अगम्य !... (भाग १ )

Submitted by Sujaata Siddha on 11 September, 2020 - 07:30

अगम्य !... (भाग १ )

गडद अंधारातून हातात हात घालून ते दोघे चुपचाप चालत होते , आजूबाजूला कसलीच चाहूल नव्हती , अगदी रातकिड्यांची किरकिर पण नाही , फक्त त्या दोघांच्या दबक्या पावलांनी चालण्याचा आवाज येत होता , ,मध्येच तिच्या हातातले सोनेरी कंकण किणकिणले, त्याबरोबर तो एकदम सावध झाला , हळूच ते कंकण तिच्या मनगटावरून मागे घट्ट सारले, मग तिचा घामेजला तळवा आपल्या उत्तरियाने हळुवारपणे पुसुन पुन्हा हातात हात घेऊन तो पुढे चालू लागला . तिच्या घशाला कोरड पडली होती, त्याला सांगावं म्हणून तिने त्याच्याकडे पाहिलं ,पण ती निरव शांतता भंग करण्याचं तिला भय वाटलं ,मग ती मान खाली घालून चालत राहिली .तेवढ्यात अचानक तो थांबला , अंधारात त्याने आजूबाजूला नजर टाकली ,कानोसा घेत तो थोडा पुढे गेला , त्याचा अंदाज बरोबर होता ,पलीकडच्या बाजूला पाणी वाहत असल्याचा खळखळ आवाज येत होता ,तिला एका झाडाखाली बसवून , दुसऱ्या एका झाडाचं पान तोडून त्याने त्याचा द्रोण बनवला आणि हलक्या पावलानी तो झऱ्याकडे गेला आणि द्रोणात पाणी भरू लागला. काळोखातही दिसणाऱ्या त्याच्या छायाकृती कडे बघताना तिच्या मनात विचार आला , ‘ हे असं कायम त्याला न बोलता कळत असतं ,इतकं प्रेम का करतो तो आपल्यावर ?’ तिचं मन त्याच्या विषयीच्या प्रेमानं भरून आलं .
“ झोप लागली का तिला ?” कुणाच्या तरी कुजबुजण्याने ‘स्वरा’ ला जाग आली, क्षणभर आपण कुठे आहोत हे तिला कळलं नाही , आजूबाजूला मिट्ट काळोख दिसत होता , स्मरणशक्तीला जोर देऊन ती आठवायचा प्रयत्न करू लागली तितक्यात त्या काळोखात समोर खुर्चीवर बसलेली आपली जाडजूड मैत्रीण’ स्वानंदी ‘तिला पुसटशी दिसली आणि सगळं तिला एका सेकंदात आठवलं, ती एका मेडिटेशन सेंटरला एक जाहिरात वाचून आली होती , सेंटर चे संचालक होते ‘त्रिविक्रमजी पंडित’ , त्यांच्या म्ह्णणण्याप्रमाणे ते काही मंत्रांद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण करायचे ,‘साऊंड थेरेपी ‘ सारखाच एक प्रकार ज्यात मेंदूला काही मंत्रध्वनी एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी ने ऐकवायचे , त्याने मेंदूच्या पेशींमध्ये ज्या लहरी उत्पन्न होतात , त्यामुळे काही चेतना जागृत होऊन , आपण ,डिप्रेशन , निद्रानाश, ताणतणाव ,मानसिक विकार आदी त्रासातून मुक्त होतो, ट्रीटमेंट सुरू करण्याआधी ते एक डेमो द्यायचे , त्यात ते त्या तयार केलेल्या मंत्रांच्या मालिकांची एक झलक ऐकवायचे . स्वरा ला अशा गोष्टींबद्दल प्रचंड कुतूहल होत ,आणि हे थोतांड न मानता अभ्यास म्हणून ती याकडे बघायची , त्यामुळेच ती आत्ता डेमो घ्यायला आली होती, पण त्रिविक्रमजींनी डेमो चालू करताच ती एका वेगळ्याच जगात पोहोचली होती ,.. तीला जाग येतीये असं तिच्या हालचालीवरून दिसताच त्रिविक्रमजींनी मंत्र थांबवले , थोडयाच वेळात ती पूर्व स्थितीवर आली तसं त्यांनी विचारलं
“कसं वाटतंय ? “
“अं ? . , “
“ स्वरा कसं वाटतंय विचारलं मी तुम्हाला ”
“ हो..हो...छान वाटतंय..”
“गुड , सावकाश उठून बाहेर या “ तिला असं म्हणून ते स्वतः बाहेर निघून गेले .त्यांच्या मागून स्वरा आणि स्वानंदी बाहेर आल्या, त्रिविक्रमजी आता रिसेप्शन च्या खुर्चीवर बसले होते , “एका डेमोचे हजार रूपये घेतो मी , मात्र डेमो आवडला असेल तरच पैसे द्या आणि पुढे ट्रीटमेंट घेणार असाल तर तसं देखील सांगा “
“मी विचार करून सांगते.” पैसे देता देता स्वरा म्हणाली . मघाच्या त्या स्वप्न , दृष्टान्त किंवा जे काही होतं त्याच्या जाणीवेतून बाहेर येताना तीला फार प्रयास पडत होते .
“ठीक आहे , माझ्या असिस्टंटचा फोन तुम्हाला येईल एकदा फॉलो अप साठी , चालेल ना ?” आवाजात शक्य तितकी मार्दवता आणत त्रिविक्रमजींनी विचारलं .
“नाही , नको , तुमचं कार्ड आहेच माझ्यापाशी ,कंटिन्यू करायचं ठरवलं तर मीच फोन करेन “ ती पर्स मध्ये कार्ड ठेवत उत्तरली .
“OK ,thanks !.
“ अच्छा निघतो आम्ही !.. “निरोप घेऊन दोघीजणी बाहेर पडल्या ,
“कसं वाटलं स्वरा ? झोप लागली होती की काय तुला ? “
“ फ्रेश वाटलं खूप , पण .. पण झोप नव्हती लागली मला “
“ म्हणजे ? “
“म्हणजे मी ना ‘ ट्रान्स’ मध्ये गेले होते कि काय असं काहीतरी फील होत होतं, “
“ तेच ते , झोप काय ,ट्रान्स काय one & the same thing.. “
“ नाही , मंद आहेस का जरा ? खूप फरक आहे, ट्रान्स म्हणजे विचारशून्य अवस्था “
, “ बरं SSS जे काय असेल ते . घरी आईला सांगणार आहेस ह्या डेमोबद्दल ? “
‘काय माहिती ?’ अशा अर्थाने स्वरा ने खांदे उडवले , स्वानंदीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं ती स्वतःच्याच विचारात गुंग होती ..’स्वरा’ आणि ‘स्वानंदी’ दोघी बालमैत्रिणी , अगदी लॉरेल & हार्डी ची जोडी ,मिनी केजी पासून एकत्र शाळेत गेलेल्या , घर आलं तसं एकमेकींना बाय करून दोघी आपापल्या घरात शिरल्या .
आईला घरात बघून स्वराला आश्चर्य वाटलं , “ममा आज तू कशी काय घरी ? गेली नाहीस ऑफिसला ?
“ अगं नाही , तू सकाळी कॉलेजला गेल्यानंतर आजीला जरा चक्कर आली , मग म्हटलं नको जायला , घरात कोणी तरी हवं ना . ‘
“ ओह !. गोळी चुकलेली दिसतेय आज तिची , “
“हो , विसरलीच होती ती , दिली तिला , आता जेवण करून झोपलेय “
“ बरं वाटतंय ना तिला आता ? “… आलेच मी, ममा जेवायला वाढ ना गं खूप भूक लागलीये “ असं म्हणत स्वरा कपडे बदलायला आत निघून गेली . ती फ्रेश होऊन बाहेर येईपर्यँत आईने गॅस पेटवला , तवा गॅसवर ठेवला,पहिली पोळी झाली तरी स्वरा बाहेर आली नाही , थोडा वेळ वाट बघून आईने आवाज दिला , “स्वरा ,पोळी झालीये , लवकर ये जेवायला नाहीतर गार होईल “ पण काही उत्तर आलं नाही, म्हणून मग ती स्वतः:च स्वराच्या खोलीत गेली तर स्वरा चक्क झोपलेली दिसली .‘अशी कशी काही न बोलता झोपली ही ? ‘ स्वतः;शी पुटपुटत आई तिच्या जवळ गेली , कपाळाला हात लावून बघितला , कपाळ गार होतं ,आणि स्वरा गाढ झोपली होती .दमली असेल असं वाटून तिच्या अंगावर पातळ शॉल टाकून खिडक्यांचे पडदे ओढून, दार लोटून घेत आई बाहेर आली .

“आणखी हवं ? “ त्याने कुजबुजत्या आवाजात तिला विचारलं , तिने नाही या अर्थी मान हलवली ,मग तिच्या हातातला पाण्याचा द्रोण घेऊन त्याने ते पान सरळ केलं आणि बाजूच्या झाडीत टाकून दिलं , पुन्हा त्यांचा चालत प्रवास सुरू झाला .”आणखी थोडा वेळ असं चालावं लागेल आपल्याला ,चालवेल ना तुला चैत्या ? “तिने होकारार्थी मान हलवली. तिच्या समंजस पणावर खूष होऊन ,अतीव प्रेमाने आणि कौतुकाने त्याने तिला आपल्या कवेत घेतलं , तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवून एक हलकंसं चुंबन घेतलं आणि पुन्हा चालायला सुरुवात केली , त्याच्या या छोटयाशा कृतीने तिचा थकवा कुठल्या कुठे पळाला , नव्या जोमाने ती पुन्हा चालू लागली , हळूहळू पहाट होऊ लागली , रात्री भयाण वाटणारं ते जंगल पक्षांच्या किलबिलाटाने नव्याने उजळून निघालं , पहाटेच्या धुसर प्रकाशाने दोघांचेही चेहेरे उजळून निघत होते , दोघेही दिसावयास अत्यंत देखणे होते , अंगावरील वस्त्रप्रावरणांवरून ‘ती’ साध्या घराण्यातली वाटत होती, तर ‘तो’ बहुधा राजपरिवाराशी संबंधित असावा ,तिच्या हातात जी कंकणे होती ती त्यानेच घातली असावी कारण ते वगळता तिच्या अंगावर एकही दागिना दिसत नव्हता ,तितक्यात तो म्हणाला , “लवकरच आपण आमच्या मातुल गृही पोहोचू , मग आपल्याला भय नाही , माझे ज्येष्ठ बंधू तिथे आहेत , ते माझे गुरू हि आहेत त्यांनीच मला ज्ञान दिले आहे , समानता शिकवली आहे , आपल्या विवाहास ते आनंदाने मान्यता देतील “ ते ऐकून तिच्या चेहेऱ्यावर लज्जा दाटून आली ,
“ स्वरा..अगं उठ SSSSS कितीवेळची झोपलेयस? दुपारी इतका वेळ झोपल्यावर पुन्हा रात्री झोपणार नाहीस , उठ बरं..” आईचा आवाज ऐकून स्वरा उठून बसली , तोंड वैगेरे धुवून ती आत टेबलापाशी येऊन बसली आपल्याच विचारात गर्क होती ,आपल्याला झोप लागली होती की आपण पुन्हा ‘ ट्रान्स’ मध्ये गेलो होतो? आणि ती ‘ दोघ कोण असतील ?’आपल्याला का दिसतायत ? ‘
“ स्वरा चहा थंड होतोय बाळा . कसला विचार करतेयस एवढा ?आल्यापासून बघतेय मी ,”
“काही नाही ग आई , थोडं अभ्यासाचं टेन्शन आहे , या आठवड्यात फायनल थिसीस सबमिट करायचाय त्याचा विचार करतेय “
आईने लागलीच डोळे मोठे केले “ अगं ..मग अभ्यास करायचं सोडून झोपा कसल्या काढतेस ? कमाल आहे . “
“ आई रात्री जागरण करणार आहे मी , तुला काही प्रॉब्लेम ? आतापर्यंत माझ्या अभ्यासाकडे तुम्हाला कोणाला लक्ष द्यावं लागलाय का? “ स्वरा जरा उंच आवाजात बोलली.
“बरं बरं ...करा काय करायचं ते , पण चिडू नका लगेच बाई , कुणाला काही बोलायची सोय नाही इथं , ज्याला त्याला इगो .. “ आईची बडबड सुरू झाली तशी स्वरां आईजवळ गेली आणि तिच्या गळ्यात हात टाकले “सॉरी ममा , मला चिडायचं नव्हतं तुझ्यावर “ असं म्हणून आपल्या रूममध्ये अभ्यासाला निघून गेली .ती गेली त्या दिशेने आई बघत राहिली ,कारण हा तिचा मवाळ अवतार तिच्या आईला नवीन होता .
पुढे अभ्यास , सबमिशन या गडबडीत आठवडा निघून गेला , या कालावधीत मात्र तो ’ भद्रक’ आणि ‘चैत्या’ तिला दिसले नाहीत , ”वेट वेट ,तुला कसं कळलं त्याचं नाव ‘भद्रक’ आहे ? तू तर म्हणालीस, की ती ‘चैत्या ‘काही बोललेलीच नाही आत्तापर्यंत, मग त्याचं नाव कोणी सांगितलं तुला , ते दोघेच दिसतायत ना तुला ? “ स्वानंदीने शंका विचारली तशी स्वरा परत विचारात पडली , “हो खरंच की ..आपल्याला कोणी सांगितलं की त्याचं नाव ‘ भद्रक’ आहे म्हणून ? “

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sahi...