submitted by सर्वदेव on 20 September, 2020 - 12:25

माझ्यात मी शोधतो
मलाच मी जो होतो
साऱ्या खुणाच मिटल्या
नवीनच का मी दिसतो

कधी खेद ना मनाला
एक आंनदची होता
हरवून परी स्मृतींना
झालो क्षणात रीता
डोकावुनी पुन्हा आपुल्या
गतकाळात जाऊ पाहतो
साऱ्या खुणाच मिटल्या
नवीनच का मी दिसतो

वाटे गरज मजला
त्या एक सवंगड्याची
शोधुनी देईल जो
वाट माझ्याच त्या घराची
जखमा ज्या जाहल्या
एकेक करुनी मोजतो
साऱ्या खुणाच मिटल्या
नवीनच का मी दिसतो

निघालो दिशाहीन कोठे
ताराही ना उत्तरेचा
अंधार हो सभोवती
आवाज क्षीण श्वासाचा
सोबतीस नसे सावल्या
त्यांच्या विनाच चालतो
साऱ्या खुणाच मिटल्या
नवीनच का मी दिसतो

कोणी ना साद घाली
शिणलो ऐकण्या जी
चाललो किती जरी हा
यात्रा न संपली माझी
अपेक्षाच ओझे झाल्या
पूर्णविराम त्यांस देतो
साऱ्या खुणाच मिटल्या
नवीनच का मी दिसतो

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults