राज तिलक

Submitted by पायस on 14 September, 2020 - 02:20

कोहली कुलोत्पन्न दोघेच फेमस. एक विराट, दुसरा राजकुमार. राजकुमार उर्फ राज कोहली आज आपल्याला नागीन आणि दोन जानी दुश्मन्स मुळे माहित असला तरी त्याचे शिखर वर्ष १९८४ आहे. या वर्षी त्याने एक नव्हे तर दोन डोक्याला ताप चित्रपट बनवले. पहिला जीने नहीं दूंगा, ज्यात रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंगशी आपली ओळख करून दिली आहे. आणि दुसरा राज तिलक ज्यातून कमल हसनला सारिका आणि प्रेक्षकांना आ वासण्याची शक्ती मिळाली.

दोन्ही सिनेमे इंदर राज आनंद-राज कोहली याच लेखक-दिग्दर्शक द्वयीच्या देणग्या आहेत आणि साधारण सारखेच आहेत. जीने नहीं दूंगाचा प्लॉट तुलनेने सरधोपट असला तरी त्यातली अ‍ॅक्टिंग कहर आहे. तर राज तिलकमधली अ‍ॅक्टिंग तुलनेने बरी असली तरी त्याच्या प्लॉटमध्ये जगभरातली कॉम्प्लिकेशन्स आहेत. अखेर राज तिलकमध्ये जानी राजकुमार म्हणजे आपला राकु आहे म्हटल्यावर त्याच्या गुर्‍हाळातील रसग्रहणाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त होते. तरी यातून पिचून बाहेर पडलेल्या रसामृताला पचवण्याचा प्रयत्न करूयात.

१) हे तर अथांग असे गहिरे पाणी

१.१) बहुधर्मिय पुत्रकामेष्टी

सिनेमाच्या सुरुवातीला कुठल्यातरी देवीच्या मंदिरात पूजा होताना दिसते. तसेच एका दर्ग्याबाहेर वाळवंटात एकट्यानेच राकु दुआ मागताना दिसतो. दोन्ही विधिंचा हेतु एकच आहे - पूजा करत असलेल्या महाराजांना मुलगा व्हावा, म्हणजे राज्याला युवराज मिळावा. यातून राकु हा अव्वल दर्जाचा स्वामीभक्त आहे हे ठसवले आहे. सुरुवातीलाच भटजी पंचा आणि लाल रंगाचे धोतर, घोळक्यातील बायका चणिया चोळीत आणि स्वतः महाराज युरोपीय वेषात दाखवून आपण धरम वीर, अमर शक्ती, सिंघासन इ. सिनेमांच्या युगातील कथा बघत असल्याचे स्पष्ट होते. महाराजांची तलवार फॉईल (फेन्सिंगची तलवार) असल्यामुळे सिनेमातील हिरो लोक निपुण तलवारबाज असल्याचे स्पष्ट होते. हा महाराज मला काही ओळखू आलेला नाही. यात इतके लोक आहेत की सगळे बरोबर ओळखले आहेत असे छातीठोकपणे मीही सांगू शकत नाही.

असा बहुधर्मीय जुगाड लावल्यानंतर महाराजांना मुलगा झाला नाही तरच नवल! त्यानुसार नोकर शेर सिंग मंदिरात येऊन सांगतो की महाराणींना मुलगा झालेला आहे. या आनंदात महाराज त्याला मोत्यांचा हार काढून देतात (गळ्यातून, हवेतून नव्हे. महाराज महाराज आहेत जादूगर नाही). याने राजीव आनंद फार मोठ्ठा राजा असल्याचे कळते. तो महामंत्री भवानी सिंगसाठी निरोप देतो की गोरगरीबांसाठी खजिना खुला करावा. अशा उधळमांडक्या राजाचा महामंत्री सहसा प्रॅक्टिकल, हुशार, आणि महत्त्वाकांक्षी असतो. हिंदी सिनेमांमध्ये अशा गुणी व्यक्तीस व्हिलन असे म्हणतात.

१.२) व्हिलन आणि इतर पात्र परिचय

या सिनेमाचा व्हिलन आहे अजित. अजित म्हणजे महामंत्री भवानी सिंग अर्थातच राजसिंहासनावर बसण्याची अपेक्षा बाळगून आहे. त्याचा साथीदार आहे मदन पुरी. आश्चर्यजनकरित्या नाव रणजित असूनही ही भूमिका मदन पुरीला दिलेली आहे. हे दोघे बहुतांश सिनेमात जोधपुरी सूट घातलेले दाखवले आहेत. युवराजाचा जन्म अर्थातच यांच्यासाठी वाईट बातमी आहे. पण अजित हुशार व्हिलन आहे. त्याला याची पुरेपुर जाणीव आहे की आपल्या मार्गातला खरा अडथळा आहे समद खान (राकु). अजितच्या म्हणण्यानुसार राकु इतका वफादार आहे की त्याच्या धमन्यांतून रक्त नव्हे तर महाराजांचे मीठ वाहते आहे. मीठ ८०१ सेल्सियस तापमानाला वितळते. एवढा हॉट पुरुष हिंदी सिनेमात दुसरा कोणी नसावा.

तिकडे महाराज लगेचच राजकुमार मोठा झाला की त्याला विलायतेला शिकण्यासाठी पाठवण्याचा, भारतीय पालकांना साजेसा निर्णय घेतात. कचकड्याच्या बाहुलीचे ते बाळ तलवार का धनी आणि कला का प्रेमी असेल हा निर्णयही ते घेऊन टाकतात. आता आनंद साजरा करण्याची वेळ झालेली आहे. त्यानुसार अजित, मदन पुरी आणि रझा मुराद दरबारात हजर आहेत. इतरही किरकोळ सेवक-सेविका आहेत. बाळाच्या सुरक्षेची शून्य चिंता असल्याने महाराज त्याला खुशाल हातात घेऊन मिरवत आहेत. पण राकु कुठे दिसत नसल्याने महाराजांच्या जीवाला घोर लागतो. रझा मुराद जलाल खान नावाने सिनेमात राकुचा धाकटा भाऊ आहे. याने कधी नव्हे ती त्याला न साजेशी हिरो-साईडची भूमिका केली आहे. हे दर्शवण्याकरता याला एकट्याला स्वच्छ धुतलेला ड्रेस दिला आहे. तो म्हणतो की तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून राकु अजमेरला ख्वाजा गरीब नवाजच्या दर्ग्याला गेला आहे. आता युवराज झालेला असल्याने दर्ग्यात बसण्याचे कारण संपले आहे. मग राकु हा क्यू घेऊन दरबारात प्रकटतो.

राकु या राज्याचा सेनापती देखील आहे. तसेच राज्यातला सर्वश्रेष्ठ तलवारबाजही आहे. हे बघता राकुला युवराजाचा गुरु म्हणून नेमणे स्वाभाविक आहे. पण मग दोन प्रश्न उद्भवतात - १) मग युवराजाला विलायतेला जाण्याची काय आवश्यकता आहे?, २) युवराजाला आत्ताच्या आत्ता, ताबडतोब राकुच्या हातात देण्याची गरज आहे का? ते आत्ता ज्या खोलीत आहेत तिथे स्नायपिंग करणारे धनुर्धारी लपवणे अतिशय ट्रिव्हिअल काम आहे. एक बाण आणि एवढ्या मेहनतीने झालेला युवराज खलास! पण सिनेमा अजून सुरु पण झाला नसल्याने तसे होत नाही. मग राकु पीळ उर्दू भाषण मारतो ज्याचे सार 'ओके' असे आहे. इथे बॅकग्राऊंडला अजित आणि मदन पुरी "हे दळण अजून किती वेळ चालणार आहे" चेहर्‍याने एकमेकांकडे बघताना दिसू शकतात. या सीनमध्ये राकुचा वेष गदळ आहे. त्याची मिशी उजव्या बाजूने निघून आली आहे. तिरंगात जो मिशीसोबत खेळ खेळला आहे त्याची सुरुवात इथे दिसते. त्याच्या दाढीचा रंग मिशीशी मॅच होत नाही. दाढी जॉ-लाईन रेफरन्सने चिकटवायची ती अट्टाहासाने जबड्याखाली चिकटवली आहे. दर्ग्याची चादर उपरण्यासारखी घेतली आहे. कंबरेला फॉईल (तलवार) तशीच बिन म्यानेची लटकत आहे. ही त्याच्या साईझची सुद्धा नाही. कारण ती त्याच्या बुटापर्यंत येते आहे. तो ज्या प्रकारे चालत येतो ते बघता समद खानचा डावा पाय कायमचा जायबंदी झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे त्याच्या डाव्या हाताला ती रँडम पुरचुंडी कसली आहे? तिचे त्या सीनमध्ये काय काम आहे?

महाराज आपल्या बिनडोकपणाचा आणखी एक पुरावा म्हणून अजितला आदेश देतात की या महिन्यात राज्यात जेवढी म्हणून मुले जन्माला आली आहेत त्या सर्वांना इथे बोलावून घ्या. त्यांचे नामकरण आम्ही करू. तीन मिनिटांच्या आत व्हिलन जिंकावा म्हणून मी यापूर्वी कधी प्रार्थना केल्याचे स्मरत नाही. मग महाराणी आणि सोबत सुलोचना येते. महाराणीची इच्छा असते की हा निर्णय सर्वात आधी तिच्या मानलेल्या भावाला, अर्जुन सिंगला कळावा. कट टू अर्जुन सिंग. अर्जुन सिंगची भूमिका प्राणने केली आहे. अप्रतिम टायमिंग असल्याने प्राणलाही याच महिन्यात मुलगा झाला आहे. बायको दुर्गाच्या भूमिकेत उर्मिला भट (महानमधल्या नाटकात काम करणार्‍या अमिताभचा सांभाळ करणारी आई) आहे. हिला आपल्याला मुलगा झाला यापेक्षा महाराणीला युवराज झाला याचाच आनंद जास्त आहे. राकुला रझा मुराद दिला तसा प्राणच्या हाताखाली पण कोणीतरी पाहिजे. मग त्याला संग्राम सिंग म्हणून कोणी दिला आहे. परंपरेनुसार प्राणने युवराजासाठी काहीतरी भेट पाठवणे अपेक्षित असते. मग तो संग्राम सिंग हस्ते एक हार पुढे पाठवून देतो. संग्राम सिंग वायुवेगाने राजवाडा गाठतो, हार राकुच्या मांडीतल्या राजकुमाराच्या गळ्यात घालतो आणि प्राणच्या मुलासाठी रिटर्न गिफ्ट घेऊन प्राणकडे परतायला बघतो. आणि नेमकी इथेच माशी शिंकते.

१.३) कधीकधी नशीब व्हिलनच्या बाजूने असते

अजित ठरवतो की ही संधी चांगली आहे, आज उठाव करूया. त्याच्या बाजूला मदन पुरी, जगदीश राज (हिंदी सिनेमांचा घाऊक पोलिस इन्स्पेक्टर) आणि जगदीश राजच्या गँगमधली माणसे आहेत. तो संग्राम सिंगला चाकू फेकून मारतो आणि लढाईला तोंड फुटते. शूटिंगच्या वेळी महाराजांच्या साईडच्या एक्स्ट्रांची संख्या मोजण्यात काहीतरी गडबड झाली असावी. कारण बहुतांश जणांना लाल रंगांचा युनिफॉर्म आहे पण काही तुरळक जणांना निळ्या रंगाचा युनिफॉर्म दिला आहे. अजितला आपले संख्याबळ मर्यादित असल्याची जाणीव आहे. त्यामुळे तो नगारा वाजवून सावध करणार्‍या सैनिकाला बाण मारून ठार करतो. व्हिलनचा नेम चक्क सलग दोनदा बरोबर लागला आहे - एक्स्ट्रीम रॅरिटी! बहुतांश सैनिक अजूनही बेसावध असले तरी राकु आणि रझा मुरादला घोटाळा असल्याची जाणीव होते आणि तेही लढाईत उतरतात.

रझा मुराद माणिक इराणीला खणाखणीत गुंतवतो. बाकी लोक फालतु असल्याने राकुला त्यांच्याकडे लक्ष द्यायचे काहीच कारण नाही. तो समयसूचकता दाखवून नगारा वाजवून धोक्याची सूचना देऊ लागतो. अजित बाण चालवून राकुलाही ठार करण्याचा प्रयत्न करतो. पण राकु या सिनेमात ब्रिगेडिअर सूर्यदेवसिंगच्या रोलसाठी प्रॅक्टिस करत असल्याने त्याचे रिफ्लेक्सेस दैवी आहेत. तो गुणगुणारा डास झटकावा तसा अजितचा बाण एका हाताने झटकून टाकतो. तसे बघावे तर अजितने हाराकिरी केली आहे. महाराज शांतपणे झोपून राहिला तरी राकु आणि रझा मुराद सहज या लोकांना हाताळताना दिसत आहेत. प्राण कधीही येऊ शकतो त्यामुळे अजितची साईड अगदीच कमकुवत आहे. पण अजितने आपला महाराज काय दर्जाचा बुद्धू आहे हे अचूक ताडले आहे. त्यानुसार महाराज तलवार घेऊन मैदानात उतरतो.

फॉईलचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर करून खणाखणी चालू असताना संग्राम सिंग प्राणच्या डेर्‍यात जाऊन उठावाचा संदेश प्राणला देतो आणि मरतो. प्राण लगेच राजवाड्याकडे धाव घेतो. तिकडे राकुचा नगारा वाजवून झालेला असल्याने तो रझा मुरादच्या मदतीला जातो. राकुच्या हस्ते माणिक इराणीचा बॉलिवूड रेकॉर्ड टाईममध्ये मृत्यु होतो (सहा मिनिटांत). हे सर्व एवढ्या वेगाने घडत असले आणि मागे दाणदाण मुझिक लावले असले तरी लढाईची कोरिओग्राफी अति विलंबित लयीत आहे. हे म्हणजे बडा ख्यालाला साथ म्हणून एखादे परण वाजवण्यासारखे आहे. राकु मग रझा मुरादला जाऊन सांगतो की बाकी सगळे मेले तरी चालतील, युवराज वाचला पाहिजे. तू त्याला घेऊन नजमा (पक्षी समद खानची बायको) कडे जा. रजा मुराद म्हणतो ओके. इथून खरा घोळ सुरू होतो. प्रत्यक्षात हे लोक ऑलमोस्ट जिंकत आले आहेत. पुढच्याच शॉटमध्ये प्राण आपल्या सैनिकांसोबत पोहोचतो आणि अजितचा प्लॅन पूर्णपणे फसतो. त्यामुळे रझा मुरादला काहीही करायची गरज नाही आहे. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.

१.४) अ‍ॅडॅप्टेबल व्हिलन

तरी अजितचा प्लॅन फसत असताना तिकडे रझा मुराद महाराणीला गाठतो. तो म्हणतो युवराज माझ्या हवाली कर. त्याच्या दरडावणीच्या सुरामुळे महाराणी अर्थातच साशंक होते. शांत शब्दांत तिला समजावून तिच्यासकट युवराजाला बाहेर काढणे हे दोन मिनिटांचे काम आहे. पण रझा मुरादला हिरो साईडचा अनुभव नसल्याने तो जबरदस्तीने युवराज हिसकावून घेतो. डोन्ट वरी, महाराणीही कमी बिनडोक नाही. रझा मुराद युवराजाला घेऊन पळ काढतो तर त्याच्या मागे चार बंडखोर येतात. ते रझा मुरादला महाराणीसमोर बाणाने मारतात. तरीही महाराणी रझा मुरादच गद्दार असल्याचा निष्कर्ष काढते. तसेच रझा मुरादला जे बाण लागतात ते वर्महोलचा प्रवास करून येतात. अन्यथा त्या अँगलने त्याला बाण लागणे अशक्य आहे. एनीवे, तिकडे अजित निरुपाय म्हणून खांबामागे लपून महाराजांच्या मर्मावर बाण मारतो. याच्या निम्मी जरी अ‍ॅक्युरसी इतर व्हिलन्सने दाखवली असती तर बॉलिवूडच्या हिरोंचे अवघड होते. जगदीश राज काम संपवावे म्हणून चाकू भोसकायला जातो आणि प्राण त्याला आपल्या ताब्यात घेतो. राकु व प्राण त्याच्याकडून या षडयंत्रामागे कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आपले बिंग फुटते आहे बघून अजित धावत पळत येतो आणि तलवार भोसकून जगदीश राजला ठार करतो. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही

अर्थातच राकु चिडतो (आणि त्याला संशयही येतो). अजित यावर "राजपूत जब अपने आका का खून देखता हैं तो तुम्हारे तरह सवाल नही करता. बल्कि खून का बदला खून से लेता हैं" असा बचाव पुढे करतो. प्राण राजपूत असल्याने हा बचाव त्याला पटतो. राकु हुशार असल्याने त्याला हा बचाव पटत नाही. राकु राजपूत नसल्याने त्याला प्राण भाव देणार नाही हे स्पष्ट असले तरी तो बापडा प्रयत्न करतो. हे सर्व संवाद अतिशय काव्यात्मक आहेत. उदा.
"अभी अभी यहां एक लाश गिरी हैं जिसे तुम्हारी आंखे नही देख सकती अर्जुन सिंग."
"लाश? किसकी?"
"असलियत की!"
प्राण महाराजांच्या तब्येतीची चौकशी करायला निघून जातो तर राकु नजमाला गाठतो. नजमाची भूमिका केली आहे योगिता बालीने. नजमा त्याला सांगते की रझा मुराद काही इकडे आलेला नाही. मग हा मनुष्य गेला तरी कुठे च्यामायला? हा शॉक कमी म्हणून की काय, तिकडे महाराज मरायला टेकतात. पटकन गचकून राजवैद्याला मोकळे करावे तर त्यांना युवराजाचे मुखदर्शन घेण्याची इच्छा होते. आता युवराज कुठून आणायचा? अशावेळी अजित आणि मदन पुरी कमालीची अ‍ॅडॅप्टेबिलिटी दाखवत फसलेला प्लॅन मार्गावर आणतात. मदन पुरी कुठून तरी एका बाळाचे शव पैदा करून हाच युवराज असल्याचे महाराणीला सांगतो. अजून एक छिन्नविछिन्न शव रझा मुरादचे म्हणून खपवले जाते. आता महाराजाचा आत्मा शांत कसा करावा? यावर महाराणी इतका वेळ झाले ते काहीच नाही असा कहर उपाय काढते. प्राणने आपला मुलगा महाराणीला युवराज म्हणून द्यावा जेणेकरून महाराजांना हा धक्का सहन करावा लागणार नाही. प्राणही परस्पर होकार देऊन आपला मुलगा आणायला जातो. त्याची बायको त्याला विचारते की किमान मला हे तरी सांग की आपला मुलगा कोणाच्या घरात देत आहेस. प्राण म्हणतो मी हे सांगू शकत नाही. कोणी विचारले तर सांग की आपला मुलगा मेला. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.

१.५) अबूबाबाच्या वरचढ कॅच आणि वफादार नोकराच्या वरचढ वफादार मालक

अजित तयारीतच असतो. तो म्हणतो की वहिनी बेशुद्ध झाल्यात तू त्यांना सांभाळ, मी तुझा मुलगा महाराणींना देऊन येतो. प्राणच्या तंबूतून तो जातो थेट मदन पुरीकडे. मदन पुरी अजितचा मुलगा घेऊन तयार आहे. आपण नाही तर युवराज रुपाने आपला मुलगा सिंहासनावर बसवण्याची बार्गेन त्याने मान्य केली आहे. आता प्राणच्या मुलाचे काय करावे? अजित म्हणतो की माझ्या मुलाला नजर लागू नये म्हणून याचा बळी देऊ. मग मदन पुरी प्राणच्या मुलाला, अजितच्या मुलावरून ओवाळून फेकून देतो. मिसटाईम्ड शॉटला बाऊंड्रीवरचा फिल्डर जसा धावत पुढे येऊन कॅच करतो तशी सुलोचना विंगेतून अचानक येऊन प्राणच्या मुलाचा कॅच घेते. अबूबाबाचा कॅच यापुढे काहीच नाही कारण संजीव कुमारला बसल्या जागी कॅच आहे, सुलोचनाला आपले बूड हलवून योग्य जागी पोहोचण्याचे अ‍ॅडिशनल चॅलेंज आहे. सुलोचना अजितची बायको असल्याचे कळते. ती म्हणते की आपला मुलगा मी युवराज म्हणून दिला, त्या बदल्यात प्राणचा मुलगा मला द्या. अजित तिची विनंती मान्य करतो.
आता एकच काम उरले आहे, राकुचा बंदोबस्त! मदन पुरी त्याला अटक करायला जातो. राकुसारखा अजिबात न दिसणारा स्टंट डबल मदन पुरीच्या काही सैनिकांना मारतो पण लवकरच राकुला अटक करण्यात मदनला यश येते. तिकडे आपला मुलगा युवराज म्हणून महाराजांना खपवण्यात अजितला यश आले आहे. महाराजही "मी युवराज पाहिला, आता मी काही मरत नाही" मोडमध्ये. थोडक्यात हा जगेल अशी चिन्हे आहेत. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.

राकुला गद्दार म्हणून महाराजांसमोर आणले जाते. राकु गद्दारी करेल ही कल्पनाच असह्य असल्याने महाराज ऑक्सिजनवर जातात. त्यात महाराणी महाराजासमोरच याची उलटतपासणी सुरु करते. खुशाल जाऊन ती महाराजांना म्हणते की राकुच आपल्या मुलाच्या मृत्युस जबाबदार आहे. आत्ता थोड्याच वेळापूर्वी त्याला अजितचा मुलगा युवराज म्हणून खपवला असल्याचे ती विसरते. पण महाराज हे विसरलेले नाहीत. त्यांना तिथल्या तिथे हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि ते जागीच गतप्राण होतात. राकुला गद्दारीचा आरोप आणि फाशीची शिक्षा मान्य होण्याचा प्रश्नच नाही. मग तो काहीतरी बरळून आपल्या बेड्या सहजगत्या तोडतो आणि पसार होतो.

एवढा अगडबंब सेटअप ज्याच्यामुळे झाला तो रझा मुराद कुणा खानाबदोश म्हणजे बंजारा टोळीला सापडतो. या बंजारा टोळीचा प्रमुख आहे ओमप्रकाश. रझा मुराद युवराजाला ओमप्रकाशच्या हवाली करून मरतो. इथून पुढे दोन मिनिटे आपल्याला अतिशय गचाळ एडिटिंग बघायला मिळते. राकु निर्धार करतो की जोवर तो आपल्या माथी लागलेला कलंक दूर करत नाही तोवर तो राज्यात परतणार नाही. या निर्धाराचे डायलॉग तो कुठल्याशा चितेसमोर उभे राहून बडबडतो आहे. ही कोणाची चिता? महाराज किंवा रझा मुरादची तर असू शकत नाही. बहुधा राकु म्हणतो त्या असलियतची चिता असावी. मग राकु व योगिता बाली नेसत्या वस्त्रांनिशी घर सोडतात. अजमेरच्या दर्ग्यात हजेरी लावून ते थेट वाळवंट गाठतात. त्यांच्या हालअपेष्टांचे प्रतीक म्हणून वाळवंटात योगिताचे पाय काटे आणि फोडांनी भरलेले, रक्ताळलेले दाखवले आहेत. राकु दु:खी होतो पण यात त्या दोघांचीच चूक आहे. अनवाणी वाळवंटातून चालायला कोणी सांगितलं होतं? वाळवंटात कुठे तडमडतात कोणास ठाऊक पण त्यांना एक गुहा सापडते जिथे राकु आपले बस्तान बसवतो. गुहा राज्याच्या सीमेवर कुठेशी असावी.

टाईम स्किप!

२) पोस्ट टाईम स्किप

२.१) बावीस मिनिटे गाण्याची वाट पाहायला लावणारा दिग्दर्शक

मध्ये बरीच वर्षे निघून जातात. राकु आणि योगिताचे केस थोडेसे पांढरे झाले आहेत. बाकी दोघेही टकाटक दिसत आहेत. राकुने तलवार शिकवण्याचे क्लासेस उघडले आहेत. युवराज न सापडल्याने अजूनही राकुवर गद्दारीच ठपका आहे. हे दु:ख सोडले तर बाकी त्यांच्या अ‍ॅरेंजमेंटमध्ये नाव ठेवायला जागा नाही. .
तिकडे राजवाड्यात चक्क बिबळ्या घुसला आहे. या बिबळ्याला पकडून एक नरपुंगव त्याच्यासोबत मस्ती करतो आहे. हा नरपुंगव म्हणजे तोतया युवराज अर्थात अजितचा मुलगा. बिनडोक महाराणी अर्थात राजमातेने याचे नाव समशेर सिंग ठेवले आहे. ही भूमिका केली राज किरणने. पोस्ट टाईम स्किप प्राणने राकुची जागा घेतल्याचे स्पष्ट होते. अजित आणि मदन पुरी अजूनही जोधपुरी सुटातच आहेत. राज किरण आपल्या आईसोबत आदराने वागतो पण नोकरवर्गाच्या पाया पडायला त्याची ना आहे. राजमाता आणि प्राणच्या मते तो प्राणचा मुलगा असल्याने तो थोडे व्यथित होतात पण प्राणला आपल्या (?) मुलामध्ये राजपूतांचे गुण आले आहेत असे वाटून तो खुश होतो. प्रत्यक्षात खुश फक्त अजित आहे कारण राजघराण्याला साजेशी गुर्मी त्याच्या रक्ताने दाखवायला सुरु केली आहे. राज किरण आता राज्याभिषेक करण्या इतपत मोठा झालेला असल्याने त्याचे लग्न राजमातेने राजगढच्या राजकुमारी मधुमतीशी ठरवले आहे.

मधुमती दाखवली आहे रीना रॉय. राज किरणला भेटायला म्हणून ती आपला लवाजमा सोबत घेऊन निघाली आहे. ऑफ कोर्स रीना रॉय राज किरणची हिरोईन असणे शक्य नाही. मग हिचा हिरो कोण? लगेच ओ ओ ओ सुरु होते. रीनाची मैत्रीण सांगते की इथून जवळच एक बंजार्‍याचा डेरा आहे. मधुमती गाणे ऐकू आले की जाऊन नाचलेच पाहिजे या तत्वाचे पालन करत असल्याने ती तडक बंजारा वस्ती गाठते. अखेर सिनेमात पहिले गाणे सुरु होते.

२.२) डेंजरस इश्क

संगीत दिले आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आवाज आहे सुरेश वाडकर आणि आशा भोसलेंचा. गाणे आहे अजूबा अजूबा अजूबा, हुस्न तेरा हैं एक अजूबा. सुरुवातीला याहियातूबा असे म्हणत कमल हसन आणि सारिका नाचताना दिसतात. कमल हसनच खरा युवराज आहे हे कोणीही सांगू शकतं. नृत्यकुशल अभिनेता असल्याने खेमट्याच्या बीट्सना मॅच होणार्‍या स्टेप्स देता आल्या आहेत. खंजिरी वाजवण्यासाठी हाथाने थाप द्यावी लागते हा गैरसमज दूर करण्यात आला आहे. मुळात खंजिरी दोन्ही हातांनी धरून हिरविणीच्या पार्श्वभागावर आघात करून वाजवायचे वाद्य आहे. कमलभाऊंनी हे अतिशय मन लावून दाखवले आहे. रीना रॉयच्या अंगावरचे मोत्यांचे दागिने बघून ओमप्रकाश ही कोणी राजकन्या असल्याचे ओळखतो. पण कपड्यांची गुलाबीची भयाण शेड बघून कमल हसन ही इथे नाचायलाच आली आहे हे ताडतो. लगेच तिला जरा बरे कपडे घालायला दिले जातात आणि कमल सारिकाला सोडून तिला पकडतो. शूटिंग आऊटडोअर असल्याचा पुरावाही इथे बघता येतो. नाचताना या लोकांनी प्रचंड धुरळा उडवला आहे.

अचानक घाणेरडा जंप कट बसतो आणि कमल हसनला रीना रॉय स्वप्नात दिसत असल्याचे स्पष्ट होते. प्रत्यक्षात तो सारिका सोबतच नाचत आहे. मग उर्वरित वेळ कोलांट्या उड्या आणि इतर कसरत नृत्ये होतात. ओव्हरऑल गाणे बरे आहे आणि डान्सही सहणेबल आहे. आता या गाण्यातून काहीतरी निष्पन्न तर झाले पाहिजे. मग सारिकाला अचानक ध्यानात येते की कमल रीनावर लाईन मारतो आहे. रीनासोबत अ‍ॅक्चुअल डान्स स्टेप्स सुरु झाल्यावर तर तिचा तिळपापड होतो. मग एक चाईल्ड आर्टिस्ट तिला नाग आणून देतो. हा चाईल्ड आर्टिस्ट म्हणजेच दिग्दर्शकाचा सुपुत्र अरमान कोहली होय. ही तो नाग रीना रॉयवर सोडते. नागही बिचारा जाऊन रीनाला चावतो. गतकाळात क्राईम पेट्रोलच्या अभावामुळे असे कितीक गुन्हे घडले असतील याची गणतीच नाही.

२.३) द्रोणाचार्य राकु

कमल हसनचे नाव ओमप्रकाशने सूरज ठेवले आहे. तो रीनाला एका तंबूत घेऊन जातो आणि तपासतो. नाग चावल्याची जखम दिसताच तो यावरचा रामबाण उपाय - विष चोखून थुंकणे - करतो. इथे याचे जाळीदार जाकीट जवळून बघता येते. बाहेर अरमान कोहली, सारिकाचा भाऊ, खंजर घेऊन आला आहे. याला आवरा अरे कोणीतरी! विष चोखल्याने कमल हसनही अंडर रिस्क आहे. त्याला काही झाले तर सारिका लगेच खंजर मारून रीनाला ठार करण्याची घोषणा करते. आपण एका राजघराण्यातील व्यक्तीवर जीवघेणे हल्ले करतो आहोत. त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस असतात. हे मूल्यशिक्षण सारिका व अरमानला मिळालेले दिसत नाही. पण कमल हसनचे मूल्यशिक्षण झालेले आहे. त्यामुळे फ्रेंच किसचा मोह आवरता घेऊन तो रीनाच्या तळहाताचे चुंबन घेतो. याने रीना शुद्धीवर येते.

विषय फार वाढू नये म्हणून रीना आणि तिची मैत्रीण काढता पाय घेतात. सारिका कमल हसनला "परत लाईन मारलीस तर याद राख. ती भवानी आहे आणि मी आहे" अशी वास्तववादी धमकी देते. ओमप्रकाश उगाच काहीतरी बोलून विषय बदलतो. त्यात तिकडे राकु येतो. कमल हसन राकुच्या क्लासचा विद्यार्थी आहे. ओमप्रकाशचे नाव सरदार झुबेरी असल्याचे स्पष्ट होते. राकु आपल्या क्लासमार्फत बदला घेण्यालायक शिष्य तयार करतो आहे. कमल हसनही त्यापैकीच एक आहे. थोडक्यात राकु द्रोणाचार्य आहे. पण अजूनही कमल हसन युवराज असल्याचे रहस्य रहस्यच आहे.

या द्रोणाचार्यांचा अजून एक शिष्य आहे सुनील दत्त. एकाच वेळी गुहेतील सर्व शिष्यांचा सामना करून, राकुच्या हातून तलवार हिसकावण्याचे कसब दाखवून तो प्रेक्षकाला पटवून देतो की आपण एक महान योद्धे आहोत. राज कुमार सुनील दत्तपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठा आहे पण मेकअपने पराकाष्ठा करून काळे केस असलेला सुनील दत्त राकुपेक्षा म्हातारा दिसेल याची खात्री घेतली आहे. त्याहूनही आश्चर्यजनकरित्या समद खानच्या क्लासमध्ये महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. सुनील दत्तचे नाव आहे जयसिंग. जयसिंगची तालीम आज पूर्ण झाल्याचे राकु सांगतो. इतकी वर्षे राकुने हा कोणाचा मुलगा आहे हे विचारलेले नसते. अखेर सुनील स्वतःच सांगतो की मी प्रतापगढचे महामंत्री भवानी सिंग यांचा मुलगा आहे. हा स्वतःला अजितचा मुलगा समजतो आहे. म्हणजे हा सुलोचनाने कॅच घेतलेला प्राणचा मुलगा आहे. आपण अजितच्या मुलाला शिकवल्याचे कळताच राकु क्रुद्ध होतो. पण दुष्टचक्र संपवायचे नसल्याने तो सुनील दत्तला आपल्या चिडण्याचे कारण सांगत नाही. त्या ऐवजी तो भविष्यात गुरुदक्षिणेचे वचन घेऊन सुनीलला जायला सांगतो. सुनील राजपूत असल्याने तो वचन पाळणार हे वेगळे सांगणे न लगे. जाता जाता योगिता बाली त्याला दर्ग्यातून आणलेला रुमाल बांधते आणि राकुला टोमणा हाणते. नवरा-बायकोत आपले काय काम म्हणून सूज्ञ सुनील काढता पाय घेतो.

२.४) सेटअप कंप्लीट आणि समरी

आता एकच मेजर जोडी राहिली आहे आणि मग स्टार लोक संपले. तशी सुनील दत्तलाही एक हिरवीण आहे पण ती नंतर. जंगलातून घोडागाडी जाताना दिसते. या घोडागाडीत बसली आहे हेमा मालिनी. हेमा मालिनी सिनेमात आहे म्हटल्यावर तिचा हिरो धरम पाजी असणार ही सेफ बेट आहे. हेमा मालिनीचा ड्रायव्हर गणवेशावरून प्रतापगढचा असल्याचे ओळखता येते. थोडक्यात ही देखील प्रतापगढची आहे. ही मंदिरात पूजा करून परत येते आहे. रस्त्यात एक झाड पडल्याने गाडी थांबवावी लागते. या सैनिकांच्याकडून काही ते झाड हलत नाही. सुदैवाने तिकडून धरम पाजी पांढर्‍या रंगाचा लेदरचा सदरा घालून चालले आहेत. आधी ते थोडे उचकतात पण गाडीत हेमाला बघून विरघळतात. मग एकटेच त्या झाडाला उचलून बाजूला फेकून देतात.

हेमाला पाजी कोण आहेत हे माहित नसल्याने ती इनाम म्हणून त्यांना एक सोन्याची मोहोर देते. पण पाजीदेखील राजपूत आहेत. त्यामुळे ते स्त्रियांची मदत करणे हा आपला धर्म मानतात. म्हणून इनाम स्वीकारणे त्यांच्या शान के खिलाफ असते. मग ते मोहोर हेमाला परत करतात आणि तिला वाटेला लावतात. अचानक तिथे प्राण प्रकटतो. धर्मेंद्र प्राणचा मुलगा आहे म्हणजे टेक्निकली सुनील दत्तचा भाऊ. हा मुद्दा नंतर क्लिअर होईल. प्राण येऊन सांगतो की ही अजितची मुलगी आहे. अजितने मध्यंतरीच्या काळात आपल्या मुलीला राजकुमारीचा दर्जा मिळवण्यात यश मिळवलेले दिसते. अर्थात पाजींची राजपूतगिरी टेक्स प्रिसिडन्स. हेमासुद्धा पाजींवर इंप्रेस होते आणि थॅंक्स म्हणून जाते. पाजींचे नाव आहे जोरावर. पाजींनाही हेमा पसंद आहे. प्राणलाही काही हरकत नाही. त्यामुळे ही जोडी जुळली. प्राणला आणखी एक मुलगा शाम सिंग दाखवला आहे. त्याचा मुद्दा आणि इतर काँप्लिकेशन्स आपण प्रतिसादांत अभ्यासू. अल्पविराम घेण्यापूर्वी या सर्व नात्यांची एक समरी

महाराज + महाराणी - एक मुलगा = कमल हसन. सध्या ओमप्रकाशचा मुलगा म्हणून वावरतो. याने राकुकडून युद्धकलेचे शिक्षण घेतले आहे. हा खरा युवराज असल्याचे सध्या कोणालाच ठाऊक नाही.
राकु + योगिता बाली - राकु राजसेवेत अहोरात्र गुंतला असल्याने मूलबाळ नाही
प्राण + उर्मिला भट - तीन मुलगे = सुनील दत्त, धर्मेंद्र, शाम सिंग. शाम सिंगचा नट बिनमहत्त्वाचा असल्याने तो डेफिनिटली धाकला. बहुधा सुनील दत्त थोरला पण नीट स्पष्ट केलेले नाही. सुनील दत्त सध्या अजितचा मुलगा म्हणून वावरतो. याने राकुकडून युद्धकलेचे शिक्षण घेतले आहे. सुनील दत्तचे सत्य केवळ अजित, मदन पुरी आणि सुलोचना यांना ठाऊक आहे.
भाऊबंद : याखेरीज राकुला एक भाऊ - रझा मुराद. याने युवराज ओमप्रकाशच्या हवाली करून अंग टाकले. तसेच प्राण हा महाराणींचा मानलेला भाऊ.
अजित + सुलोचना - एक मुलगा, एक मुलगी = राज किरण आणि हेमा मालिनी. राज किरण थोरला. राज किरण सध्या युवराज म्हणून वावरतो. प्राण व राजमातेनुसार राज किरण प्राणचा मुलगा आहे पण प्रत्यक्षात तो अजितचा मुलगा आहे. हे सत्य केवळ अजित, मदन पुरी आणि सुलोचना यांना ठाऊक आहे.

जोड्या
कमल हसन + रीना रॉय + सारिका - प्रेम त्रिकोण. सारिकाला कमल आवडतो. कमलला रीना आवडते. रीनाला अजूनतरी या डाऊनमार्केट लोकांबद्दल काहीच वाटत नाही.
धरम + हेमा - ट्रिव्हिअल जोडी.
सुनील + ? - मुख्य हिरोंपैकी एक असल्याने यालाही एक हिरवीण आहे हे फिक्स.

ती कोण? एवढी सर्व कॉम्प्लिकेशन्स कशी निस्तरली जातात? आणि मदन पुरीचे नाव रणजीत का आहे या प्रश्नांची उत्तरे अल्पविरामानंतर

......................... मदन पुरीचे नाव रणजीत का आहे हा प्रश्न सोडून, त्याचे उत्तर कोणाकडेच नाही.

(अल्पविराम)

एडिट : करेक्शन -
याखेरीज प्राणला एक भाऊ - रझा मुराद >>> रझा मुराद राकुचा भाऊ आहे
धन्यवाद rmd

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बादाम खाके >> Happy

९) हिरो लोकांचा पहिला विजय

९.१) बालक एक्स्चेंजपेक्षाही मोठ्ठा गोंधळ

सुनील दत्तसमोर रातोरात कोऽहम् प्रश्न उभा राहिला आहे. अस्मादिकांच्या मते त्याच्यापुढे तीन पर्याय आहेत - १) राकुकडे जाऊन "तुम्ही बरोबर होतात गुरुदेव. मी माझ्या वडलांना कधीच ओळखू शकलो नाही कारण ते माझे खरे वडीलच नाहीत" सांगावे. राकुला जेव्हा कळेल की सुनील अजितचा मुलगा नाही तेव्हा तो याला आपलेसे करेलच, प्लस खर्‍या पालकांचा शोध घ्यायला खचितच मदत करेल. २) रंजिताकडे जाऊन आपल्या आयुष्याचे रडगाणे गावे. ३) आदि शंकराचार्यांनी निर्वाण षटकात सांगितल्याप्रमाणे शिवोऽहम् शिवोऽहम् चा जाप करावा. अ‍ॅक्शनची बाजू पाजींकडे असल्यामुळे आणि सुनीलला संस्कृत येत नसल्यामुळे तो रंजिताकडे जाऊन रडत बसतो. शूटच्या दिवशी वारं खूप होतं. त्यामुळे याच्या विगचे भरघोस केस उभे राहिले असून झाकली मूठ उघडी पडली आहे. तो रंजिताला सांगतो की माझ्याकडे तुला देण्यासारखं आता काही राहिलं नाही, मी शब्दशः रस्त्यावर आलो आहे. रंजिताही मुरलेली प्रेमिका आहे. ती म्हणते, तर मग काय झालं? मला काहीच प्रॉब्लेम नाही. तो म्हणतो, ऐक माझं. मी माझ्या गुरुमातेचे, योगिता बालीचे पाय बघितले आहेत. राकुच्या नादी लागून त्या बाईचे लई हाल झाले. तरी तू काहीतरी धडा घे नाहीतर तुझेही हाल होतील. ती म्हणते, तर मग काय झालं? मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण तरीही तो रॅशनॅलिटीची कास सोडत नाही. मग ती खंजिर उपसते. आय मीन इट, शब्दशः खंजिर उपसते आणि म्हणते गपगुमान मला हो म्हणतोस का देऊ जीव? बिचारा घाबरून ओके म्हणतो. हा त्यांच्या मार्गातील क्षुल्लक अडथळा आहे. खरा अडथळा त्यांची दिलजमाई होताच हजर होतो - प्राण व त्याचा कबिला.

प्राण म्हणतो हा काय फालतुपणा लावला आहे? (यावर थेटरातल्या प्रेक्षकांनी प्राणला एकमुखी पाठिंबा दिल्याचे ऐकिवात आले आहे) सुनील म्हणतो की कुठे काय? तिला मी आवडते, मला ती आवडते. जब लव्ह इज ब्लॉसमिंग तो क्या करेगा अर्जुन सिंग? प्राण म्हणतो की एक प्रॉब्लेम आहे. आमच्यात कबिल्यावाल्यांना कबिल्याबाहेर लग्न करण्याची परवानगी नाही. हायला! माझी समजूत होती की राजपूत लोक सगोत्र विवाहविरोधाबाबत अगदी कट्टर असतात. मग हे सेम कबिला-लग्न करणारे कुठले राजपूत आहेत? एनीवे, आता थोड्याच वेळात बालक-एक्स्चेंज गोंधळ काहीच नाही असा गोंधळ उडणार आहे. त्यामुळे अगदी बारीक लक्ष द्या.

सुनील प्रत्यक्षात आहे प्राणचा मुलगा. या न्यायाने तो सेम कबिल्याचा झाला आणि त्याचे रंजिताशी लग्न व्हायला सिनेमाच्या नियमांनुसार खरेतर काही प्रत्यवाय नसावा. हा मुद्दा नोंदवलात? गुड, गोंधळ पुढे नेऊ. रंजिता म्हणते की तसे असेल तर मी कबिला सोडून चालले. प्राण भडकतो आणि चाबूक उगारतो. आता "अगर आप मेरे बाप-अगर तुम मेरे बेटे" शॉट्स काढायची वेळ झाली आहे. सुनील म्हणतो की हे काय बरोबर नाही, तुम्ही असा अन्याय करू शकत नाही. स्वतःच्या मुलासोबत पण असेच वागला असतात का? प्राण म्हणतो की अजून तुला माहितीच नाही मी काय करू शकतो. चल समज तू माझा मुलगा आहेस, असे म्हणून तो सुनीलची चामडी लोळवतो. इथे सिनेमाच्या दर्जाला न साजेसे शूटिंग आहे. सुनीलला मारलेल्या प्रत्येक फटकार्‍यानंतर त्याचा शर्ट जिथे फाटावा तिथे फाटतो आणि रक्ताचे थेंब/ओघळही दिसतात. सुनील दत्तने या चित्रपटात चांगला अभिनय केला आहे (इतरांच्या मानाने) हेही मान्य करावे लागेल. एवढे मारल्यानंतर सुनील होतो बेशुद्ध! मग प्राण रंजिताला आशालताच्या तंबूत नेऊन आदळतो. रंजिता आशालताला काय घडले ते सांगते. आशालता म्हणते हात्तिच्या, अरे तू या कबिल्याची नाहीच्चेस मुळी!

अ‍ॅपरंटली आशालतानेही रंजिताप्रमाणेच कोणा बाहेरच्याला पकडून घाट घातला आणि त्याचे फलस्वरुप रंजिताचा जन्म झाला. आता हे रहस्य प्राणला माहित नसेल? तरी त्याला रंजिता शाम सिंगसाठी चालणार होती. आशालताही परस्पर हार घेऊन लग्न ठरवत होती. मग तेव्हा हे रहस्य आणि यांच्या रीतिभाती कुठे गेल्या होत्या? दुसरे म्हणजे जर रंजिता या कबिल्याची नसेल तरी सुनील प्रत्यक्षात याच कबिल्याचा आहे. नियमांनुसार यांचे लग्न तरीही होता कामा नये. सिनेमाच्या एंडला जेव्हा सर्वकाही उघड होईल, तेव्हा प्राणची यावर काय रिअ‍ॅक्शन असेल? का तेव्हा आईच्या पावलावर पाऊल टाकून रंजिताही राज को राजही रखेगी? खैर, बात यही खतम हो जाती तो और बात थी. रंजिता हे कळल्यावर आजाद पंछी प्रमाणे सुनीलकडे जाते. पण खडकावर त्याचे रक्त तेवढे आहे, तो कुठेतरी गायब झाला आहे.

९.२) आणि या सर्वांहून मोठ्ठा प्लॉट ट्विस्ट

कट टू राकु. दिग्दर्शकाला अचानक आठवण होते की राकु सिनेमात मुसलमान आहे. मग त्याचा नमाज पढतानाचा सीन होतो. माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार नमाज पढताना मौन पाळणे अपेक्षित असते. तसेच आपण देवाची मूर्ति किंवा चित्र समोर ठेवून शुभं करोती म्हणतो तसे मक्के-मदिनेचे फोटो समोर लावणे गरजेचे नसते. (हे जर चूक असेल तर मी दिलगीर आहे) राकु मात्र मोठमोठ्याने जोगवा मागावा तसे सर्वशक्तिमान खुदाला साकडे घालतो आहे. हे सर्व बघत चिंताग्रस्त चेहर्‍याची योगिता बाली उभी आहे. सुनील याची नमाज पूर्ण होण्याची वाट बघत विंगेत उभा आहे. नमाज पूर्ण होताच तो भेलकांडत फ्रेममध्ये येतो आणि कोसळतो. मग या दोघांचे लक्ष सुनीलकडे जाते. राकुला झटकन लक्षात येते की सुनीलला कोणीतरी गुरासारखा बडवला आहे आणि त्याला तातडीने उपचारांची गरज आहे. तो योगिताला याच्याकडे लक्ष द्यायला सांगून वैद्य आणायला जातो.

आता याला वैद्य कुठे मिळणार? तो जातो ओमप्रकाशच्या कबिल्यात. ओमप्रकाश आणि त्याचे लोक जिप्सी असले तरी त्यांच्या वैद्याकडे पक्के सिमेंटचे घर आहे. वैद्य कुठेतरी बाहेर गेला आहे. याच्याकडे कंपाऊंडरही नसल्याने राकु थेट आत घुसतो आणि मुळापासून हादरतो. राकुही हादरत असेल तर प्रेक्षकाची अवस्था काय सांगू? वैद्याच्या घरातील खाटेवर दाढी मिशा वाढलेला रझा मुराद! रझा मुराद सिनेमाच्या सुरुवातीला अंग टाकताना दाखवला असला तरी तो मेलेला नसतोच; जखमांनी फक्त त्याची शुद्ध हरपलेली असते. अर्थातच ओमप्रकाशने त्याची या वैद्याकडे सोय केली असणार. राकु अक्षरशः गहिवरतो. पण रझा मुराद नुसतंच बकर्‍याप्रमाणे बे बे करतो आहे. वैद्य येऊन सांगतो की हा जिवंत तर आहे पण याची वाचा गेली आहे आणि शरीरही अर्धांगवायुचा झटका यावा तसे लुळे पडले आहे. राकु म्हणतो हरकत नाही, हो किंवा नाहीचा इशारा करू शकतो? एकच प्रश्न - युवराज जिवंत आहेत का? रझा मुराद होकार देतो. राकुच्या चेहर्‍यावर लिहिलेले वाचताही येते - सध्या एवढी क्लॅरिटी पुरे!

९.३) रेहाना आणि सुलताना

युवराज तर आहे कमल हसन! आणि तो बावळट आपल्या कर्माने पडला आहे कैदेत. आता तो जिवंत असल्याची बातमी राकुला कळली म्हणजे त्याला बाहेर काढले पाहिजे. इतके दिवस वाट बघून कंटाळलेली सारिका जाते रीना रॉयकडे. च्यायला या राजवाड्यावर पहारा नामक काही गोष्ट आहे का नाही? कोणीही, केव्हाही आत घुसतंय. सारिका म्हणते की कुठं लपवून ठेवलंस माझ्या सूरजला? (कमलचे नाव सूरज आहे) रीना उगाच हुशारी मारते - सूरज को कौन छुपा सकता हैं? सारिका भलतीच उखडते - मैं आकाशवाले सूरज की बात नही कर रही. रीना तिचा पावित्रा पाहून सांगते की राज किरणने त्याला कैद करून ठेवले आहे. सारिका अजून उखडते - तो कैद झाला आणि तू काय बाकीचे तारे मोजत बसली होतीस? चल दाखव मला कुठे ठेवलंय त्याला. नाही त्याला सोडवला तर नावाची सारिका नाय! रीनाचा आशावाद पुन्हा जागृत होतो. ती म्हणते ओके, चल तर मग.

बराच वेळ गाणे झाले नसल्याने गाणे लावायची वेळ झाली आहे. ओमप्रकाशच्या कबिल्यातील कोणीतरी (हा अ‍ॅक्टरही मला ओळखू आलेला नाही, पण चेहरा ओळखीचा वाटतो) सुभेदार खडक सिंग बनून कैदखान्यात येतो. त्याने सोबत रेहाना - जिप्सी वेषातील रीना रॉय - आणि सुलताना - सारिका - आणल्या आहेत. दोघीही अगदी मधाळ आवाजात "जी सुभेदार जी" करत प्रवेश करतात. हे कमी म्हणून त्या कंटिन्यूअस खांदे घुसळत आहेत. राज कोहली बहुधा आंधळा असावा. रीना-सारिकाने हे काहीही केले नाही तरीही त्या पुरेशा मादक वाटतात; या दिग्दर्शकीय टचची काही आवश्यकता नव्हती. कमल आणि प्रेक्षकांना हे काय घडते आहे लगेच लक्षात येते. नाचगाण्याचा बहाणा करून कमलला सोडवायचे असा ट्राईड अँड टेस्टेड प्लॅन! कमल साखळदंडाने जखडल्या अवस्थेतच समरसॉल्ट मारून किशोर कुमारच्या आवाजात आहा करतो आणि गाणे सुरु होते.

९.४) जुलम हो गया, लेकिन किस पे?

गाणे आहे हाय हाय सुभेदार जी गजब हो गया, जुलम हो गया रे जुलम हो गया. कमलला आवाज दिला आहे किशोर कुमारने, रीनाला आवाज दिला आहे अलका याज्ञिकने आणि सारिकाला आवाज दिला आहे साधना सरगमने. कमलच्या डाव्या कानातले कुंडल अजूनही सापडलेले नाही. रीनाला जिप्सी वेष दिला असला तरी तिला कोणीही ओळखत नाही. "राजकुमारीजी असे झिपरे कपडे घालून का नाचत आहेत" विचारत नाही. बरं हिच्या मापाचे जिप्सी कपडे मिळाले ते मान्य केले तरी हिच्या एक्झॅक्ट मापाचा मोरपिसांचा नेकलेस कुठून मिळाला? तुनळीवरच्या प्रिंटचे (आणि बहुधा ओरिजिनलचेही) कलर करेक्शन गंडल्याने सारिकाचे मूळ हिरवे डोळे नकली वाटतात. असे असले तरी पहारेकरी एकंदरीतच भोंगळ आणि कंटाळलेले असल्याने ते या नाचगाण्यावर ऑब्जेक्शन घेत नाहीत. आणि या दोघी दिसतातही अगदी सुरेख!

या गाण्याचा सारांश असा की या दोघींना पिंजर्‍यातला कैदी (कमल) आवडतो. कमलला या दोघी आवडतात. आणि सुभेदारजी तुम्ही असताना आम्ही तिघे एकमेकांपासून दूर का? हा तर जुलुम झाला. हे सर्व अतिशय आनंदी स्वरात म्हणण्याचे जगावेगळे कसब यांच्यात आहे. कमलला मनसोक्त नाचता यावे म्हणून त्याला वेगळ्या कोठडीत हलवलेले दिसते. सारिका रीनापेक्षा अधिक शेपमध्ये असल्याने तिच्या स्टेप्स अधिक सफाईदार आहेत. रीनाने केसांचा पोंगा एका बाजूला सोडला असून, त्याच्या भाराने ती सतत उजवीकडे कललेली वाटते. पण सर्वात कहर एक्स्ट्राचे पहारेकरी आहेत. असा डान्स स्थितप्रज्ञाप्रमाणे पाठीमागे हात बांधून कोण बघतं? एक कडवे संपताच कमलला अपेक्षेप्रमाणे कोठडीतून बाहेर काढून नाचू देतात. बरं आवाज किशोर कुमारचा दिला म्हणून त्याला अमिताभच्या स्टेप्स का दिल्या? शेवटच्या कडव्यात तर याला क्लासिकल नाचायला लावून त्यातून अमिताभ स्टाईल डान्समध्ये ट्रान्झिशन पण आहे. ते पुरेसे नाही म्हणून याला डफली देऊन याचा ऋषी कपूर का बनवला? बरं किमान भूगोल तरी सांभाळायचा. कैदखाना तर बेसमेंटमध्ये होता. मग एक जिना चढून जाताच किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज कसा दिसू शकेल? असो, बाकी गाणे काही खास नाही. शेवटी सगळे झुक झुक गाडी करत नाचायला लागतात आणि हे निसटणार तेवढ्यात खरा सुभेदार तिथे टपकतो.

९.५) सारिकाची एक्झिट

वीसेक शिपाई वि. कमल, रीना, सारिका आणि खडक सिंग हे चौघे अशी फाईट सुरु होते. सहसा बॉलिवूडमध्ये अनेक वि. अनेक फाईट सीन अतिशय केऑटिक असतात आणि हा सीनही यास अपवाद नाही. रीनाला थोडी बहुत तलवार चालवता येते असे दिसते. ती फॉईलच्या मदतीने लढते. सारिका जिम्नॅस्टिक्स करत लाथा घालणे या तंत्राचा प्रभावी वापर करते. खडक सिंग तसाही कॉमिक रिलीफ असल्याने त्याचे पंचेस चार्ली चॅप्लिनच्या जमान्यातील आहेत. आणि कमल तर राकुशिष्य आहे. फारिन विद्याविभूषित राज किरणलाही कपट वापरल्याखेरीज याचा सामना करता आला नव्हता तर या मूठभर शिपायांची काय कथा? त्यातल्या त्यात एक ही-मॅन छाप प्राणी थोडा त्रास देतो. लवकरच या सगळ्यांना कोठडीत बंद करण्यात हे यशस्वी होतात.

फाईटच्या एंडला जगातला सर्वात खोटा शॉट आहे. दाखवायचे असे आहे की कमलने भोसकून एका शिपायाला ठार केले आहे. पण क्लिअरली दिसू शकते की कमलची तलवार शिपायापासून दोन इंच अंतरावर आहे. तरीही उगाच कमल तलवार उपसल्याचा अभिनय करतो आणि शिपाई प्रचंड ओव्हरअ‍ॅक्टिंग करून मरतो. सारिका येऊन म्हणते की चल आता पळू. कमल म्हणतो थांब, रीनाला सोबत घेऊ. ती म्हणते की मी त्या भवानीला कोठडीत डांबले आहे. तो म्हणतो की नाही नाही, तिलाही बरोबर घ्यायचं म्हणजे घ्यायचं. सारिका संतापते. राकु तिकडे नमाज पढतो आहे आणि याची चौकशी करते आहे मी. याच्यासाठी राजवाड्यात घुसले मी. कैदेत सोडवण्यासाठी रीनाला तयार केलं मी. जोखिम पत्करली मी आणि याला रीनाची पडली आहे?

पण कमल तिला डायरेक्ट फ्रेंडझोन करतो. तो म्हणतो की मी रीनावर प्रेम करतो, तुझ्यावर नाही. ती भाषण देऊन कमलचे मतपरिवर्तन करू पाहते. बॅड मूव्ह! तेवढ्या वेळात कमल जाऊन रीनाला सोडवतो. बिचारी सारिका! हताश होऊन ती जागीच थिजते. कमल तिला ओढतच बाहेर काढतो. आता हा मोठा इश्यू होऊ शकतो. जनरली प्रेम त्रिकोणात एकाची कुर्बानी जावी लागते. इथे क्लिअरली सारिकाचा जीव जाणार आहे. गोष्टी इतक्या सरधोपट झाल्या की ताणू नयेत. त्यानुसार लगेच एडिटर कुर्बानी शॉट लावतो. एक शिपाई कमलवर सुरा फेकतो, सारिका मध्ये येते आणि खेळ खल्लास! लक्ष देऊन पाहिल्यास सुरा तिच्या डाव्या बाजूस खांदा आणि वक्षस्थळ यांच्या मधील मांसल भागात लागला आहे. सुर्‍याला विष लावले नसावे असे मानण्यास वाव आहे. कमल अजिबात जखमी झालेला नाही. सारिकाही ती जखम वगळता व्यवस्थित आहे. पटकन चिंधी बांधली तर सारिका कबिल्यात पोहोचेपर्यंत सहज जगू शकते. तिचा डावा हात कदाचित जायबंदी होईल पण ती वाचण्याची शक्यता खूप जास्त आहे. तरीही कुर्बानी द्यायची असल्याने कमल त्या शिपायाला मारून परत येईपर्यंत सुरा अर्धा इंच खाली सरकतो. मरता मरता तरी थोडे सुख द्यावे म्हणून कमल तिला कवटाळतो. ती म्हणते की ठीक आता काय, माझे अवतार कार्य संपत आले आहे. माझा छोटा भाऊ, अरमान कोहली, अजून अठरा वर्षांनी इच्छाधारी नाग होणार आहे. त्याची काळजी घे. एवढे बोलून ती मरते.

राज किरणच्या कानावर हा प्रकार जाईपर्यंत रीना आणि कमल निसटतात. तो बिचारा चरफडण्याखेरीज काही करू शकत नाही. अशा रीतिने सारिकाच्या मृत्युची किंमत चुकवून का होईना पण हिरो लोकांनी प्रथमच व्हिलन लोकांवर विजय मिळवला आहे. रहस्येही एक एक करत उलगडत आहे. रझा मुराद जिवंत असल्याने कमल हसन युवराज आहे हे कळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. हिरो लोकांची यशाची कमान अशीच चढती राहते का हे पुढच्या भागात बघू.

माझा छोटा भाऊ, अरमान कोहली, अजून अठरा वर्षांनी इच्छाधारी नाग होणार आहे. त्याची काळजी घे. एवढे बोलून ती मरते..... Biggrin
मलाही खरे वाटले आधी!
हा बेस्ट पंच होता आत्तापर्यंतचा.....
खूपच हसू आले ....

माझा छोटा भाऊ, अरमान कोहली, अजून अठरा वर्षांनी इच्छाधारी नाग होणार आहे >>> Lol हे भारी होते.
येऊ दे पुढचा भाग.

हेडरमधलाच मजकूर वाचलाय.
रझा मुराद खर्‍या राजपुत्राला घेऊन जात असताना मारला जातो. मग तो राजपुत्र ओम प्रकाशच्या कबिल्यात कसा पोचतो?

मग तो राजपुत्र ओम प्रकाशच्या कबिल्यात कसा पोचतो? >> होतं असं की जेव्हा रझा मुरादला बाण मारतात तेव्हा रझा मुराद युवराजाला घेऊन घोड्यावर स्वार झालेला आहे. हे महाराणीसमोर घडते कारण महाराणी गच्चीतून त्याला बाण लागताना पाहते. रझा मुराद लगेचच अर्धमेला होतो पण घोडा धडधाकट आहे. हिंदी चित्रपटांतील प्राण्यांना साजेशा बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करत तो मालक आणि मालकाच्या हातातला युवराज, अशा दोघांना घेऊन तिकडून निसटतो. नंतर त्याचे काय होते माहित नाही पण रझा मुरादला तो ओमप्रकाशच्या कबिल्याजवळील माळरानात सोडतो आणि बाकीचे हेडरमध्ये आहेच.

पायस माझे लॉकडाउन डिप्रेशन तुमच्या लेखांमुळे जाते आहे. धन्यवाद. बघायचा प्रयत्न केला पण लेखन जास्त जबरदस्त आहे.

हो. तेवढ्यासाठी आणि तिथवर सिनेमा पाहिला.

बाळ राजपुत्रांशी अदलाबदलीवरच्या आणखी एका सिनेमावरही तुम्ही लिहिलं आहे ना?

हा लेख वाचून मी पुन्हा एकदा हा चित्रपट पहायला सुरुवात केली. तुम्ही ज्या तपशीलात लिहिले आहे त्यासकट बघायला मजा येते आहे.

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे पुन्हा एकदा आभार Happy सर्व प्रतिसाद वाचत असलो तरी यथोचित उत्तरे द्यायला वेळ होतोच असे नाही. आज थोडका वेळ आहे तर हा खटाटोप.

रसग्रहणांचा फॉरमॅट >> मला व्यक्तिशः हा फोरम फॉरमॅट (नमनाला काही परिच्छेद आणि नंतर प्रतिसादांत उर्वरित मसाला) अधिक आवडतो. पण याची सुधारित आवृत्ती काय असेल यावर विचार चालू आहे. एकाच पोस्टीत लांबलचक रसग्रहण मी टेलिपोर्ट सिटीवरच्या किथच्या लिखाणात (शैतानी ड्रॅक्युला, भूत के पीछे भूत इ.) पाहिले आहे. कॅज्युअल व्ह्यूअर्स साठी ते वाचताना दमछाक होईल असे वाटते.

कुठल्या जोड्या कोणाच्या ते अजूनही कळलेलं नाही >> Biggrin हा सिनेमा पहिल्यांदा पाहिल्यानंतर माझेही डोके गरगरले होते. बहुधा म्हणूनच एवढा चालला असेल. प्रेक्षक दोन-तीन वेळा पाहायला गेले असतील. जेणेकरून समजावे नक्की काय होतं कथेत?

इनिशियल चॉईसेस पुढीलप्रमाणे होते: दिलीपकुमार (राजकुमार), फिरोझखान (सुनील दत्त) आणी जितेंद्र (कमल हसन) >> Happy मला व्यक्तिशः दिलीपकुमार आणि जितेंद्र चालले असते. सुनीलच्या जागी मात्र फिरोझ नसता शोभला.

या रिफ्लेक्सेसची प्रेरणा बहुतेक संजय लिला भंसाळीने घेतली असावी >> हायला! गुड ऑब्झर्वेशन! आणि हे अगदीच शक्य आहे. सावरिया पाहिल्यापासून मला शंका आहे की भन्साळी अभ्यास म्हणून सत्तर-ऐंशीचे सिनेमे बघत असावा.

1952 की कितीतरी साली वैजयंती, पद्मिनी, जेमिनी गणेशन, प्राण यांचा याच नावाचा चित्रपट आला होता. >> इंटरेस्टिंग माहिती. माझी हिंदी सिनेमाची माहिती साठच्या आधीच्या सिनेमांबाबतीत अगदीच तुटपुंजी आहे. गुगलवर जेवढे मिळाले त्यानुसार राजकुमार हरवणे वगळता याची कथा बरीच वेगळी दिसते पण तुम्ही म्हणता तशी आणखी साम्यस्थळे असू शकतात.

वाचूनच दम लागला >> मी समजू शकतो. हा सिनेमा अगदी थकवणारा आहे. दहा-बारा तासांच्या मिनी सीरिजचे मटेरिअल तीन तासात कोंबले आहे. थोडं पॉलिश केलं आणि 'योग्य' ते बदल केले तर याची अल्ट बालाजीच्या दर्जाची, दोन सीझन चालणारी वेब सीरिज बनेल.

हा पिक्चर खराच असा पळवत पळवत बनवलाय का? >> हो. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. अन्यथा एवढं मटेरिअल तीन तासांत कोंबणे अशक्य आहे.

अजून अठरा वर्षांनी इच्छाधारी नाग होणार आहे. >> मला हे सिरियसली खरे वाटले >> अहो खरेच आहे ते! कमलने नीट काळजी घेतली नाही म्हणून तर याच्या बंदोबस्तासाठी धरम पाजींना सनी पाजींना पाठवावे लागले Proud

पायस माझे लॉकडाउन डिप्रेशन तुमच्या लेखांमुळे जाते आहे. धन्यवाद. >> Happy

बाळ राजपुत्रांशी अदलाबदलीवरच्या आणखी एका सिनेमावरही तुम्ही लिहिलं आहे ना? >> तुम्ही बहुतेक अमर-शक्तीबद्दल बोलत आहात. त्यात अदलाबदली होत नाही पण राजपुत्र हरवतात. एके दिवशी या सर्वांचा पितामह, धरम वीरबद्दल लिहायची इच्छा आहे पण त्यातील सर्व तपशीलांना न्याय देता यायला हवा.

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद Happy तुमच्या प्रतिसादांनी लिखाण चालू ठेवण्याचा हुरुप येतो यात दुमत नाही. अजून चार-पाच भागांत राज तिलक संपावा. पुढले भाग लवकरच पोस्टतो.

१०) व्हिलन लोकांचा पलटवार

१०.१) गैरसमज पसरवणारा एडिटर

राकुला कमलची काळजी नाही याचे पुरावे पुढच्या सीनमध्ये मिळतात. युवराज जिवंत आहे हे कळल्यावर राकुकडे 'राज तिलक थांबवा' (थेटरातले प्रेक्षकः आम्ही गेले दोन तास हेच म्हणतो आहोत) या विषयावर राजमातेशी नेगोशिएट करायला मुद्दल आहे. यावेळेला तो स्वतः जायचे ठरवतो. किमान आतातरी 'अरे आपण त्या कमल हसनला पण याच संदर्भात पाठवले होते. तो अजून परतला कसा नाही? कारटा कुठे उलथला आहे कोणास ठाऊक?!' अशी योगिताकडे तक्रार करतानाचा सीन असायला हवा होता. नेमक्या त्याक्षणी कमल प्रकटणार, सारिका मेल्याचे खापर राकुवर फोडणार. मग योगितालाही अजून दोन चार टोमणे मारता आले असते. असो, असे मनोरंजक सीन्स आपल्या नशीबात नाहीत. तर राकु राजवाड्यात चोरदरवाज्याने प्रवेश करतो. हा मार्ग कमलला नसता सांगता आला? त्याला निसटणे सोपे पडले नसते? राकुला कमलची काळजी नाही हेच खरे.

आता दर्जेदार एडिटिंग पाहा. राकु सोबत रझा मुरादला घेऊन आला आहे. हा भुयारी मार्ग असून राजमातेच्या दालनाच्या बाहेरच्या खोलीत ते चेंबर उघडते. राकु आधी झडप उघडतो. मग स्वतः बाहेर येतो. मग ती झडप सताड उघडून तिचा आवाज करतो. मग रझा मुरादला खेचून वर घेतो. हे होताना दोघे कुंथतात. एवढे सर्व झाल्यानंतर राजमाता, आणि फक्त राजमाता, तिच्या सेविका नव्हे, या दोघांच्या घुसखोरीची दखल घेते. जंपकटमुळे असा समज होऊ शकतो की हे सर्व तिच्या डोळ्यादेखत घडते आहे. पण सीन अखंड पाहिल्यास राकु वेगळ्या खोलीत प्रवेश करून मग राजमातेच्या विश्रामकक्षात आलेला कळते. एव्हाना पेंगुळलेल्या प्रेक्षकांना 'राकुला राजमातेच्या बेडरुमचा अ‍ॅक्सेस आहे' असे सटल पण चुकीचे संदेश देणारा एडिटर या सिनेमाला या लाभला आहे.

१०.२) सहज सोपे उपाय करण्यापेक्षा उर्दू झाडण्यास बॉलिवूडकरांची पसंती असते.

राजमातेला अर्थातच राकुची उपस्थिती पसंत पडलेली नाही. पण तरीही ती आरडाओरडा करून शिपायांना बोलवत नाही. का? एडिटरने पसरवलेल्या गैरसमजांना खतपाणी घालण्यामागे तिचा काय हेतु आहे? अस्तु. ती राकुला म्हणते तुझी इथे यायची हिंमत कशी झाली? तो म्हणतो की दोन गोष्टी - १) मी गद्दार नाही, २) युवराज जिवंत आहे. ती म्हणते मग अजितने ते एका रँडम बाळाचे प्रेत दाखवले होते ते कोणाचे होते? तो म्हणतो अरे पुरावा आहे माझ्याकडे. मग तिला तो बाहेरच्या खोलीत नेतो तिकडे एका निळ्या रंगाच्या खुर्चीत रझा मुराद बसलेला असतो. इथे राजमातेकडे बघून रझा मुराद एक भयप्रद हास्य करतो. हे बघून कोणीही घाबरेल. दर्दी प्रेक्षक तर याचा व्हिलन मोड अ‍ॅक्टिव्हेट झाला आहे असे ठरवून मोकळा होईल. पण राजमातेचा मेंदू आता वेगळ्याच प्रतलात धावतो आहे. त्या दिवशी मदन पुरीने 'मी रझा मुरादला मारले' असे सांगितले होते. पण हा तर जिवंत आहे. म्हणजे मदन पुरीने आपल्याला चुना लावला. आणि मदन पुरीचा बॉस अजित. म्हणजे आपल्याला अजितनेही चुना लावला. तरीच तोंड भाजल्यासारखे वाटत होता. चुना जास्त झाला.

ती जाऊन भोकाड पसरते की 'सांग कुठे आहे माझा मुलगा. सांग. सांग जलाल खान सांग.' तिचा पावित्रा बघून रझा मुरादचे क्रिपी हास्य जाऊन तोच भेदरतो. राकु मग सांगतो की त्याची दातखीळ तुझ्या आक्रस्ताळेपणामुळे नाही एरवीच बसली आहे. तो बोलू शकत नाही. त्यामुळे राकुच्या माथी लागलेला कलंक पुसला जात नाही आहे, युवराजाचा पत्ता लागत नाही आहे. हा मुद्दाही फालतू आहे. रझा मुराद बोलू शकत नाही. पॅरॅलिसिसमुळे लिहूही शकत नाही. पण वाचू तर शकतो. मान तर डोलावू शकतो. थोडं किचकट काम आहे पण मुळाक्षरांचा चार्ट आणा. एकेका अक्षरावर बोट ठेवून रझा मुरादला 'तुला जो शब्द बोलायचा आहे त्यातले पुढचे अक्षर हे आहे का?' असा हो-नाही प्रश्न विचारून त्याचा मेसेज काढून घ्या. तुम्हाला स्वतः हे काम करायचे नसेल तर पगारी नोकर नेमा. इतका सहज साधा उपाय असतानाही प्रेक्षकांचा छळवाद मांडायचा असल्याने राकु उगाच 'मैं सच्चा मुसलमान हूं, मैं जहन्नुम की आग में कूद सकता हूं' उर्दू भाषण झाडतो. अजित व राज किरणसारख्या गुणी लोकांचा या सिनेमाच्या शेवटी अशा बिनडोक लोकांच्या हस्ते पराभव का होणार आहे?

१०.३) वाह्यात प्लॅन

राकु राजमातेला धीर देत म्हणतो की आपण बिनडोक असलो तरी अल्लाह आपल्या बाजूने आहे, तो आपली मदत करेल. ती म्हणते ते ठीक आहे, पण राज तिलकचं काय करू? एव्हेंट मॅनेजर अ‍ॅडव्हान्स परत नाही करणार. राकु म्हणतो की माझ्याकडे एक कल्पना आहे. कट टू दुसरा दिवस. राजमाता अजितला बोलावून घेते. तोही सोबत सुलोचना आणि एक वेणी घातलेल्या हेमा मालिनीला घेऊन येतो. ती म्हणते की रीना रॉयने तर बंजार्‍यासोबत पळून गेली. अशी मिडल क्लास राजकुमारी आम्हाला सून म्हणून नको. तरी राज किरणचे लग्न आता हेमा मालिनीशी करूयात. सिनेमा संपत आला आणि फायनली हेमाचे जे रुपा नाव सांगितले होते, तो रुपमतीचा शॉर्ट फॉर्म असल्याचे कळते. ही घोषणा ऐकून हेमा नाखूष होते. कारण तिला धर्मेंद्र आवडतो. पण ती फक्त नाराज झाली आहे. अजितला धरणीमातेची दुभंगून पोटात घेण्याची स्कीम अजून चालू आहे का याची चौकशी करावी लागणार आहे. राज किरण त्याचा खरा मुलगा आहे. म्हणजे हेमा त्याची सख्खी बहीण झाली. आता हा विवाह कसा काय होऊ शकेल? राजमता वेड पांघरून पेडगावास जाते. ती म्हणते की तू तर तुझा मुलगा आमच्या पदरात घालायला तयार होता (जो त्याने घातलाच) मग आता मुलगी द्यायला काय प्रॉब्लेम आहे? अजितची गुपिते फोडण्याची ड्युटी सुलोचनाकडे असल्याने ती सत्य काय ते सांगते.

आता - हे असे घडेल हे राकुला कसे कळले? राज किरण तर प्राणचाही मुलगा असू शकतो. मदन पुरीचाही मुलगा असू शकतो. आणि सुलोचनाला अंदर की बात माहित होती म्हणून; नाहीतर समजा अजितने होकार देऊन तोंड दाबून बुक्क्यांचा मार पसंत केला असता तर? मग यावर मिटिगेशन स्ट्रॅटेजी काय? असे वाह्यात प्लॅन यशस्वी कसे काय होतात देव जाणे. अजितची चूक असली तर इतकीच त्याने गुपचूप सुलोचनाच्या बाळासोबत अदलाबदली करायला हवी होती. लहानपणी सुनीलला मारण्याचा प्रयत्न आणि सुलोचनाचा कॅच त्याच्या अंगाशी आला आहे. राजमाता म्हणते की सर्व काही क्लिअर आहे. तू आणि हा तोतया युवराज व्हिलन आहात, तरी नाईश मीटिंग, प्लीज लीब्व्ह! राज किरण म्हणतो बर्रर्रर्रर्र! तो म्हणतो की या सर्व सिनेमात सर्वात हॅंडसम, चांगला फॅशन सेन्स असणारा, धुतलेले कपडे घालणारा, तेलकट चेहरा नसणारा, हुशार, युद्धकुशल आणि सर्वात महत्त्वाचे तरुण, असा मीच आहे. अर्थातच सेना अशा गुणी माणसाच्याच बाजूने आहे. त्यामुळे तुलाच नाईश मीटिंग, प्लीज लीब्व्ह. राज किरण सैनिक बोलावून तिला कैद करतो. या ना त्या प्रकारे का होईना राकु-राजमातेचा वाह्यात प्लॅन फसल्याचे बघून प्रेक्षक क्षणभर सुखावतो.

१०.४) गहरी चाल

अजित राज किरणवर भलताच इंप्रेस होतो. तो म्हणतो की मुला, धन्य केलंस तू मला. आ झप्पी पा ले. राज किरण तुच्छतेने त्याच्याकडे बघतो. म्हणतो महामंत्री आहेस, महामंत्र्यासारखाच वाग. जसे धर्मेंद्राला राकुने शिकवले आहे तसे हेमाला बहुधा योगिताने शिकवले असावे. राज किरणला युवराज भय्या असे संबोधून ती टोमणे मारते. फरक इतकाच की हे करताना हेमा शाळेतल्या गॅदरिंगमध्ये शोभेल अशी अ‍ॅक्टिंग करते. अजितच्या चेहर्‍यावर "मुलगा भाव देत नाही, मुलगी ओव्हरअ‍ॅक्टिंगने लाज काढते, आणि बायको सगळी रहस्ये सहस्त्र जिभांनी जगजाहीर करते. मी करू तरी काय?" असे हताश भाव आहेत. ही ओव्हरअ‍ॅक्टिंग कमी असे भोकाड राजमाता महाराजांच्या ऑईल पोर्ट्रेटपुढे पसरते. खाल्ल्या मीठाला जागून शेर सिंग (तो युवराज जन्मल्याची बातमी देणारा सेवक) तिला काही पाहिजे का विचारतो. ती म्हणते की गेल्या वर्षी एक राखी जास्त आणली होती. या वर्षी तीच वापरणार होते. आता मी हिचे काय करू? तू ही राखी प्राणला नेऊन दे. त्याला काय ते समजेल.

अ‍ॅज इफ राज किरण तोवर गप्प बसणार आहे. तो राजन हक्सरला (ऐलान-ए-जंग मधील सुप्रसिद्ध लोळणारा सेठ) कामाला लावतो. तुनळीवर इथे सिनेमा थोडा कापला आहे असे वाटते. राजन हक्सर जाऊन प्राणच्या पागेला आग लावतो. याने घोडे उधळतात आणि त्या पळापळीत बरीच लोकं टापांखाली चिरडली जातात. यामध्येच शेर सिंगही मारला जातो. हे सर्व स्थितप्रज्ञाप्रमाणे दोन बायका त्या फिनिक्स स्तंभापाशी उभ्या राहून बघत आहेत. महत्त्वाची बाब अशी की चिरडल्या गेलेल्यांमध्ये उर्मिला भटचाही समावेश आहे. राजन जाऊन वृत्तांत राज किरणला सांगतो. राज किरण त्यावर खुश होतो. कारण आता तिचा अंतिम संस्कार करण्यासाठी गायबलेला धर्मेंद्र येईल आणि आयताच जाळ्यात सापडेल.

१०.५) जाळपोळ

त्याचा अंदाज शंभर टक्के बरोबर आहे. दोन वेण्या घातलेल्या हेमाने पाजींना उर्मिला मेल्याचे कळवले आहे. अपेक्षेप्रमाणे पाजी अंतिम संस्कार करायला जाणार आहेत. इथे बँडेज म्हणून धर्मेंद्राला चक्क पांढरा हातमोजा दिला आहे. हेमा म्हणते वेडेपणा नको करूस, जे काय विधी असतील ते प्राण करेल. तो म्हणते नाही, आग तर मीच लावणार. कट टू चिता. सवाष्ण मेली म्हणून उर्मिलाला लाल साडी नेसवली आहे. जळण्याची वाट बघत ती मंद श्वास घेते आहे. प्राण चितेला आग लावणार इतक्यात धर्मेंद्र घोड्यावर येतो आणि जळते लाकूड हिसकावून घेतो. यांच्यात बहुधा तुळशीपत्र, गंगाजल, घागर वगैरे विधी नसावेत. कारण दोघांनाही तिला जाळायची घाई झाली आहे.

आपल्या मुलांना चाबकाने गुरासारखे बडवणे प्राणचा छंद आहे. त्यामुळे सुनीलप्रमाणेच तो धर्मेंद्रालाही फोडतो. पण पाजी आहेत गरम रक्ताचे. ते एका पॉईंटला उखडतात, प्राणला ढकलतात आणि चितेला आग लावतात. मग तिथे राज किरण येतो. त्याला बघून धर्मेंद्र लगेच आपला आतला शर्ट दाखवतो. तो म्हणतो की इस खून को पहचानते हो? अरे हा अजून तोच रक्ताने भिजलेला, न धुतलेला शर्ट घालून फिरतो आहे? हेमा मालिनीला सॅल्यूट आहे. याला मिठी कशी काय मारते देव जाणे. तो राज किरणला घोड्यावरून खाली पाडतो. मग त्रिशूळ मारून राज किरणचा अंत करणार इतक्यात प्राण मध्ये तडमडतो. नाईलाजाने पाजी त्रिशूळ फेकून एका शिपायाला ठार करतात. प्राण व राज किरण पाजींना पकडण्याचा प्रयत्न करतात पण आपल्याचा आईच्या चितेचे लाकूड घेऊन पाजी त्यांना चकमा देतात. मग घोड्यावर स्वार होऊन पळ काढतात. राज किरण त्यांचा पाठलाग करतो पण याची परिणती पाजींच्या घोड्यासकट कडेलोट होण्यात होते. अर्थातच ते जिवंत आहेत पण राज किरण त्यांना मेलेला समजून परत फिरतो. परत येताच तो प्राणला कैद करतो. प्राण आश्चर्यचकित होतो. राज किरण म्हणतो की तू मला कितीही नावं ठेव, अगदी शुद्ध हिंदीत नावं ठेव, बट फॅक्ट इज फॅक्ट! तू मूर्ख आहेस. शत्रूच्या वडलांना मी असं मोकळं सोडू शकत नाही. एवढे बोलून तो प्राणला बंदी बनवून राजवाड्यात परततो.

अजितचे पितळ उघडे पडले आहे. व्हिलन लोकांनी आता सटलटीची कास सोडून उघड उघड विघातक कारवाया सुरू केल्या आहेत. जिवंत युवराज कमल आहे आणि सुनील प्राणचा मुलगा आहे सोडून सर्व रहस्ये क्लिअर झाली आहेत. आता हिरो लोकांना एक होण्याची गरज आहे. ते एकत्र झाले की एकदाचा क्लायमॅक्स सुरू होईल. हिरो लोक एकत्र कसे येतात ते पुढील भागात.

हे होताना दोघे कुंथतात. >> फिस्सकन हसू आले.

एक वेणी घातलेल्या हेमा मालिनीला >> वेण्याच बर्‍या लक्षात ठेवल्यात Lol

धमाल आहे Lol

"अजितच्या चेहर्‍यावर "मुलगा भाव देत नाही, मुलगी ओव्हरअ‍ॅक्टिंगने लाज काढते, आणि बायको सगळी रहस्ये सहस्त्र जिभांनी जगजाहीर करते. मी करू तरी काय?" असे हताश भाव आहेत. ............ आपल्या मुलांना चाबकाने गुरासारखे बडवणे प्राणचा छंद आहे." - इथे म्हणजे पायसचं कौतूक करायला सखाराम गटण्याचीच प्रतिभा (विलोभनीय, अलौकिक ई.) हवी. Happy

ह.ह.पु.वा.
८० च्या सिनेमाचे परिक्ष्ण करावे तर पायसनेच!

हेमाच्या कॅरॅक्टरला लॉजिकचा कोर्स करण्याची नितांत आवश्यकता आहे. जर सुनील अजितचा मुलगा नसेल तर ऑटोमॅटिकली हेमा त्याची सख्खी बहीण असू शकत नाही, फार फार तर सावत्र. सो तो ऑलरेडी तू माझी बहीण नाही असे म्हटला आहे.

Happy

एका पॉईंटला कमल झेंड्याच्या काठीवर उभा आहे आणि काठी ज्या भिंतीत रोवली आहे तिच्या कठड्यापाशी सर्व पहारेकरी आहेत. कमल त्यांच्या रेंजच्या संपूर्णतया बाहेर आहे. तरीही बिचारे हवेतल्या हवेत तलवारी फिरवत राहतात.
>>
काठी कपत नाहित
____________________________

त्याच वर्षी आलेल्या सुपरहिट तोहफामधून डोक्यावरून साड्या नेणे ही स्टेप कॉपी करण्याचा फेल प्रयत्न केला जातो.
>> कमालिचा अभ्यास आहे १९८४ चा.

_________________________________
लग्गेच राजीव आनंद स्वप्नातून जागा होतो. त्याला दिसते की गाण्यावर रंजिता सुनील दत्तसोबत नाचत आहे. मग ते दोघे बागडत निघून जातात आणि राजीव आनंदचाही मोठ्ठा पोपट झाल्याचे स्पष्ट होते.
>>>>
सुनिल दत्त म्हातारा झालेला. चुकुन संजय दत्त सम्जुन त्याला घेतला असावा. त्याला नाचता येइना म्हणुन नाच राजिव बरोबर अस्सा सगळा आनंद असावा.

काठी कपत नाहित >> Lol हा पंच मला नाही सुचला. हा खास थिएटरमध्ये विचारायचा प्रश्न आहे. रच्याकने हा सिनेमा आला तेव्हा संजय दत्तला इंडस्ट्रीत येऊन तीन वर्षे होऊन गेली होती. त्यामुळे फक्त राजीवच नाहीतर सर्वच प्रकारचा आनंद आहे.

११) एक भला मोठ्ठा दिवस - १

११.१) चाबूक ऑब्सेशन

प्राणला जेरबंद करून राजमातेसमोर आणले जाते. तो राजमातेला म्हणतो की माझी दूरदृष्टी बघ. प्राण तुझी मदत करू शकेल त्याच्याआधीच मी त्याला बंदी बनवले आहे. हा मनुष्य खरंच या सिनेमाचा व्हिलन आहे? इथे फ्रेंच कटमध्ये राज किरण कमालीचा हँडसम दिसतो आहे. आणि कमालीच्या गदळ, बिनडोक हिरो लोकांकडून याचा पराभव होणार आहे? कलियुग कलियुग म्हणतात ते हेच!
राजमाता त्याला म्हणते की अरे आपण भारतीय आहोत. तुझा यशोदा मैया सिद्धांतावर विश्वास कसा नाही? तो छद्मी हसतो. म्हणतो, 'ए बाय मी हिरो नाही काय, मी व्हिलन हाय व्हिलन! माझा पालनेवाली माँ कन्सेप्टवर विश्वास नाही.' दुसर्‍या दिवशी राज तिलकचा मुहूर्त आहे. जर तिने काही अडथळा आणला तर तिला आणि प्राणला मारण्याची धमकी दिली जाते. त्या दोघांना नजर कैदेत सोडून तो निघून जातो. इथे एक भला मोठ्ठा दिवस सुरु होतो.

प्राण अजूनही शॉकमध्येच आहे. अजितचा मुलगा असा वागला तर मी समजू शकतो पण माझा मुलगा इतका दुष्ट? राजमाता म्हणते की अरे सावळा, तो अजितचाच मुलगा आहे. आता जर अजितने मुलांची अदलाबदली केली तर त वरून ताकभात लॉजिकने सुनील दत्त प्राणचा मुलगा असला पाहिजे. तसे बघावे तर हा केवळ अंदाज झाला, सिद्धता नाही. पण राजमाता छातीठोकपणे प्राणला 'सुनील दत्त तुझा मुलगा आहे' सांगते. आता ते खरे आहे म्हणून ठीक आहे. प्राणला आपण आपल्याच मुलाला विनाकारणच गुरासारखे बडवल्याचा साक्षात्कार होतो. दोघेही पश्चात्ताप करत बसतात.

सुनील दत्त इकडे अजितच्या बेडरूममध्ये घुसला आहे. हातात आहे चाबूक! हा प्राणचाच मुलगा आहे. योगिताने याची चांगली सुश्रूषा केली असावी कारण हा ठणठणीत दिसतो आहे. मधल्या काळात राकुने 'अरे रडतो कशाला? तुझा बाप कोण हे अजितला ठाऊक असलेच पाहिजे. त्याला जाऊन विचारत का नाहीस?' असा सल्ला दिला असावा. मग तो अजितला गुरासारखा बडवतो. म्हणतो, सांग कोण आहे माझा बाप. अजित थोडा वेळ मार सहन करतो पण नंतर त्याने विचार केला असावा की हे लपवून फायदा काय? सुनील ऑलरेडी राज किरणचा विरोधक आहे. मग तो म्हणतो की तू प्राणचा मुलगा आहे. हे कळल्यावर सुनील निघून जातो आणि पडद्याआड ही गंमत बघत असलेला राकु अजित समोर येतो.

११.२) शत्रूला जरब बसवण्याच्या अभिनव पद्धतीचा उगम

राकुच्या चेहेरेपट्टीत तसूभरही बदल झालेला नसला तरी उगाच अजित त्याला ओळखायला दोन मिनिटे घेतो. राकुही हे विसरला आहे की आपण उर्दूमध्ये लोकांना पकवतो, हिंदीत नाही. जसे की इथे स्वतःला उद्देशून भौचाल शब्द वापरतो. प्रत्यक्षात त्याने जलजला शब्द वापरला पाहिजे. तो अजितला कुत्ते संबोधून म्हणतो की बघ माझ्या चेहर्‍यात तुला वफादारी दिसेल, नीट रोखून बघ. अजितही अगदी रोखून त्याच्या चेहर्‍यात वफादारी शोधताना दाखवला आहे. त्यात बिचारा फारच गोंधळला आहे - तू उर्दूत बरळत होता ते समजत नव्हतं. आता तू हिंदीत बरळतो आहेस, तेही समजत नाही आहे. अजित म्हणतो की दया कर प्लीज! (आणि एकाच भाषेत बरळ) राकुला अजित नक्की कशासाठी आर्जवे करत आहे हे समजत नाही. तो म्हणतो की तुझे एका फटक्यात दोन तुकडे करणे हीच एक दया मी तुझ्यावर करू शकतो. पण नाही, मी तुझे दोन नाही तर हजार तुकडे करणार आहे. हजार तुकडे करणार तर करणार ते सर्व प्रजेसमोर करणार आहे ज्यांच्यासमोर तू मला गद्दार सिद्ध केलं होतंस. इथे राकुचा अ‍ॅटिट्यूड साराभाई व्हर्सेस साराभाई, एपिसोड एकोणतीस मधील मायाच्या 'गंगुराम दंतमंजन के एक पॅकेट के साथ दो गंगुराम टूथब्रश फ्री' शी (टाईम स्टँप ००:४८) मिळताजुळता आहे. वत्सा राकु, तू तुझ्या हाडवैर्‍याला धमकावतो आहेस, सुनेला टोमणे नाही मारत आहेस.

एकतर राकुला गद्दार प्रायव्हेटली, महाराजांच्या बेडरुममध्ये ठरवण्यात आलं होतं. त्याची धिंड काढली नव्हती. आणि समजा हा गद्दार असल्याची दवंडी पिटली असेल तरी कुठे आहे ही प्रजा? राजवाड्यातले मूठभर शिपाई, प्राणच्या तळावरचे शंभर एक लोक आणि ओम प्रकाशच्या कबिल्यातले पन्नास एक लोक. अगदी राकुचा क्लास धरला तरी गिणती अडीचशेवर जात नाही. बाकीच्या बाजार बुणग्यांना अजित मेला काय जगला काय, काय फरक पडतो? उगाच आपलं काहीतरी. बरं एवढं करून अजितला मारत नाहीच. 'तुम्हारी मौत हम पर उधार रही' म्हणून तिथून निघून जातो. तिरंगा मधल्या 'उसके गले का नाप लेने गये थे कि वो फंदे की मौत मरेगा या हमारे पंजे की' चा उगम राज तिलक मधल्या 'तुम्हारी मौत हम पर उधार रही' मध्ये आहे.

११.३) ऐतिहासिक प्रेरणा

सुनीलच्या वेगळ्याच प्रायोरिटीज आहेत. तो जातो प्राणच्या कबिल्यात. तिथे त्याला रंजिता भेटते. तो म्हणतो की अगं मी प्राणचा मुलगा म्हणजे कबिल्यातलाच आहे आणि नियमांनुसार आपले लग्न होऊ शकते. इथे रंजिता सोयीस्कररित्या आशालताने सांगितलेले 'तू कबिल्याबाहेरची आहेस' हे रहस्य विसरते. ती सुनीलला सांगते की तुझी आई काही दिवसांपूर्वी मेली आणि तिच्या अंतिम संस्कारानंतर प्राणही गायब आहे. बहुतेक तरी राज किरणने उठाव नको म्हणून प्राणच्या अटकेची बातमी गुप्त ठेवली आहे. तो हुशार व्हिलन असल्याचा आणखी एक पुरावा. इथे एक अतिशय वाईट सिनेमॅटिक चॉईस आहे. सुनील कॅमेर्‍यात डोळे घालून 'यामागे अजितचा हात तर नसेल' ही शंका व्यक्त करतो. सहसा असे शॉट फोर्थ वॉल ब्रेक करून प्रेक्षकांशी संवाद साधण्याकरता वापरतात. इथे सुनीलने काय संवाद साधला? त्याला कॅमेर्‍यात डोळे घालायला लावण्याचा दिग्दर्शकीय टच का? असो, रंजिता म्हणते की समजा अजित यामागे असेल असे धरले तरी तू एकटा काय करू शकणार आहेस? कबिल्यातले लोक फक्त प्राणचे ऐकतात, तेही तुझी मदत करणार नाहीत. मग तिकडे आशालता येते. तिला सुनील कबिल्याचा वारस आहे हे लक्षात आले आहे. रंजितावर फिदा असल्याने तो आशालता या कबिल्याची नाही, पर्यायाने रंजिता या कबिल्याची नाही अशा फालतु मुद्द्यांकडे कानाडोळा करेल याची तिला खात्री पटते. मग ती म्हणते की एक काम करू, आपण माझ्या भावाकडे मदत मागू. मी पळून गेल्याने तो नाराज आहे पण बाका प्रसंग ओळखून तो नक्की आपली मदत करेल.

आता हे बंधुराज कोण आहेत ते आधीच सांगतो कारण एडिटरने पाट्या टाकल्याने भलताच सीन सुरू होतो. आशालताचा भाऊ दाखवला आहे देवकुमार. तो असतो भिल्ल. इथे राज कोहलीने राजपूत इतिहासातून प्रेरणा घेतली आहे. जेव्हा महाराणा प्रताप असाच संकटात सापडला होता, तेव्हा त्याला भिल्लांनी मदत केली होती. तेव्हा पण बहुतेक बायकोच्या कनेक्शन मार्फत तो भिल्लांपर्यंत पोहोचला होता (चूभूद्याघ्या). पण ते भिल्ल सुसंस्कृत होते. हे भिल्ल स्त्रीलंपट, आचरट व अंधश्रद्धाळू आहेत तर त्यांचा सरदार ढेरपोट्या आहे. एक वेणी घातलेली हेमा पंजाबी ड्रेसमध्ये जंगलात हिंडते आहे. यामागचे कारण दाखवण्याची तसदी एडिटर घेत नाही. एक चिल्लर भिल्ल तिच्यामागे लागतो. हा चिल्लर भिल्ल शब्दशः चिल्लर आहे. हा इतका कमकुवत आहे की एका पॉईंटला हेमा बारीकशा फांदीला घासटून तशीच पुढे पळते पण हा मात्र फांदीस स्पर्श होताच कळवळतो. मग तिथे धरम पाजी अवतरतात. हेमा म्हणते की हा माझ्यावर अतिप्रसंग करू पाहत होता. एवढा क्यू पाजींसाठी पुरेसा आहे.

११.४) शाप - उ:शाप

पाव मिनिटं फाईट होते. चिल्लर भिल्लाकडे एक छोटी कुर्‍हाड आहे. एका पॉईंटला ती कुर्‍हाड आकाशात उंच उडते आणि पाजी कुर्‍हाडीच्या ट्रॅजेक्टरीमध्ये याला पकडून ठेवतात. कुर्‍हाड पाठीत घुसते चिल्लर भिल्ल खलास! राज कोहलीला दिग्दर्शकीय टच द्यायची खोड असल्याने चिल्लर भिल्ल जागच्या जागी तडफडण्याऐवजी हेमाच्या पायांशी जाऊन मरतो. मग पाजी व हेमा निघू बघतात पण त्यांनी चारी बाजूंनी भिल्ल येऊन घेरतात. हे लोक कुठून आले? इतका वेळ विंगेत दबा धरून बसले असतील तर मग चिल्लर भिल्लाची मदत का नाही केली? असो, या दोघांना पकडून ते देवकुमारसमोर हजर करतात. हा मेलेला चिल्लर भिल्ल देवकुमारचा उजवा हात होता (म्हणे). पाजी म्हणतात अशा फडतूस लोकांना कामावर कशाला ठेवतोस? देवकुमार उखडतो. (नॅचरली)

देवकुमारचा वेष स्टीरिओटिपिकल भिल्लाचा आहे. भारतात कुठेही जग्वार आढळत नसला तरी जग्वारच्या ठिपक्यांचा पॅटर्न असलेल्या कातड्यापासून त्याचा ड्रेस तयार केला आहे. डोईस पिसांचा मुकुट. गळ्यात हाडकांची माळ, हातात कडे वगैरे वगैरे. डावीकडचा बूब तसाच लोंबताना दिसेल अशा तर्‍हेने नेसलेले वस्त्र. हा मनुष्य इतका गदळ आहे बघता हा हिरो लोकांच्याच बाजूने उभा राहू शकतो, राज किरण याला बघूनच 'सो डाऊनमार्केट' म्हणून नाक मुरडेल. देवकुमार असे ठरवतो की याची शिक्षा म्हणून धर्मेंद्राला भाले मारून ठार करावे आणि त्याच्या रक्ताने कबिल्याच्या देवतेला अभिषेक करावा. बेसुमार लिपस्टिक व लिप ग्लॉस चोपडलेली हेमा म्हणते हा अन्याय आहे. ती सर्व घडला प्रकार विदित करते. देवकुमार गदळ असेल पण दुष्ट नाही. त्याला लक्षात येते की आपण रागाच्या भरात बावळटासारखे वागलो. मग एखाद्या ऋषीच्या थाटात तो म्हणतो की मी शाप मागे तर घेऊ शकत नाही पण उ:शाप देतो - देवतेला कौल लावला जाईल. जर देवतेने आग ओकली (शब्दशः) तर देवता नाराज आहे असा अर्थ काढून शिक्षा कायम ठेवली जाईल. अन्यथा तुम्हा दोघांना आम्ही सोडून देऊ.

देवतेचा कौल काय पडला याचे उत्तर पुढील भागात.

धमाल! इतके वाचूनही कोण कुणाचा कोण हे नीट लक्षात राहिले नाही ! एडिटर च्या तरी कसे लक्षात राहील?
CREATE TABLE ACTORS (ACTORID INT PRIMARY KEY, NAME VARCHAR(30) NOT NULL)
CREATE TABLE RELATION (ACTORID1 INT NOT NULL, ACTORID2 INT NOT NULL, RELATION VARCHAR(30) )

हसण थाम्बवता येत नाहे आहे. काय अभ्यास, काय अभ्यास. आता असे भाबडे सिनेमे हि बनत नाहित आणि भाबडे प्रेक्षकहि राहिले नाहित.

देवा! किती हसायचे Lol
पण ह्या सिनेमातले व्हिलन पायसला बरेच आवडलेले दिसतात....थोडक्यात पायस व्हिलन ग्रुपमधे आहे Happy

अजितच्या चेहर्‍यावर "मुलगा भाव देत नाही, मुलगी ओव्हरअ‍ॅक्टिंगने लाज काढते, आणि बायको सगळी रहस्ये सहस्त्र जिभांनी जगजाहीर करते. मी करू तरी काय?" असे हताश भाव आहेत.>>>>>>>>
हसून हसून पोट दुखले अक्षरशः. YouTube वर जाऊन पाहिले ते expressions.

आत्ताशी ४.२ पर्यंत आलो आहे. पायस - बाय द वे, ४.३ हे बरोब्बर ४३व्या मिनीटाला सुरू होते यू ट्यूबवर. म्हणजे तुझा १० चा रेश्यो दिसतोय

ते जोरावर उचलतो ते झाड काही आगापीछा नसताना आपले सहज त्या रस्त्यावर पडलेले दिसते, ते ही दोन्ही बाजूंनी छान कापून. त्याचा बुंधा वगैरे कोठेच दिसत नाही. सारिका सोडली तर बाकी तिन्ही हीरॉइन्स ची एण्ट्री घोड्यांशी संबंधित आहे. रत्नांग्रीतल्या समस्त म्हैशींच्या वरताण यातल्या समस्त एलिजिबल मुली बरोब्बर एकाच वेळेस अडचणीत येतात व त्यांचे भावी प्रेमिक त्यांना त्यातून सोडवतात. घोडा कितीही पिसाळला तरी बहुधा सुसायडल होत नसावा. इथे रंजिताचा घोडा थेट कड्यावरून आत्महत्त्याच करायला निघाल्यासारखा वाटतो. पुन्हा हे दोघे पडल्यावर दोन्ही घोडे शांतपणे उभे आहेत.

सुनील, धरम, त्याचा भाऊ, प्राण व रंजिता यांचे एकाच वेळेस तेथे असणे, व यातील तिघांना ते घोडे उधळल्याचे माहीत नसणे यात वेग, दिशा व अंतरे याचा अभूतपूर्व गोंधळ आहे.

तेव्हाच्या राजघराण्यातील सेनापती, मंत्री वगैरे लोकांचे असे धोरण दिसते की एरव्ही जरी हे त्या महालात एकत्र उभे असले, एकत्र कारस्थाने करत असले, तरी यांची मुले तरूण होउन अचानक एकमेकांना भेटेपर्यंत त्यांना एकमेकांपासून लपवलेले असते, तसेच त्या मुलांपासून या म्हातार्‍यांनाही लपवलेले असते. कारण यातले कोणीही कोणालाही ओळखत नसते. धरम व सुनील दत्त हे राकु, प्राण व अजितच्या पिढीचे न वाटता तरूण वाटावेत म्हणून गोबेल्स तंत्राने त्यांचा उल्लेख सतत जवान (धरम), नौजवान (सुनील) असा अनेकदा केलेला आहे.

राजवाडे कितीही गयेगुजरे असले, तरी किमान बिबट्या प्रूफ असू नयेत? एक रॅण्डम बिबट्या कोठून आला तेथे एकदम? परत त्यातून होणार्‍या धांदलीत लोक कोणत्याही दिशेला पळतायत. लिटरली वाघ मागे लागला असला तरी किमान पळणार्‍याने वाघाच्या विरूद्ध दिशेला पळावे ना? राजकिरण एखाद्या मांजराच्या पिल्लाला पकडावे तसा त्या बिबट्याला जेरबंद करतो. या प्रसंगात राणी व मुख्य सगळे मंत्री कोठे असायला हवेत? ते तेथेच असतात लगेच टाळ्या पिटत यायला.

रीना रॉय ला कोणाच्या तरी गायकीचा आवाज येतो तो आवाज व संगीत टोटली "हम तुम्हे चाहते है ऐसे" च्या सुरूवातीचा पीस आहे. सारिका तिच्यावर साप सोडते हे वरती वाचले पण तो सीन या क्लिपमधे उडवलेला दिसतो. आता सापाचे विष काढायचा कार्यक्रम बंद तंबू मधे का करावा लागतो कोणास ठाउक. मग हा पठ्ठ्या विष शोषून घेतल्यावर तसाच तिचा किस घ्यायला बघतो. लेका चूळ तरे भर! इथे बहुधा 'जहर है के प्यार है तेरा चुम्मा' हे गाणे काटले असावे.

तो समशेर आत्ता बिबट्याशी लढत होता ना? मग पुन्हा विलायतेवरून कसा आला? की फक्त ८-१५ दिवसांचा कोर्स करायला गेला होता. बरं राजपुत्र जर विलायतेला, तर महामंत्रीचा मुलगा किमान जवळच्या मोठ्या शहरात तरी पाठवावा? सुनील दत्त तलवाबाजी राकुकडे शिकतो. कोणाचा रे तू वगैरे चर्चा झाली नसेल ठीक आहे. पण सुनील दत्त ने राजवाड्यात कधी त्या फुटीर समद खान बद्दल ऐकले नाही? निदान अनावश्यक पल्लेदार उर्दूवरून तरी शंका यावी? समद खान ओळख वगैरे लपवून तेथे नसतो बहुधा.

या राजघराण्यात हायरार्की, प्रोटोकॉल वगैरेंचा पत्ता नसावा. कमल हासन त्या लष्करसिंगशी लढायची घोषणा करतो तेव्हा त्याला एकदम त्या खासे लोक बसलेल्या जागी कोणी येउ दिले? मात्र त्या डाकूला हरवल्यावर तेथूनच एक उलटा समरसॉल्ट मारून तो थेट रानीमाँ समोर येतो. तेव्हा तिच्या चेहर्‍यावर एकच विचार दिसतो - की भावा अशी उडी जर आधी मारून दाखवली असतीस, तर त्या तीन पैकी एक खुर्ची तुला डायरेक्ट दिली असती, डाकूबिकूच्या भानगडीत न पडता!

लहानपणी सुनीलला मारण्याचा प्रयत्न आणि सुलोचनाचा कॅच त्याच्या अंगाशी आला आहे.
>>
बरोबर कॅचेस विन द मॅचेस.

तो समशेर आत्ता बिबट्याशी लढत होता ना? मग पुन्हा विलायतेवरून कसा आला? की फक्त ८-१५ दिवसांचा कोर्स करायला गेला होता. बरं राजपुत्र जर विलायतेला,
>>
८० च्या दशकात कोणत्या तरी कारणास्तव फिल्म एडिटिन्ग फार खराब होते. यामुळे कुठलाही शुट कुठेही जोडला जात असे. ७० आणि ६० मध्ये पण इतके प्रोब्लेम्स जाणवत नसत पण ८० ज चे पिक्चर्स पाहताना ही त्रुटी सहज जाणवते.

र च्या क ने सुनिल दत्त शेवट पर्यंत बर्यापैकी फिट होता लोकसभेच्या सीटच्या साठी तो घरो घरी फिरायचा. पार्ल्याला आमच्याघरी पण आलेला.
पण ८० चे दशक असल्याने आणि कॅमेर्यातले सेल नेमके संपले असल्याने फोटो घेता आला नाही.
____________________________________________
आशालताचा भाऊ दाखवला आहे देवकुमार. तो असतो भिल्ल.

अरे मग आशालताच कबिल्यातली नाही वाटते. ती भिल्ल असेल तर तिचे कबिल्यात लग्न कसे होइल?
शेवटी प्राणला कळेल की तो स्वतःच कबिल्यातला नाही.

Pages