माझा ( न ) कोरोना अनुभव

Submitted by मनीमोहोर on 15 August, 2020 - 05:25

ठाण्याच्या वाढत्या कोरोना केसेस आणि परिचितात निघत असलेले पॉझिटिव्ह पेशनट्स मी अगदी उंबरठ्या बाहेर पाऊल टाकत नसले तरी मनावरचा दबाव निश्चितच वाढवत होत्या. तरी ही मॉरल हाय ठेवून कोरोना लॉकडाऊन च्या निराशाजनक वातावरणा मध्ये ही त्यातल्या त्यात आनंदी राहण्याचा माझा प्रयत्न चालला होता. फोनवर बोलून कनेक्ट रहाणे,
Quilting, क्रोशे सारखे छंद जोपासून त्यात मन रमवणे जाणीवपूर्वक केलं जातं होतं.

एक दिवस सकाळचं आटोपून मैत्रिणी शी फोनवर बोलून जरा रिलॅक्स झाले होते तेवढ्यात यजमानांनी हाक मारून त्याना जरा ताप आल्या सारख वाटतय असं सांगितलं मात्र, माझ्या मनात नको तोच विचार पहिल्यांदा आला. हात लावून बघितलं तर एवढं गरम वाटत नव्हतं अंग पण dr नी विचारलं तर सांगता येईल म्हणून थर्मामीटर लावला. दोन मिनिटानी ताप बघितला आणि माझ्या पाया खालची वाळूच सरकली कारण थर्मामिटर ताप दाखवत होता 103.

सर्व प्रथम काय केलं तर तोंडावर मास्क बांधला आणि त्यांच्या कापाळावर मिठाच्या पाण्याची घडी ठेवली. फार अंतर ठेवणे जरी शक्य नव्हते तरी जास्तीत जास्त ते मेंटेन करण्याचा प्रयत्न मात्र मी नक्कीच करत होते. केमिस्ट ला फोन करून मास्क, ग्लोव्हज, गन थर्मामीटर, सॅनिटायझर ,ऑक्सिमिटर वैगेरे घरी आणून देण्याची विंनती केली कारण आता मला कदाचित त्याची जास्त गरज भासणार होती. ताप जरी होता तरी ते तसे बरे होते. शांतपणे झोपले होते. श्वास लागणं, अस्वस्थ वाटणं अशी काही चिन्हे नव्हती. नंतर मी आमच्या फॅमिली डॉक्टर ना फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. " तुम्ही अजिबात घराबाहेर पडल्या नाही आहात तर काळजी करू नका , साधा ताप असू शकेल " अश्या शब्दात त्यांनी मला धीर दिला आणि एक क्रोसीनची गोळी ताबडतोब द्यायला सांगितली तसेच संध्याकाळी प्रत्यक्ष तपासावे लागेल असं ही म्हणाले.

इथे आम्ही दोघेच असतो . कोणालाही प्रत्यक्ष येऊन मदत करणे किंवा मी काही मदत मागणे किती कठीण आहे ह्या आजारात ह्याची जाणीव होऊन मला अधिकच अगतिक वाटलं. बाहेरगावी असलेल्या मुलांना इथले छोटे छोटे प्रॉब्लेम जरी सांगत नसलो तरी ही एवढी मोठी गोष्ट त्याना न सांगणं शक्यच नव्हतं. सगळं धैर्य एकवटून मुलाला फोन लावला आणि त्याला ही बातमी सांगितली. तिकडे मुलं ही काळजीत पडली. दूर असल्याने प्रत्यक्ष मदत करणं शक्य नसल्याने त्याना ही जास्तच अगतिक आणि हतबल वाटत होतं. परदेशातून इकडे येणं सध्याच्या काळात अजिबातच सोपं नाहीये ह्याची परत एकदा प्रचिती आली. लवकरात लवकर म्हणजे दहा दिवसानी त्याला येता येणार होत अशी प्रायमरी माहिती मिळाली. परंतु त्यानी तिकडून खूप सूत्र हलवली. मित्र आणि नातेवाईकांची सपोर्ट सिस्टीम फोन वैगेरे करून उभी केली. त्या मंडळींचे ही धीर देण्याचे मला फोन आले आणि थोडा जीवात जीव आला.

एवढ्या हाय फिवर मध्ये पचायला हलकी म्हणून यजमानांसाठी मी पेज केली . नवल म्हणजे त्यानी ती तर आवडीने खाल्लीच पण नॉर्मल पोळी भाजी ही मागितली. हाय फिवर मुळे त्याना कळत नाहीये ते काय मागततायत अस मला वाटलं☺ म्हणून मी आज नका खाऊ पोळी अस ही सुचवलं. पण त्यांनी फारच हट्टच केल्याने मला द्यावीच लागली पोळी भाजी .

जेवण झाल्यावर ते परत झोपून गेले शांतपणे. पण मी मात्र फोन वर बोलून आणि पुढे काय वाढून ठेवलं आहे ह्या विचाराने अगदीच थकून गेले होते. जेवायची ही इच्छा आणि ताकद राहिली नव्हती तरी दोन घास कसे बसे खाऊन घेतले. माझे नातेवाईक आणि मुलं फोनवरून चौकशी करून धीर देत होते हाच त्यातल्या त्यात दिलासा होता.

तशात दुपार झाली. आता परत एकदा ताप चेक करू या म्हणून त्यांना मी त्याना उठवलं. ते फ्रेश वाटत होते. तसेच मी छान आहे , तीन ताप होता अंगात अस वाटतच नाहीये अशी पुष्टी ही जोडली. मी ही जरा उत्साहाने त्यांना थर्मामीटर लावला बघितलं तर मलाच ताप भरायची वेळ आली कारण तो ताप दाखवत होता 104 डिग्री. हताश होऊन मी दुसऱ्या खोलीत आले. आता dr कडे जाण्या शिवाय पर्याय नाही अशी खूणगाठ मनाशी बांधली आणि विमनस्क अवस्थेत पुढे काय आणि कसं करायचं ह्याचा विचार करत बसले .

दिवसभराच्या दगदगीमुळे मला हो थोडं फिवरीश वाटत होतं, त्यामुळे मी ही थर्मामीटर लावला अन ताप बघितला तर तो दाखवत होता 105 डिग्री ... हे बघून मात्र मी आंनदाने वेडीच व्हायची बाकी होते . इतका हाय फिवर बघून आनंदित होणारी मी जगातली पहिलीच। व्यक्ती असेन कदाचित पण तो माझ्यासाठी मात्र युरेका मुमेंट होता. कारण तापाच कोडं सुटल्या सारखं वाटत होतं. मला स्वतःला आतून अजिबातच एवढा ताप भरलाय अस वाटत नव्हतं. . म्हणजे त्यांना ही कदाचित ताप नसेल ह्या विचाराने हात लावून बघितलं तर त्यांचं अंग ही नॉर्मल वाटत होतं. आता थर्मामीटरमध्ये काही तरी झोल आहे ह्याची जवळ जवळ खात्री पटली असली तरी त्यावर शिक्कामोर्तब करणं बाकी होतं. केमिस्टला ऑर्डर केलेल्या वस्तू अर्जंटली पाठवण्याची विंनती केली. अर्ध्या तासात नव्या थर्मामीटर ने ताप बघितला तर तो माझा आला 97. 5 आणि यजमानाचा आला 97

दोघांचा नॉर्मल ताप बघून त्या क्षणी काय वाटलं हे शब्दात सांगणं शक्यच नाहीये. मुलांना आणि नातेवाईकांना ही फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली . त्यांच्या ही डोक्यावरच मोठंच ओझं उतरल्या सारखं झालं. एकदा ताप नाहीये हे कळल्यावर मात्र सगळी मंडळी थट्टा विनोद करण्यात, माझी मस्करी करण्यात दंग झाली . मी तर पुढचे दोन चार दिवस तो झोलवाला थर्मा मीटर लावून माझा नसलेला चार ताप खूप एन्जॉय करत होते. ☺

कोरोनाची ही झलकच हे प्रकरण किती कठीण आहे ह्याची कल्पना यायला पुरेशी होती. त्यामुळे ह्यातून सही सलामत सोडवल्याबद्दल देवाचे आभार मानले आणि संपूर्ण जगाच्या कोरोना मुक्ती साठो प्रार्थना ही केली.

अश्या तऱ्हेने एकंदरच रोलर कोस्टर असणारा हा दिवस शेवट गोड झाल्यामुळे अविस्मरणीय झाला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमाताई, आधी काळजी वाटली. शेवटाकडे मात्र हळूच हसायला आलं.
तुम्हाला दोघांनाही उत्तम आरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा.
''त्या'' च्याबरोबर तुमची लांबूनच ओळख असू दे.

ममो
105 वगैरे वाचून जाम घाबरले
तो थर्मोमीटर दृष्ट लागू नये म्हणून देवघराजवळ ठेवा Happy

शीर्षकात "(न)" वाचून आणि हाताला अंग गरम लागत नसताना १०३ अंश हे वाचून अंदाज आला.
तुम्हाला एकदम किती हायसे वाटले असेल.

ममो, नुसतं वाचून आमचे हिंदोळा खूप वर गेला आणि तितकाच खाली आला, तुमचं काय झालं असेल याचा पूर्ण अंदाज आला, थर्मामीटरच्या बाबतीतही सेकंड ओपिनियन घ्यायला हवं हा धडा मिळाला

हर्पेन +१

वाचता वाचता एक सेकंद टेन्शन आलं, मग 'न' असल्यामुळे ते कमी झालं आणि तुमचा १०५ वाचल्यावर थर्मामीटर गंडल्याची शंका आलीच.

असो. उत्तम आरोग्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

हर्पेन +१

ममो, तू तसे धीराने घेतलेस त्याचे पण कौतुक. कारण नुसते टेस्टचे नाव ऐकले तरी पुढचे दृष्य डोळ्यासमोर उभे राहतेय. ओके ! आता काळजी घ्या. मास्क, सॅनीटायझर / साबण हे पण आता रोजच्या जीवनाचे कायमचे भाग झालेत.

Lol
डिजिटल थर्मामीटरचा असा अनुभव मलापण एकदा आलाय. लेकाला ताप आला होता म्हणून थर्मामीटर लावला तर १०४! आम्ही घाबरलोच. पण हाताला तर एवढा लागत नव्हता. मग जुना पाऱ्याचा थर्मामीटर लावला तर १०२. तोही जास्तच आहे पण जरा बरं म्हणायचं.
नंतर खूप दिवस जुनाच थर्मामीटर वापरला. तो नंतर एकदा माझ्या हातून पडून फुटला. आता एकूण ३ थर्मामीटर आहेत घरात. दोन डिजिटल आणि एक पाऱ्याचा. Happy

पार्‍याचा थर्मॊमिटर एकदा तपासून बरोबर आहे याची एकदा खात्री केली की तो कधी खराब होत नाही. क्रॅकवगैरे जाउन थोडाफार पारा बाहेर गेल्याशिवाय.

वाचताना बाप रे अजून एक अनुभव आला असे झाले पण शेवटाला हसूही फुटले. किती टेन्शन आले असेल पण तुम्ही धीराने घेतलेत. उत्तम आरोग्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

प्रतिसादासाठी आणि शुभेच्छां साठी सगळ्याना खूप खूप धन्यवाद.

तुम्हाला दोघांनाही उत्तम आरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा.
''त्या'' च्याबरोबर तुमची लांबूनच ओळख असू दे. >>अनया थँक्यू .

जबरदस्त झोल.. >> खरंय जबरदस्त झोल निरु.

तो थर्मोमीटर दृष्ट लागू नये म्हणून देवघराजवळ ठेवा Happy >> अनु ☺

हार्पेन , बरोबरे , माझ्या ही मनात तेच आलं. थर्मामीटर वर पण खूप विसंबून चालणार नाही. आणि तारतम्य वापरायला हवे हेही.

ममो, तू तसे धीराने घेतलेस त्याचे पण कौतुक. कारण नुसते टेस्टचे नाव ऐकले तरी पुढचे दृष्य डोळ्यासमोर उभे राहतेय. ओके ! आता काळजी घ्या. मास्क, सॅनीटायझर / साबण हे पण आता रोजच्या जीवनाचे कायमचे भाग झालेत. >> खरंय रश्मी.

वावे हा ट्रॅडिशनल पाऱ्याचा थर्मामिटर आहे आणि मागच्याच आठवड्यात ह्याने बरोबर ताप दाखवला होता. ह्या वेळेसच गंडला.

उत्तम आरोग्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. >> प्रज्ञा थँक्यू.

असो पण काही झालं नाही हे आणखीन छान >> आदु तेच ...

तुम्हाला एकदम किती हायसे वाटले असेल. >> मानव ते शब्दातोत आहे.

हा हा
काकांचा दुसरया वेळीही ताप मोजला तेव्हा रहस्य उकलले होते.
पण टेंशन नक्कीच आले असणार. परदेशातील मुलांना सुद्धा टेंशन आले असणार. बरं झाले रात्र गेली नाही या टेंशनमध्ये.. की परदेशातील मुलांची गेली?

बाकी मी तर सध्या कोरोना आपल्याला होऊ शकतोच याची मनाची तयारी केली आहे उगाच ते धीर खचून आहे ती परिस्थिती आणखी गंभीर व्हायला नको. आपणच का? असा विचार झालाच कोरोना तर मनात यायला नको.

ममो _/\_, सुरवातीला वाचताना माझीही तंतरलीच. बर्याच दिवसात तसेही तुमचे लेखन नाही.
असो, काळजी घ्या, गणपतीत मोदक स्पर्धेत तुमच्या कळीदार मोदकांची वाट बघतोय.

ऋ, मनाची तयारी केली ते चांगले आहे, पण "तो" कोणाच्याही जवळ फिरकायला नको.

न झालेल्या कोरोनाबद्दल अभिनंदन.
अजून एक वर्षतरी असेच काढावे लागेल अशी परिस्थीती आहे.माझा अंदाज असा आहे की भीती,व्यवसायाचे /नोकरीचे टेंशन ,आर्थिक संकट,अंगाला चलनवलन नसणे आणि सतत प्रचंड दडपणामुळे कोरोनापेक्षा जास्त मृत्यु होतील.

अर्ध्यातच अंदाज आला शिर्षकामुळे.☺️
थर्मामिटर गोंधळ आमच्याकडे पण झाला होता. नविन आणला तेव्हा व्यवस्थित काम केले अन लगेच दुसऱ्या दिवशी गडबडला. काही केल्या लवकर वाजेचना, बदलून घेतला मग.
आमच्याकडे बिपी मशीन, वजनकाटा सगळे किमान दोन जण वापरतो एका वेळी खात्री करायला, तसेच थर्मामिटर चे पण हल्ली

लेख वाचताना पण एकदम रोलरकोस्टर सारखं वाटलं! शीर्षक वाचलं तेव्हा तुमचा अनुभव नसणार हे कळलं पण काकांचं थर्मामीटर रिडींग वाचून धस्स झालं. शेवटी हुश्श झालं आणि थोडं हसूही आलं!
काय ना पण आपण साध्या तापाला देखील किती घाबरायला लागलोय!

लेख वाचताना सुरुवातीला थोडी धाकधूक वाटत होती . पण शेवट सुखदायक हे पाहून हुश्श झालं . तुम्हा उभयतांना खूप साऱ्या शुभेच्छा

ममो घाबरवलंस ना आधी! पण सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे शीर्षकावरून थोडी कल्पना आली होती. आता थर्मामीटर पण फ्रॉड निघतय म्हणजे बघायलाच नको. पण वेळीच लक्षात आलं तुझ्या हे खुपच बरं झालं . हो तापाची हल्ली भिती वाटतेच पण जरा घसा दुखायला लागला तरी सॉलिड तंतरते माझी. पटापट गरम पाण्याच्या गुळण्या, गरम पाणी पिणे चालू.
असो, तुम्ही दोघं ठिक आहात, जीव भांड्यात पडला.

पण वेळीच लक्षात आलं तुझ्या हे खुपच बरं झालं
>>>>>
ईथे मनात विचार आला की खाजगी हॉस्पिटल गाठले असते तर त्यांनी काही नसताना लाखभर रुपयाला कापूनच सोडले असते.

ओहह हेमाताई खुसखुशीत. आधी धडकी भरली होती.

अशीच मजा माझ्याबाबतीत झाली, खाली सोसायटीत चेक करतात रोज. मधे सकाळी दुध घेऊन आल्यावर watchman काकांनी चेक केलं, लाल सिग्नल, शंभर ताप. मी म्हणाले शक्यच नाही, साधी कणकणपण नाहीये अंगात, मी घरी चेक करते, नाहीतर तुम्ही परत झिरो करून चेक करा. तसं केल्यावर 97 दाखवलं. त्या काकांनी बहुतेक आधीचे झिरो केलं नव्हतं आणि मी पण लक्ष दिलं नव्हतं नीट.

सगळ्यांना प्रतिसादासाठी आणि शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.

ऋ ,मुलांचा ही दिवस होता , रायरी पर्यंत मिटलं सगळं.
किती ही तयारी असली मनाचे प9 तरी तो नको येऊ दे जवळ हीच प्रार्थना !

पाफा , थँक्यू . मोदक करायचा विचार आहे पण सध्या घराबाहेर जात नसल्याने सगळं डिमार्ट बिग बास्केट वर अवलंबून आहे.

अजून एक वर्षतरी असेच काढावे लागेल अशी परिस्थीती आहे.माझा अंदाज असा आहे की भीती,व्यवसायाचे /नोकरीचे टेंशन ,आर्थिक संकट,अंगाला चलनवलन नसणे आणि सतत प्रचंड दडपणामुळे कोरोनापेक्षा जास्त मृत्यु होतील. >> खर आहे. सध्या तरुण ,लहान मुलं, म्हातारी माणस, देशात राहणारे ,परदेशात राहणारे , नोकरी असलेले, नसलेले, असे सगळेच न पेलणाऱ्या लेव्हलच्या स्ट्रेस मध्ये आहेत.

काय ना पण आपण साध्या तापाला देखील किती घाबरायला लागलोय! >> हो ना , आणि धनुडी म्हणली तस थोडा घसा दुखायला लागला तरी घाबरायला होतंय.

अशीच मजा माझ्याबाबतीत झाली, खाली सोसायटीत चेक करतात रोज. मधे सकाळी दुध घेऊन आल्यावर watchman काकांनी चेक केलं, लाल सिग्नल, शंभर ताप. मी म्हणाले शक्यच नाही, साधी कणकणपण नाहीये अंगात, मी घरी चेक करते, नाहीतर तुम्ही परत झिरो करून चेक करा. तसं केल्यावर 97 दाखवलं. त्या काकांनी बहुतेक आधीचे झिरो केलं नव्हतं आणि मी पण लक्ष दिलं नव्हतं नीट. >> अंजू तू खूपच धैर्य दाखवलस.

मला अस वाटत की हे माझ्या लक्षात आलं नसत आणि माझ्या विंनतीवरून dr नी चिठीवर औषध दिलं असत तर फारच अनर्थ ओढवला असता. पण देवदयेने तसं काही झालं नाही.

ईथे मनात विचार आला की खाजगी हॉस्पिटल गाठले असते तर त्यांनी काही नसताना लाखभर रुपयाला कापूनच सोडले असते. >> पैशापरी पैसा गेला असता आणि वर मनस्ताप किती झाला असता.

हुश्श !!! घाबरवलंत हा ममो Lol
थर्मॉमिटरचा असा यडपट अनुभव आम्हाला आलाय. काही वर्षांपूर्वी नवर्‍याला सडकून ताप भरला होता - तीन किंवा चार नक्कीच असावा पण थर्मॉमीटरवर एकशे सहा फॅ ( हो, एकशेसहा !!! ) आला आणि बंदच पडला थर्मॉमीटर Proud अशीच पायाखालची जमीन सरकली होती. जवळ हॉस्पिटलही नव्हतं त्यावेळी - बहुधा म्हणूनच दुसर्‍या थर्मॉमीटरने ताप बघायचं लगेचच मनात आलं. पण तो एवढा तापला होता की काँबिफ्लाम, डोक्यावर पाण्याच्या घड्या हे आधी केलं आणि मग शेजार्‍यांकडे गेले तर म्हणे आम्ही नाही ठेवत थर्मॉमीटर ( विक्षिप्त शेजारी ! Proud ). बिल्डिंगमधली माझी नेहेमीची मैत्रीण नेमकी मुंबईला गेली होती. दुसरा थर्मॉमीटर शोधून आणेपर्यंत एकशेएकपर्यंत खाली आला ताप.
मग डिजिटल बरोबर आठवणीने साधा पार्‍याचा थर्मॉमीटरही आणला होता तर तो फारच कुचकामी निघाला... त्यातला पारा पुढेच जायचा नाही Lol
खरंच एकशेसहा ताप होता की थर्मॉमीटरचं डोकं सटकलं हे कंन्फर्म होऊ शकलं नाही पण त्याचीच सटकली असावी कारण नवर्‍याचा ताप नंतर परत दोनपर्यंतही चढला नाही आणि फक्त क्रोसिनवर एक दिवसात बरा झाला.

गेले तर म्हणे आम्ही नाही ठेवत थर्मॉमीटर ( विक्षिप्त शेजारी ! Proud ) >> असून सांगत नसतील. नाहीतर त्यांनी नसता का मागितला कधी तुमच्याकडे?

Pages