मी मोडलेली जगमान्य पुर्वापार रुढ असलेली रीत

Submitted by कविता१९७८ on 10 September, 2020 - 09:59

तशी लहानपणापासुनच मी खंबीर , घरात वडीलांच्या व्यसनामुळे आणि तापट स्वभावामुळे बालपण अगदी वाईट गेले. त्यात मी बंडखोर , धाडसी. पुढे शिकत गेले आणि माझ्यात आणि माझ्या कुटुंबात असलेली तफावत वाढतच गेली. मी एकटी एका टोकाला आणि आई— वडील , भाउ— बहीण असे चौघे दुसर्‍या टोकाला. त्यावेळी आमच्या समाजात कुणी जास्त शिक्षण घेत नसल्याने शिक्षणासाठी माझ्या घरातुन प्रचंड विरोध झाला. मारहाण झाली पण मी माझी जिद्द सोडली नाही. नोकरी करुन स्वत:च्या पैशाने डिस्टंस लर्निंग द्वारे बी.ए. पुर्ण केलं. त्यावेळी दर रविवारी बोईसर ते चर्चगेट जायचे क्लासेस साठी एस एन डी टी युनिव्हर्सिटी मधे आणि त्यावेळी लोकल नसल्याने एका वेळेचा प्रवास ३-३० तासांचा असे. नंतर एम बी ए केलं . सांगायचे कारण असे की मुळुमुळु रडत बसले असते तर आज मी स्वत:च्या पायावर उभी राहीले नसते. हळवेपणा हा आपला विकनेस होउ देउन आपण आपलंच नुकसान करतो. आपल्याला काय हवंय हे आपणच ठरवायला हवं. कुणी आपल्याला काही बोललं तर रडुन भेकुन गावगोंगाट करुन मी अबला नारी म्हणुन सहानुभुती गोळा करण्यात कसलाही मोठेपणा नाही. मन मोकळे जरुर करावे पण उगाच कुणावर भावनिकरीत्या अवलंबुन राहण्यात काही अर्थ नाही कारण आपली लढाई आपल्यालाच लढायची असते आणि सतत हळवेपणा दाखवुन आपले अबलत्व सिद्ध करण्यापेक्षा खंबीरपणे आणि प्रॅक्टीकली आलेल्या परीस्थितीला तोंड देणे जास्त महत्वाचे. बर्‍याचजणांचे मत असे की काहीजणींना नाही जमत , पण खंबीरपणे जगण्यासाठी टाकीचे घाव सोसायलाच हवेत का?

शिक्षणाबद्दल लिहायला गेले एक मालिका लिहुन होइल पण इथे शिक्षणाचा उल्लेख केलाय त्याचं कारण म्हणजे शिक्षणामुळेच मी माझ्या पायावर उभी राहीले , बाहेरच्या जगात वावरले , बर्‍याच गोष्टींबद्दल ज्ञान मिळाले. मुख्य माझ्या विचारातही आमुलाग्र बदल झाला. विनाकारण असलेल्या बर्‍याच जुन्या चालीरीती मी मोडीत काढल्या. फक्त मुलांचीच मक्तेदारी असलेली बरीच कामे मी नेटाने केली. यातली सर्वात जुनी आणि बर्‍याच धर्मात असलेली पुर्वीपासुन रुढ असलेली रीत म्हणजे माणुस मेल्यावर अंतिम संस्काराचा हक्क जो कुठल्याही परीस्थितीत पुरुषालाच मिळतो या रुढीला मी नुकतीच १५-१६ दिवसांपुर्वी तिलांजली दिली. वयाच्या १७ व्या वर्षापासुन कामाला सुरुवात करुन मी कुटुंबाला हातभार लावला. मधली बरीच वर्षे सतत व्यावसायिक आणि कौटुंबिक संघर्ष करण्यात गेली. मागच्या आठ वर्षांपासुन आई आणि वडीलांची आजारपणे सांभाळण्यात गेली. चार वर्षांपुर्वी वडीलांना दुर्धर अशा कॅन्सरने ग्रासले आणि आर्थिक आणि सेवा या दोन्हींमधे मी काही कसुर ठेवली नाही. भावाची आर्थिक स्थिती बेताची पण सेवा करण्याची बाजुही कधी त्याने सांभाळली नाही त्यावर त्याच्या बायकोची सारवासारव ही की मेल्यावर चितेला अग्नी तर तुमचा भाउच देणारे ना. हे ऐकुन मला खुप वाईट वाटले , मलगी जेव्हा आपल्या आईवडीलांची सेवा, त्यांचं औषधपाणी त्यांना मानसिक आधार देण्याचं आणि ज्या कर्तव्याची अपेक्षा मुलाकडुन असते ती सर्व कर्तव्ये बजावते तर तिला आई वडीलांच्या चितेला अग्नि देण्याचा हक्क का मिळु नये असे वाटायचे.

तर या २२ आॅगस्टला गणपतीच्या दिवशी माझे वडील गेले आणि ३-४ तासातच त्यांच्यावर अंत्यविधी करण्याचे ठरले. माझी खुप ईच्छा होती अंतिम संस्कार करण्याची पण कसं जमेल हे माहीत नव्हतं. आजकाल ज्यांना मुलगा नाही फक्त मुलीच आहेत त्या मुलींना अंतिम संस्काराचा अधिकार मिळतोय हळुहळु पण माझा भाउ असताना मला अग्नि द्यायला मिळणे कठीण वाटत होते. त्यात वडील गेल्याचे दु:ख म्हणजे एकाचवेळी हळवेपणा आणि खंबीरपणा याची सांगड घालत होते. घरातुन वडीलांचे शव बाहेर काढण्यासाठी पुरुषमंडळी आत आली तशी मी ही म्हणाले मी त्यांचा मुलगाच होते मीही तुमच्याबरोबर त्यांना बाहेर काढणार आणि आम्ही सर्वांनी मिळुन त्यांना अंगणात तिरडीवर ठेवले. तिथे बाकीचा कार्यक्रम उरकल्यावर प्रेत उचलायची वेळ आली तेव्हा सर्व पुरुषमंडळी तिरडीला खांदा द्यायला सज्ज झाली , मला बाजुला केले गेले आणि माझी घालमेल वाढली, तितक्यात माझी चुलत बहीण जीचा आम्हा सर्वांवर खुप दरारा आहे तिने सर्वांना थांबवलं आणि पहीला खांदा मला आणि भावाला द्यायला लावला. जी आॅब्जेक्शन घेईल असे वाटत होते तिनेच पुढाकार घेतला कारण तिलाही माझ्या कर्तव्याबद्दल अभिमान होता. माझ्या भावाने मला विचारलं तुला जमेल का? मी म्हंटलं का नाही? अत्यंत भावुक क्षण होता तो , मी जोरजोरात रडतही होते आणि तितकीच खंबीरही होते , अंगणातुन प्रेत रस्त्यावर आणलं तेव्हा सगळी पुरुष मंडळी अवाक! कारण मुलगी तिरडीला खांदा देतीये हे दृश्य आतापर्यंत तरी विरळाच आहे.

पुढे बाकीच्या मंडळींनी खांदा दिला तेव्हा माझ्या बहीणीनेही खांदा दिल्याचे पाहुन समाधान वाटले. आणि मी माझ्या चूलत भावाला जो अतिशय समंजस आहे त्याला सांगुन टाकले की मी ही स्मशानभुमीत येणार. त्याला काय बोलावे हे सुचलेच नाही. ५ मिनिटांवर अॅम्ब्युलन्स उभी होती तिथे गेल्यावर सर्व बायका मागे फीरल्या पण मी स्मशानभुमीवर जाण्याच्या मतावर ठाम होते , माझं पाहुन माझी बहीणही माझ्याबरोबर यायला तयार झाली आणि तिने सर्व बायकांना सांगितले की आम्ही जाणार, कविता जाईल तर मीही तिच्या बरोबर जाणार, माझ्या चुलत बहीणीच्या नवर्‍याने आक्षेप घेतला. मला अॅम्ब्युलन्स मधुन खाली उतरवायचा हट्ट धरला पण माझ्या चुलत बहीणीने आणि चुलत भावाने आमची बाजु उचलुन धरली. स्मशानभुमीवर पोहोचलो आणी सख्ख्या भावाने एका बाजुला लांब उभे राहायला सांगितले त्याला ही मी नकार दिला , आम्हीही चितेजवळ येउच शकतो असे उत्तर मी त्याला दिले. नंतर शवावरचं सामान काढण्याचे काम आणि शवाला उचलुन चितेवर ठेवण्याचे कामही मी इतर भावांच्या बरोबरीने केले. मग माझ्या काकांनी मला आणि बहीणीला बाजुला उभं राहायला सांगितलं पणे तितक्यात माझ्या आत्येभावाने शवाला तुप चोळण्यासाठी मला सांगितले. अत्यंत हळवा क्षण होता माझ्यासाठी पण तितक्याच खंबीरतेने मी ते काम पार पाडलं , भावाच्या जोडीला चितेवर ठेवलेल्या शवावर शेवटची लाकडे ठेवली. आता वेळ आली होती मुखाग्नीची. आता मात्र भाउ मुखाग्निसाठी चितेजवळ उभा झाला आणि तितक्यात माझ्या मोठ्या काकांनी मला सांगितलं की तुला भावावर मुखाग्नि द्यायचाय का ये मग आणि मी लगेचच धावले माझ्या बरोबर बहीणही आली आणि आम्ही तिघांनी चितेला ५ प्रदक्षिणा घालुन मुखाग्नि दिला. देताना शेवटची जोरात हाक मारायची होती वडीलांना. अत्यंत भावुक आणि हळवा क्षण पण खंबीरपणे निभावला.

हळवं असणं वाईट नाही पण तो आपला कमकुवतपणा नसायला पाहीजे. मी खंबीर नसते तर माझी इच्छा ही मनातल्या मनातच राहीली असती आणि मरेपर्यंत तो सल कायम राहीला असता. योग्य वेळी योग्य निर्णय आणि योग्य कृती करणे हे महत्वाचे असते. माझ्या बहीणीचेही मला कौतुक वाटले कारण तिचे शिक्षण जास्त नाही पण तिनेही आईवडीलांची सेवा केली आणि जुनी रीत मोडीस काढुन अंतिम संस्कार केले . तिच्या नवर्‍याने किंवा सासुने अक्षेप घेतला नाही उलट त्यांना आमच्याबद्दल गर्वच वाटला आणि मुलगा असताना ही मुलगा आणि दोन मुली असे तिघांनी एकत्र अग्नि देणे हे कित्येक समाजात पहीलेच उदाहरण ठरले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरंच कौतुक. इथे माबोवर स्त्री सबलीकरणावर खूप चर्चा आणि वादविवाद वाचले आहेत. असे काहीतरी पहिल्यांदाच वाचायला मिळाले. तुमच्या वडिलांना श्रद्धांजली.

माझ्या आईने माझ्या मावशीचे दिवस केले होते पुण्यात ओंकारेश्वर घाटावर 10 वर्षांपूर्वी ते आठवले. सगळे पुरुषच तिथे. मोघे की घैसास असे गुरुजी होते ते म्हणाले तुम्हाला करायचं आहे ना मग काही किंतु न आणता करा, पुरुषांनीच केले पाहिजे असे काही नाही.

लंपन

खरं म्हणजे कूठल्याही गूरुजींना आक्षेप नसतो हो आक्षेप घेणारा फक्त आपला समाज असतो आणि ज्याला आपणच अनन्य साधारण महत्व देतो

KP, big hug and condolences for ur loss.

तुझं आणि कुटुंबाचं कौतुक आणि इथे शेअर केल्याबद्दल आभार.

आक्षेप घेणारे गुरुजी मला माहित आहेत. आम्ही त्यांना बोलावणं बंद केलं.

आई तिच्या आईचं श्राद्ध आणि इतर गोष्टी करते म्हणून अनेकांनी अनेक बोल लावलेत. आम्ही ठामपणे अशांना जे सूनवायचं ते सुनावलं.

केपी, वडिलांना श्रद्धांजली. फार खंबीर आहेस तू . फार चांगलं केलंय वहिवाट मोडलीस ते.

रिया ,लोकांचं मी मनावरच घेत नाही, माझे वडील ऐन गणपतीच्या दिवशी २२ तारखेला दुपारी गेले आणि कुटुंबातील सर्व लोकांना सुतक लागलं तर जे लांबचे पण एका कुटुंबातील लोक होते त्या सर्वांना गणपती विसर्जित करावे लागले. हे लोक तिसर्‍या दिवशी सांत्वनासाठी बसायला आले आणि आम्हाला सुनावुन गेले की गणपतीचाच दिवस दिसला का त्यांना विसर्जनाच्या दिवशी गेले असते सर्वांची गणपतीची मजा घालवली. हे ऐकुन आम्ही दुर्लक्ष केलं कारण ज्या लोकांना हेच समजत नाही की मरण आणि वेळ आपल्या हातात नसते त्यांना समजवायचं तरी काय?

>>>>काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा पंकजानी अंतिम संस्कार केले होते. सुषमा स्वराज गेल्या तेव्हा त्यांचेही अंतिम विधी त्यांच्या कन्येने केले होते. या दोन्हीचं लाईव्ह टेलिकास्ट झालं होतं, तरीही आपल्याकडे अजून या गोष्टीला लोक सहज स्वीकारत नाहीत.>>>> वा! हे माहीत नव्हते.

कविता, तुमचे खूप खूप कौतुक. तुम्ही जे धाडस दाखवलेत, त्याबद्दलही आणि हा अनुभव सर्वांबरोबर share केलात, याबद्दलही. स्वतः ची पाठ थोपटून घेण्याची हौस आहे असेही काही लोकं बोलणारे असतात. पण मुळात काहीतरी चांगले आणि वेगळ्या वाटेवरचे अनुभव लोकांसमोर आणण्याचा उद्देश हाच असतो, की त्यातून इतरांनांही प्रेरणा मिळेल, नवा मार्ग निवडण्यासाठी धाडस मिळेल. अतिशय सरळ साध्या शब्दांत तुम्ही हे सर्व लिहिले आहे, ते direct मनाला भिडते.तुमच्या भावना समजून घेऊन तुम्हाला साथ देणाऱ्या नातेवाईकांचेही खूप कौतुक ! ईश्वर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो !

धन्यावाद नादिशा

<<<स्वतः ची पाठ थोपटून घेण्याची हौस आहे असेही काही लोकं बोलणारे असतात. >>>

प्रत्येकाची आपापली मते असतात. मला त्यातुन हवं ते घेते मी आणि बाकीचं सोडुन देते

कविता तुमच्या धैर्याला सलाम.. एकंदरच तुमची शिकण्याची जिद्द अन इतर गुणांचे कौतुक वाटले. शिरडीला तुम्हीच चालत गेला होतात ना? लेखमाला वाचल्यासारखे आठवते.
असेच खंबीर रहा.. तुमच्या दु:खात मी सहभागी आहे.

छान हिम्मत दाखवलीत,
बिकट वाट वहिवाट करायला सुरु केल्याबद्दल अभिनंदन
तुमच्या दु:खात सहभागी आहे.

सर्वांचे धन्यवाद,

अनघा,

होय मीच शिर्डीला चालत जाते , मला खुप आनंद होतोय की मागची ३-४ वर्षे मी ईथे अॅक्टीव्ह नसुनही तुम्हा सर्वांनाही मी आठवतीये Happy

शाब्बास कविता. वेळ पडल्यास असेच खंबीर रहा. शुभेच्छा.
तुमच्या पिताजींना धन्य वाटल असेल. त्यांना श्रद्धांजली.

छान कविता! माझ्या आई-वडिलांचेंसर्व विधी मी व माझ्या बहिणीने केलेले सुमारे १७ आणि १२ वर्शापूर्वी.. त्याची आठवण आली!
तुमच्या खंबीरपणाचे कौतुक!

तुम्ही खंबिर आहातच पण अशा वेळी आपल्या विचारांशी तडजोड करायची शक्यता फार असते. ते न करता तुम्हाला निभावता आले त्याबद्द्ल अभिनंदन. तुम्हाला सावरायचे बळ मिळो.
जिज्ञासाची क्लोजरच्या पोस्टलाही +१

दुःखद प्रसंगातही खंबीरपणे उभी राहिल्याबद्दल कौतुक आहे तुझे व कुटुंबातील सर्वांचे.
काकांना श्रद्धांजली _//\\_
>>साईबाबांवरच्या तुझ्या श्रद्धेने तुला खंबीर होण्याचे बळ दिले आहे. हिच श्रद्धा आणि तुझे मेडीटेशन, रेकी तुला यापुढेही उर्जा देतील.>>> +१०००००

कविता, तुमचे मिपावरचे लिखाण वाचले आहे. तुम्ही जिद्दीने पहिली शिरडी पदयात्रा केली त्याचे वर्णन खूप आवडले होते. तुमच्या निर्धाराचे कौतुक वाटले होते. काही बाबतीत पोषक सामाजिक वातावरण नसतानाही दृढ निश्चयाने तुम्ही आयुष्याची वाटचाल चालू ठेवलीत आणि यशस्वी झालात. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
पितृ निधनाच्या दु:खात सहभागी.

कविता अ बिग हग. तुझ्या वडिलांना श्रध्दांजली. तुझ्या मनासारखे करता आले ह्यातच समाधान.

अमितव+1
पुढील आयुष्यला शुभेच्छा

वडीलांचे कार्य करता आले याबद्दल बरे वाटले. मन खंबीर असल्याखेरीज अशा नवीन रुढी निर्माण करता येत नाहीत. Happy
डोक्यावरुन छत्र गेल्यावर कळते आपण काय गमावले ते !

लेख वाचला तेव्हा प्रतिक्रिया देता आली नाही कारण माझ्या वडीलांचा मॄत्यू आठवला आणि रडायला आले.
अशाच खंबीर रहा!

Pages