जब I met मी :- 6 (भाग पहिला)

Submitted by Cuty on 30 August, 2020 - 07:45

'पार काळाझारंय पोरगा! पण काय करायचं आता? ती म्हणते शिकलेलाय! मग कसंतरी उरकून टाकायचं, जाऊदे मरूदे एकदाचं!' आई माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत, मला तिडिक जाणवेल इतक्या तुच्छतेने, बाहेरच्या खोलीत बसून शेजारच्या काकूला सांगत होती. मी आत पोळ्या करताकरता ऐकत होते. मला आईचा राग करावा की, कीव करावी की, स्वतःच्या नशिबाला दोष द्यावा हेच कळेना! अन माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले! एक महिन्यावर माझे लग्न आले होते, अन काहीही करून मी स्वतःच ते मोडावे यासाठी केले गेलेले सर्व निष्फळ प्रयत्न किंवा ईतर काही मार्गाने ते मोडण्यासाठी केलेल्या निष्फळ हालचाली, यासर्वांचा परिपाक म्हणजे आईच्या तोंडून निघालेले वरील वाक्य होते. माझ्या डोळ्यासमोर झरझर मागील चारपाच वर्षे येऊन गेली!

मी शिक्षण पूर्ण करून गावातीलच उच्चमहाविद्यालयात रूजू झाले होते. गावातच आईवडिलांबरोबर राहत असल्याने खर्च तसा काहीच नाही आणि वर बर्यापैकी पगार! अगदी हिशेबच करायचा म्हटलं तरी, माझ्या लग्नासाठी येणार्या जवळपास सर्व खर्चाइतकी रक्कम, मी या पाच वर्षात कमवून आईवडिलांना दिली होती. जन्मापासून गावातच वाढल्याने मी रहायचीही अगदीच साधी! खरे सांगायचे तर माझ्या विद्यार्थिनीही माझ्यापेक्षा जास्त टापटीप रहायच्या. पण मी स्वतःसाठी थोडाही जास्त खर्च करायला घाबरायचे. नाहीतर लगेच घरून टोमणे, बोलणी ऐकायला लागायची. बरे एवढे करूनही चारपाच वर्षात माझ्या गळ्यात अर्ध्या तोळ्याची चेनही आली नव्हती की, दोनएक ग्रॅम सोन्याचे कानातले टाॅप्स नव्हते. इतकी वर्षे मी नकली चेन आणि कानातले घालून नोकरी करत होते. इतर आईवडिल जसे मुलीच्या लग्नासाठी चारपाच वर्षे आधीपासून तयारी करतात, जमेल तसे सोनेनाणे, पैसाअडका बाजूला ठेवतात तसे तर नाहीच, उलट माझा सर्व पगारही घरातच खर्च केला जायचा. नाही म्हणायला धाकट्या भावाच्या शिक्षणाला थोडाफार हातभार होई पण दुसरीकडे घरामधे आणि सर्वांच्या राहणीमानातील बदलही लक्षात येण्याजोगा होता. भावाचे शिक्षण पूर्ण होत होते आणि माझे लग्नाचे वयही वाढत होते. एकेक करून जवळपासच्या, नात्यातील माझ्या सर्व मैत्रिणींची लग्ने झाली, माझ्या धाकट्या चुलतबहिणींची लग्नेही ठरली. शेवटी जेव्हा धाकटा भाऊ एका चांगल्या नोकरीला लागला तेव्हाच घरात माझ्या लग्नाचा विषय निघाला. पण माझ्या लग्नासाठी एक दमडीही आईवडिलांनी ठेवली नव्हती. मग काय! माझ्या नोकरीचे अन पगाराचे भांडवल करून एखादा कमी शिकलेला किंवा दुय्यम नोकरी करणारा मुलगा बघून एकदम कमी खर्चात किंवा 'तुम्हीच लग्न करून घ्या" असे सांगून कशीबशी मला उजवायची तयारी चालू झाली. दुसरीकडे घरात माझ्यासमोर माझ्या वाढत्या वयाचा बाऊ करून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जाई. मला अगदी हतबल वाटे. पण नशीबानेच मला साथ दिली. आत्याच्या नात्यातील एक दूरचे पण चांगले स्थळ मला आले. मुलगा काळासावळा पण नाकीडोळी नीटस. भरपूर शिकलेला अन चांगली नोकरी. इतर नातेवाईकांपुढे आईवडिल काही करू शकले नाही आणि लग्न ठरले! आज एक महिन्यावर लग्न आले, पण आईला आपली मुलगी आपल्याला सोडून जाणार याचे दुःख नाही आणि वडिलांना मुलीचे लग्न ठरल्याचा आनंद, अभिमान नाही!!

लग्न झाले. मे महिन्याची सुटी होती. आता माझा नवरा शहरात जिथे नोकरीला होता, तिथेच मी ही नवी नोकरी शोधली. आम्ही दोघेच शहरात रहायला गेलो. दरम्यान मी एकदा दोनतीन दिवसांसाठी माहेरी गेले. माझा जुन्या नोकरीतील झालेला शेवटचा पगार तेथीलच बँकेत जमा होता. तो काढून घेऊन घरी आले तोच आईने लग्नाला झालेल्या खर्चावरून बडबड, धुसफूस सुरू केली. वडिल एका शब्दानेही तिला काहीच कसे बोलत नाहीत, म्हणून मी त्यांच्याकडे अगतिकतेने पाहिले की, ते लगेच दुसरीकडे तोंड फिरवू लागले. जसे काही आधीच ठरल्याप्रमाणे ते थोड्याच वेळात, मुकाट्याने एक शब्दही न बोलता घराबाहेर पडले. मी सर्व समजले. कसे का असेना, पण आता आपले लग्न झाले आहे आणि यापुढे कुठे आपली त्यांना मदत होणारंय? असा विचार करून मी तो पगार आईपुढे करीत म्हटले, 'हे घे, ठेव तुला. माझ्या नवर्याला या पैशाबद्दल काहीच माहित नाही.' आईने लगेच हात पुढे करून पैसे घेतले. एका शब्दानेही मना केले नाही. पण असेल काही अडचण, असे म्हणून मी विषय सोडून दिला. आणि इथेच मी फसले!!

मी हळूहळू नविन संसारात रमत होते. नवी नोकरीही छान सुरू होती. पण आईवडिलांचे माझ्याशी वागणे मात्र अगदी तुटक आणि जेवढ्यास तेवढे होते. फोनवरही अगदी जुजबी आणि वरवर बोलत. मी कशी आहे, नविन संसार कसा चाललाय याबद्दल विचारपूस किंवा माझ्याबद्दलची ओढ मला अजिबात त्यांच्या बोलण्यात जाणवत नसे. माझे आतापर्यंतचे सर्व आयुष्य जिथे गेले ते गाव, मैत्रिणी, सगेसोयरे, भाऊबहिणी यांच्या आठवणीने मी कधीकधी हळवी होई. विशेषतः सणसमारंभ असतील तर हे जरा जास्तच जाणवे. सासरी जाऊन सर्व सण वगैरे व्यवस्थित पार पाडल्यानंतर मनाला एक प्रकारचा थकवा जाणवे. मग परत नवर्याबरोबर शहरात जाण्याआधी एखादा दिवस माहेरी जाऊन येऊयात, असे खूपदा वाटे. तसे माझे माहेर जवळच होते. पण आईवडिल एखादा फोन करून आग्रहाने मला कधीच बोलावत नसत. आणि सासरच्या मंडंळींसमोर स्वतःच फोन करून 'येऊ का ' असे विचारणे मला प्रशस्त वाटत नसे. हळूहळू चारपाच सणवार , समारंभ असेच गेले. आता सासरच्या महिलावर्गालाही कुणकुण लागली की, नव्या नवरीला तिचे आईवडिल ' फारसे विचारत नाहीत'. मग आडूनआडून माहेराबद्दल प्रश्न विचारणे, आगाऊ चौकश्या करणे तर कधी चक्क ' मग वहिनी, कधी जाणारंयस म्हणते माहेरी? ' असे विचारून एकमेकींकडे पाहून डोळे मिचकावणे वगैरे प्रकार सुरू झाले. मला अगदी कानकोंडे होई. पण तरी मी शिताफीने काहितरी बोलून, हसून विषय उडवून लावत असे. वाटायचे, बरं झालं आपण शहरात राहतो, इथे राहत असतो तर अवघडच झालं असतं! पण आता एक गोष्ट मात्र मला उमगली होती, माझे लग्न झाले, पगार बंद झाला आणि आईवडिलांच्या नजरेत माझी किंमत उतरली! बाकी ते माया वगैरे सब झूट! जगात फक्त व्यवहारच आहे अशी खात्रीच पटू लागली!

दिवस पुढे पळू लागले. पण परिस्थिती जैसे थे! एक दिवस आईचा फोन आला. सहज बोलताबोलता विचारते, असे दाखवत तिने विचारले, 'काय ग! नोकरी वगैरे करतेस ते ठिकंय, पण नीट राहतेस ना? नाही म्हणजे, चार पैसै असतात ना तुझ्याकडे, तुझे असे म्हणून? की नवर्याच्याच घशात घालतेस? यावर मी म्हटले, 'अग घरखर्चासाठी देतात ते मला काही रक्कम. शिवाय माझ्या पगारातून माझा खर्च जाऊन राहिलेली शिल्लक मी अडिअडचणींसाठी राखून ठेवते' . 'मग आतापर्यंत बराच पैसा जमला असेल?', आई म्हणाली. ' नाही गं , पण कधी लागले तर गरजेपुरते आहेत', एवढे बोलून मी विषय टाळला.

दुसर्या दिवशी पुन्हा आईचा फोन आला, 'अगं कालच आम्ही बोलत होतो. बरेच दिवस तू इकडे आलीच नाहीस की गं! या आठवड्यात सुटीला इकडेच ये दोन दिवस.' आता आईच्या आवाजात कधी नव्हे इतका गोडवा होता. मी जरा बुचकळ्यातच पडले. पण 'ठीक आहे' असे म्हणून फोन ठेवला अन माझ्या लक्षात आले, आईने फक्त मलाच बोलावले आहे. माझ्या नवर्याबद्दल ती काहीच बोलली नाही! का कुणास ठाऊक, मला जावेसेच वाटेना. पण कसे का होईना निदान सासरच्या मंडळींना दाखवण्यासाठी तरी मला माहेरी जाणे भाग होते. नाहीतर आजवर तिकडची मंडळी फक्त टोमणे मारून हैराण करत होती, आता एकटी का होईना पण जर माहेरी गेले नाही, तर पुढे काय होईल काय माहित, असा विचार करून मी गावी गेले.

गावी आल्यानंतर मी आधी एक दिवस, सर्व नातेवाईक, भाऊबहिणी, मैत्रिणी,शेजारपाजारच्या मावश्या, काकूंना भेटले. सर्वजण माझ्याकडे नवी नवरी म्हणून अप्रूपाने पाहत होते, कौतुकाने विचारपूस करत होते. पण एक गोष्ट सर्वांच्या नजरेत, बोलण्यावागण्यात दिसत होती, ती म्हणजे आईवडिलांनी नव्या नवरीला खूप दिवसांनी बोलावले, माझे कसले कोडकौतुक केले नाहीत. दुसरीकडे आई जरा तुसडेपणानेच वागत होती आणि वडिलही तुटकच बोलत होते.

दुसर्या दिवशी सकाळी अचानकच आई भसकन बोलली, 'काय गं, तुझ्या सासरच्या बायका विचारतात का, आईकडे का जात नाहीस, आई का बोलावत नाही म्हणून?' हे ऐकून मी सर्दच झाले!! ही आपली आई! हिला चांगले ठाऊक आहे, आपली सासरी गेल्यावर कशी कोंडी होत असेल. तरीही हिला आजवर आपल्याला, जावयाला निदान एकदाही बोलवावेसे वाटले नाही. मी काही बोलणार इतक्यात तिने सुरूवातच केली, " हे बघ! तुझ्या लग्नात आम्हाला आधीच खड्ड्यात पाडलंस! झाला तो खर्च पार आमच्या गळ्याशी आलाय. धाकटा नुकताच नोकरीला लागलाय. त्याला काय आयुष्यभर कर्जातच बुडवायचाय का? तुला न तुझ्या नवर्याला दर सणाला बोलवायला अन तुमची मिजास वाढवायला, आम्हाला जोर नाही आला. तुझ्या सासूला अन नंदाजावांना काय सांगायचं ते तुझं तू बघ! तू पगार देतेस ना त्यांना? मग तुझा, तुझ्या नवर्याचा मानपान, कपड्यांचा खर्च दरवेळी आम्ही का करायचा? '' आता सर्वकाही माझ्या लक्षात आले. माझ्याकडे थोडीफार रक्कम असल्याचे मीच तिला फोनवर सांगितले होते. तिला माझ्याकडून पैसे काढून घ्यायचे होते. पण मी नाईलाजाने पैसै तिच्यापुढे ठेवले अन म्हणाले, ' तुझी ओढाताण होत असेल. हे माझ्याकडचे पैसे घे. उगीच मानपानासाठी तुम्हाला त्रास नको. अन तिकडच्यांनाही बोलायला काही निमित्त नको.' आई झटक्याने, 'हं..!' करून मुरका मारून ' आता कशी आली वठणीवर!' असा चेहरा करून ताडकन आत उठून गेली!

सासरी मला कानकोंडे करून, अप्रत्यक्षपणे आम्ही तुला त्रासही देऊ शकतो, तुला आमची गरज आहे, असे भासवून माझ्याकडून लग्नानंतरही जमेल तितके पैसै उकळायचा यांचा डाव होता. यासाठीच मला इतके दिवस यांनी घरी येऊ दिले नाही. हा उघडपणे न दिसून येणारा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता. पण आतासुद्वा मी हतबल होते. नविन लग्न झालेले! नवरा, सासरची मंडळी यांचा तसा काही त्रास नव्हता. शहरात दोघेही खाऊनपिऊन सुखी होतो. पण सासरी दर सुटीला येणेजाणे होत होते. सासरी ' हिच्या माहेरचे लोक जावयाला बोलावतही नाहीत. मानपान, जावयाचे कोडकौतुक तर दूरच राहिले!', याबद्दल स्पष्ट अढी त्यांच्या मनात असलेली मला जाणवत होती. उद्या माझ्यावर राग काढण्यासाठी आईवडिलांनी मला किंवा नवर्याला अजिबात बोलावले नाही, माझ्याशी फोनवरून संपर्क कमी केला तर सासरी ही गोष्ट नजरेस येणारच. शिवाय कोणजाणे एखाद्या कार्यक्रमात, मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने, आईने सासरच्या लोकांपैकी कोणाचा अपमान केला तर माझ्या भरल्या संसारात आग लागली असती! आणि तसे करायला आई मागेपुढे पाहणार नाही याची मला खात्री होती. कारण आता पैशापुढे तिच्या मनात माझ्याबद्दल माया मुळीच राहिली नव्हती. तेव्हा मी पण, आता इथून पुढे चार पैसे फेकलेले परवडले पण आपल्या संसारात कलह नको असा व्यवहारी विचार करायला लागले. मला फक्त मनःशांती हवी होती.

काही दिवसांनी आम्ही शहरात फ्लॅट बुक करण्याचा विचार केला. त्यासाठी सुरूवातीची बरीच रक्कम जुळवायला लागणार होती. दोघांनीही काटकसर करून, खर्चावर नियंत्रण ठेवून शक्य तितके लवकर फ्लॅट बुक करायचे ठरवले. पण आता माझ्या आयुष्यात एक नविनच पायंडा पडला होता. मला घरखर्चासाठी आता अगदी जेमतेम रक्कम मिळायची, त्यातूनही ओढाताण करून, प्रसंगी स्वतःची, खायचीप्यायची, औषधपाण्याची आबाळ करून का होईना, पण काहीएक रक्कम मी बाजूला काढायचे. दर तीनचार महिन्यांनी सासरी गेले की, आई बोलावायची. मग तिच्याकडे जाऊन काही पैसे, घरात एखादी वस्तू किंवा आईला साडी वगैरे घेऊन द्यायचे. मग माझ्याच पैशाने माझ्यासाठी किंवा नवर्यासाठी काहीबाही घेऊन घरी जाऊन 'आईने दिले' असे सांगायचे. बाबा सर्व माहित असून काहीच माहित नसल्यासारखे दाखवायचे. मला कळत होते, माझा पाय गाळात रूतत चाललाय! पण काही उपाय दिसत नव्हता. वर हा त्रास कोणाला सांगताही येत नव्हता अन सहनही करता येत नव्हता.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! युनिव्हर्सिटीत शिकत असताना मी एका समुपदेशकाकडे काम करित असे तेंव्हा एक केस पाहिलेली की आई वडिलच मुलीचे लग्न तुटावे
म्हणुन प्रयत्न करित होते. ते तर मुलीच्या नवर्याला फोन करुन मुलीशी भांडण लावायचे आणि मुलगी पार डिप्रेशन मध्ये!

cuty पुढच्या भागात तिने यातून कसा मार्ग काढला ते लिहा.. तिला गाळातून बाहेर काढा.. >> +१०० आईचे असे तोडून वागणे पचवणे अवघड असते.
मुलगा-मुलगी एकसमान म्हणतो मग मुलीने लग्न झाले तरी थोडी माहेरची जबाबदारी घ्यावी या आईच्या मतात वावगे काही नाही. पण ते राजी-खुशी, आपलेपणाने गोडीत घडावे. वेठीला धरून, भावनिक कोंडमारा करून घडू नये. लवकर मार्ग काय ते लिहा.

मला तुमची परिस्थिती समजू शकते, कारण मीही अशा प्रकारच्या छळातून गेलो आहे. आम्ही तीन बहिणी अजूनही याचा सामना करीत आहोत. आता आम्हाला याची सवय झाली आहे.

आम्हाला त्यांच्या सर्व युक्त्या माहित आहेत .पण काहीवेळा सापळ्यात अडकतो किंवा भावनिक होतो .

मुलगा-मुलगी एकसमान म्हणतो मग मुलीने लग्न झाले तरी थोडी माहेरची जबाबदारी घ्यावी या आईच्या मतात वावगे काही नाही. पण ते राजी-खुशी, आपलेपणाने गोडीत घडावे.
>>
+१ आणि मुलीला व मुलाला समान पणे वागवावे.

धन्यवाद धनुडी, निलिमा, सिमंतिनी, sarika
@ peacelily -धन्यवाद. ही माझी कथा नाही. पण कथानायिकेला जे अनुभव आले, ते माहितीतल्या बर्याच मुलींना, यापेक्षा कमीजास्त प्रमाणात, पण आलेले पाहिले आहेत.