कुलूप (लघुकथा)

Submitted by बोकलत on 14 August, 2020 - 10:53

ही खरीखुरी गोष्ट माझ्यासोबत चार वर्षांपूर्वी घडलेली आहे. मी त्यावेळी नोकरीच्या ठिकाणी रुम रेंटवर राहत होतो. मी ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी घरीच राहायचो. घरी असलो की दिवसातून कधीही काळवेळ न पाहता शंखनाद करणे, बासरी वाजवणे, जोरात गाणी ऐकणे असली कामं मी करत असे. या गोष्टी मी शक्यतो दुपारीच करत असे. दुपारी शांत ac,फॅन लावून झोपलेली लोकं मला अजिबात पटत नसत. या गोष्टीमुळे आजूबाजूचे माझ्यावर खार खाऊन असत.
तर मी रविवारी शक्यतो जेवण घरीच बनवायचो. माझ्या शेजारी काका काकी राहायचे त्यांचा मुलगा सून काही दिवसांसाठी घरी आले होते. काका काकी शुद्ध शाकाहारी होते, मुलगा पण शाकाहारी होता पण लग्न झाल्यावर बायकोने त्याला मांसाहार करायला शिकवलं होतं. तर माझ्या रूममधून रविवारी मटण, मच्छीचे वास आजूबाजूच्या घरात जात असत. वास घेऊन काकांच्या मुलाला आणि सुनेला नॉनव्हेज खायची खूप इच्छा होत असे. असाच एके रविवारी मी मटण मागवून संध्याकाळी बाहेर फिरायला गेलो होतो. दरवाजाला मी शक्यतो कुलूप लावत नसे.फिरून आलो तर काकांच्या घराबाहेर भरपूर माणसं जमली होती. मला वाटलं काका गेले की काय, म्हणून काय झालं? हे विचारायला गेलो तर सगळे माझ्याकडे घाबरलेल्या नजरेने बघायला लागले. त्या विचित्र नजरा पाहून मी तिथे न थांबता घरी आलो. काही दिवसांनी मला समजलं की मी जेव्हा फिरायला गेलो तेव्हा काकांचा मुलगा माझ्या घरी मी काय जेवण करणार आहे हे बघायला आला होता. घरात काळोख होता आणि नेमकी लाईट गेली होती. तो जेव्हा स्वयंपाकघरात गेला तेव्हा तिथे त्याला कोणाच्यातरी असण्याची चाहूल लागली. तो फ्रीज उघडणार इतक्यात त्याला एका कोपऱ्यात एक साडेसात आठ फूट उंच माणसाची काळी आकृती दिसली. ती कपाळावर आठ्या पडलेली आकृती अतिशय रागाने त्याच्याकडे बघत होती. हे काहीतरी विचित्र प्रकरण आहे हे काकांचा मुलगा समजून गेला. कसाबसा त्याने तिथून पळ काढला आणि पुढचे पाच सहा दिवस तापाने अंथरुणाला खिळून होता. हे ऐकून मी घरी आलो फ्रिजमधलं गार पाणी प्यायलो आणि जोरात ओरडलो "अरे बावळट बायंगी परत लोकांसमोर आलास तर कुलूप लावून बाहेर जात जाईन."

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Pages