लेखनस्पर्धा -- माझा अनुभव -- कोविड-१९ लॉकडाऊन -- अतरंगी

Submitted by अतरंगी on 4 September, 2020 - 08:02

३० डिसेंबर २०१९:-

सालाबाद प्रमाणे कतारच्या क्लायेंटचा ईमेल आला,  फेब्रुवारीमध्ये २५ ते ३० दिवसाचे shutdown  होते. दरवर्षी फेब्रुवारी मध्ये २० ते २५ दिवस, एप्रिलमध्ये ८ ते १० दिवस आणि ऑक्टोबर मध्ये १५ ते २० दिवस असे काम त्यांच्याकडे असतेच. मी गेले काही वर्षे पूर्णवेळ जॉब सोडून स्वतः:चा व्यवसाय सुरु केला आहे, व्यवसायाची सुरुवातच असल्याने, अजून म्हणावे तसे उत्पन्न नाही.  त्यात अधे मध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा अशा  शॉर्ट टर्म assignment, consulting करून जमा खर्चाचा ताळमेळ घालावा लागतो. त्यामुळे हातात काम नसल्यास अशा संधी सोडणे परवडत नाही. त्या कालावधी मध्ये दुसरे काही काम हातात नसल्याने होकार कळवला.

८ फेब्रुवारी २०२०:-
क्लाएंटकडून तिकीट आणि व्हिसा आला. तो पर्यंत करोना विषयक बातम्या यायला लागल्या होत्या. पण भारतात आणि कतार मध्ये अजिबातच चिंता करण्यासारखी परिस्थिती नव्हती. शिवाय एकदा होकार कळवून जर ऐन वेळी येणार नाही असे कळवले तर क्लाएंटच्या कामाचा खोळंबा होतो आणि आपल्याला परत कधी तिथे काम मिळायची शक्यता नसते. त्यामुळे आता या क्षणी निर्णय बदलणे शक्य नव्हतेच.

१६  फेब्रुवारी २०२०:-
 कतारला पोचलो. एक दोन दिवसातच काम चालू झाले. एकदा काम चालू झाले की १२ तास काम, येणे जाणे, जेवण वगैरे मध्ये इतका वेळ जातो कि मोबाईल, सोशल मीडिया यासाठी फारतर फार दिवसभरात १५ ते २० मिनिटे मिळतात त्यामुळे जे सहकाऱयांसोबत वगैरे बोलणे होईल त्यातून थोडे फार कळत होते. पण अजूनही करोनाची झळ अशी बसली नव्हती  कारण महाराष्ट्रात, कतारमध्ये कुठेच काही केसेस नव्हत्या. इटली , इराण, केरळ वगैरे मध्ये चालू होते. लवकरच लस वगैरे सापडेल आणि साथ आटोक्यात येईल असे वाटत होते. त्यामुळे मी अगदीच निवांत होतो.

२९ फेब्रुवारी २०२०:-
कतार मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला. कतारने तातडीने पावले उचलत एक पूर्ण हॉटेल आरक्षित करून, जे बाहेरून येत आहेत, त्यांना तिथे राहण्याची सोय उपलब्ध करून दिली.

९ मार्च २०२०:- पुण्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडला. कतार मध्ये रुग्णांची संख्या दोन आकडी झाली. आता मात्र संकट दारात आले. कंपनीने मास्क, सोशल डिस्टंसिन्ग, बाकी घ्यावयाची काळजी याविषयी सूचना मार्गदर्शक तत्वे पाठवायला सुरुवात केली. मी जमेल तेव्हा घरी फोन करणे, त्यांना थोड्याफार सूचना देणे चालू केले. इथून मात्र पुढचे कित्येक दिवस दिवसागणिक वाईट बातम्यांशिवाय माझ्याकडे काहीच आले नाही.

भारताने १९ मार्चला २२ मार्च पासून एक आठवडा विमानसेवा बंद करण्याची घोषणा केली. माझे काम संपत आलेच होते. २५ ते २६ तारखेला काम संपणारच होते. ठरवले तर क्लाएंटला सांगून या दोन दिवसात घरी जाणे शक्य होते. काय करावे नक्की कळत नव्हते. या दिवशी मी सगळ्यात मोठी चूक केली.
आता तीनच दिवस विमाने चालू म्हणल्यावर सगळेच जण भारतात परतायला बघणार आणि विमानतळे, इमिग्रेशन सगळीकडे नुसता झुंबड उडणार, हा आजार होण्याचे चान्सेस कैक पटीने वाढणार, या विचाराने मी फारच द्विधा मनस्थितीत होतो. काय करावे, न करावे या विचारात मी भयानक चुकीचा निर्णय घेतला कि २८ मार्च ला फ्लाईट चालू होतील तेव्हा आपण ३० किंवा ३१ तारखेला जाऊ.

घरी दोन मेडिकल हिस्टरी असलेले सिनिअर सिटिझन्स, दोन लहान मुले. मी जर आजार घेऊन घरी परतलो किंवा देव न करो मलाच काही झालं तर या सर्वांकडे  कोण बघणार या विचाराने मी जरा जास्तच काळजी करत होतो, घेत होतो.

२६ मार्चला अचानक भारतातील विमानतळं आता २८ मार्च ला ना उघडता  १४ एप्रिल पर्यंत बंद राहतील अशी घोषणा झाली आणि माझ्या एप्रिल पहिल्या आठवड्यात भारतात परतण्याच्या नियोजनाला सुरुंग लागला. सरकराने घेतलेला हा निर्णय आणि त्यापुढे वाढवत वाढवत नेलेली बंदी आम्हाला फारच महागात पडली.

दरम्यान तिकडे पुण्यात संचारबंदी घोषित झाली आणि पत्नी समोर कामाचा डोंगर उभा राहिला. घरकामाला येणाऱ्या दोन्ही बायका येऊ शकत नव्हत्या. सिनिअर सिटिझन्सची पथ्य, त्यांच्या हॉस्पिटल वाऱ्या, घरात बांधून पडल्यामुळे  त्यांची होणारी चिडचिड, मुलांचं खाणं, छोट्याला भरवणं, घरकाम यात तिचे अतोनात हाल व्हायला सुरुवात झाली. नाही म्हणायला वडील तिला जमेल तशी मदत करत होते पण त्याने तिचा भार फार काही हलका होत नव्हता. त्यात मुलं दिवसभर घरात, बाहेर खेळायला जाता येत नाही, काही करता येत नाही म्हणून तिचं अजूनच डोकं खात. दोघांचा स्क्रीन टाइम भयानक रित्या वाढला. मी फक्त अधे मध्ये फोन वर बोलणं यापेक्षा जास्त काही करू शकत नव्हतो. मोठ्या मुला सोबत फोन वरून काही ब्रेन गेम्स खेळाव्या म्हणलं तर तो इंटरेस्टेड नसायचा.

याच दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कतार मध्ये असलेल्या एका मित्राचे वडील वारले. आधीच हातात काम नाही आणि त्यात हा आघात. लॉक  डाऊन मुळे भारतात घरी पण जाता येत नाही, काम नाही, हातात फार पैसे नाही.... त्याच्या मनस्थितीची तर कल्पना पण करता येत  नव्हती. कतार मध्ये बाहेर पडण्यावर निर्बंध असल्याने भेटायला पण अगदी उभ्या उभ्या जाऊन आलो. सांत्वन तरी काय करणार कसे करणार. सगळेच अतिशय उदास झाले होते.

साधारण ५ एप्रिलला आमचे काम पूर्णपणे संपले. आमच्या राहण्याखाण्याचा खर्च आता आमच्या खिशातून जायला लागला. केंद्र आणि राज्य सरकार धडाधड लॉक डाऊन वाढवत चालले होते. आम्ही आमच्या परीने राज्य आणि केंद्र सरकार यांना संपर्क करून परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत येण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी या साठी प्रयत्न करत होतो. बाकी आमच्या हातात करण्यासारखे फार काही नव्हतेच.

आपण कायम आपण काय करू शकतो यावर लक्ष द्यावे हे आजवरच्या अनुभवाने शिकवले आहेच. आता हातात पूर्ण रिकामे २४ तास होते. काही काम नाही, जबाबदारी नाही. भरपूर रिकामा वेळ होता. सर्वात आधी स्टॉक मार्केट वर भरपूर लक्ष केंद्रित केले. आधी ट्रेडिंग करताना स्वतःच्या चुका, ट्रेंड सेट अप मध्ये काय काय बदल करता येतील याची यादी साधारणपणे डोक्यात होती. ते सर्व लिहून काढणे, मग त्यातल्या ट्रायल एरर, या सर्वांच्या व्यवस्थित नोंदी करणे, मग त्यात झालेल्या चुका परत शोधून त्यावर काम करणे चालू केले. यात दिवसभरातील भरपूर वेळ जायला लागला. रोज संध्याकाळी चालायला जाणे चालूच होते. त्याला पण १०००० स्टेप्स अ डे  या बंधनात बांधून टाकले. कधी कधी तर रोजच्या १५०००, १८००० स्टेप्स होऊन जायच्या. काही ना काही करून मन आणि मेंदू व्यग्र ठेवायचा प्रयत्न करत होतो. ते न केल्यास काय होऊ शकते हे आजूबाजूच्या भकास, वैतागलेल्या चेहऱ्याच्या आणि तासंतास  नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमवर काहीही बघत बसणाऱ्या सहकाऱ्यांकडे बघून कळत होते.    

याच दरम्यान मी मागे अंध मुलांसाठी लेखनिक म्हणून जायचो तिथे परिचय झालेल्या एकीने whatsapp वर " After this lockdown if you didn't improve your health, knowledge, hobbies,please understand that   you never lacked time, you lacked discipline" असे काहीसे स्टेटस ठेवले होते. ते अगदी मनापासून पटले. स्टॉक मार्केट वर, १०००० स्टेप्स अ डे लक्ष केंद्रित केलेच होते, त्यात कित्येक दिवस राहून गेलेली  उर्दू शिकायची इच्छा पूर्ण करायला घेतली. रोज एक अक्षर घायचो आणि गिरवत बसायचो. त्यातच मध्ये काही सहकार्यांनी युट्युब वर दीक्षित डाएटचे व्हिडीओ पाहून ते करायला सुरुवात केली. मला पण ते कधी तरी करून पाहायची इच्छा होतीच. हि चांगली संधी होती. तसेही रोज तिन्ही त्रिकाळ हॉटेल वरचे मसालेदार जेवण घ्यावे लागत होते. ते सुद्धा तब्येतीला हानिकारकच होते. मग त्यातला ब्रेकफास्ट करणे बंद केले. रात्री ८ ला जेवण झाले कि सरळ दुसर्या दिवशी दुपारी एक वाजता जेवायचो.

या सर्व activities मध्ये आणि जे काही थोडे फार जवळचे सहकारी होते त्यांच्या सोबत दिवस जात होते. घरी बायकोचे होणारे हाल आठवले कि मात्र फार वाईट वाटायचे, सगळ्या परिस्थितीवर चिडचिड व्हायची.  माझे तसे बरे चालले होते. शिवाय ज्या मित्राचे वडील गेले किंवा कतारमध्ये/ भारतात जॉब गेलेल्या मजुरांचे होणारे हाल, किस्से कानी येत होते, त्यांचे हाल  इमॅजिन केले तर आपण त्या मानाने फार सुखात आहोत याची जाणीव कायम होती.

असाच एक महिना गेल्यावर साधारण ५ मे ला सरकारने पहिली खुशखबर दिली, परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी  "वंदे भारत मिशन" सुरु करण्याची . आम्ही सर्वांनी  उत्साहाने भारतीय दूतावासाने दिलेलं फॉर्म भरले, आणि रोज आता कधी पुढची बातमी येतेय याची वाट बघत बसलो. आता कुठे घरी परतायची आशा जरा निर्माण झाली. पण त्या आशेनेच खूप अपेक्षाभंग केला. एका मागे एक शेड्युल येत होते, पण कतारमधून आणि गल्फमधून महाराष्ट्रात जायला विमानेच नव्हती. आम्ही दरवेळेस शेड्युल आले कि मोठ्या आशेने त्यात मुंबईचे नाव शोधायचो, पण निराशा सोडून कधीच काही मिळाले नाही. केरळला जाणाऱ्या विमानांमध्ये एक दोन सहकारयांचा नंबर लागला. पण आम्ही बाकी सगळे तिथेच..... त्यातच मध्ये एका ट्रॅव्हल एजन्टने फेसबुकवर पोस्ट टाकली कि तो मुंबईसाठी चार्टर्ड फ्लाईट arrange करत आहे. आम्ही सर्वानी तो हि प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून त्याला नावे दिली. त्याने सांगितलेली अव्वाच्या सव्वा रक्कम द्यायलाही तयार झालो. पण त्याचेही पुढे काही झाले नाही.

२५ मे  २०२०:-ईद.

एरवी सगळ्याच आखाती देशात ईदची धामधूम असते पण यावेळेस सगळे मॉल बंद, रस्त्यावर तुरळक रहदारी, महत्वाची सोडून बाकी सर्व दुकाने बंद. ज्या मित्राचे वडील वारले तो मुस्लिम. ईदच्या निमित्ताने त्याला वापरात भेटावे, त्याला जरा बरे वाटेल म्हणून मी आणि अजून एक मित्र स्वीट्स घेऊन  त्याला भेटायला गेलो. तो त्याच्या तीन  मित्रांसोबत फ्लॅट घेऊन राहात होता. त्यांचा अजून एक मित्र आला होता. तो छान बिर्याणी बनवायचा म्हणून मग मस्त बिर्याणीचा मेनू होता. दोन तीन तास तिथे थांबलो, सुंदर झालेल्या बिर्याणीवर आडवा हात मारला आणि घरी परतलो.
तीन दिवसांनी त्या मित्राचा फोन आला, त्याला ताप आल्याचा. जो बिर्याणी बनवणारा त्यांचा मित्र होता त्याला करोनाचे निदान झाले. आता मात्र माझी तंतरली. मी पण तिथेच होतो, त्या सर्वांसोबत त्याने बनवलेले जेवलो. मलापण लागण झाल्याची शक्यता  होतीच. मी आता बाकी सहकाऱ्यांपासुन लांब राहायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत फिरणे पण थांबवले. चुकून मला लागण झाली असेलच तर अजून कोणाला नको व्ह्यायला.
माझ्या मित्राने आधी स्वतःला एका रूम मध्ये कोंडून घेऊन दोन दिवस तापाचे औषध घेतले. ताप कमी झाल्यावर जरा निवांत झाला. तीन दिवसांनी त्याला परत ताप आला.मग मात्र तो तातडीने करोना टेस्ट करायला गेला. त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. इकडे माझ्या डोक्यावर टांगती तलवारच होती. ३ जून नंतर सुद्धा मला कोणतेही लक्षण दिसत नसल्याने मी जरा निर्धास्त झालो. अगदी थोडक्यात वाचलो.मित्राला कतार मध्ये चांगली ट्रीटमेंट मिळाली दोन आठवड्यात ठणठणीत होऊन रूम वर परत आला.

८ जून २०२०:-

गेली कित्येक दिवस ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस अखेर उजाडला. १५ जूनला वंदे भारत मिशन अंतर्गत दोहा मुंबई फ्लाईट होती आणि त्यात माझा नंबर वेटिंग लिस्ट मध्ये असल्याचा ईमेल आला. माझ्या एका सहकाऱ्याला कन्फर्म असल्याचा ईमेल आला.  आम्ही महाराष्ट्रातले ६ जण होतो. बाकी अजून जे ४ जण होते त्यांना काहीच ईमेल आला नाही.  ज्या मित्राला करोना झाला होता त्यालाही कन्फर्म असल्याचा ईमेल आला होता. पण आता त्याला प्रवास करणे शक्य नव्हते. इतके दिवस घरी जायची वाट बघत असताना, नेमकी जायची सुवर्णसंधी आलेली असताना त्याला घरी परत येता येणार नव्हतं.
दुसऱ्या  दिवशी तिकीट कन्फर्म झाले कि नाही कळणार होते. कित्येक जण इतके दिवस भारतात परतायची वाट पाहात असल्याने नंबर लागेल  कि नाही याची शाश्वती नव्हती. दुसऱ्या दिवशी ठरवून दिलेल्या वेळेत त्यांनी  सांगितलेल्या ठिकाणी पोचलो. तीन तास वाट पाहिल्यावर माझे तिकीट कन्फर्म झाले आणि मी पहिला निःश्वास सोडला. १५ जूनचे तिकीट मिळाले.
अक्षरशः दोन ते अडीच महिने ज्या दिवसाची वाट बघत होतो तो शेवटी जवळ आला होता. पण आधी काही वंदे भारताच्या फ्लाईट पण अगदी  रद्द झाल्या मुळे जरा धाकधूक होतीच.

माझे तिकीट आल्याने पण बाकी सहकाऱ्यांपैकी कोणाचे तिकीट ना आल्याने जरा वाईट वाटत होते. इतके दिवस सगळे कायम सोबत असल्याने एक चांगले बॉण्डिंग झाले होते त्यात आम्हाला दोघांनाच ईमेल आल्यामुळे, शिवाय माझ्या जवळच्या मित्राला करोना मुळे  येता येणार नसल्याने  नाही म्हणायला मन थोडे खट्टू झालेच  होते.  

बाकीचे सहकारी दुसऱ्या एखाद्या स्टेट मध्ये वंदे भारत मिशन किंवा चार्टर्ड फ्लाईट मिळतील का या साठी जोरदार प्रयत्न करत होते. दोन वेळा फ्लाईट अल्मोस्ट कन्फर्म झालेल्या कॅन्सल झाल्या. एकदा तर फ्लाईट्स चे तिकीट आले, सगळे जण पॅकिंग करून हॉटेल सोडायला खाली जमले आणि ऐन वेळी फ्लाईट कॅन्सल झाली.

१५ जून २०२०:- भारतात परतण्याचा दिवस उजाडला. विमानतळावर आणि प्रवासात जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक होते.  हॉटेल मधूनच भरपेट नाश्ता करून निघालो. भारतात पोचल्या शिवाय काही खायचे नाही असे ठरवूनच निघालो होतो. चेक इन करताना, सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन प्रत्येक ठिकाणी सगळ्या वस्तू परत परत sanitize करत होतो. भारतात पोचल्यावर सरकारने अगदी जय्यत आणि व्यवस्थित तयारी केली होती. प्रत्येकाचे तापमान बघणे, फॉर्म भरून घेणे  ,आरोग्य सेतू ऍप तपासणे,वगैरे अगदी व्यवस्थित झाले.

आमच्या परतण्यात आणि बाकी अनेक बाबतीत कतारच्या महाराष्ट्र मंडळाची बरीच मदत झाली. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. महाराष्ट्र मंडळाने जॉब गेल्या मुळे पैसे नसलेल्या कामगारांना जेवण पुरवणे, कतार मध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये आणि भारतीय दूतावासामध्ये समन्वय साधणे, अडकलेल्या लोकांच्या याद्या बनवणे यात बरीच मेहनत केली, मदत केली. मी परत आल्यावर बाकीचे सहकारी महाराष्ट्र मंडळाने फॉलो अप घेऊन अरेन्ज केलेल्या केलेल्या फ्लाईट्स मुळेच परत येऊ शकले. आमच्या सर्वांतर्फे त्यांना अगदी मनापासून धन्यवाद.
माझ्या "परदेशात अडकलेले भारतीय" या धाग्यावर मायबोलीकरांनी दिलेल्या सदिच्छांबद्दल आणि माझे मनोबल वाढवल्याबद्दल त्यांचे पण मनापासून धन्यवाद.  

भारतात परत आल्यावर ७ दिवस हॉटेल quarantine आणि ७ दिवस home quarantine होते.  सुदैवाने घरा पासून ३ किमीवरचेच एक हॉटेल त्या यादीत होते. भारतात आल्यावर जास्त काळजी घेणे क्रमप्राप्त होते. कारण जर कतार मध्ये करोनाची लागण झाली असती तर मला एकट्यालाच रिस्क होती, पण इकडे काही झाले तर माझ्या सोबत घरच्यांचे पण हाल होणार होते. हॉटेलवर चेक इन केल्यावर आधी पूर्ण रूम sanitizer ने पुसून काढली. पुणे मनपाने नियम फारच कडक करून ठेवले होते. रूम मधून बाहेर पडायला सुद्धा परवानगी नव्हती. म्हणजे तिकडे असताना जे चालणे फिरणे या निमित्ताने व्यायाम होत होता तो पूर्णच बंद पडला. शिवाय आता बोलायला कोणीच नाही. फक्त मैं और मेरी तनहाई ...... त्यात मी फक्त ७ दिवस न राहता १० दिवस राहण्याचा निर्णय घेतला होता. पूर्णपणे खात्री झाल्या शिवाय घरी जाणे मला परवडणार नव्हते. ते दहा दिवस महा बोअरिंग गेले. 
साधारणपणे सातव्या कि आठव्या दिवशी माझ्या शेजारच्या खोलीत कोणी तरी राहायला आले. तो रोज गॅलरीत बसून  वादनाचा करायचा. मी छान मन लावून त्याचा तो रियाज ऐकत बसायचो.त्या बासरी वादकाने १० दिवसाच्या कंटाळवाण्या वास्तव्यामधले काही क्षण का होईना सुंदर आणि सुसह्य करून केले. त्या अपरिचित बासरी वादकास पण मनापासून धन्यवाद... 

२३ जूनला करोनाची टेस्ट करून, रिझल्ट आल्यावर मी शेवटी २५ जून रोजी घरी परत आलो.

१६ फेब्रुवारी ला देश सोडताना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते कि २० ते २५ दिवसासाठी बाहेर पडलेला मी चार महिन्याने घरी परतेन.

करोनाने मुळे काय गमावले याची यादी तर करू इच्छित नाही पण चांगले आरोग्य, शिस्त, पेशन्स  नक्कीच दिले.

असो. इति माझी करून गाथा संपूर्णम...
 

तळटीप:-
१. काही तारखा गुगल करून टाकल्या आहेत. चुकीच्या असायची शक्यता आहे.

२. लेख नीट आणि छान लिहायची खूप इच्छा होती पण वेळच मिळत नव्हता.संयोजकांनी वाढवून दिलेल्या कालावधीमध्ये आज लकीली मिळालेल्या वेळात जमेल तसा लिहून (खरडून) पोस्ट करत आहे.... इंजिनिअरिंगला असताना शेवटच्या दिवशी जर्नल  कसंबसं कम्प्लिट करून सबमिट करायचो अगदी तसेच फिलिंग आले आहे.... :-)  

३. निघाल्या पासून परत येई पर्यंत च्या फोटोजचे एक कोलाज पण करून टाकायचे होते. पण त्यालाही वेळ मिळाल्याने हा एकच... कतार एअरपोर्ट वरचा.....
WhatsApp Image 2020-09-04 at 5.52.27 PM.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लिहीलाय लेख

जोपर्यंत आपल्या ओळखीचं कोणी अडकलेलं नसतं तोपर्यंत त्याची झळ तितक्या तीव्र जाणवत नाही. तुम्ही अडकल्याचे जेव्हा कळले होते तेव्हा आम्हाला त्याची तीव्रता जाणवली.

तुम्ही या काळात उत्तम नियोजन केलेत.

माझ्या "परदेशात अडकलेले भारतीय" या धाग्यावर मायबोलीकरांनी दिलेल्या सदिच्छांबद्दल आणि माझे मनोबल वाढवल्याबद्दल त्यांचे पण मनापासून धन्यवाद. >>
अगदी मनापासून लिहले आहे तुम्ही.
तुमची भारतात यायची व्यवस्था झाली हे वाचल्यावर खुप आनंद झाला होता.

कविन +१११, आम्ही सहवेदना अनुभवत होतो. आणि तुम्हांला यायला मिळणार हे कळल्यावर अतिशय आनंद झाला , हायसं वाटलं.

जोपर्यंत आपल्या ओळखीचं कोणी अडकलेलं नसतं तोपर्यंत त्याची झळ तितक्या तीव्र जाणवत नाही. तुम्ही अडकल्याचे जेव्हा कळले होते तेव्हा आम्हाला त्याची तीव्रता जाणवली.
तुमची भारतात यायची व्यवस्था झाली हे वाचल्यावर खुप आनंद झाला होता.
>>>

अनुमोदन
लिखाण आवडलं

खूप आवडला लेख!
जोपर्यंत आपल्या ओळखीचं कोणी अडकलेलं नसतं तोपर्यंत त्याची झळ तितक्या तीव्र जाणवत नाही. तुम्ही अडकल्याचे जेव्हा कळले होते तेव्हा आम्हाला त्याची तीव्रता जाणवली.
तुमची भारतात यायची व्यवस्था झाली हे वाचल्यावर खुप आनंद झाला होता. >>>+१

बापरे
कोविड अनुभव या सिरीज मधून या लॉकडाऊन बद्दल, या जागतिक महामारीबद्दल नवे दृष्टिकोन, प्रत्येकाच्या नव्या अडचणी समोर येतायत.
फायनली घरी आलात हे बरे.बायकोला, कुटुंबियांना हायसे वाटले असेल.
(ppe वाला फोटो चांगला आला आहे.)

जो अनुभव तुम्ही लिहिलाय अगदी डोळ्यांसमोर उभा राहिला...
तुम्ही भारतात सुखरूपपणे परत आलात त्याचा आनंद वाटला.

छान अतरंगी अनुभव आहे.. शेवट गोड झाला म्हणून असे म्हणू शकतोय. काळ नक्कीच कठीण असणार तो तुमच्यासाठी. ईथे कित्येक लोकं आपल्या राहत्या घरात बोअर झाले होते. तिथे फॅमिलीपासून दूर अडकून राहणे किती अवघड आहे याची कल्पनाच करू शकतो...

खूप छान प्रांजळ अनुभव लिहिलाय..
भारतीय लोक संकटकाळी धैर्य दाखवतात आणि एकमेकांना मदतीचा हातही पुढे करतात.
मी ट्विटरवर जयशंकर आणि हरदीपसिंग पुरींची ट्विट्स वाचत असते. वंदे भारत मिशनबद्दल खूप माहिती कळते. इतकं अवाढव्य प्लॅनिंग आणि त्यात या मिशनमधून कुठे कोविद आउटब्रेक न होणं हे कौतुकास्पद आहे.

कठीण अनुभवकथन!
तुम्हाला, तुमच्या खंबीर पत्नी आणि वडिलांना सलाम!!

मी हे फार जवळून पाहिलं असल्याने तुमच्या स्थितीची कल्पना आहे. तुम्ही तुमचं मनोधैर्य टिकवून ठेवलं, हे महत्त्वाचं आहे. तुमच्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहो, ही सदिच्छा.

एका वेगळ्या अनुभवातून खरं तर संक्रमणातून पार पडलात.
ह्या अनुभवाने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना पुढील आयुष्यासाठी नक्कीच अतिशय खंबीर बनवलं असेल..
शुभेच्छा..

खूप आवडला लेख! +1111
जोपर्यंत आपल्या ओळखीचं कोणी अडकलेलं नसतं तोपर्यंत त्याची झळ तितक्या तीव्र जाणवत नाही. तुम्ही अडकल्याचे जेव्हा कळले होते तेव्हा आम्हाला त्याची तीव्रता जाणवली.
तुमची भारतात यायची व्यवस्था झाली हे वाचल्यावर खुप आनंद झाला होता. >>>+१

अतरंगी,
तुमचा अडकलेले.. धागा वर आला की काही चांगली बातमी असेल असे वाटायचे.
तुम्ही सुखरूप परतल्यावर खूप बरं वाटलं होतं.

जोपर्यंत आपल्या ओळखीचं कोणी अडकलेलं नसतं तोपर्यंत त्याची झळ तितक्या तीव्र जाणवत नाही. तुम्ही अडकल्याचे जेव्हा कळले होते तेव्हा आम्हाला त्याची तीव्रता जाणवली.
तुमची भारतात यायची व्यवस्था झाली हे वाचल्यावर खुप आनंद झाला होता. >>>+1.

_/\_ सविस्तर लिहिल्यामुळे तुमच्यावर ओढवलेली परिस्थिती, घालमेल, त्यातही डोकं शांत ठेवण्याचे तुमचे प्रयत्न हे सगळं पोचलं.

खरंच, या स्पर्धेमुळे कितीजणांचे अनुभव समोर आले.

आमच्या सोसायटीतले एक गृहस्थही असे ३-४ महिने परदेशात अडकले होते.

छान लिहिलंय.
सविस्तर लिहिल्यामुळे तुमच्यावर ओढवलेली परिस्थिती, घालमेल, त्यातही डोकं शांत ठेवण्याचे तुमचे प्रयत्न हे सगळं पोचलं.>>> +1111111

थरारक अनुभव लिहिला आहे तुम्ही. बिर्याणी जास्त महागात पडली नाही हे नशीबच समजायचे तुमचे आणि कुटुंबाचे. अदृश्य असणारा हा महाभयंकर रोग लवकरात लवकर नष्ट होऊदे.

Pages