आठवणी

Submitted by गंधकुटी on 25 August, 2020 - 06:27

आठवणींचे डोंबारी
बांधतात कुठेही दोर
कसेही, कधीही येऊन
ठोठावतात मनाचे दार

कधी धरून उन्हाचे कवडसे
अंगणात उतरतात त्यांच्या पोरी
सुखावतात, रमवतात मग
सुखद आठवांच्या झुल्यावरी

कधी ऐन तापल्या दुपारी
झोप उडून जाते दूर
ऐकू येतात त्यांचे ढोल
उसासत, धपापत राहतो उर

कधी सरत्या संध्याकाळी
उडवत येतात गोधूळी
सुखदुःखाचे हिशेब कशाला
हुरहुरत्या कातरवेळी

ताणून काळाची दोरी
झुलत राहतात आठवणी
घटना आणि माणसं
बनतात स्मरणमाळेतले मणी

उत्तर रात्री कधीतरी जेव्हा
हा खेळ आवरतो डोंबारी
झोपेच्या अंमलाखाली तेव्हा
स्वप्न मोहरतात सोनेरी

Gandhkuti

Group content visibility: 
Use group defaults