भिकेचे डोहाळे

Submitted by भानुप्रिया on 7 September, 2020 - 10:42

कसे लागत असतील रे
भिकेचे डोहाळे?
म्हणजे जे जे अमूल्य असेल आपल्याकडे,
ते ते शोधायचं...नीट पारखून घ्यायचं.
मग जमिनीचा एक अत्यंत घाणेरडा तुकडा शोधायचा,
त्यात एखाद्या बोथट, गांजलेल्या धातूच्या तुकड्यानं
हाताला खोलवर, ठसठसणाऱ्या कुरूप जखमा होईपर्यंत
खणत राहायचं.
आपण अमूल्य जे काही गोळा केलंय,
आयुष्यातलं,
ते सगळं, एका गलिच्छ कापडात
तितकीच घाणेरडी पुरचुंडी करून
त्या खड्ड्यात पुरायचं
अन् वरून आपल्याच हातांनी
त्यावरच्या ठसठसणाऱ्या जखमांसकट
माती एक सारखी करायची.
त्याला आपल्या रक्ताचं
शिंपण करायचं.
इतकं करून झालं,
की आपल्या, आता पोकळ झालेल्या मनात
आणि पर्यायानं आयुष्यात
निमूटपणे परतायचं.
थोडा अवधी गेला की ते रितेपण खायला उठणार हे नक्की
अन् ते तसं झालं की नव्यानं वणवण सुरू करायची
'जपून ठेवावं असं काही सापडतं का' हे बघायला…
असाच काहीसा असेल का,
भिकेच्या डोहाळ्यांचा प्रवास?

Group content visibility: 
Use group defaults