आधी बीज एकले

Submitted by गंधकुटी on 23 August, 2020 - 12:58

आधी बीज एकले!

कसं वाटत असेल बीजाला
मातीत घ्यायला गाडुन
अंधार सभोवतालचा
घ्यायला दुलईसम ओढून

केव्हा कोणत्या क्षणी त्याला
कसे आतले गुज आकळे
अंधार सारत बाहेर येती
चैतन्याचे कोंब कोवळे

कोण शिकवते अंकुरांना
घ्याया प्रकाशाचा वसा
कोण समजावी मुळांना
त्यांचा मातीचा वारसा

माणसामध्ये का नसावे
बिजामधले उपजत ज्ञान
काय, कसे, कधी धास्तीत
सदा व्याकुळलेले प्राण

कसं जमावं बिजासम
घ्याया निर्मितीचा ध्यास
विसरून सारी भीती
घ्याया मोकळा श्वास

अंधार सांडून मनीचा
देवा, फुटो आशेची पालवी
नाळ जुळो निर्माणाशी
प्रभो, तिमिर मनाचा घालवी

सोपवून तुजवर सारे
निर्धास्त मग मी व्हावे
तुझ्या कृपेच्या सावलीत
मी मम मनास शांतवावे

जीवन सरीतेच्या प्रवाही
मी झोकून मजसी द्यावे
संपवून सारे अट्टाहास
भार तूजवर सोपवावे

नेईल प्रवाह जेथे
तेथे मी आनंदाने जावे
मनामधले ईवले बीज
तेथे निःशंक रुजावे...
तेथे निःशंक रुजावे...

विद्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अनेक वर्ष मायबोलीची वाचक आहे, पहिल्यांदाच काही पोस्ट केले आहे. द्वैत, मनिमोहोर, दाद यांची मी अगदीच पंखा आहे... Hopefully they too wil read and like what I have written.

Thanks.