NIVANTPAN

Submitted by 'चंद्र'शेखर पालखे on 16 August, 2020 - 12:39

निवांतपण(मी अनुभवलेलं)

गजबजलेल्या वस्तीपासून थोडंसं दूर- एक छानसं घर एकटंच -
पायथ्याशी असलेल्या
लांबलचक कंटाळवाण्या अंगणात-
भिंतींचे हातपाय ताणून आळस देत बसलेलं.
लांबून चक्क मोरांचा आवाज ऐकू येतोय कानीं...
घरातल्या कोपऱ्यात आहे एक खोली-ती ही एकटीच -पण
तीत आहे एक (रिकामी?)खुर्ची-
भल्या मोठ्या खिडकीशी टेकलेली...
ती खिडकी पाहतेय बाहेर
निवांत-स्वत:मधूनच आरपार.
घरासारखीच ऐसपैस पसरून स्वतःला...
तिला लागूनच एक टेबल- रिकामटेकडं...
सोबतीची वाट पाहत असल्यासारखं....
आणि त्या रिकाम्या खुर्चीत बसलेला मी... मीही रिकामाच-
टेबलावर पडलीय एक डायरी
उगीचच चार दोन-चार दोन
ओळी लिहिलेली-...
वाऱ्याची झुळूक-हलकीशी-
शब्द उडून जाणार नाहीत
अशा बेतानं - हळुवारपणे-
फडफडतंय एक नवंकोरं पान-
शब्दांना तर अजिबातच नाहीये घाई कागदावरल्या मूर्त रूपाची-
शांततेत निमुट वाट पाहणारं
माझं शांत शांत कोरं मन
आणि आतल्या आत वाहणारं
माझं नितांतसुंदर एकटेपण!!!

060620

Group content visibility: 
Use group defaults