"कणकण" : एक सामाजिक विश्लेषण !

Submitted by Charudutt Ramti... on 15 August, 2020 - 03:32

सध्या पृथ्वीतलावर मानव जातितील उत्क्रांतीच्या प्रवासात ‘न भूतो न भविष्यती’ अश्या प्रकारची एक क्रांती घडत आहे. “क्रांतीस ऊत येतो तेंव्हा उत्क्रांती घडते!” - हा माझा वैयक्तिक प्रमेय आहे. ह्या प्रमेयाचा डार्विनच्या उक्रांती विषयक प्रमेयाशी दुरान्वये सुद्धा काही संबंध नाही, आणि असल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.

सर्दी, थंडीताप, कणकण, कसकस, अंग दुखून येणं, बारीक ताप वगैरे किरकोळ तक्रारिंवर 'आयुर्विज्ञानातील उपलब्ध उपचार पद्धती' आणि त्या विषयीची (एकंदर बरीचशी चुकीची) माहिती ह्या विषयी समाजात एकंदर आलेला ऊत
पाहता, पुढे जाऊन शंभर वर्षांनंतर कदाचित हिंदुत्ववाद्यांचे म्हणणे कम्युनिस्टांना एक वेळ पटेल किंवा फारतर ‘खादी’वादी काँग्रेसिंचे आणि 'लाठी'वादी RSS वाल्यांचे सुद्धा मनोमिलन होईल परंतु, आयुर्विज्ञान ह्या (बोधी)वृक्षाच्या ऍलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी ह्या तीन मुख्य शाखांच्या धन्वंतरिंचे ह्या पृथ्वी तलावर कधी एकमत होणार नाही, उभ्या जन्मात. पण त्या ही पेक्षा हे प्रॅक्टिशनर्स एक वेळ परवडले पण ह्या शाखांच्या fan followers ची मला मला कायमच प्रॅक्टिशनर पेक्षा जरा अधिकच धास्ती वाटत आलेली आहे. हे आयुर्वेद, ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी चे fan followers म्हणजे नाका पेक्षा मोतीच जड.

“साधा ताप आहे, एक क्रोसीन घे आणि जा कामावर! काही झालेलं नाहीये तुला” - इथं पासून ते,

"वेडायस काय? क्रोसीन पेक्षा दोन त्रिभुवन कीर्ती वटी आणि दोन सूतशेखर रस घे गरम हळद दुध बरोबर, बरं वाटेल, सकाळ पर्यंत, जाऊ सकाळी सिंहगड ला सायकल नं” - असलं आचरट काही तरी. सूतशेखर-रस हा प्रत्यक्षात कोणताही ‘रस’ नसून ती सुद्धा त्रिभुवन कीर्ती प्रमाणे एक ‘वटी’चआहे, आणि त्याचे दोन डोस सुद्धा तुमच्या आनंदी जीवनात 'विरस' निर्माण करण्यास पुरेसे आहेत, हे इथे मी नम्र पणे नमूद करू इच्छितो.

आणि त्याहून पुढे जाऊन…

“अरे काही ही धाड भरलेली नाही तुला, ‘मानसिक’ आहे सगळं तुझं , एक फोन नंबर देतो , त्यांची अपॉइंटमेंट घे , होमिओपॅथी चा पुण्यातले सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिशनर आहे. पार अगदी परभणी पासून पेशन्ट येतात. तीन महिने ट्रीटमेंट घे , परत तुला आयुष्यात सर्दी होणार नाही, लिहून घे! मेंटल स्ट्रेस हे सततच्या सर्दीचं मुख्य कारण आहे. " - इथं पर्यंत! ता मला एक सांगा आता प्रॅक्टिसिंग होमिओपॅथ कडे 'अगदी परभणी पासून पेशंट येणे!' म्हणजे काय जागतिक दर्जाची 'सर्टिफिकेशन' ची आणि रँकिंग जगन्मान्य पद्धत आहे का? म्हणजे तुम्हाला गोल्ड मेडल वगैरे नसलं तरी चालेल, पण परभणी पासून येतायत नं पेशंट्स, मग भारी बरका डॉक्टर, असलं काहीतरी भन्नाट लॉजिक!

न विचारताच दिले गेलेले फुकटचे असंख्य सल्ले वाटत ह्या तिन्ही "पॅथ्यांचे" प्रचारक आपापल्या परीने आपापल्या आवडीच्या उपचार पद्धतींचा अगदी फुकट प्रचार करत सुटलेले असतात. मुख्य म्हणजे ह्यांच्या पैकी एकाकडे ही डॉक्टर ची डिग्री सोडाच साधा कंपाउंडर चा डिप्लोमा सुद्धा नसतो. परवा तर माझ्या एका मित्रानं सांगितलं की "मला किंवा घरच्यांना ताप वगैरे आला तरी मी कधीच डॉक्टर कडे जात नाही. आमच्या शेजारी एकजण पूना हॉस्पिटल मध्ये आहेत , त्यांच्या कडून गोळ्या आणतो." मी विचारलं ते तुझे शेजारी काय पूना हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहेत का ? तर मला वेड्यात काढत म्हंटला "छ्या, अरे तो साधा अकाउंटंट आहे पूना हॉस्पिटल ला" . मी पुढं विचारणार होतो “मग त्याच्या औषधांनी बरं नाही वाटलं तर काय, पूना हॉस्पिटलला जनरेटर साठी लागणारं डिझेल सप्प्लाय करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर कडून प्रिस्क्रिप्शन लिहून घेतोस काय?” पण म्हंटल राहूदे , विषय नको वाढवायला.

पण सांगायचा मूद्दा हा की वैद्यक शास्त्रातील नसलेल्या ज्ञाना बद्दल आत्मविश्वास मात्र प्रचंड असतो ह्या फ्री लान्सर कॅन्सल्टंट्स लोकांच्याकडे. हे लोक ह्या जाहिराती करीता आणि प्रचारा करीता एक पै सुद्धा घेत नाहीत म्हणून. नाहीतर जर 'कमिशन बेसिस' वर काम केलं असतं ह्या ' वैद्यक शास्त्राच्या विविध शाखांच्या प्रचारक' लोकांनी, तर एल.आय.सी. एजंट आणि इस्टेट एजंट सुद्धा फिके पडले असते ह्यांच्यापुढे.

खरं सांगायचं, तर थंडी ताप, कणकण वगैरे आल्यावर चटकन 'क्रोसीन' किंवा 'ऍनॅसीन' वगैरे घेऊन 'सुखासीन' पणे पांघरूण घेऊन, ऑफिसला दांडी मारत, दुपारी चांगली पाच तास झोप काढणे ह्या पेक्षा जगात दुसरा आनंद नाही. पण ऍलोपॅथीच्या द्वेषाने पेटून उठलेला कुणीतरी आयुर्वेद अभ्यास शाखेचा परमभक्त अश्यावेळी नेमका कडमडतो…

“ अरे मूर्ख माणसा, सारखी सारखी 'ऑफ द काउंटर मेडिसिन्स' घेऊन घेऊन 'तुझी रोगप्रतिकारक शक्ती पार नष्ट झाली आहे! त्या ५०० , ५०० एम.जी. च्या गोळ्या घेणं आधी बं-द्द-क्क-र आणि आयुर्वेदिक उपचार सुरु कर.” - असं मला ठणकावंत, दुर्वास ऋषींनी इंद्रा ला द्यावा तसा शाप दिल्यासारखा माझ्या शी (फोन वर) बोलतो आणि माझा ऍलोपॅथी ह्या औषधोपचारांच्या प्रभावीपणा विषयी असलेला सगळा कॉन्फिडन्सचं पार गळून पडतो.

त्यानंतर मग माझी ऍलोपॅथी नावाची डेक्कन क्वीन ट्रॅक बदलत एकदम मिरज-पंढरपूर बार्शी लाईट सारखी आयुर्वेद नावाच्या नॅरो गेज ट्रॅक वर येते आणि, “पाणी भरायला म्हणून पंधरा मिनिटं थांबणारी गाडी, दीड तास झाला तरी स्टेशनातून हलूच नये!” तशी एकाच जागे वर अडकून पडते. एक वेळ गाझा पट्टी , पाक occupied काश्मीर , अकसाई चीन , चायना-हॉंगकॉंग , चायना-तैवान, इंग्लंड आणि नॉर्दन आयर्लंड, असले जागतिक वाद सुटतील , पण ऍसिडिटी झाल्यावर अँटासिड म्हणून जेल्युसील घ्यायचे की पित्तनाशक आवळांमृत? घसा खवखवू लागल्यावर ऑरेंज फ्लेवर स्ट्रेपसिल्स घ्यायचे की कंठ सुधारक वटी? पोट बिघडल्यावर ग्लुकॉन डी घ्यायचे की हिन्गतुपादी? अशक्त पणा आल्यावर बी कॉम्प्लेक्स च्या गोळ्या घायचा की च्यवनप्राश? हे असले घरगुती मतभेत सुटतील अशी काही लक्षणं नाहीत.

खरं पहायला गेलं तर साधी सर्दी आणि किंचित कणकण. पण, औरंगजेबाने शहाजहानला आग्र्यात कैद करून हाल हाल करत विषप्रयोग करून वगैरे ठार मारले तसले प्रयोग माझ्यावर करत, जागतिक आरोग्य संघटनेने सोडाच पण भारतातील एका साध्या जिल्हापरिषदेतील आरोग्य खात्याने सुद्धा अजून मंजुरी दिली नसलेले औषधोपचार हे निःशुल्क सल्लागार लोक माझ्या शरीरावर सुरु करतात, त्यांच्या "जहरील्या" औषधोपचारांचे.

"वाsफ घे वाsssफ निलगिरी च्या तेलाचे चार थेंब टाकून ! " - ह्या वाफे पासून माझी ट्रीटमेंट सुरु होते. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॉट नावाच्या शास्त्रज्ञानं सुद्धा लोकोमोटिव्ह इंजिनाचा पिस्टन पुढे सरकवा म्हणून, त्याच्या पहिल्या इंजिनाच्या सिलेंडर मध्ये जेवढी भरली असेल, त्याहून कितीतरी जास्त प्रमाणात गरम वाफ मग माझ्या घाणेंद्रियां मधून प्रवास करत श्वासनलिकेला चटके देत माझा जीव गुदमरवून टाकते.

ते कमी पडतं की काय मुळातंच दिसायला सुंदर असलेल्या ललना अधिक सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन कसे फेशिअल करतात? त्या पद्धतीने माझ्या कपाळावर लेप लावला जातो. पण तो लेप फेस पॅक वगैरे चा असला तर "पुरुषजन्मा ही तुझी कहाणी" कसली? आज घेतलेली वस्तू उद्या जर खराब लागली म्हणून बदलून आणायला गेलं की पेठेतले दुकानदार कसा गिऱ्हाईकाचा स्वाभिमान कसा ठेचतात तसा स्वयंपाकाघरातून मनसोक्त पणे खलबत्यात ठेचून आणलेला हा फेशिअल पॅक म्हणजे आल्याचा लेप जळजळीत तिखट रस माझ्या श्रीमुखास फासला जातो, बाटा कंपनी च्या चामड्याच्या बुटांना चेरी ब्लॉसम च्या काळ्या कुळकुळीत क्रीम ने पॉलिश करावं तसा. मी आता त्या आल्याच्या किंवा सुंठेच्या रसामुळे त्वचेवर होणाऱ्या लाही ने जवळ जवळ चक्क शंख नाद करायचा बाकी असतो. माझ्या काळ्या पाण्याची शिक्षा अजूनही कमी पडते की काय असं ह्यांना वाटतं, आणि कुणीतरी गॅस वर चांगलं उकळून उकळून उतू गेलेलं गरम गरम वाफा येणारं दूध आणि त्या दुधात चांगली दीड चमचे हळद घालून माझ्या आधीच दुखणाऱ्या घश्यात ओतण्यासाठी गरम गरम पेल्यात घेऊन माझ्या अंथरुणा जवळ उभं राहतं. ह्या असल्या भयंकर औषधीमुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या ह्या 'घरघुती औषधोपचार तज्ज्ञांची” मी त्यामुळं प्रचंड धास्ती घेतली आहे.

“घे पटदिशी पीsss! दूध गार होण्याच्या आत, चांगला शेक बसू दे घश्याला !”. - माझ्याच घरातील कुणीतरी अघोरी प्रवृत्ती.

“अर्रsssये , मला घश्याचं किरकोळ इन्फेक्शन झालंय, मला काय घटसर्प झालाय काsss? एवढं कढत्त कढत्त हळद आणि दूध माझ्या घश्यात ओतायला?” - माझ्याच घरातील एक घरगुतीऔषधोपचार पीडित व्यक्ती (अर्थात मी)

“गप्प बैस...घे पटकन हळद दूध” - अघोरी प्रवृत्ती.

"अहो 'घसा' आहे तो माझा, तुमच्या न्हाणीघरातली मोरी नाही ! जरा तुंबली असं वाटलं की किवी ड्रेनेक्स चं पाकीट फोडून वर दोन ग्लास पाणी ओतून साफ करायला ! " - माझा प्रचंड त्रागा सुरु असतो. . पण माझ्या त्राग्याला इथं कोण भीक घालतोय ?

हे सगळं कमी पडलं की काय म्हणून, “ अरे अगदी कोमट्टच्चे, हे बघ बोट बुचकळून पहा कोमट्टच्चे” असं म्हणत जवळ जवळ पंचाणऊ औंष सेल्शियस इतके गरम केलेल्या पाण्याच्या आणि ‘फक्त अर्धा चमचा’ ‘फक्त अर्धा चमचा’ म्हणत म्हणत वसई किंवा विरार साईडच्या एखाद्या मिठागरात सहा महिन्यात जेवढं मीठ तयार होईल साधारण तेवढं सगळं मीठ त्या ग्लास भर उकळत्या पाण्यात यशस्वी रित्या विरघळवून भयंकर खारट झालेल्या पाण्याच्या त्या असह्य अश्या गुळण्या. वर भूतलावर बोलल्या जाणाऱ्या एकंदर कोणत्याही भाषेत त्याच्या वैशिष्टयपूर्ण चवीसाठी एकही योग्य शब्द नसलेला असा तो तुरट, करपट आणि कडवट असा तो दिवसातून तीन तीन वेळा घ्यायचा तुळशीच्या पानांचा आणि गुळवेलचा तो रोग्याचे पित्त खवळवून टाकणारा काढा. आयुष्यात कधीही न जमणारी ती एका नाकपुडीतून पाणी घेऊन दुसऱ्या नाकपुडीतून सोडण्याची अघोरी जलनेती. ते रबराच्या बॅग ने छाताडावर चटके देऊन शेक घेणं. अरे बाब्बानो एकवेळ माझ्या छाताडावर बसून माझा गळा घोटा एकवेळ पण ती छाती भाजून काढणारी उकळत्या पाण्याने भरलेली रबराची बॅग काढा रे कुणीतरी माझ्या बरगड्यांवरून...पूर्वी कोळश्याच्या ईस्त्रऱ्या असायच्या लौंड्री वाल्यांच्याकडे आणि ती गरम गरम इस्त्री कॉटन च्या शर्टावर ठेवल्या ठेवल्या कशी शर्टाच्या बटणांमधून ती बटणं जळू लागल्या मुळे त्यातून वाफा किंवा धूर येऊ लागायचा तसा धूर आणि वाफा माझ्या त्या बिचाऱ्या छातीच्या बारगड्यांच्या हाडांमधून येऊ लागेल की काय अशी भीती मला वाटू लागते, इतकी गरम असते ती शेकायची रबरी पिशवी. साध्या सर्दी वरती हे असले अघोरी औषधोपचार घेताना, पाश्चात्यांच्या त्या ऍलोपॅथी मुळे तुमच्या रोगप्रतिकारक ‘शक्तीचा’ अंत होतो हे मान्य असलं तरी एतददेशीयांच्या ह्या आयुर्वेदामुळे आमच्या सहन’शक्तीचा’ अंत होतो ह्याचं कुणालाच भान नसतं. नळ स्टॉप वरून टू व्हीलर वरून सिग्नल तोडून आयुर्वेद रस-शाळेकडे वळताना मला नेहमी वाटतं, ह्यांचे नाझिंशी गुप्त पत्रव्यवहार असावेत पूर्वीचे, दुसऱ्या महायुद्धातल्या काळातले.

मग मधेच कुणीतरी, “अरे थांबवा हे सगळं, रोगापेक्षा उपाय भयंकर”, असं म्हणणारा 'प्रेषित' अवतरतो. हा प्रेषित 'होमिओपॅथी' चा धर्मप्रसार करायला आलेला असतो. ( होमिओपथीच्या औषधाला 'साबुदाण्याच्या गोळ्या' - 'साबुदाण्याच्या गोळ्या' असं म्हणून खरंतर अनेक पिढ्या काही लोकांनी, अत्यंत रुचकर अश्या साबुदाण्याच्या खिचडीचा अत्यंत हीन पद्धतीने वर्षानु वर्षे घोर अपमान केला आहे! ). नासाचं २०१५ साली सोडलेलं यान कसं २०२२ साली गुरु किंवा शनी ग्रहावर वर जाऊन पोचणार असतं आणि तिथली छायाचित्र काढून “तिथे अजिबात पाणी नसून फक्त दगड धोंडे आहेत!” असं अनुमान काढणार असतं, तशी ही होमिओपॅथीची ट्रीटमेंट. उपचार सुरु होऊन दीड दीड वर्षं झाली तरी “अजून म्हणावा तसा गुण येत नाही हो डॉक्टर!” अशी तक्रार घेऊन गेलेल्या पेशंट्स ना कित्येक होमिओपथ्स नी "अहो, जरा पेशन्स ठेवा...वेळ लागतो होमिओपॅथीनं गुण यायला! मी आता तुमचा डोस जरा किंचित वाढवतो! बघा तुम्हाला नक्की फरक वाटेल" असं म्हंणत खुळ्यात काढून परत पाठवल्याच्या असंख्य आख्यायिका मी ऐकल्या आहेत.

होमिओपॅथी संदर्भात मी असंही ऐकलंय की “लक्षणे नसलेल्या माणसाला जर गरज नसताना होमिओपॅथीची ट्रीटमेंट दिली तर त्या माणसामध्ये ते औषध ज्या आजारावर लागू पडते त्या आजाराची ती लक्षणे दिसू लागतात म्हणे! इतकी होमिओपॅथी ची ट्रीटमेंट इफ्फेक्टिव्ह आहे.” हे बोलणं म्हणजे असं झालं की – “वेड्यांच्या इस्पितळातले सगळे वेडे एक मिटिंग घेऊन असं ठरवतात की आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर मध्ये जरा मानसिक संतुलन ढळल्याची लक्षणे आल्यासारखी वाटत आहेत आणि त्यामुळे ह्या डॉक्टरलाच जरा शॉक ट्रीटमेंट देऊन काही फरक पडतोय का ते पाहू!”
मला सांगा, एखाद्या आजाराची अजिबात लक्षणे नसताना होमिओपॅथी डॉक्टर कडे जाऊन कोण हो कशाला मला औषध द्या , येतात का अमूकएक आजाराची लक्षणे ते पाहू, आणि मग तुमचं औषध किती रामबाण आहे ते ठरवू , असं म्हणायला ?

आता एकीकडे ही लवकरात लवकर बरं वाटवणारी पण तात्पुरतं बरं वाटलं तरी दूरगामी रोगप्रतिकार शक्ती कमी करणारी ऍलोपॅथी, तर दुसरीकडे ‘रोगा’पेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था असलेली आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि तिसरी कडे नक्की औषधामुळं बरं वाटू लागलंय की इतकी वर्ष औषध घेऊन औषध आणि व्याधी दोन्हीचा विट येऊन रोग्याला शेवटी कंटाळून कंटाळून आपोआप बरं वाटू लागलंय हे नक्की निदान झालं नसलेली असलेली होमिओपॅथी , ह्या तीन तीन नद्यांची पात्रं कोरडी ठणठणीत पडली की काय? म्हणून, अधून मधून कुणी तरी "अरे ते ऍलोपॅथी होमिओपॅथी बिथि सगळं सोड आणि “नेचरोपॅथी” करून पहा" असं म्हणत फिरणारे अतृप्त आत्मे सुद्धा आयुष्याच्या भयाण एकाकी रस्त्यात पिशाच्य भेटावे तसे भेटतात. वर आणि हे ही नसे थोडके म्हणावे तसे म्हणून मग "वनौषधी" घेऊन पाहिलास काय ? असं विचारणारे आयुष्यातला उरला सुरला आत्मविश्वास घालवायला बसलेच आहेत.

ह्या “ते सगळं सोड आता “हे” करून पहा!” वाल्यांची यादी इथेच संपत नाही. "रेकी" , "फिजिओथेरपी", " चुंबक-थेरपी" , “पुष्पौषधी” , “काष्ठांऊषधी” , “स्टोन-थेरपी” , “प्राणिक हीलिंग” , " पंचकर्म” झालंच तर "युनानी" “केरळी मसाज" , यादी संपणारच नाही. साड्यांच्या दुकानात मॅचिंग ब्लाउज पीसची असते तशी व्हरायटी इथे सापडेल तुम्हाला.

ह्या जुनाट त्याच त्याच थेरांप्यां पासून सुटका करून घेण्यासाठी मी, आणि ह्या पारंपरिक उपचार पद्धतींच्या फॅन फोल्लोवेर्स ची "थेरं" बंद करण्यासाठी मी सध्या अजूनेक नवीन ‘थेरं’पी शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहे, माझी स्वतःची अगदी स्वतंत्र अशी. मुळात मी अभियंता आहे आणि माझ्या कडे लौकिकार्थानं कोणतंही वैद्यकीय प्रशिक्षण ‘नसल्यामुळं मला तशी काही मेडिको-लीगल अडचण येईल अशी काही शक्यता वाटंत नाही ह्या माझ्या संशोधनात, कारण तर चुकलंच माझं हे वैद्यकीय क्षेत्रातलं संशोधन तर मेडिकल प्रॅक्टिशनर चं रजिस्ट्रेशनच नाही त्यामुळे सरकार 'रद्द' तरी काय करणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून ?

ही थेरपी खूप साधी, सोपी , सहजसाध्य आहे. ह्या थेरपी मध्ये फार त्रास होत नाही. कामावरून साधारण आठ ते दहा दिवस सुट्टी घ्यायची, कुठेही बाहेर जायचं नाही , घरी (विशेषतः बायकोशी) आणि शेजारी पाजारी सगळ्यांशी सलोख्याचे संबंध राखायचे. एखादी आवडीच्या लेखकाची मस्त पैकी एखादी "मराठी" कादंबरी वाचायला घ्यायची. लक्षणे सौम्य असतील तर कथासंग्रह सुद्धा चालतो. पेपरातल्या बातम्या वाचणे आणि टीव्ही वर बातम्या पाहणे होई तोपर्यंत टाळायाचं. तसेच सोशल मीडियाचा वापर शक्यतो तितका कमी करायचा. बँकेचे कर्जाचे व्याजदर कमी होणे , शेयर मार्केट मध्ये तेजी येणे , बाजारात(?) करोनाची लस येणे इत्यादी गोष्टींची बिलकुल वाट न पाहता कादंबरीतल्या पात्रांच्या वर्णुकीवर लक्ष केंद्रित करायचं. पण फक्त त्याच बरोबर घराच्या घरी पावशेर कच्चे दाणे घ्यायचे. त्यावर मिठाच्या पाण्याचा हबका देऊन ते लोखंडी कढईत दहा मिनिटे चांगले खारवायचे. आणि कादंबरीचे पान उलटताना अधून मधून तोंडात टाकायचे. ज्यांना मद्य पान वर्ज्य नाही त्यांनी ते माफक प्रमाणात केले तरी चालेल. पण खाऱ्या शेंगदाण्यांऐवजी काजूचा मोह मात्र टाळावा. ज्यांना वाचनाची फारशी आवड नसेल त्यांनी रफी किंवा मन्नाडे वगैरे गायकांची आवडीची गाणी यू ट्यूब वर लावून कानात बड्स घालून मस्त पडून राहायचे अंथरुणात. वाचनासारखाच परिणाम साध्य होतो.

सध्या तरी ह्या नवीन संशोधित ‘थेरपी’च्या टेस्टिंगचा आणि ट्रायलचा राउंड माझा स्वतःवरच सुरु आहे. आत्तापर्यंत तरी चांगला गुण आला आहे आणि अजून तरी दुसरा कुठला साईड इफ्फेक्ट आलाय असं दिसत नाही. कधी कधी मात्र शरीरात अतिजडत्व येऊन ग्लानी आल्यासारखं वाटतं पण ते अगदी नैर्सर्गिक/नॉर्मल आहे, त्यात काळजी करण्यासारखं काही नाही. उपचार सुरुच ठेवायचे. ही नूतन उपचार पद्धती विकसित करण्यामागची माझी भूमिका, सध्या प्रचलित उपचार पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणणे ही नसून , सद्य उपचार पद्धतींमधील अघोरी पणा कमी करून त्यात अधिक 'अनौपचारिकता’ आणणे आणि रुग्ण आणि परिचारक ह्यांच्यात ‘सामोपचाराचं’ वातावरण निर्माण करणे ही आहे. ह्या नावीन्य पूर्ण उपचार पद्धतीस मी 'स्वानंदोपॅथी' किंवा 'खुशालौषधी" असं नांव देण्याच्या विचारात आहे.

चारुदत्त रामतीर्थकर,
१५ ऑगस्ट २०२०, पुणे.

टीप : कोणत्याही वैद्यकीय शाखेची किंवा व्यवसायाची 'खिल्ली' उडवणे हा ह्या लेखाचा मुळीच उद्देश नसून, सर्व वैद्यकीय शाखा आपापल्या स्थानी समाजाची आणि रुग्ण सेवा करण्यास सक्षम आहेत. केवळ हलक्या फुलक्या शैलीने केलेले विसंगतीचे हे एक चित्रण आहे.
(सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखांमध्ये रुग्ण सेवा करणाऱ्या वैद्य, डॉक्टर्स आणि होमिओपॅथ, ह्या सर्वांच्या ज्ञानकक्षांची आणि योगदानाची लेखकाला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे हा लेख मा.बो. कर अपेक्षित खेळीमेळीने स्वीकारतील अशी नम्र अपेक्षा लेखक ठेवत आहे. त्यामुळे समाजाची अविरत सेवा करणाऱ्या सर्व धन्वंतरीची आधीच क्षमा मागून हा लेख प्रकाशित करत आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
कालच त्या भोंदू स्वागत तोडकर वर गुन्हा दाखल झालाय
https://ahmednagarlive24.com/2020/08/13/order-to-file-a-case-against-bog...
बाकी माझा एक मित्र आहे प्युअर पित्तप्रकृतीवाला. नको म्हणत असताना त्याने करोना च्या भीतीपायी दालचिनी, लवंग. पिंपळी यांचा एवढा मारा केला शरीरावर की त्याला ते दुष्परिणाम निस्तरायला नवीन उपचार घ्यावे लागले.

जिद्दू , वर्णिता आणि प्रभुदेसाई जी तुमच्या अभिप्राया बद्दल धन्यवाद !