लिपी आनंदाची

Submitted by ज्येष्ठागौरी on 22 August, 2020 - 09:23

लिपी आनंदाची

काही वर्षांपूर्वी,आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला लेकीनं एक छोटा अल्बम बनवला त्यात Happines is ह्या प्रसिद्ध मालिकेतली काही चित्रं एकत्र करुन आपल्या कुटुंबाचे संदर्भ लागू पडतील अशी चित्रं निवडली.अगदी साधीसुधी आणि गोड..उदाहरणार्थ happiness is playing cards together.आम्ही दोघे मुलं लहान असताना त्यांच्याशी पत्ते खेळायचो ते कुठंतरी आठवून.तो अल्बम बघून एक खात्री पटली की जरी आजच्या स्पर्धेच्या,भौतिक सुखाच्या जगात मुलं वावरत असली तरी आनंदाची व्याख्या कुठं ना कुठं आपल्यासारखीच आहे.
माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये आनंदी माणसांची संख्या जास्त होती असं आता वाटतंय. बहुतेक जण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय होते.बहुतेकांच्या घरी आई, घरीच असायची, बहुतेकांची एकत्र कुटुंब होती.वृद्ध माणसं, लहान मुलं, विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती सांभाळल्या जायच्या सहज. मनातलं बोलायला भरपूर माणसं होती.अगदी तज्ञ नसेल पण सर्वसाधारण मार्गदर्शन मिळायचं.फार तासून तपासून पहायची वृत्ती नव्हती,गरजा खूप नव्हत्या.स्पर्धा कमी होत्या.मनं समाधानी होती.आता
मी आता तुलनेचा उदास सूर लावणारे असं समजू नका, पण सर्व चांगल्या गोष्टी पूर्वी होत्या आणि आता अगदी अंधःकार आहे असं मात्र नाही.पण जग जास्त समाधानी होतं.मामा आणि आई भेटले की हेच म्हणायचे की किती समाधानी होतं आपलं जग,म्हणजेच मागच्या पिढीला त्यांचं जग नेहमीच जास्त स्वस्थ,जास्त समाधानी वाटत आलंय. आत्ता आत्तापर्यंत मी पुढच्या पिढीत होते.जगण्याच्या लढाया लढताना,वेग खूप वाढला होता जगण्याचा.उमेद खूप होती,काम करण्याचा उत्साह आणि वेग जास्त होता.भौतिक गोष्टींच्या मागे पळताना,खऱ्या आनंदाचं मृगजळ पुढे पळत राहिलं. असामान्य अशा श्रीमंतीच्या मागे पळताना सामान्य क्षणातला लाख मोलाचा आनंद मागे पडला आणि अर्थात तेंव्हा ते सगळं योग्यचं होतं. काळाला धरुन होतं, तसं अधून मधून इंद्रधनुष्य दिसावं तसं आनंदाचे छोटे धागे यायचे डोळ्यासमोर. पण परत एकदा चक्रात सापडायला व्हायचं.पण मग काही वर्षांपूर्वी झालेल्या एका मोठ्या अपघातानंतर, पुन्हा एकदा संधी मिळाल्यावर लक्षात आलं की खरंतर आता एकदा आनंदाची ठिकाणं शोधून पहायला हवं.मग हळुहळू तो वेग मुद्दाम कमी केला. एका आयुष्यात सर्व गोष्टी करणं हे मानवी प्रयत्नांच्या बाहेर आहे हे स्वतःला पटलं आणि मग काहीतरी मिळवायसाठी धावायची गरज कमी झाली.सुदैवानं आयुष्यानी तशी मुभा दिली.आयुष्यातल्या अनेक अनिश्चिततेचा अनुभव घेतल्यानंतर,आहे त्या क्षणात आनंदी राहायचा प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे हे थोडं थोडं समजलं.ऑफिसमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन मुलांची शाळा सुटायच्या वेळी अचानक त्यांना पूर्वकल्पना न देता त्यांच्या शाळेच्या दारात उभं राहून त्यांना दिसले की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणत्याही गोष्टींपेक्षा वरचढ आहे हे समजलं.तीच गोष्ट आईसाठी सुट्टी काढून तिच्याबरोबर गप्पा मारण्यात काय सुख होतं हे ती गेल्यावर प्रकर्षानं जाणवलं.माझ्या एका मैत्रिणीला हे मी सांगितल्यावर तिनं माझं बौध्दिक घेतलं, आपलं करिअर, आपला धनसंचय हा कसा महत्वाचा आहे ते सांगितलं.खरंही आहे ते, पण काही गोष्टी वेळ गेल्यावर परत मिळणार नाहीयेत हेही तितकंच खरं नव्हतं का.मुलांची शाळा संपली.आई असण्याचं सुखही संपलं........
घरातल्या जुईच्या वेलाला भरभरुन फुलं लागली. ऑफिसमधून घरी येत असताना घराच्या खाली राहणाऱ्या चंद्रमुखी नावाच्या श्वानानी जोरजोरात शेपूट हलवून स्वागत केलं.घरी पाऊल ठेवलं तर आवरलेलं घर.पुस्तकांचं कपाट आवरताना सापडलेलं एक विस्मृतीतलं पुस्तक.
अरे वा छान आनंदाच्या लिपीतली चार अक्षरं तर सहज सापडली.अरे सोपी आहे ही लिपी.आपल्या आजूबाजूला सहजी वावरणाऱ्या क्षणांमधून, माणसांमधून, परिस्थितींमधून ती आपल्या भोवती असते.
आनंदाची लिपी समजायला सोपी पण उपयोगात आणायला उगाचच कठीण वाटणारी.मुळात मातृभाषेसारखी उपजत असणारी ही लिपी काळाच्या ओघात कुठेतरी लुप्त होऊन जाते.सापडू म्हणता सापडत नाही पण थोडा वेळ स्वतःला दिला की ती आपसूक समोर येते.अर्थात मला ती पूर्णपणे येते असा दावा करणं चुकीचं आहे पण तरीही आता ती दिसायला लागली हेही खूप चांगलं आणि खूप महत्वाचं.
जुनं आठवलं तर लहानपणी बहुतेक आपण सर्व आनंदात असायचो,म्हणजे आनंदी राहणं ही माणसाची उपजत प्रवृत्ती असणार आणि आनंदाची लिपीही उपजत येत असणार. नक्कीच असणार कारण लहानपणी सगळ्या मुलांच्यात अगदी सहजसुलभ आनंद दिसतो.छोट्या छोट्या क्रियांमधून त्यांना खळखळून हसू येतं आणि आनंद चेहऱ्यावर लख्ख दिसतो.
पण एका हिंदी कवीची कविता वाचून मन थिजलं
मेरा खुशी का घडा़
जिसमें
मेरी सारी खुशियाँ
मेरे खूबसूरत सपनें
मेरे प्यारे रिश्तें
मेरी सुनहरी यादें
महफूज़ रखी थी।
उस पर वक्त के ओले जो पडे़
कई छोटे बड़े छेद कर गए।
उन छेदोंसे
मेरे कई सपने बह गए
कई रिश्तें हौले सेे
दरारों से रिस गए,
बस कुछ यादें
अवशेष रह गई।
मी स्तब्ध झाले,आपल्याला हा अनुभव काही नवीन नाही. आपल्या आनंदावर विरजण पडत असतं, कोणी घालत असतं असं नव्हे पण पडत असतं आणि आपण त्याला शरण जात राहतो. आनंद ही आपली मूळची उपजत वृत्ती आहे हे विसरून जातो. विपरीत काळ, नकारात्मक व्यक्ती, विरुद्ध परिस्थती हे मुख्य घटक असतात आपला आनंद संपवणारे,पण कुणाला का दोष द्या,खरंतर आपणच परवानगी देतो ह्या सगळ्यांना,आपला आनंद ओसरु द्यायची, नाही का.आपल्या आनंदाच्या दोऱ्या दुसऱ्यांच्या हातात द्यायच्या नाहीत.नाहीतर आपल्या परवानगीशिवाय कोणाची काय हिम्मत आहे आपल्याला हात लावायची.
आनंदाची लिपी अगदी उपजत येत असते आपल्याला,मुळाक्षरे अगदी पक्की असतात फक्त त्याचा अभ्यास,स्वाध्याय सतत चालू ठेवावा लागतो.ह्या लिपीतून दुसऱ्याशी छान संवाद साधता येतो.खरंतर दुसऱ्यालाही ही लिपी कमी अधिक प्रमाणात येत असतेच.आपण जरा प्रयत्न केला तर समोरच्याला विश्वास वाटतो आणि आपण दोघेही ह्याच लिपीत बोलायला लागतो.समजायला,वापरायला अगदी सोपी
आमच्याकडे आई बापूंना ही लिपी छान अवगत होती,दोघंही अगदी आनंदात रहायचे. आयुष्यात खूप मोठ्या दुःखाना वंचनांना,तुलनांना सामोरं जाऊनही न डगमगता त्यांनी आम्हा तिन्ही भावंडांचं जग आनंदी ठेवलं.आनंदाच्या लिपीची मुळाक्षरं त्यांनी शिकवली आम्हाला.
समाधान, सुख, स्वास्थ्य, ममत्व, जिव्हाळा हे सगळे त्याच लिपीतून निर्माण होणारे ध्वनी आणि शब्द आहेत.ह्या लिपीतून सगळं सकारात्मकच बाहेर येतं, असा अनुभव आहे.आपण आनंदात असताना ईर्षा, तुलना,त्वेष या भावना मनाला शिवत नाहीत कारण आपण स्वतः स्वतःत समाधानी असतो.आपला प्रवास आतल्या दिशेनी असतो ,त्यामुळे बाह्य गोष्टींचा असर होत नाही.मला कशानी आनंद होतो हे माझं मलाच शोधायला लागतं.बुद्ध म्हणतो तसं "एक अनुशासित मन खुशी लाता है।
आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्यांचे घाव काही म्हणता काही केल्यानं निघत नाहीत.अशा वेळी ही लिपी मनात मागे असते पण पुढे येत नाही पण तिचं स्मरण आणि दुरुन का होईना दर्शन हेही पुरेसं असतं. सगळ्यांनाच काही ना काही काळ आयुष्यात दुःख, वेदना,कष्ट पीडा ह्या येतच असतात, त्यावेळी आनंदी राहणं हे अवघड असतं पण सध्या आपण आनंदात नाही ह्याचा स्वीकार हीसुद्धा फार मोठी गोष्ट आहे.आणि सदैव सकारात्मक राहणं हेही अवघड असतं.
कुटुंबात ,संकटात एकमेकांचा हात धरून राहणाऱ्या व्यक्ती ही लिपी छान शिकलेल्या असतात. आनंद ही एक अशी गोष्ट आहे की जी कशावरही,कोणावर अवलंबून नसली पाहिजे.स्वतः स्वतःमध्ये समाधानी असलो तरी नक्की आनंदात राहता येईल.आणि स्वतः आनंदात असल्याशिवाय दुसऱ्याला आनंद देणं केवळ अशक्य!जे आपल्याकडे नाही ते कसं वाटणार?
लिपी म्हणजे एखाद्या गोष्टीचं लिंपण, आनंदाचं लिंपणकाम मनावर केलं की छोट्या छोट्या गोष्टीत खुशहाली मिळते.एकत्र घेतलेलं जेवण,खिडकीतून लांबवर दिसणारा पाऊस, उन्हाचा कवडसा,एखाद्या कवितेची ओळ,आवडीचं पुस्तक, कॉफीचा मग,सुट्टीचा दिवस, कोणासाठीतरी निरपेक्ष केलेली एखादी गोष्ट, अरे भराभर आनंदाच्या लिपीतली अक्षरं दिसायला लागली की.नेहमी आनंदात राहणं अवघड आहे कारण सगळेच जण आपण उंच सखल वाटा चालत असतो पण जेव्हा शक्य आहे तेंव्हा आनंदाची लिपी चाळायला हवी,तिचा अभ्यास व्हायला हवा पुनःपुन्हा!
ओशो म्हणतात की माणसाला तीन प्रकारच्या भावना असतात,सुखाची दुःखाची आणि आनंदाची! आनंदाची व्याख्या ते करतात ती म्हणजे सुख आणि दुःखाचा अभाव म्हणजे आनंद असं ते म्हणतात.खरंतर माझ्यासारख्या सामान्य संसारी व्यक्तीला,ज्यांना जगण्याच्या लढाईत,हे अवघड आहे.आपला आनंद कोणावर किंवा कशावर अवलंबून नसावा असं कितीही कोणी म्हणलं,तरी आपल्या माणसांच्या आनंदानी,त्यांच्या यशानी आनंदून जाणं किंवा त्यांच्या दुःखात किंवा चिंतेत काळजी वाटणं हे स्वाभाविक आहे पण तरीही होता होईतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला हवा हेही तितकंच खरं.मी एकदा अगदी दूरच्या नात्यातल्या व्यक्तीसाठी काहीतरी एक छोटी गोष्ट केली,त्यादिवशी मला शब्दात न सांगता येणारा आणि मावणारा आनंद मिळाला.तसा मला आधी कधी मिळाला नव्हता.मी नेहमी करते ते माझ्या जवळच्या व्यक्तींसाठीच,त्यांच्या भल्यासाठी पण हे काहीतरी वेगळं होतं, त्यादिवशी आईबापूंची खूप आठवण झाली.त्यांनी बोट धरुन जी वाट दाखवली त्यावर मी पहिलं पाऊल टाकलं.आत्ता अचानक भगवान बुद्धांची एक ओळ वाचली Happiness will never come to those who do not appreciate what they already have!आणि आपल्या पोतडीतल्या दप्तरातल्या, आनंदाच्या लिपीची आठवण झाली. Happiness is an inside job..त्यामुळे त्या लिपीकडे पुन्हा एकदा मी डोळे उघडून , डोळे भरुन पाहिलं.पुन्हा पुन्हा....चला आता या वळणावर परत नव्यानं शिकावी ही लिपी, गिरवावं गमभन....
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!!
मुलांची शाळा संपली.आई असण्याचं सुखही संपलं इतकं सुटवंग जगता आलं तर भाग्यवानच म्हणायचं. "आपला धनसंचय" असा आत्मकेंद्री विचार फार थोड्या बायकांचा असतो. धनसंचय करतात पण मुलीला बाईक हवी, सासूला भूतानला जायचं, मुलाला केटरिंगचा बिझनेस करायचा अशा कुठल्या कुठल्या अनवट किंवा वहिवाटीच्या वाटांवर पैसा खर्च होत जातो. पण त्याची गणती तिच्यालेखी आणि कुणाच्याच लेखी नसते. बोलीभाषेतही "बापाचा माल" म्हणले जाते. आईचा माल कुणी म्हणत नाही आणि म्हणल्यावर कितीजणांच्या डोक्यात बापाप्रमाणे पैसा किंवा मालमत्ता येतं? आनंदाच्या लिपीसाठी वर्क-लाईफ बॅलंस हवा हे बरोबर पण फार थोड्या मुली "करियर आयुष्य ग्रासून टाकतं" ह्या टोकाशी आहेत. बहुतेक जणी करियर करायला आवश्यक संसाधने नाहीत ह्या टोकाशी आहेत.