तपती

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 May, 2009 - 03:01

हे असं यापुर्वी कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे सगळं हॉस्पिटलच आश्चर्यचकित झालेलं होतं. डॉ. तपतीने ऑपरेशन करायला नकार दिला ही घटनाच मोठी धक्कादायक होती आणि तेही हॉस्पिटलमध्ये ती एकटीच निष्णात न्युरोसर्जन असताना? तसे डॉ. उपासनी आणि डॉ. हुमनाबादकर होते म्हणा. पण अशा क्लिष्ट ऑपरेशनमध्ये डॉ. तपतीचा हात धरणारा कोणीच नव्हता. आणि मुळात तपतीच सदैव पुढे असायची अशावेळी. गेल्या चार वर्षात यमराजालाही आव्हान देणारी डॉक्टर म्हणुन विख्यात झाली होती तपती आणि आज अशोकराव सरंजामेंचं ऑपरेशन करायला तपतीने नकार दिला होता.

डॉ. तपती भास्कर. स्वतःला वैद्यकीय व्यवसायाला पुर्णपणे वाहुन घेतलं होतं तिने. चार वर्षापुर्वी तिने सर्वोदय जॉईन केलं. त्यावेळी सर्वोदयमध्ये प्रस्थापित डॉ. उपासनींनी तोंड वाकडं केलं होतं, ही पोर काय ऑपरेशन्स करणार म्हणुन. नुसतं रक्त बघितलं तरी हिला चक्कर येइल असं डॉ. उपासनींचं ठाम मत झालं होतं त्यावेळी.

तपती होतीच तशी........ एखाद्या जाईच्या कळीसारखी नाजुक, एकशिवड्या अंगाची, गोरीपान. तिला बघितल्यावर कसं एकदम हळुवार फ़िलींग यावं कुणाच्याही मनात. आणि ही पोर न्युरोसर्जन? पण बघता बघता तपतीने सगळ्यांना जिंकुन घेतलं अगदी डॉ. उपासनींसहीत. रुग्णालयाच्या स्टाफ़ची तर ती लाडकी तपूताईच झाली होती. तिची शल्यकर्मातली हातोटी भल्या भल्यांना चकीत करणारीच होती. ऑपरेशन थिएटरच्या बाहेरची तपती आणि आतली तपती यात जमीन आसमानाचा फ़रक असे. एकदा का तो हिरवा अ‍ॅप्रन अंगावर चढला की तपती कुणी वेगळीच असे. चार वर्षात ती भराभरा यशाच्या पायर्‍या चढत गेली. आता अशी परिस्थिती होती की तपतीशिवाय सर्वोदय ही कल्पनाच कुणाला सहन होण्यासारखी नव्हती. वार्डमधल्या पेशंटसचे डोळे कायम तपतीच्या आगमनाकडे लागलेले असायचे. डॉ. तपतीवर एकदा केस सोपवली की निर्धास्त होउन जायचे ही आता हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची सवयच बनली होती. आणि अशा डॉ. तपतीने सुप्रसिद्ध समाजसेवक अशोकराव सरंजामेंचं ऑपरेशन करायला नकार दिला होता.

झाले असे की परवा रात्री अचानक अशोकरावांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारण होते मेंदुतून होणारा रक्तस्त्राव. ब्रेन हॅमरेज सारख्या सर्जरीज ही डॉ. तपतीची खासियत होती. त्यामुळे डीनसरांनी ताबडतोब डॉ. तपतीला बोलावणे धाडले. कारण अशोकराव हे राज्यातील खुप मोठे प्रस्थ होते. एक निरपेक्ष समाजसेवक म्हणुनच ते ओळखले जात. राज्यातील अनेक समाजसेवी संस्थांचे ते आधार होते. त्यांनी अनेक अनाथ महिलाश्रम, वृद्धाश्रम चालु केले होते. साठी ओलांडलेले अशोकराव आज मृत्यूच्या दारात उभे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार होता. अशोकराव अ‍ॅडमिट झाल्यापासुन रुग्णालयात अनेक राजकिय आणि अराजकीय लोकांच्या भेटी वाढल्या होत्या. आधीच लोकप्रिय असलेले सर्वोदय आता अजुनच चर्चेत आले होते.

"नाही सर, मी हे ऑपरेशन नाही करू शकणार! तुम्ही हि केस उपासनीसरांना द्या ना. ते मला सिनिअर आहेत, अनुभवी आहेत." डॉ. तपतीने अगदी ठामपणे नकार दिला.

"अगं पण का? आणि डॉ. उपासनीनीच तुझे नाव रेकमेंड केले आहे. खरे सांगायचे झाले तर तुझी ख्याती ऐकुनच सरंजामेसाहेबांच्या कुटुंबियांनी त्यांना सर्वोदयला आणले आहे. आणि आत्ता तु ऑपरेशनला नकार देतेयस! हा आपल्या गुडविलचा प्रश्न आहे बेटा!"

अचानक सरांचे लक्ष तपतीच्या चेहर्‍याकडे गेले. तिचा चेहरा कुठल्याशा अनामिक वेदनेने पिळवटुन गेला होता. डोळ्यात पाणी होते. तसे डीन सर एकदम गडबडले, पटकन उठुन तपतीपाशी आले......

"काय झालं तपती, बेटा तुला बरं वाटत नाहीये का? हे बघ तु थोडावेळ आराम कर. नुकतेच देशपांड्यांचे ऑपरेशन करुन आली आहेस म्हणुन थकली आहेस तू, थोडावेळ विश्रांती घे, आणि मग आपण बोलु, ठिक आहे? " डीनसरांनी हळुवारपणे विचारले.

तपतीने मान डोलावली आणि ती केबीनच्या बाहेर निघुन गेली.

डीन तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहातच राहीले. दरवाजा ढकलुन तपती बाहेर निघुन गेली तरी कितीतरी वेळ डीन सर हलणार्‍या दरवाज्याकडे पाहातच राहीले. त्यांना खरेतर खुप आश्चर्य वाटले होते. तपती खरेतर खुप हळवी आणि भावनाप्रधान अशी होती. कुणाचेही दु:ख पाहीले की रडवेली व्हायची. कुणालाही मदत करायला सदैब तयार असायची......

आणि आता सरंजामेंसारख्या देवमाणसाचे ऑपरेशन करायला तिने नकार दिला होता. ही खरोखर मनाला धक्का देणारीच गोष्ट होती. मी तपतीला पुर्णपणे ऒळखतो असा विश्वास असणारे डीन त्यामुळेच बुचकळ्यात पडले होते.

"नाही, काहीतरी तसेच महत्वाचे कारण असल्याशिवाय तपती असे वागणार नाही. कुठल्याही समस्येपासुन पळ काढणे हा तिचा स्वभावच नाही. काहीतरी निश्चित खदखदतंय तिच्या मनात. त्याशिवाय पोर असा ऑपरेशनला नकार देणार नाही. पण मग ती मला का नाही बोलली, का नाही सांगत आहे ती मला काय झालय ते? मला बघायलाच हवं, तपुशी बोलायलाच हवं. "

मनाशी काहीतरी ठामपणे ठरवत डीन ऊठले आणि तपतीच्या केबीनपाशी आले.

दारवर टकटक करुन त्यांनी दार हलकेच उघडले. तपती टेबलावर डोके टेकवून बसली होती, बहुदा झोपली असावी. ते बघुन डीन थबकले,

"ओह, पोर झोपलीय बहुदा, दमुन! " आणि परत मागे वळले.

"नाही पपा मी जागीच आहे, या ना! मला माहीत होतं तुम्हाला राहवणार नाही म्हणुन!" तपतीने डोके वर केले आणि तिच्याकडे बघुन डीनना धक्काच बसला. डॉ. भास्करराव मार्तंड यांनी गेल्या आठ दहा वर्षात पहिल्यांदाच आपल्या लेकीच्या डोळ्यात अश्रु पाहीले होते. तपतीचे डोळे रडुन रडुन सुजले होते.

डीन सरांच्या पोटात कालवले तिचा चेहरा बघून. ते लगबगीने पुढे झाले....

"काय झाले रे बेटा, तु असा रडतोयस का म्हणुन? त्यांनी लगबगीने तपतीला जवळ घेतले.

"काय झालं बेटा रडायला आणि ऑपरेशनला नकार देण्यामागे याचा काही संबंध आहे का?

तशी तपती अजुनच रडायला लागली. डीनसरांनी पुढे होउन तिला कुशीत घेतले आणि ते हळुहळु तिच्या केसातुन हात फिरवत तिला थोपटायला लागले. तपती मनमोकळेपणे रडत होती, हुंदके वाढले होते. डीनसरांनी तिला मनसोक्त रडु दिले.....

त्यांना माहीत होते पुर्णपणे मन मोकळे केल्याशिवाय तपती राहणार नाही. पण त्यासाठी तिला थोडा वेळ देणे आवश्यक होते. थोड्यावेळाने तपती शांत झाली.

तसे सरांनी उठुन तिला पाणी दिले. वेंडींग मशिनवरुन कॉफी आणुन तिला दिली आणि ती काही बोलण्याची वाट पाहात, प्रेमळपणे तिच्याकडे पाहात तिच्यासमोर बसुन राहीले. तपतीने कॉफी घेतली आणि कृतज्ञतेने त्यांच्याकडे बघत म्हणाली....

"थँक यु, पपा. मी तुम्हाला खुप त्रास दिला ना?" तिच्या चेहर्‍यावर शरमिंदेपणाचे भाव होते.

"नाही रे बेटा, तु लेक आहेस ना माझी. तुझ्या वेदना खरेतर तु न सांगता मला कळायला हव्यात. पण आज मात्र मी खरोखर गोंधळलोय गं. गेल्या कित्येक वर्षात तुला रडताना बघितलं नाही ना, त्यामुळे असेल कदाचित. तु आता ठिक आहेस ना? बघ ठिक असशील तर बोलु, नाहीतर राहू दे. आपण नंतर बोलु , आता तु आराम कर."

त्यांनी मायेने तपतीला सांगितले आणि ते केबीनचा बाहेर जाण्यासाठी दाराकडे वळले. तसे तपतीने मागुन येवुन त्यांचा हात पकडला.....

"नाही पपा, आताच बोलु द्या मला. पुन्हा ही अशी योग्य वेळ येइल की नाही कोण जाणे." तपतीचे डोळे पुन्हा पाणावले होते.

सरांनी पुढे होवुन तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, " बोल पिल्लु, तुला जे काही सांगायचं आहे ते अगदी मनमोकळेपणाने बोल. कदाचीत मी काही मदत करु शकेन."

"पपा, खरेतर तुम्हीच फक्त मदत करू शकता. नाहीतरी तुमच्याशिवाय माझे आहेच कोण या जगात? पपा, मी गेल्या आठ वर्षात एक गोष्ट तुमच्यापासुन लपवून ठेवली होती. तुम्ही मला कधीच विचारले नाहीत हा तुमचा मोठेपणा. पण आता मला वाटते ते तुम्हाला सांगायची वेळ आली आहे."

तपती शांतपणे पण ठाम स्वरात एक एक शब्द उच्चारत होती.

"बाबा, तुम्ही विचारलंत ना मला, माझ्या रडण्याचा अशोक सरंजामेंचं ऑपरेशन करायला नकार देण्याशी काही संबंध आहे का म्हणुन? "

"हो पपा, संबंध आहे, निश्चितच आहे, मी अशोक सरंजामेंचं ऑपरेशन करायला नकार दिला कारण ......

.......... कारण अशोक सरंजामे हा माझा बाप आहे, हो पपा, तो माणुस माझा बाप आहे ! "

क्रमश:

विशाल.

गुलमोहर: 

विशाल अरे कधी पुर्ण करतो आहेस कथा? किती वाट पहायला लावायची ?
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

विशाल, कट्ट्यावर नुसता TP करण्यापरीस इथे येऊन कथा पूर्ण कर. नाहीतर तिथे सर्वोदय मध्ये येऊन बडवेन.. Angry

Pages