हाती विसावला प्राजक्त..

Submitted by तो मी नव्हेच on 8 September, 2020 - 22:16

एका रम्य, नितांतसुंदर संध्याकाळी
प्राजक्ताचं एक फूल अगदी अलगद
माझ्या हाती येऊन विसावले
मी हसलो त्याच्याकडे बघत,
त्याच्या परिमळ अंगांगात भिनला जणू
तेही टपोरे हसत होते हे पाहून
पण, त्या फूलावरचे अवेळचे दव
अस्वस्थ करीत होते मला सतत
आपले जन्मदाते झाड सुटल्याचे दुःख
सलत होते बहुदा त्याला कुठेतरी
त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात
मग मी ही त्याला ठेवले झाडाच्या पानावर
त्याचे टपोरेपण खुलूनच दिसले
त्या हिरव्याकंच पानांवरती
खुशीत होते ते, झुललेही झुला
वाऱ्यावर स्वार, अपेक्षांच्या ओझ्याशिवाय
जणू त्याचे बालपणंच जगत होते पुन्हा
थोड्या वेळाने आले ते पुन्हा खाली
विसावले हातावर माझ्या, गुरुत्वाकर्षणाने
त्याच्या परिमळाने मला आनंद द्यायला....
त्या फुलाने जणू स्त्री जन्म घेतला होता

-रोहन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users