पाककृती स्पर्धा २- {नैवेद्यम स्पर्धा}-----ओजस

Submitted by ओजस on 31 August, 2020 - 12:55

बाप्पांचा नैवेद्य....मोरया....६.jpegनैवेद्य पदार्थ
डावी बाजू - लिंबू, ओल्या नारळाची चटणी, भोपळ्याचे रायते

ओल्या नारळाची चटणी:- ओल्या नारळाचा कीस+दोन तीन हिरव्या मिरच्या+कोथिंबीर+साखर+चवीपुरते मीठ

भोपळ्याचे रायते:- उकडलेला लाल भोपळा+घट्ट दही+साखर+दाण्याचा कूट+किंचित हिरवी मिरची पेस्ट+चवीपुरते मीठ

उजवी बाजू- अळूची पातळ भाजी, फ्लावर-बटाटा भाजी, मूगाची उसळ

अळूची पातळ भाजी:- आळूची पाने+पालकाची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून उकडून घेतली. नंतर ही भाजी घोटून त्यात डाळीचे पीठ कालवले. आले-हिरवी मिरची पेस्ट, उकडलेली हरभरा डाळ आणि उकडलेले दाणे+पातळ चिरलेले खोबरे+लाल तिखट+ हळद+ हिंग+आमसूल+गुळ+धने जिरे पावडर+गरम मसाला घालून भाजीला उकळी आणली. त्याला मेथी कढीपत्ता फोडणी घातली

फ्लावर-बटाटा भाजी:- फ्लावर आणि बटाटा बारीक चिरून घेतली. त्याला आले- मिरची,कढीपत्ता घालून नेहमीसारखी फोडणी केली. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली.

मूगाची उसळ:-मुग रात्रभर भिजत घातले. कुकर मध्ये दोन शिट्ट्या करून वाफवून घेतले. आले-मिरची पेस्ट, कढीपत्ता घालून फोडणी केली. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली.

तळणीचे पदार्थ- पापड-पापडी,कोथिंबीर वडी

कोथिंबीर वडी:- कोथिंबीर जुडी स्वच्छ धुऊन, फडक्यावर टाकून स्वच्छ कोरडी केली. नंतर ती बारीक चिरून त्यामध्ये आलं मिरची पेस्ट, हळद, तिखट, धने जिरे पावडर, गुळ, चवीपुरते मीठ, तेल,हरभरा डाळीचे पीठ घालून गरजेपुरते पाणी घालून त्याचे रोल बनवून वाफवून घेतले. थंड झाल्यावर वड्या पाडून तळून घेतल्या

गोड पदार्थ- मोदक, करंजी,अनारसा, पुरणपोळी, रस (घरी साठवलेला),शेवयांची खीर

मोदक:- मोदकाच्या पारीसाठी मैद्यामध्ये मोहन घालून पीठ भिजवून घेतले.सारणासाठी खोबरे किसून थोडे परतून गार झाल्यावर बारीक कुस्करून घेतले.त्यामध्ये पिठीसाखर, वेलची पूड, काजू बदाम भरड पुड घातली.नेहमीसारखे मोदक करून तळून घेतले.

करंजी:-वरील प्रमाणे साहित्य वापरून करंजी केली

अनारसा:- अनारशाचे पिठ आधीच करून ठेवले होते. त्या पिठा मधून थोडा गोळा काढून त्याला पिकलेलं केळं लावून त्याचे खसखशीवर अनारसे थापले. साजूक तुपावर तळून घेतले

पुरणपोळी:-हरभरा डाळ कुकरला शिजवून घेतले. त्यामधील पाणी काढून टाकून त्यामध्ये गूळ घालून मिक्सरला फिरवून घेतले. नंतर मावे मध्ये हे मिश्रण ठेवून पुरण शिजवून घेतले. त्यात वेलची पूड घातली. मोहन घालून कणीक भिजवून घेतली. आणि पुरणपोळ्या केल्या.

शेवयांची खीर:-शेवया तुपावर परतून घेतल्या. त्यानंतर दूध घालून खीर शिजवली. साखर व वेलची पूड घातली. काजू बदाम भरड पूड घातली

साधे वरण भात, दही भात, आमटी.

आमटी:- तुरीची डाळ शिजवून घेतली. डाळ घोटून त्यामध्ये तिखट, धने-जिरेपूड, सांबार मसाला, गुळ, चवीपुरते मीठ घालून डाळ उकळवून घेतली. त्याला मेथी, कढीपत्ताची फोडणी दिली. कोथिंबीर घालून वरून अर्धे लिंबू पिळले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy आली का खीर! झाली की पंचपक्वान्न! बाप्पा मोरया!!!
हिरवी वाटी कसली आहे? अळूच्या भाजी शेजारी.