।।मेलेलं कोंबडं।।। (भाग-२)

Submitted by mi manasi on 19 August, 2020 - 05:44

।।मेलेलं कोंबडं।।
(भाग २)

विचारसरशी जुई चालायला लागली होती. पण तितक्यात रस्ता क्रॉस करून सुहास तिच्यासमोर आला देखील. तिला थांबावंच लागलं...

"कशासाठी आलायस?" जुईने शक्य तितक्या कोरड्या स्वरात विचारलं...

"तुला भेटायला जुई! मी तुला भेटायला आलोय... कोण जाणे आता पुढे काय होईल? तुझं-माझं काही झालं तर सांगणारही कोणी नाही. नुसतीच वाट बघत बसू”… सुहास अगदी काकुळतीला येऊन समजावण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

"पण आपले मार्ग वेगळे झालेत आता सुहास! जुन्या रस्त्यावर येऊन पुन्हा पुन्हा मागे वळू नकोस. मी नसेन तिथे आता….मी थकलेय रे...मी जिथून निघाले होते तिथेच पोचवलंस तू पुन्हा मला.. मी आता खूप दूर गेलेय तुझ्यापासून...तू जा आता…जा तू!"

जुई इतक्या आवेशाने बोलली की रस्त्याने जाणारी माणसं मागे वळून बघू लागली होती. ते लक्षात येताच तिने आवाज खाली आणला. हळू पुटपुटली...

"जाऊदे मला."... आणि त्याला वळसा घालून जाऊ लागली.

“जुई प्लिज, एकदाच! फक्त एकदा भेटूया. शेवटचं समज. प्लिज...”

बोलता बोलता सुहासने जुईचा हात धरला. हिसका देऊन आपला हात सोडवून घेत तिने एकदम रागाने त्याच्याकडे पाहिलं. पण त्याची तीच पूर्वीसारखी आर्जवी नजर…तशीच तीच नजरेतली व्याकुळता पाहिली आणि तिचा निश्चय थोडा डगमगला...ती थांबली. आवाजात सहजता आणत म्हणाली...

"बोल, काय नवीन सांगायचंय तुला आता?”

"इथे? रस्त्यात?.."

सुहासने अस्वस्थ हालचाल केलेली जुईला जाणवली. काय करायचं ते न समजल्यासारखी जुई घुटमळली. तिचा होकार समजून सुहास लगेच वळला आणि चालायला लागला...

संमोहित झाल्यासारखी जुई त्याच्या मागोमाग चालू लागली….

चालता चालता पुढे चालणाऱ्या पाठामोऱ्या सुहासला न्याहाळत जुई विचार करीत होती...

किती बदललाय हा! ..आता वयस्कर दिसायला लागलाय… हूं!बिच्चारा!. लायकीची नोकरी शोधता शोधता स्वतःची लायकीच घालवून बसला. निलेशच्याच वयाचा ना हा! निलेश दुसऱ्यांदा बारावी पास झालेला. साधा एक्सरे टेक्नीशियन. पण लग्न करून आता एका मुलीचा बाप झालाय. आणि हा! चांगला बीएस्सी झालाय तरी बेकार फिरतोय अजून...

काकू सांगत होती. चागला बँकेत नोकरीला होता. स्वतःचा ट्युशन क्लास काढायचा म्हणून नोकरी सोडून एका ट्युशन क्लासवाल्या मित्रासोबत जाऊन राहिला तीन वर्षं. सगळं सांभाळायला शिकला होता त्याच्याकडे. त्याने काय! नवीन असतांना गरज होती तेव्हा धरून ठेवलं आणि गरज संपली, तसं घालवून दिलं...

तरीही ह्याने तेच करून दाखवायचं ह्या धडपडीत अजून दोन वर्षं वाया घालवली… क्लास काढायचा तर त्याला हुशारी व्यतिरीक्त अजूनही खूप काही लागतं हे कळलं, तेव्हा नोकरीचं वय उलटून गेलेलं.…

हट्टी! शिकवण्या घेतोय पण शाळेत शिक्षक व्हायचं नाहीय... इतकं आयुष्य वाया चाललंय तरी समजू नये? कसल्या मातीचा बनलाय हा!

आपलं तरी नशीब कसं फाटकं. जीव लागावा तोही अशाच माणसाला! काकूकडे तिच्या मुलाला शिकवायला यायचा ….

जुईच्या मनांत आलं...कदाचित दोघांमध्ये कितीतरी गोष्टी सारख्या आहेत म्हणून जवळ आलो...

दोघांचीही बुद्धिमत्ता फुकट गेली पण त्याची जाणीव काही संपली नाही. आपण इथल्या लोकांपेक्षा खुप हुशार आहोत, खुप वेगळे आहोत हेच डोक्यात घेऊन राहीलो. सुहास नोकरीसाठी आणि मी तशा शिकलेल्या नवऱ्यासाठी...

कधीतरी सगळं मनासारखं होईल अशी आशा होती...

दोघांचीही हरल्यावरही लढाई सुरुच आहे. सगळ्या कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची वृत्तीही सारखीच. आणि कधी कसलीच तक्रार नाही...

मला माहीत होतं शिकायला मिळतं तर खूप पुढे गेले असते मी. फर्स्टक्लास होता बारावीत. गणित, सायन्समध्ये डिस्टींगशन होतं. पण निलेशने ना पुढे शिकू दिलं ना धड नोकरी करू दिली. त्याच्यापेक्षा पुढे जाईन याची भीती वाटली त्याला...दुसरं काय!

नाना गेल्यावर तोच घरातला कर्ता पुरूष होता ना? त्यातून आपल्या आधी जन्माला आलेला. एवढे अधिकार पुरेसे होते अडवायला. नर्सिंगला सुद्धा जाऊ दिलं नाही. का तर नाईट शिफ्ट असते...आता बायको नर्स चालली...

एकच स्वप्न पाहिलं. नवरा गरीब असला तरी चालेल पण शिकलेला हवा. काकूसुद्धा म्हणायची... “जुई तुला ना खूप शिकलेला नवरा मिळायला हवा.”...

कुठे माहित होतं? नुसता शिकलेला असणं पुरेसं नसतं ते!

माहित आहे , अजूनही सुहासला हवं ते करण्याची संधी मिळाली तर तो खुप पुढे जाईल. तेवढी कुवत आहे त्याची! म्हणून तर विश्वास वाटला...

सुहास बराच पुढे गेलेला दिसला. पण जुईचं पाऊल मात्र उचलत नव्हतं. पावलातल्या आठवणींच्या बेड्या तुटत नव्हत्या. आठ महिन्यापुर्वीचा तो प्रसंग सारखा काळजावर डंख मारत होता. त्याची सुहासने वाच्यताही केली नाही हे खटकत होतं. जुई संभ्रमात होती. सुहासला त्या दिवशी काही वाटलं की काहीच वाटलं नाही?...

आठ महिन्यापूर्वीचा तो दिवस तिच्या डोळ्यात उतरला...

क्रमशः
मी मानसी...

मेलेलं कोंबडं भाग -१
https://www.maayboli.com/node/76062

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैत्रगंधा
वावे
उनाडटप्पू
एविता
कमला
Peacelily2025
प्रितम
Mrunali samad
मोहिनी १२३
मुग्धमोहिनी
सगळ्यांना धन्यवाद!
छान प्रतिसादासाठी आभार!