चोख व्यवहार

Submitted by निशिकांत on 29 August, 2020 - 23:07

चोख व्यवहार---( वीक एंड लिखाण )---लघुकथा

माणसाचे मन म्हणजे एक अजब रसायन आहे हे मला पदोपदी जाणवते. कित्येक गोष्टी/घटना मनात दडून बसलेल्या असतात आणि त्या कधी तरी आठवण होऊन डोकावतात. अशा घटना/प्रसंग घडतात तेंव्हा नगण्य असतात आणि आज जेंव्हा आठवतात तेंव्हा त्यांना नवे संदर्भ प्राप्त होतात. असाच एक प्रसंग घडला तेंव्हा मला त्याची खूप चीड आली होती पण तेंव्हा असे वाटलेही नव्हते की कधी काळी मला त्यावर लिहायची उर्मी येईल.
ही घटना जवळ जवळ तेवीस वर्षांपूर्वीची आहे. मी स्टेट बँक ऑफ हैदराबादमधे नोकरीला क्षेत्रीय प्रबंधक म्हणून कार्यरत होतो. माझ्या आधिपत्त्याखाली पन्नासच्या जवळपास शाखा होत्या. त्या सर्व शाखांच्या सुरुळीत काम काजाची तसेच ठेवी आणि कर्जे वाढवायची जिम्मेदारी माझ्यावर होती. प्रत्येक शाखेला तीन महिन्यातून एकदा भेट देणे पण अवश्यक होते. अशा भेटीत त्या शाखेच्या महत्वाच्या खातेदारांना भेटणे आणि चर्चा करणे पण होत असे.
एका शाखेचे एक ग्राहक खूप धनवान होते. त्यांचा त्या गावात आडतीचा व्यवसाय होता. मोंढ्यात दुकान पण होते. त्यांचे सर्व बँकिंग व्यवहार आमच्या कडे होते. ते गावातील एक बडे प्रस्थ होते. एकेदिवशी त्या शाखेच्या व्यवस्थापकाचा मला फोन आला. या ग्राहकाला नुलगा झाला होता . त्याच्या बारस्याचा कर्यक्रम होता आणि त्याने मला निमंत्रित केले होते. आसामी मोठी असल्याने मला जाणे अवश्यक होते. मी होकार कळवला आणि ठरल्या दिवशी काम काज आटोपून त्या गावाला सायंकाळी पोंचलो. कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर चालू होता. बरेच लोक जमले होते. मी गेल्यावर नमस्कार चमत्कार झाले अणि मी बसलो सगळ्या लोकात. रात्री आठ वाजता ते गृहस्थ माझ्या जवळ आले आणि म्हणाले की साहेब हा कार्यक्रम बराच वेळ चालेल. आपण वर माडीवर बसू या. आम्ही वर गेलो. शाखा व्यवस्थापक, मी, गावातील अजून कांही प्रतिष्ठित मंडळी आणि यजमान असे वर बसलो. गप्पा सुरू झाल्या. मद्याची बाटलीही निघाली आणि पार्टी सुरू झाली.
मॅनेजर मला सांगत होते की यांचा बँकेतील व्यवहार खूप चोख आहे. कर्जाचे हप्ते ते एक दोन दिवस आधीच भरतात. जेंव्हा बँक तिमाही व्याज आकारते त्या आधी व्याजाचा अंदाजे हिशोब करून व्याजाची रक्कम पण भरतात. आमच्या शाखेचे हे सर्वात महत्वाचे आणि नंबर एकचे खातेदार आहेत.
एव्हाना दोन तीन पेग रिचवलेले होते. मॅनेजरने केलेली तारीफ ऐकून यजमान जरा जास्तच रंगात आले. ते सांगत होते की व्यवहार चोख ठेवणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे. गावात कोणाकडेही चौकशी करा माझ्या व्यवहारा बद्दल. अहो एवढेच काय! मी देवाशी पण व्यवहारात चोख आहे. आता हेच बघा ना. मला हा मुलगा पाच मुलीनंतर झालाय. नवस बोलल्या प्रमाणे दोन दिवसापूर्वीच मी सौंदत्तीला जाऊन आलो. नवस केला होता की मला जर मुलगा झाला तर माझ्या पाच पैकी एक मुलगी येल्लम्मा देवीला देवदासी होण्यासाठी अर्पण करेन. दोन दिवसापूर्वीच देवीला माझी अकरा वर्षाची मुलगी आधी अर्पण केली आणि नंतरच मुलाचे आज बारसे केले. आपणाला कुठेही उधारी चालत नाही.
हे ऐकून माझे डोकेच गरगरायला लागले. मी तबियत अचानक बिघडल्याचे कारण सांगून न जेवताच निघून गेलो. हा प्रसंग कित्येक दिवस माझ्या डोक्यात घोळत होता.

निशिकांत देशपांडे. पुणे
मोक्र ९८९०७ ९९०२३

 

 
 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयंकर आहे.
यावर काहीतरी कायदा आहे ना?