प्रिय तू- १

Submitted by मुग्धमोहिनी on 6 September, 2020 - 12:10

प्रिय तू ,

कसा आहेस ? ठीक आहेस ना? तू मला तुझ्या आयुष्यातून वजा करून दोन दशकांहुन आधिक काळ लोटला. पण मला अजुनही तुला विसरता आले नाही, येत नाही. कसं विसरू शकणार! पहिल्या प्रेमाची अलवार अनुभूती तुच दिलीस ना मला.

आपली पहिली भेट, आपला सहवास, तुझी सुंदर अक्षरात भरभरून लिहीलेली प्रेमपत्रं सगळं सगळं आठवतयं मला.
तू आवडायला लागल्यावर हळुच कोणाला ऐकू जाणार नाही अशा आवाजात मी गुणगुणलेली “चुरा लिया है तुमने जो दिलको” ही ओळ आणि तुझं माझ्याकडे चमकून बघणे....

एके दिवशी मंत्रमुग्ध झाल्यासारखं एकामेकांकडे बघत बसणं आणि त्यातच कधीतरी पुढचं आयुष्य एकामेकांबरोबर काढण्याच्या आणाभाका घेणे... त्यावेळची पावसाळी प्रसन्न सकाळ मला अजून आठवतेय.

आमच्या घरच्या गच्चीवर आपण अगदी जवळ जवळ उभे होतो. त्यावेळी एकामेकांना बिलगण्याची झालेली तीव्र इच्छा आणि प्रयत्नपूर्वक ठेवलेला संयम...

आपलं एकत्र प्रोजेक्ट ,assignments करणं, आपल्या मित्राचे वडिल गेले तेव्हा त्याला, त्याच्या आईला आधार देणं, खूप जणांनी आपल्याबरोबर share केलेल्या त्यांच्या अडचणी आणि आपल्याला दिलेले blessings, एकत्र फिरणं, गप्पा मारणं, हॅाटेलिंग...

तुझा समजुतदारपणा, उमदा,प्रेमळ स्वभाव, आपली एकामेकांवरच्या प्रेमामुळे आयुष्यात काहीतरी करून दाखवायची आलेली जिद्द, किती गोष्टी केल्या आपण त्या काळात , काही एकत्र, काही वेगळ्या...

त्यावेळी तू मला ‘इतक्यात घरी सांगायला नको’ असं म्हणत होतास. पण, नाही , मी तुझे ऐकले नाही, मी घरी सर्वकाही लगेचच्या लगेच सांगत होते. माझ्या घरी तू आवडलाही होतास. छान चालू होतं सगळं; आपला अभ्यास, आपल्या बाकीच्या activities n आपलं प्रेमही फुलत होतं या काळात. मग मी तुझ्यामागे घरी सांग म्हणून लकडा लावायला सुरूवात केली. आपण त्यावेळी विद्यार्थी होतो. तुला स्वत:ला सिध्द करून मग घरी सांगायचे होते. पण माझ्या हट्टामुळे तुला आधीच घरी सांगावे लागले.

आणि तुझ्या अपेक्षेप्रमाणे तुझ्या वडिलांचा का दोघांचाही(?) नकार आला . आणि अचानक माझ्या आयुष्यातून तू निघूनच गेलास , कोणतेही कारण न देता...

मला नव्हे आम्हा सर्वांनाच यातून सावरायला वेळ लागला, त्रास झाला. अर्थात तुलाही वाईट वाटलं असणारचं.तुझ्याबद्द्ल तेव्हाही मनात राग नव्हता आणि आजही नाही. आहे फक्त प्रेम, काळजी आणि कृतज्ञता...

क्रमश:

https://www.maayboli.com/node/76575

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users