गातो आहे जीवन गाणे

Submitted by निशिकांत on 27 August, 2020 - 22:49

सुखावलो मी, कवेत माझ्या
चंद्र, तारका, शुभ्र चांदणे
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

प्रयोग नवखे करावयाची
आस जागते उरात माझ्या
परंपराही भिनली आहे
जन्मापसुन मनात माझ्या
टाळ्या पडती ऐकुन माझे
जुन्या स्वरातिल नवे तराने
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

लाख संकटे आली गेली
बिलगुन होतो निर्धाराशी
एक कवडसा जरी मिळाला
युध्द छेडले अंधाराशी
संघर्षाच्या वाटेवरती
हास्य भेटले मणामणाने
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

देवाला मी खूप मानतो
कर्मकांड पण मला न रुचते
शरीर देवाचा देव्हारा
अंतरात अस्तित्व भासते
सुन्या सुन्या मंदिरी कशाला
व्यर्थ असावे येणे जाणे
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

प्रसन्न होवुन नको विचारू
"काय हवे तुज" उगाच देवा !
नको दया मज, खरेच माझे
जीवन आहे झकास मेवा
अवघड मार्गी, आनंदांच्या
क्षणांस टिपले कणाकणाने
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

ओला श्रावण, निर्झर,हिरवळ,
गंधित माती सारे माझे
वसंतातल्या पर्णफुटीशी
जुळून जीवन जगलो ताजे
आस न उरली अता कशाची
ओंजळ भरुनी दिले जगाने
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Avadali kavita!