कर्मबंध

Submitted by पायस on 13 August, 2020 - 08:35

अनित्य

शिशिरातली एक चांदणी रात्र. तो डोंगर मुख्य रहदारीपासून थोडका लांबच होता. यज्ञश्रीच्या सातकर्णीच्या राज्यकाळात घाटाचाही वापर बंद पडला होता. त्यामुळे मुख्य वस्ती, ते छोटेसे ग्रामही आधी पायथा, मग पायथ्यापासून थोडे दूर असे दूर दूर चालले होते. त्याला डोंगर केवळ सुयोग्य शब्दाभावी म्हणायचे. उंचच उंच आणि अवाढव्य असा एकसंध काळा कातळच तो! भल्या भल्या पाथरवटाची छिन्नीही त्या कातळासमोर निष्प्रभ ठरावी. अशा कातळात मानवी अस्तित्व होते ते त्या एका गुहेपुरते. त्या कातळात कोरून काढलेली एकच ती नागमोडी वाट त्या गुहेशी येऊन थांबत होती. ती गुहा नैसर्गिक असली तरी आतील बांधकाम निश्चितच नैसर्गिक नव्हते. आत शिरल्या शिरल्या एक ताम्रपट दृष्टीस पडत होता. त्या ताम्रपटावर एकच शब्द कोरला होता.

"तित्थिय"

गुहेत विहार खोदलेले दिसत होते. काही मृत्तिकापात्रे तशीच पडलेली होती. ओदनाची काही शिळी शिते, शाडवाचे कण असे काहीबाही तिथे होते. पण त्यावर मक्षिकांचे दुर्लक्ष झालेले दिसत होते. तो बोळ तसाच पुढे जाऊन एका सभागृहात उघडत होता. ते चैत्यगृह असावेसे वाटत होते. तिथे इतरही अनेक बोळ येऊन मिळत होते पण ते बोळ आत जाऊन बंद होत असावेत. ती जागा मोठी, हवेशीर आणि संपूर्णतया रिकामी होती. कातळाच्या छपरात एक मोठे विवर होते, तिथून चांदणे आत झिरपत होते. रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती पण एकही आत येऊ धजावत नव्हता. त्या जागेत सामान म्हणून काही असेल तर फक्त ते आरसे! असंख्य आरसे. जिकडे नजर फिरवावी तिकडे आरसे. त्यातील काही आरशांसमोर .....

ठाक्!

.... शेवटचा साधक कोसळला. असेच अजून चारजण निपचित पडले होते. लाकडाची जड वस्तु हातात घेऊन तो धापा टाकीत होता. खात्रीसाठी त्याने कपाळावर जोरदार प्रहार केला. आरशाच्या अगदी समोर उभे राहून त्याने नजर आरशावर फेकली. त्याचे समाधान झाले. आता त्याला अडवणारे कोणी नव्हते. आपले हत्यार दूर फेकून देऊन तो एका विशिष्ट आरशासमोर उभा राहिला. आरशातला तो याच्याकडे बघून मंद स्मित करत होता. याच्या चेहर्‍यावरची शिर न शिर तट्ट फुगली होती पण आरशातला तो मात्र तसेच स्मितहास्य करत राहिला. तो हळू हळू आरशाकडे सरकला. आरशातला तो जमिनीवर ललितासनात बसला होता. याच्या हातात एक अणकुचीदार दगड होता. आरशाच्या मागे जाऊन पोहोचला तरी आरशातला तो त्याच अवस्थेत बसला होता. हातातल्या दगडाने तो मागचा पापुद्रा खरवडू लागला. जसा जसा तो पापुद्रा खरवडत होता तशी तशी त्याची मुद्रा क्रुद्ध होत होती.

ती रात्र त्या कातळात कायमची कोरलेली आहे. कितीतरी वेळ तो खरवडण्याचा आवाज आसमंतात घुमत होता. अचानक क्षणभरच भक्कन प्रकाश पडला आणि तो आवाज थांबला. ही घटना कोणालाच माहित नाही. माहित पडली असती तरी तित्थियांच्या आश्रयस्थानी जाऊन त्यांना मदत करण्याची इच्छा कोणातच नव्हती. आणि इच्छा जरी असली तरी एवढी जोखीम कोण घेईल?

~*~*~*~*~*~

पुनर्भव

ती रात्र अक्षय तरी कधीही विसरणार नाही. या संसारात अक्षय केवळ निमित्तमात्रच म्हणावा लागेल. पण त्या रात्री तो त्याच्या परीने असामान्य धाडस करायला निघाला होता. छट्टेच्या घाटामार्गे डोंगर चढून पिंपळाखाली सेल्फी काढून परत यायचं; तेही मध्यरात्री! आता गावातल्या तरुणांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं तर हे दिव्य करणं भाग होतं. नाहीतर काम असल्याशिवाय छट्टेच्या घाटातून तो भर दिवसा सुद्धा गेला नसता.

निघण्याआधी त्याने मोबाईल पूर्ण चार्ज करण्याची खबरदारी घेतली होती. वस्तीतून बाहेर पडण्याआधीच वीजमंडळाच्या कृपेने सगळीकडे अंधार झाला होता. अमावस्या पाच दिवसांवर होती. त्यामुळे चंद्रप्रकाशही तसा अपुराच होता. झपाझप पावले उचलत तो घाट चढू लागला. दोस्तगावात तेवढं एकच नवल होतं - छट्टेचा घाट! या छट्टेच्या घाटाविषयी अनेक प्रवाद होते, दंतकथा होत्या. हा जात असलेल्या पिंपळावरच्या मुंजापासून रानात लपून राहणार्‍या जखिणीपर्यंत; धडका देऊन घायाळ करणार्‍या घोडापाकापासून सर्वशक्तीमान आग्यावेताळापर्यंत; सर्व भूते या घाटात होती. म्हणजे असं दोस्तगावकर म्हणतात ब्वा! अक्षयचा यावर मर्यादित प्रमाणात विश्वास होता. म्हणजे भूतं असतात हे त्याला अगदी मान्य होते पण एवढी भूते घाटात असती तर त्यांनी कधीच गावाची राखरांगोळी केली असती. त्यामुळे हा घाट म्हणावा तितका झपाटलेला नसावा. त्यात रामरक्षा आपल्याला तोंडपाठ आहेच की! स्वतःचीच समजूत काढत तो चालला होता. अंधुक प्रकाशात डोंगर अजस्त्र भासत होता. डोंगर कसला, लांबरुंद पसरलेला एकसंध कातळच तो! मध्ये मध्ये पडलेल्या भेगांमुळे एखाद्या राक्षसाने आपला जबडा घट्ट मिटून घेतला असल्याचा भास होत होता. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत तो चालतच राहिला. हा हा म्हणता त्याने पिंपळ गाठला. सेल्फी घेतला. फोटो कसा आला हे न बघताच तो आल्या पावली परत फिरला. न जाणो फोटोत मागे मुंजा स्माईल देताना दिसायचा! मुख्य घाटाचा रस्ता गाठल्यावरच त्याला फोटो बघायचा धीर आला. फोटो नॉर्मलच होता. बिडीचे झुरके घेत तो गावाकडे निघाला. भुताटकीच्या अफवांने घाटात एक गाडी दिसेल तर शपथ होती. एवढ्यात त्याला मागून प्रचंड आवाज आला. कशाचा तरी स्फोट झाल्यासारखा तो आवाज होता. सोबत घर्र घर्र असाही आवाज येत होता. त्याने थरथरतच मागे बघितले. थोड्याच अंतराव दरड कोसळली होती. पण ही आणि दरड? जणू डोंगर ढासळला होता. तो जीवाच्या आकांताने धावत सुटला. सुरक्षित अंतरावर पोहोचल्याची खात्री होताच भीतिची जागा कुतुहलाने घेतली. त्याने लँडस्लाईड जवळून बघितली होती. या भौगोलिक चमत्काराने राक्षसाने मिटलेला जबडा आ वासून उघडला होता.

मोठ्या मुश्किलीने अक्षय मास्तरांना सोबत चलण्यासाठी तयार करू शकला होता. नसत्या साहसाबद्दल घरच्यांची बोलणी बसली होतीच पण त्याहीपेक्षा भोळ्या गावकर्‍यांना ती लँडस्लाईड याच्या उद्योगाचा परिणाम वाटत होती. गावात मास्तरच काय ते व्हॉईस ऑफ रिझन होते. गावकर्‍यांनाही काय ती शहानिशा झाली तर हवेच होते. सरकारी यंत्रणेला बातमी पोचवण्यात आली असली तरी त्यांनी त्वरित हालचाल करण्याचे काही कारण नव्हते. गावाचे नुकसान शून्य होते आणि डोंगरात लँडस्लाईड्स येणे ही काही नवी बाब नाही. ते येईपर्यंत थांबायला अक्षय तयार नव्हता. मास्तरही मग हो ना करता करता तयार झाले. उन्हं थोडी उतरल्यावर ते दोघे घाट चढून लँडस्लाईड झाली तिथे पोहोचले. दोन मोठे ट्रक जातील एवढे भगदाड पडले होते.
"चमत्कारिकच आहे. लँडस्लाईड्स ऐकल्या, व्हिडिओंमध्ये बघितल्या पुष्कळ पण हे काहीतरी औरच आहे."
"हो ना? तुम्ही सोबत यायला तयार झाले म्हणून नाहीतर सरकारी लोक येईस्तोवर हे गौडबंगाल सुटलेच नसते."
"गौडबंगाल तर खरेच!" मास्तर त्या भगदाडातून आत शिरत उद्गारले. डोंगराच्या आत गुहा तयार झाल्या होत्या. आणि त्यांचे प्रवेशद्वार, ते भगदाड, इतक्या वर्षांमध्ये रॉक फॉर्मेशनखाली लपले होते. ते दोघे त्या गुहा नीट निरखून बघत होते. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ३-३ गुहा होत्या. थोड्याच वेळात त्यांना लक्षात आले की या गुहा मानवनिर्मित आहेत. आतमध्ये व्यवस्थित कोनाडे, दगडी आसने असा जामानिमा होता.
"अरे लेका ही लेणी आहेत."
"म्हणजे?"
"म्हणजे तू अनवधानानेच का होईना एक सांस्कृतिक ठेवा शोधला आहेस. एवढं समज की आपले दोस्तगाव फेमस होणार आहे."
"मास्तर.... मला तुम्हाला काहीतरी वेगळंच दाखवायचं आहे. या गुहांपेक्षाही काहीतरी विचित्र. तुम्ही चला माझ्याबरोबर."
ते दोघे अजून आतमध्ये गेले. तो बोळ डोंगराच्या पोटाकडे जात होता. जसे जसे ते आत जात होते, प्रकाश अनपेक्षितरित्या वाढत होता. थोड्याच वेळात ते एका सभागृहात पोहोचले आणि समोरचे दृश्य बघून मास्तरांनी आ वासला.

******

"दोन कटिंग" अजितने ऑर्डर दिली. तो आणि तारा डिपार्टमेंटच्या स्कॉर्पिओमध्ये बसून निघाले होते. गाडीत इक्विपमेंट फारसं नव्हतं पण अजितला आहे जागा म्हणून माणसांची गर्दी करायची नव्हती. त्याला शांत बसून या अनपेक्षित फाईंडवर विचार करायचा होता. अशावेळी ताराखेरीज तो कोणाची कंपनी खपवून घेणार नव्हता.
"दोस्तगावला जायचंय दादा. अजून किती वेळ लागेल?"
"अजून तास तरी लागेल मॅडम. रस्त्याची अवस्था बघताच आहात तुम्ही. पोहे बनत आहेत. एक-एक प्लेट खाऊन घ्या मग पुढचा रस्ता पकडा." अजितला हा ऑप्शन चालणार होता. ताराने पोह्यांच्या डिश कलेक्ट केल्या आणि अजितच्या टेबलसमोर खुर्ची ओढून बसली.
"तुला काय वाटतं अजित? तिथले शिलालेख शाबूत असतील? आय मीन ते शब्दशः डोंगराच्या पोटात होते."
"आय डोन्ट नो तारा, इट्स व्हेरी पझलिंग. हा डोंगर डेक्कन ट्रॅप्सचा भाग आहे. खूप खूप पूर्वी जागृत असलेल्या ज्वालामुखीचा हिस्सा. त्यामुळे रॉक फॉर्मेशन होऊन या गुहा डोंगराच्या पोटात गडप होण्याची शक्यता मी नाकारत नाही, ऑल्दो इट स्टिल डझ नॉट मेक अ होल लॉट ऑफ सेन्स! मृत ज्वालामुखीत लेणी कोराविशी का वाटलं असेल? अर्थात जर ही लेणी असतील तर! निव्वळ आश्रयस्थान म्हणून केवळ विहार खोदलेले असू शकतात."
"आणि या डोंगराविषयी जिओलॉजिकल सर्व्हेज् मध्ये काहीच इंटरेस्टिंग माहिती नाही. भुताटकीच्या नावाखाली गावकर्‍यांनी अजिबात कोऑपरेट केलेलं दिसत नाही. दोस्तगाव म्हणे, काहीतरीच नाव आहे."
"अ‍ॅक्चुअली याचं मूळ नाव दोस्तगाव नाही. औरंगजेब जेव्हा ताराबाईचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः मैदानात उतरला तेव्हा त्याने गावांची नावे बदलण्याचा सपाटा लावला होता. त्याच काळात मूळच्या मित्रपुराचे नाव बदलून त्याने दोस्तगाव करून टाकले. तीनशे वर्षांमध्ये हेच नाव कायम झालेले दिसते आहे."
"मित्रपुर? मित्राचे गाव? पण कोणाच्या मित्राचे? कोणा राजाने आपल्या मित्रासाठी हे गाव वसवले असेल?"
"याच्याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. आणि तो छट्टेचा घाटही मूळचा दर्पण घाट! अ‍ॅकॉर्डिंग टू द अर्लिएस्ट रिपोर्ट ऑफ अ सुपरनॅचरल अ‍ॅक्टिव्हिटी, या घाटात गेलं की तुमची छटा, तुमची सावली चोरीला जाते म्हणून तो छटेचा आणि कालांतराने छट्टेचा घाट झाला. अर्थात त्याला दर्पण घाट नाव का होतं ते आत्ता लक्षात येतंय."
"ते चैत्यगृह ना? मला त्या चैत्यगृहाबाबात उत्सुकता आहे. स्तूप नाही याचा अर्थ ही फक्त निवासी सोय असण्याची शक्यता अजूनच वाढते."
"हम्म. मलाही त्या जागेबद्दल खूप उत्सुकता आहे. निघायचं?"
"येस. चलो."

******

अजितने सर्वप्रथम मास्तर आणि अक्षयची भेट घेतली. त्याची व ताराची गावातच राहण्याची सोय केली होती. त्यांचे इतर सहकारी देखील गावातच मुक्काम ठोकणार होते. तिथे वार्ताहरांची गर्दी बघून अजितच्या कपाळावर छोटीशी आठी पडली, पण ते एक दोन दिवसांत पांगतील याची त्याला खात्री होती. रात्रीचे जेवण उरकून मास्तर व अक्षय अजितला भेटले. अक्षयला आलेला अनुभव त्याने पुन्हा एकदा कथन केला. त्याचा मसाला वगळला तर तो किती नशीबवान ठरला हे अजितला ताडणे कठीण गेले नाही. लँडस्लाईडपासून तर तो वाचलाच पण सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची एक जागाही त्याला सापडली होती. ताराकडे फारसे प्रश्न नव्हती. ती भूगर्भशास्त्रज्ञ असल्याने तिला या डोंगराचा जिओलॉजिकल सर्व्हे करण्यात अधिक रस होता. केलेल्या वर्णनावरून हा डोंगर मृत ज्वालामुखी असून त्याच्या माथ्यावर अनेक स्पॅटर कोन्स असल्याचे स्पष्ट होते. या स्पॅटर कोन्स मधून प्रकाश त्या दालनापर्यंत पोहोचत असावा. डेक्कन ट्रॅप्सचा भाग असल्याने बेसॉल्टमधून कोरून काढलेल्या त्या लेण्यांमध्ये व्होल्कॅनिक व्हेंटचा मध्यवर्ती खोलीप्रमाणे वापर केला गेला होता. उद्या जाऊन कन्फर्म केले की तिचे काम संपणार होते. अजितला मात्र तिथले शिलालेख तपासण्यात रस होता.
"सर...." मास्तर अडखळले.
"बोला मास्तर. नि:शंक मनाने तुम्हाला काय सांगायचं ते सांगा."
"ती जागा मला ठीक नाही वाटली सर. मी काही इतिहास अभ्यासक नाही पण भिक्षुंसाठी बांधलेल्या निवासस्थानी आरसे का असतील?"
"तुमचा प्रश्न बरोबर आहे पण म्हणून त्या जागेत काही दोष आहे हे म्हणणे मला पटत नाही. पण आपण उद्या बघूच काय ते." अजितने त्या दोघांना निरोप दिला.
"या आरसेप्रकरणाविषयी तुला काय वाटतं?"
"वेल, आम्हाला व्होल्कॅनिक ग्लास म्हणजे ज्वालामुखीमुळे तयार होणार्‍या काचेविषयी शिकवले जाते. ऑब्सिडिअन हा या काचांचा सर्वात फेमस प्रकार. जरी तिला काच म्हणत असलो तरी तो एकप्रकारचा दगडच असतो. पण अत्यंतिक उष्मा आणि मग थंड होण्याची प्रक्रिया यामुळे त्या दगडांचा पृष्ठभाग रिफ्लेक्टिव्ह बनतो."
"पण सह्याद्रीत असे दगड सापडतात?"
"हो. टॅकिलाईट नामक व्होल्कॅनिक ग्लास ही बेसॉल्ट दगडापासून तयार होते."
"......"
"का रे, असा गप्प का झालास?"
".... माझं अंतर्मन सांगतं आहे की काहीतरी चुकतंय. चैत्यगृह म्हणजे साधनेसाठी बांधलेला मोठा हॉल. सहसा इथे स्तूप असतो, प्रदक्षिणामार्ग असतो. यांच्या वर्णनावरून तशी काहीच सोय इथे दिसत नाही. किमान खांब तरी असतात. इथे एकही स्तूप नाही, खांब नाहीत, बांधकाम नाही. नुसताच प्रशस्त हॉल! हे काहीतरी औरच प्रकरण आहे. सर्वकाही समोर असतानाही हे सगळं अतिशय गूढ वाटतंय."
ताराने स्मित केले. खिडकीपाशी उभ्या असलेल्या अजितला तिने पाठीमागून मिठी मारली. थोड्याच वेळात ते दोघे या सर्व बाबी विसरले आणि निद्रादेवीच्या आसर्‍याला गेले.

.........
........
........

अक्षय बिछान्यातून उठला आणि सावकाश घाट चढू लागला. तिथे जाऊन पुन्हा एकदा त्याला बघायलाच हवं. त्याची स्वतःची तशी इच्छा होती का हे सांगणे जरा कठीण आहे पण त्या क्षणी ती त्याची गरज होती आणि गरजवंताला अक्कल नसते.

~*~*~*~*~*~

कर्म

"धिस इज .... धिस इज अनबिलीव्हेबल..."
अक्षयने त्या जागेचे वर्णन आरसेमहाल असे केले होते ते खोटे नव्हते. ते चैत्यगृह होते की नाही हे सांगणे जरा कठीण आहे पण तो एक प्रशस्त, हवेशीर हॉल होता. तिथली हवा अगदी मोकळी होती, अजिबात कुंद नव्हती. डोक्यावर असलेले भले थोरले विवर याची कारणमीमांसा करीत होते. तिथे आरसेच आरसे होते. दगडी भिंतीतून खोदून काढलेले आरसे. किंबहुना त्या मृत ज्वालामुखीच्या सर्व व्हेंट्समध्ये असे आरसे तयार झाले होते. पण या मध्यवर्ती व्हेंटमध्ये ते प्रामुख्याने होते. त्यांना काच नाही तर आरसेच म्हणावे लागेल कारण एवढे ठळक प्रतिबिंब एखाद्या आरशातच दिसू शकेल. तसेच त्या दोघांच्या एक गोष्ट लगेच ध्यानात आली जी मास्तरांनी आदल्या रात्री सांगितली नव्हती.

त्यातल्या एकाही आरशात त्या दोघांचे प्रतिबिंब दिसत नव्हते!

"काय गौडबंगाल आहे काहीच समजत नाही. एवढे आरसे इथे का असतील? आणि त्यात फक्त आपलीच प्रतिबिंबे का दिसत नाहीत?"
"नो क्लू. पण अजित हे आरसे नैसर्गिक वाटत नाहीत."
"????"
"हे सर्व प्लेन मिरर्स आहेत. नैसर्गिकरित्या एवढे स्मूथ फिनिशवाले आरसे बनणे असंभव आहे. कोणीतरी हे आरसे घडवले आणि मग भिंतीत बसवले. कशासाठी? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात? कोणासाठी? का? माझं तर डोकं गरगरायला लागलं."
"आणि त्यातल्या काहींना नक्षीकाम केलेली बॉर्डर आहे, काहींची बॉर्डर अर्धवट आहे, तर काही तसेच ओबडधोबड आकारात आहेत. पण प्रत्येकाला घासून पुसून लख्ख केले गेले आहे. इट इज स्ट्रेंज."
"मग आता काय करायचं ठरवलं आहेस?"
"तात्पुरतं मी या दर्पणगृहाकडे दुर्लक्ष करणार आहे. गुहांमध्ये इतरही शिल्पे आहेत. त्याखेरीज काही शिलालेख आहेत आणि एकमेव असा ताम्रपट आहे. ते आधी अभ्यासले पाहिजेत. पण त्यांची भाषा कुठली तरी वेगळीच प्राकृत आहे. मला पटकन ओळखू आली नाही. प्राकृतशी साधर्म्य हे मात्र नक्की. माझं तरी पहिलं टार्गेट हे शिलालेख आणि ताम्रपट. तू?"
"आधी तर आपण परत फिरायची वाट बघत असलेल्या वार्ताहरांना चुकवण्याची शर्थ करणार आहे. सीरिअसली दो, त्या ओबडधोबड आरशांपैकी एकामधून मी रॉक टेस्टिंगसाठी सॅम्पल घेणार आहे. त्याचा लॅब रिपोर्ट येण्याची वाट बघेन. आर्किओलॉजी टीमची प्राथमिक चाचणी झाली की या डोंगराचा सर्व्हे करण्याचे रेकमेंडेशन दिलं आहे."
"ठीक आहे, मी शहरात परतलो की कळवतो."

********

"महेश. ये ना. कॉफी?"
"अर्थात. माझी कॉफीला कधी ना असते का? अजित अजूनही त्या साईटवरच आहे का?"
"हो. येईल तो परत परवापर्यंत. बस, आलेच मी."
महेश अजित आणि ताराचा जवळचा मित्र होता. कागदोपत्री तो काहीच कामधंदा करत नव्हता. दहा वर्षांपूर्वीपर्यंत तो आफ्रिकेत हिर्‍यांच्या व्यापारात गुंतलेला होता. आयुष्य निवांत घालवता येईल इतपत पूंजी साठल्याची खात्री पटल्यावर त्याने सर्व उद्योग सोडून तरुणपणात निवृत्ती स्वीकारली होती. एकटा जीव असल्यामुळे तो मनमुराद आयुष्याचा आनंद घेत होता. इतिहासाच्या आवडीमधून त्याची अजितशी ओळख झाली होती आणि त्याच ओळखीचे आता घट्ट मैत्रीत रुपांतर झाले होते.
"दर्पणगृह हं? त्या येड्या आजतागायत चॅनेलवाल्यांनी तुमच्या लेण्यांना दर्पणलेणी नाव देऊन टाकलं आहे."
"अरे अजित कसला उखडला आहे. टेक्निकली त्या लेणी नाहीत. लेण्यांमध्ये जशी शिल्पे आढळतात, एखादा स्तूप, प्रदक्षिणामार्ग असतो तसं इथं काही नाही. त्यातल्या त्यात याला एक प्रकारचा विहार म्हणता येईल असे अजित म्हणतो आहे. पण या चॅनेलवाल्यांना कोण समजावणार?"
"बरं ती लेणी नाहीत. माझ्यासाठी तो इंटरेस्टिंग प्रश्न नाही. ते आरसे, ते आरसे आहेत काय नक्की? काही इनसाईडर स्कूप?"
"हा घे लॅब रिपोर्ट आणि तुझं तूच ठरव. माझ्यापुरते तरी ते टॅकिलाईट आहेत आणि कोणीतरी त्यांचे घासून पुसून आरसे बनवले. मागून सिल्व्हरिंग सदृश काहीतरी केलं आहे. कसल्याशा विचित्र मिश्रधातुचा अतिशय पातळ मुलामा दिलेला आहे. आता तसं कोणी आणि का केलं हा अजितसारख्या पुरातत्व संशोधकांचा किंवा तुझ्यासारख्या बुद्धिला खुराक शोधणार्‍या लोकांसाठीचा प्रश्न आहे. मला फक्त त्या मिश्रधातुच्या पापुद्र्याच्या रासायनिक पृथक्करणाशी मतलब."
"यू गेस्ड इट राईट. बुद्धिला खुराक आहे अगदी! मला तरी हे कोडं फारच इंटरेस्टिंग वाटलं. कदाचित त्यात माणसाचे प्रतिबिंब दिसू नये म्हणून तशी योजना केली असेल?"
"पण मग टॅकिलाईटचे आरसे, तेही एवढं स्मूथ फिनिशिंग असलेले, का बनवले असतील? आणि सहसा अशा मुलाम्याने, त्या पापुद्र्याने प्रतिबिंब अधिक सुस्पष्ट दिसते. प्रतिबिंबाला अवरोध होत नाही. आणि फक्त माणसांच्याच प्रतिमा का दिसू नयेत?"
थोडा पॉज घेऊन ताराच पुन्हा बोलू लागली.
"...... टू बी फ्रँक दॅट प्लेस गिव्ह्ज मी द क्रीप्स. मला फक्त त्यातल्या एका दगडाचं सँपल घ्यायचं होतं. मी असाच आरसा निवडला ज्याच्या आजूबाजूने कसलीही नक्षी नव्हती. त्याच्यावर कसलेही संस्कार झालेले नव्हते. माझे प्रतिबिंब दिसत नसल्यामुळे मी त्याला खर्‍या अर्थाने आरसाही म्हणू शकत नव्हते. ती कसली जाणीव होती हे शब्दांत सांगता येत नाही. प्रतिकर्षण हा त्यातल्या त्यात जवळ जाणारा शब्द आहे. ती जागा तुम्हाला दूर लोटू बघते महेश. ते आरसे तुम्हालाच काय तुमच्या प्रतिमेलाही दूर लोटतात. मी कसंतरी अवसान आणून एक नमुना चाचणीकरिता घेतला. पण बाहेर येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता."
"विलक्षण प्रकार आहे खरा! मला तिथे जाता येईल?"
"आय गेस. तू स्वतः तो अनुभव घेतल्याशिवाय काही ऐकणार नाहीस. लँडस्लाईडची तपासणी करणारं पथक दोन दिवसात गाशा गुंडाळेल आणि पुरातत्व विभागाची लोकंही फोटोग्राफ्स अभ्यासायला घरी परततील. दिवसाच्या वेळात तर तुला तिथे जाता यावं."
"ओके. तोवर हे कोडं आहेच विचार करायला." तिच्याकडे वर्तमानपत्र सरकवत तो म्हणाला.
कोण्या एका सद्गृहस्थाने खांदा दुखतो आहे म्हणून इस्पितळात धाव घेतली होती. अचानक असं काय झालं हे कोणाला कळेना. त्याचा जीव घाबराघुबरा झाला होताच, त्यात त्याचा उजवा खांदा पिचल्यासारखा वाटत होता. डॉक्टरांने तपासणी केल्यानंतर त्याचं खांद्यातलं हाड आतून तुटलं होतं. जणू कोणी आतून हातोडी मारून तिथला टवका काढला होता. पण बाहेरून कसल्याही प्रकारची इजा झाल्याचे लक्षण नव्हते. त्यावर कडी म्हणून की काय पण त्या हाडाच्या तुकड्याचा काहीच पत्ता नव्हता. स्कॅन्समध्ये त्याचे नामोनिशाण नव्हते.
"अरे देवा, आता व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्डही छापून यायला लागले!"
"नाही. मी त्याला भेटण्याचा प्रयत्न करून आलो. त्याची नाही पण त्याच्या बायकोची भेट झाली. टीव्ही बघता बघता त्यांच्या चर्येत फरक पडल्याचे तिने टिपले होतेच पण कामाच्या ठिकाणी झाले असेल काही म्हणून तिने दुर्लक्ष केले. दुसर्‍या दिवशी मात्र याने वेदनातिरेकाने किंकाळी फोडली तेव्हा थेट इस्पितळात धाव घेतली. कितीही अविश्वसनीय वाटली तरी बातमी खरी आहे. कसे काय कोणास ठाऊक पण कोणीतरी हातोडी किंवा छिन्नी मारून त्याच्या खांद्यातल्या हाडाचा टवका काढला."

*******

असेच काही दिवस गेले. महेशने दोस्तगावात आपला मुक्काम ठोकला. जेव्हा अजित व तारा दोस्तगावात परतले तेव्हा महेश त्यांना सरळ दर्पणगृहात घेऊन गेला. अक्षय तिथे जमिनीवर फतकल मारून बसला होता. एकटक तो समोरच्या आरशात बघत होता. दोघेही बुचकळ्यात पडले.
"महेश काय आहे हे? हा असा का बसला आहे? अक्षय ... " अजित अक्षयला काही विचारणार एवढ्यात अक्षयने जोरजोरात हात हलवून तीव्र नापसंती दर्शवली.
"त्याला तसंच बसू देत. जेव्हा त्याचे मित्र त्याला घरी न्यायला आले तेव्हा त्याने दगडफेक केली. त्यांनी न जुमानता जेव्हा त्याला ओढून नेले तेव्हा त्याला फरफटत घेऊन जावे लागले. मध्येच तो बेशुद्ध झाला. दुसर्‍या दिवशी परत इथे हजर. सुरुवातीला दिवसातून १-२ तासच येत होता पण हळूहळू प्रमाण वाढतच चालले आहे. पण लक्षवेधी बाब ती नाही. इकडे या."
ते तिघेही अतिशय काळजीपूर्वक अक्षयच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. आता त्यांना अक्षयचा आरसा अगदी नीट दिसत होता. आरशात त्यांच्या मागची दगडी भिंत दिसत होती, इतर आरसे दिसत होते आणि ते मात्र दिसत नव्हते. पण जमिनीवर बसलेला अक्षय अगदी स्पष्ट दिसत होता. त्याची या गालापासून त्या गालापर्यंत पसरलेली हास्याची लकेर भावनाशून्य होती. त्यात ना राग होता, ना आनंद, ना द्वेष, ना प्रेम, ना आकर्षण, ना प्रतिकर्षण. ती लकेर फक्त तिथे होती. ते प्रतिबिंबही तिथे केवळ होते. ते दिसायला अक्षयसारखे होते. पण त्यात अक्षय किती होता? वर्णन ऐकायला विचित्र वाटले तरी ते सत्य होते. जणू कोणी ट्रेस पेपर वापरून एखाद्या चित्राची हुबेहूब नक्कल केल्याप्रमाणे अक्षय त्या आरशात छापला गेला होता. प्रतिबिंब जिवंत नसले तरी त्यातही एकप्रकारचा जिवंतपणा असतो पण हे काहीतरी अजब होते.

सर्वप्रथम तारा भानावर आली. "एक मिनिट! याचे प्रतिबिंब आरशात कसे काय दिसते आहे? मी सगळे आरसे तपासले होते, त्यातल्या एकाही आरशात माझे प्रतिबिंब पडले नव्हते. हा आरसा कुठून आला? आणि फक्त याचेच प्रतिबिंब का दिसते आहे? आपल्या तिघांच्या प्रतिमा यात का दिसत नाहीत?" तिच्या डोक्यात जणू प्रश्नांचे मोहोळ उठले होते.
"ताराचे शंभर टक्के खरे आहे. मी इथल्या सर्व आरशांचे अगदी लेबले लावत निरीक्षण केले. इथल्या एकाही आरशात जिवंत प्राण्याचे प्रतिबिंब दिसत नाही." ते तिघे गावातल्या हॉटेलात चहा पीत होते. महेशने आपल्या नोट्स उघडल्या होत्या.
"आधी मी माझे प्रतिबिंब दिसते का हे बघण्याचा प्रयत्न केला. मग मी घरी कुत्रा पाळलेल्या एकाला तयार करून त्याच्या कुत्र्याला सर्व आरशांसमोर उभे केले. त्याचेही प्रतिबिंब पडले नाही. थोडक्यात कुठल्याही जीवाचे या आरशांमध्ये प्रतिबिंब दिसत नाही. नक्षी असलेले आरसे आणि साधे आरसे यांच्यात काही फरक आहे का हे बघून झाले पण मला तरी काही फरक आढळला नाही. आणि मग अक्षयचे वागणे माझ्या नजरेत भरले. तो जवळपास रोजच इथे येत असलेला मला खटकले. एकेदिवशी मी त्याच्या एक्झॅक्ट मागे उभा राहिलो तेव्हा माझ्या हा घोळ लक्षात आला."
"म्हणजे तुला म्हणायचं आहे की एका विशिष्ट कोनातून अक्षय जेव्हा आरशात स्वतःला बघतो तेव्हा आणि तेव्हाच ते प्रतिबिंब तयार होते. आणि त्या कोनातून बघितले तरच ते इतरांना दिसते?"
"माझं निरीक्षण तरी असंच आहे. आणि हे प्रकरण वाढतच जाईल असे दिसते आहे."
"ते कसे काय?"
"जेव्हा तुम्ही इथे सर्वप्रथम आलात आणि तुमची आजची व्हिजिट, काही फरक जाणवतो?"
दोघांनी क्षणभर विचार केला. "गर्दी वाढल्यासारखी वाटते ना?" तारा म्हणाली.
"एक्झॅक्टली! भेट देणार्‍या लोकांची गर्दी वाढते आहे. तात्पुरत्या तोकड्या व्यवस्थापनाला लवकरच ही गर्दी झेपेनाशी होणार आहे. हे काय प्रकरण आहे मला अजूनही नीटसे कळलेले नाही. त्या शिलालेखांत काही क्लू असला तर असेल. पण तोवर ही जागा पूर्णपणे सील करणे मला योग्य वाटते"
अजितच्या भुवया आक्रसल्या. त्याचा अभ्यास अजून पूर्ण झाला नव्हता. पण बहुधा एवढा वेळही नव्हता. तिथल्या तिथे बसूनच या रहस्याचा भेद करणे आवश्यक होते.

********

महेश रात्री बराच उशीरा परतला. अजित अजूनही कागदांच्या भेंडोळ्यात डोके खुपसून बसला होता. तारा परत जाऊनही दोन दिवस लोटले होते. दिवसेंदिवस दोस्तगावातली गर्दी वाढतच चालली होती. अधिकाधिक लोक आपापला आरसा शोधत दोस्तगावात येत होते. न्यूजचॅनेल्सच्या ब्रॉडकास्टिंगने आरसे अजूनच दूरवर पोहोचत होते. ती जागा सील केली असली तरी लोक चोरून चोरून आत शिरण्याचा प्रयत्न करतच होते. तासन् तास आरशांसमोर बसत होते. एकदा अडकल्यावर त्यांना हलवणे मुश्किल होते.
"काही सापडलं?"
"वेल, शोध घेणारे डोळे वाढल्यामुळे बरंच काही सापडलं आहे आणि जेवढं सापडलंय त्यावरून अंदाज तर खूप काही बांधता येतात." अजितने त्याच्या नोट्सपैकी एक कागद त्याच्यापुढे सारला.
"दुसर्‍या सातकर्णीपर्यंत या गावाच्या नावाचा मागमूसही नाही. त्याच्या राजवटीपासून या घाटाचा सातवाहनांनी वापर सुरु केला. त्याची चिन्हे या लेण्यांमध्ये आहेत, इतर अभ्यासक याला दुजोरा देत आहेत. पण ..."
"पण?"
"पण ही लेणी सातवाहनपूर्व काळातील आहेत. बराबर गुहांच्या शैलीशी मिळती जुळती शैली या गुहांची आहे. मिळती जुळती पण सारखी नाही."
"ही लेणी कदाचित बराबरच्याही आधी बांधली गेली असावीत. कदाचित बराबरच्या कारागिरांनी ही शैली आत्मसात केली असावी. याचं कार्बन डेटिंग नाही का करता येणार?"
"इन थिअरी, हो. पण रिझल्ट्स रिलायेबल नसतील. इथे क्षीण चुंबकीय क्षेत्र आहे. चुंबकीय क्षेत्राने कार्बन-१४ च्या हाफ लाईफवर परिणाम होतो आणि डेटिंगचे निकाल चुकू शकतात. आणि तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? या लेण्यांच्या नावाने सामान्य जनता शंख करायला लागली की बेस्ट केस सिनारिओ या लेण्या जनरल पब्लिकला बंद होतील. वर्स्ट केस ....."
"पण मग काय करता येईल? चुंबकीय क्षेत्र हे कारण फेकून विषय बंद करता येऊ शकतो. तसेही गूढकथांमध्ये चुंबकीय क्षेत्रामुळे भास होतात असं कारण पुढे करतातच लोकांचा विश्वासही बसेल."
"हो, तेच करायचा विचार आहे माझा. पण त्याने रहस्यभेद तर होत नाही." अजितने एक कागद पुढे धरला.
"यातले बरेचसे शिलालेख आणि ताम्रपट गौतमीपुत्राच्या काळातले आहेत. सगळे भाषांतर नंतर वाच पण सारांश असा की या विहारांची डागडुजी करण्याचा आदेश गौतमीपुत्राने दिला होता. तेव्हा कामगारांना असाच काही चमत्कारिक अनुभव आला असावा. त्याच्या सेवकांना त्याने आरशांपासून दूर राहण्याची ताकीद दिली आहे. त्याचा आणि येथील एका भिक्षुचा संवादही दुसर्‍या एका शिलालेखात दिला आहे. त्या संवादांचा सारांश आणि ताम्रपटावर कोरलेला एकमेव शब्द एकमेकांशी संबंधित आहेत.
"कोणता तो शब्द?"
"तित्थिय!"
"म्हणजे?"
"म्हणजे धर्मभ्रष्ट! गौतमीपुत्राच्या काळात ते अनुभव आल्यानंतर त्याने एका भिक्षुच्या मदतीने इथल्या प्रकारांचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. त्याला फार काही कळले असे दिसत तरी नाही पण आरशांमध्ये काही तरी धोका आहे आणि इथले साधक धर्मभ्रष्ट आहेत असा निष्कर्ष काढला गेला आहे."
...........
धाड, धाड, धाड! दारावर पडणार्‍या थापांनी त्यांचे संभाषण खुंटले.
...........
"अजित....." अजितच्या सहकार्‍यांपैकी तो एक होता.
"काय झालं?" त्याच्या कपाळावरचे आठ्यांचे जाळे बघून अजित व महेश काळजीत पडले.
"थिंग्ज हॅव गॉट अ लिटल व्हायोलंट. एकजण आरशासमोरून उठायलाच तयार नाही आहे. त्याला घेऊन जायला आलेल्या नातेवाईकांना मारतो आहे, बोचकारतो आहे. वी आर ट्राईंग टू इव्हॅक्युएट हिम अ‍ॅज सून अ‍ॅज वी कॅन. एव्हरी बिट ऑफ मॅन पॉवर इज वेलकम!"
यापुढे आणखी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. मुकाट्याने ते दोघे लेण्यांकडे धावले.

*********

ठिय्या देऊन बसलेल्यांपैकी बहुतेक जणांना चुचकारून, मारून मुटकून बाहेर काढले गेले. तो एकच जण उरला होता. मध्यमवयीन गृहस्थ, अंगावर साधाच फुल बाह्यांचा शर्ट. बाह्या कोपरापर्यंत दुमडलेल्या. साधीच पँट, शर्ट आधी खोवलेला असावा पण आता विस्कटून जागोजागी बाहेर डोकावतो आहे. केस आणि चेहर्‍यावर धुळीचे अवशेष. बोटांवर रक्ताच्या हलक्या खुणा. जमिनीला सर्वशक्ती लावून त्या बोटांनी चिकटण्याचा प्रयत्न थोड्याच वेळापूर्वी केला होता. उजवा खांदा थोडा मोठा वाटत होता. डावी मांडी घालून शरीराला खेटलेली. उजवा पाय गुडघ्यात मुडपून उभा. उजव्या गुडघ्यावर उजवा हात टेकलेला, नव्हे रेललेला. डावा हात कंबरेपाशी जमिनीवर टेकवलेला. उजवा पंजा मनगटातून दुमडून जमिनीकडे झुकला आहे. डावा पंजा सपाट, बोटे ताणलेली शरीरापासून दूर रोखलेली आणि डोळे भावनाशून्य!

महेश पावलांचा आवाज न करता, हलकेच त्याच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. समोर एक सुंदर आरसा होता. आरशाच्या बाजूने कमळांची नक्षी होती. महेश अर्थातच त्या आरशात दिसत नव्हता. त्याच्या पाठीमागची भिंत त्यावरील आरसे, त्यांच्यात पडणारी प्रतिबिंबे, प्रकाशासाठी लावलेल्या विविध दिव्यांचा परावर्तित झालेला उजेड हे सर्व दिसत होता. त्या पार्श्वभूमिवर एखाद्या राजाच्या रुबाबात बसलेल्या त्या व्यक्तीची प्रतिमा स्पष्ट दिसत होती. मॉनिटरचा शार्पनेस १०० केल्याइतकी स्पष्ट! प्रतिमेच्या चेहर्‍यावर अतुलनीय समाधान विलसत होते. महेश चक्रावला. त्याने प्रत्यक्ष चेहर्‍याकडे पाहिले. भावनाशून्य चेहरा, जीवनलक्षणविरहित डोळे. प्रतिमेचा चेहरा - अतिशय प्रसन्न हास्य, संतुष्ट भाव. गुहेतला सर्व प्रकाश जणू त्याच्यामागे एकवटला होता. तो प्रकाश नव्हे ती आभा होती, अमित आभा! अनंत आभा! प्रतिमेची नजर महेशवर खिळली. महेशच्या शरीरातून शिरशिरी आली. त्या नजरेत कसल्याही प्रकारची आक्रमकता नव्हती, द्वेष नव्हता, आनंद नव्हता, करुणा नव्हती. होता तो फक्त संतोष! जणू महेशच्या अस्तित्वाची दखल घेण्यापुरते ते डोळे हलले होते. तेवढ्या हालचालीनेही महेशच्या अंगावर काटा आला होता. पण तो जागीच थिजला.

अशातच एक स्त्री पुढे आली. महेशला तिची ओळख पटली. तो तिला भेटला होता. समोर बसलेल्या व्यक्तीचा खांदा मोठा दिसत होता कारण तिथे हेवी पॅडिंग आणि बँडेज केले होते. याच्याच खांद्याचा उजवा टवका निघाला होता. हा तोच आरसा होता ज्याचे रॉक सँपल ताराने घेतले होते. आरशाच्या डाव्या कोपर्‍यात छोटा टवका उडालेला अजूनही दिसत होता. पण तेव्हा तर त्या आरशाला तर बॉर्डर नव्हती. हे महेश शपथेवर सांगू शकत होता, तसा फोटोग्राफिक पुरावाही होता. मग आता ही नक्षीकाम केलेली चौकट कुठून आली? काय बदलले? काय घडले? आणि याच्या बायकोला कोण समजावणार की हे सर्व काहीतरी अनाकलनीय, विस्मयकारक आहे?
"हा आरसाच आपल्या दोघांमधील अडसर आहे ना?" काही कळेपर्यंत तिने हातातला धोंडा आरशावर फेकून मारला. तिथेच पडलेला बेसॉल्ट असावा अन्यथा सामान्य दगडाने त्या आरशाला तडा जाणे कठीण होते. तिला अडवेपर्यंत तिने तीन वेळा तरी आरशावर प्रहार केला होता. अगदी चक्काचूर झाला नसला तरी जाणवण्याइतपत नुकसान झाले होते. सर्वांचे लक्ष या प्रकाराच्या जनकाकडे गेले. त्याच्या नाकातून, कानातून, तोंडातून रक्त बाहेर येत होते. जागोजागी त्याचे शरीर पिचले होते. चेहरा कोणीतरी जडवस्तुचा प्रहार करून फोडला होता. पोस्टमॉर्टेम न करताही महेश सांगू शकत होता, याची हाडे व इतर नाजूक अवयव आतून फुटले असावेत. महेशने आरशात बघितले. ती आभा, तो प्रकाश सर्व काही नाहीसे झाले होते. उरला होता तो फक्त काळोख!

~*~*~*~*~*~

निर्वाण

दोस्तगावातला त्यांचा शेवटचा दिवस असणार होता. त्या जागेला सील करण्याची शिफारस मान्य करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली होती. त्या रात्री जे काही घडले त्यावर प्रत्यक्षदर्शी वगळता कोणाचाही विश्वास बसणे कठीण होते. आरशात बदल झाल्याचे फोटोग्राफ्समार्फत सिद्ध करता येत होते पण आरसा फुटण्याचा झालेल्या मृत्युशी संबंध लावणेही अनाकलनीय होते तर चित्रीकरण नसताना ते सिद्ध करणे असंभव! तिथे काहीतरी संमोहनसदृश परिणाम होत असल्याचे तोकडे पण पचायला सोपे स्पष्टीकरण देण्यासारखे होते.
गावकर्‍यांनी या बाबतीचा धसका घेतला होता. ते तिकडे फिरकण्याची शक्यता नसली तरी वार्ताहरांची गर्दी वाढत होती. त्यांच्या वृत्तांकनातून दोस्तगावच्या लेण्यांची दुष्कीर्ती पसरणार होती. व्हिडिओतून, फोटोंतून चुंबकाप्रमाणे ते आरसे न जाणे कितीकांना आपल्या बंधनात जखडणार होते. आणि सर्वात निराशाजनक बाब अशी होती की यावर काहीच उपाय नव्हता. ते आरसे नष्ट करण्याचा परिणाम त्यांनी बघितला होता. त्या आरशांची उपलब्धता कमी करण्याचा सध्यातरी काहीच मार्ग नव्हता. हतबलता दोस्तगावात साक्षात अवतरली होती.
"अजित", तारा अजितला न्यायला शहरातून आली होती. त्याने दखल घेण्यापुरते स्मित केले. तो आपल्या नोंदी, कागदांच्या चळती, छायाचित्रे इ. सामान पॅक करत होता. ताराने एक खुर्ची गाठली आणि गार पाण्याचा घोट घेतला. तिच्या मुद्रेवरही चिंतेची लक्षणे होती.
"हे रहस्य रहस्यच राहणार असे दिसते तारा." त्याने बॅगेची चेन लावली आणि तिच्यासमोर खुर्ची घेऊन बसला.
"तुला अजून काही माहिती काढता आली?"
त्याने खिशातून एक छोटी टिपणवही काढली. "मी आधी म्हटल्याप्रमाणे ही जागा खरंच विचित्र आहे. इथे जातकातील प्रसंग कोरलेले आहेतच पण त्याबरोबर काही असे कथांची शिल्पे आहेत ज्या मला तरी परिचित नाहीत. अनेक लेख कोरले आहेत. त्यातील काही सूत्रे आहेत, काही सातवाहन राजांनी केलेल्या नोंदी आहेत. पण असे असूनही या सर्वातून एकसंबद्ध चित्र असे तयार होतच नाही. कधीकाळी इथे भिक्षुंच्या निवासाची सोय होती हे येथील विहारांवरून स्पष्ट आहे पण आरशांसमोर बसून प्रार्थना करण्याची पद्धत का आणि कुठून आली हे काही कळत नाही. तरीही इ.पू. ५० च्या सुमारास अशी प्रार्थना करणारा एक पंथ उदयास आला असावा. यांचे नावही अगदी समर्पक आहे. तित्थिय, किंवा संस्कृतमध्ये तीर्थक हे संसाराचे चक्र, कर्मबंध तोडून त्यातून सुटका करणारे म्हणवले जातात. या साधकांचे लक्ष्यही तेच असावे असे दिसते आहे. यांना धर्मभ्रष्ट लेबल लावले यात काहीच नवल नाही. पण हे आरसे वापरायचे कसे सुचले आणि हे आरसे कोणी तयार केले याविषयी काहीच माहिती नाही."
"माझ्याकडेही नवीन माहिती आहे."
"ती काय?"
"ते दगड.. त्या टॅकिलाईटच्या दगडांच्या मागे एक अतिशय पातळ पापुद्रा आहे. हा चांदी, लोखंड आणि टायटॅनिअम अशा मिश्रधातुचा पापुद्रा आहे. माझा अंदाज असा आहे की या पापुद्र्यामुळे त्या दगडांची परावर्तनक्षमता कमी होत असावी."
"पण मग त्यात निर्जीव वस्तुंचे प्रतिबिंब कसे दिसते?"
"युअर गेस इज अ‍ॅज गुड अ‍ॅज माईन! एनीवे या मिश्रधातुमध्ये क्षीण चुंबकीय गुणधर्म आहेत. तिथे क्षीण असे चुंबकीय क्षेत्र आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर परिणाम झालेला जाणवत नाही म्हणजे ते क्षेत्र फारच क्षीण असावे पण एका विशिष्ट कोनात, विशिष्ट अंतरावर आरशाच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता सर्वोच्च असावी. या चुंबकीय क्षेत्रामुळे तर हे सर्व घडून येत नसेल?"
दोघांकडे यावर काहीच उत्तर नव्हते. फेकायला म्हणून हे कारण छान होते. पण त्याने चित्र स्पष्ट होण्याऐवजी अजूनच धूसर होत होते. त्या विशिष्ट कोनात, विशिष्ट अंतरावरही केवळ एकाच व्यक्तीचे प्रतिबिंब पडत होते. तसे का यावर कसलेच उत्तर देता येत नव्हते.

"महेश कुठे आहे?"
"अक्षय आठवतो ना? तोच एक राहिला आहे जो आरशांपासून हलायला तयार नाही. त्याला आज गुहांतून बाहेर घेऊन येणार होते. महेशला त्या आरशांमध्ये आणि या लोकांमध्ये भलताच रस निर्माण झाला आहे. जागा सील होण्याआधी तो जास्तीत जास्त निरीक्षण करून घेतो आहे. अर्थात रहस्य सुटण्याची आशा मी सोडली आहे. ऐतिहासिक दस्तावेजही काही मिळेल असे वाटत नाही."
"अरे पण मग हा मनुष्य अजून परतला कसा नाही?"
चौकशी करताच अक्षयला त्याच्या घरी आणल्याचे समजले. महेशही तिकडेच आहे असे कळले. मग ते दोघे अक्षयच्या घरी गेले. घरात सुतकी अवकळा पसरली होती. अक्षयला परत परत आरशासमोरून मारून मुटकून उठवून, घरी आणून, त्यावर नजर ठेवून आधीच थकलेल्या त्याच्या घरच्यांनी आता हात टेकले होते. निराशा त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. अक्षय भिंतीला टेकून बसला होता. डावी मांडी घालून शरीराला खेटलेली. उजवा पाय गुडघ्यात मुडपून उभा. उजव्या गुडघ्यावर उजवा हात टेकलेला, नव्हे रेललेला. डावा हात कंबरेपाशी जमिनीवर टेकवलेला. उजवा पंजा मनगटातून दुमडून जमिनीकडे झुकला आहे. डावा पंजा सपाट, बोटे ताणलेली शरीरापासून दूर रोखलेली आणि डोळे भावनाशून्य!
"मी त्याला याच अवस्थेत आरशासमोर बसलेला पाहिला." महेश सांगत होता.
"त्याचे प्रतिबिंबही आरशात दिसत होते. इतकी स्पष्ट प्रतिमा मी कधीच पाहिली नव्हती. त्या आरशातील अक्षयने माझ्याकडे बघून हात हलवला अजित. जणू अक्षयचा आत्माच त्या आरशात होता. तो अतिशय आनंदी दिसत होता, पण त्या आनंदाची मला भीति वाटली. खूप प्रखर प्रकाशाकडे फार काळ बघवत नाही तसेच त्या अतिरेकी आनंदाचा मला तिटकारा वाटला. तिथे उभे राहणे नकोसे झाले. अखेर गावकर्‍यांच्या मदतीने याला उचलून परत आणले. यावेळेस त्याने कसलाही विरोध केला नाही. किंबहुना त्याने कसलीही हालचाल केलेली नाही. त्याचा श्वास चालू आहे, नाडी व्यवस्थित आहे. प्राथमिक तपासणीनुसार तो शंभर टक्के निरोगी आहे. तो जिवंत आहे पण याला जिवंत म्हणावे का?"
महेशच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कदाचित कोणीच देऊ शकणार नव्हते. आरशांची जी काही प्रक्रिया होती ती अक्षयच्या बाबतीत पूर्णत्वास गेली होती. जरी दोनच उदाहरणे डोळ्यांदेखत असली तरी निष्कर्ष स्पष्ट होता. या प्रवाहात एकदा अडकले की सुटका नाही. जसे गोफणीतला दगड वर्तुळाकार गतीने फिरतच राहतो पण एकदा गोफणीतून दगड सुटला की तो परत येत नाही. तसेच जीवनचक्रातून सुटल्यावर त्या अतिरेकी हर्षामध्ये सामावल्याशिवाय गत्यंतर नाही. शारिरिक, मानसिक, बौद्धिक वा आत्मिक, कोणताही पिंजरा असो; तुमचा आरसा त्या पिंजर्‍याचे दार उघडतो. आणि एकदा पिंजरा उघडला की उडालेला पक्षी परत येत नाही.

~*~*~*~*~*~

अनात्मन

साधारण तीन आठवड्यांनी अजित दोस्तगावात परतला. त्याला इतर गुहांचे निरीक्षण करण्याची परवानगी मिळाली होती पण दर्पणगृहात जायला सक्त मनाई होती. त्याला एका विशिष्ट गुहेत रस होता कारण त्या गुहेत यज्ञश्री सातकर्णीचा उल्लेख होता. सम्राट म्हणावा असा यज्ञश्री हा शेवटचा सातवाहन राजा! म्हणजे हा उल्लेख कालक्रमे सर्वात नवीन होता. त्या गुहेचा अभ्यास कसून करावाच लागणार होता. तसे त्याच्याकडे प्राथमिक स्वरुपाचे भाषांतर तयार होते. यज्ञश्रीच्या राज्यकाळात एकाएकी हे सर्व तित्थिय मरण पावलेले आढळले. त्या गुहेला यज्ञश्रीच्या आदेशावरून दगड वगैरे बसवून सील केले असावे आणि मग वरून रॉक फॉर्मेशन झाले असणार. जर हे कन्फर्म झाले तर किमान या गुहा इतकी वर्षे लपून कशा राहिल्या याचे ठाम उत्तर मिळेल. त्याने आपल्या पद्धतीने जे काही निरीक्षण करायचे ते केले आणि तो थबकला. दर्पणगृहाच्या दिशेने जाणारी मुंग्याची रांग पाहून काहीतरी चुकते आहे हे त्याच्या ध्यानात आले. तिथल्या पहारेकर्‍याने आपण शक्यतो त्या दालनापासून दूरच राहत असल्याचे कबूल केले. तो फक्त मुख्य प्रवेशद्वारावर पहारा ठेवून होता. पण इथे येण्याचा आणखी एक मार्ग असला तर? त्या मुंग्या कोणा आगंतुकाने आणलेल्या खाद्यपदार्थांच्या कणांवर ताव मारायला आलेल्या असल्या तर?

पहारेकर्‍याला आत्ताच विश्वासात घेण्यात फारसा अर्थ नव्हता. त्याने गावातले हॉटेल गाठून पोहे आणि चहा अशी ऑर्डर दिली. कोण येत असेल इथे? मुळात एकच व्यक्ती येत असेल का एकापेक्षा अधिक जण असतील? इथे असलेला धोका जगजाहीर असतानाही कोण येत असावं? आरशांनी जखडलेला कोणी दुर्दैवी जीव? पण मग सोबत खाण्याचे जिन्नस का आणले असावेत? आरशांनी जखडलेले जीव तिथून हलायलाही तयार नव्हते मग हा कोण आहे? आणि तेवढ्यात पोह्याची प्लेट घेताना मालकांचे बोलणे ऐकून अजितच्या पायाखालची जमिन सरकली.
"यावेळेस महेशरावांसोबत तुम्ही पण आलात ते बरं झालं. नाहीतर ते एकटेच येत असतात. ते दिसत नाहीत. कुठे गेले ते?"
महेश! महेश इथे येत होता. महेशला दुसरा प्रवेशमार्ग सापडला असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्याने या गुहांमध्ये बराच वेळ घालवला होता. किंबहुना सील होण्यापूर्वी तो जवळपास रोजच इथे चक्कर मारत होता. का आरशाच्या ओढीने तो रोज त्या दर्पणगृहाकडे खेचला जात होता. याचा छडा लावण्याचा एकच मार्ग होता. महेशला गुहेत गाठून जाब विचारणे.

दुसर्‍याच दिवशी महेश आला. अजित दिखाव्यापुरता परत गेला असला तरी तो अक्षयच्या घरी मुक्काम ठोकून होता. महेश मास्तरांकडे उतरतो हे त्याला कळले होते. मास्तरांना विश्वासात घेऊन अजित आपले वास्तव्य गुप्त ठेवण्यात यशस्वी झाला होता. आता प्रतीक्षा होती ती रात्रीची. महेश काळोख झाल्यावर गडद निळ्या रंगाची शाल लपेटून डोंगराकडे निघाला. अजितने थोडे अंतर ठेवून त्याचा पाठलाग सुरु केला. मध्येच त्याने नेहमीचा रस्ता सोडून एक पायवाट पकडली. त्याच्या वेगाशी जुळवून घेताना अजितची दमछाक होत होती पण त्याने नेटाने तीच वाट तुडवली. अंधुक चंद्रप्रकाशातही एका चिंचोळ्या गुहेचे तोंड दिसत होते. हाच दुसरा प्रवेशमार्ग असणार. गुहांच्या जाळ्याचा सर्व्हे पूर्ण झाल्यास ही वाट सापडणे अशक्य नव्हते. पण त्या दोन मृत्युंनंतर ही कामे रखडली होती आणि महेशने त्याचा फायदा उठवला होता. पण तो तिथे जाऊन करत काय होता? इतक्या दिवसांत तर त्याच्यावर आरशांचा प्रभाव पूर्ण झाला पाहिजे. अजितने आपल्या टॉर्चवर लाल जिलेटिन पेपर लावून प्रकाश मंद करण्याची सोय केली आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधायला तो गुहेत शिरला.

चाचपडत दर्पणगृहापर्यंत पोहोचायला त्याला जरा वेळ लागला. महेश आत असल्याचे संकेत तिकडून येणार्‍या आवाजांनी मिळत होते. अजितने पहारेकर्‍याच्या बाजूचा कानोसा घेतला. कसल्याशा लोकगीताचे सूर कानावर आले. तो कंटाळा येऊ नये म्हणून गाणी गात होता. महेशच्या हालचाली जणू गुहांच्या भिंती शोषून घेत होत्या. पहारेकर्‍यापर्यंत ते आवाज पोहोचूच देत नव्हत्या. अजितने मनाशी एक निर्धार करून दर्पणगृहात प्रवेश केला. महेश तिथेच होता. त्याच्या सॅकमध्ये बिस्किटांचा पुडा दिसत होता. हातात छिन्नी होती. एक आरसा भिंतीतून काढून त्याने पापुद्रा आपल्याकडे आणि काचेचा भाग भिंतीकडे असा टेकवला होता. छिन्नीचे घाव घालून तो आरशाचा पापुद्रा उकलत होता. गुहेच्या रचनेमुळे मर्यादित चंद्रप्रकाशही ते दालन उजळून टाकत होता. महेशचे काम जवळजवळ पूर्ण होत आल्याचे लक्षात येत होते. त्याच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य दिसत होते. पण ते समाधान आसुरी होते, अतिरेकी होते. न राहवून अजितने त्याला हाक दिलीच "महेश!"
महेश जागीच थबकला. त्याला काही बोलायचे असले तर ते शब्द बाहेर पडले नाहीत, घशातच अडकले. त्याला अजितचे आगमन आवडले नाही हे स्पष्ट होते.
"महेश हा काय प्रकार आहे?"
"अजित...... अजित ही वेळ स्पष्टीकरणाची नाही, काम पूर्ण करण्याची आहे."
"तू हे जे काही करतो आहेस ते टप्प्या-टप्प्याने योजनाबद्धरित्या पूर्णत्वास नेत आहे. मला नाही वाटत अजून काही मिनिटांनी फार काही बिघडेल. आणि जर तुझी अपेक्षा असेल की या पुरातन अवशेषांची मनाला येईल तशी नासधूस मी माझ्या डोळ्यांदेखत होऊ देईन तर तुझा फार मोठा गैरसमज झाला आहे."

महेशने एक सुस्कारा सोडला. आणि अचानक त्याने एक छोटा दगड नेम धरून अजितच्या कपाळावर मारला. अजित बेशुद्ध झाला. थोड्यावेळाने अजितच्या चेहर्‍यावर पाण्याचे हबके मारून त्याला शुद्धीवर आणण्यात आले. महेशच्या चेहर्‍यावर तेच अतिरेकी हसु होते. हा महेशच होता ना? कपाळाची जखम चांगलीच ठसठसत होती. शांत डोक्याने विचार करण्याच्या परिस्थितीत अजित नव्हता.
"आता तू फक्त ऐक. तसेही या आरशांचा बीमोड करण्याचा मार्ग मी शोधून काढला आहे. त्याची सिद्धताही काही क्षणांत होऊन जाईल. मी आलो त्याच दिवशी मला माझा आरसा सापडला होता. प्रतिबिंब अंधुक, अस्पष्ट होते पण होते खास! अक्षयची अवस्थाही मी पाहिली. त्याच्या उदाहरणाने मी सावध झालो. मीही जवळपास रोजच माझे प्रतिबिंब बघायला येत होतो. ते प्रतिबिंब दिवसेंदिवस ठळक होत होते. एके रात्री मी आरसा भिंतीतून उपसून काढला आणि डोंगरात फेकून दिला. पण दुसर्‍या दिवशी त्या रिकाम्या खोबणीत एक नवीन आरसा तयार होता. त्यातला 'मी' माझ्याकडे प्रसन्नपणे स्मित करत होता. माझा आरसा तयार झाला होता अजित, त्याला नष्ट केल्याखेरीज माझी सुटका नव्हती.
पण याला नष्ट तरी कसा करायचा? आरसा फोडण्याचा परिणाम डोळ्यादेखत पाहिल्यावर तसले वेडे साहस करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि आरशातला 'मी' दिवसेंदिवस प्रबळ होत चालला होता. पण तो 'मी' नव्हतो, अजित! मी मनाला पक्के बजावले होते की 'तो' मी नाही. त्याचे ते स्मितहास्य जणु मला दात विचकून सांगत होते की एक दिवस, एक दिवस तुझा प्रतिकार अपुरा पडणार आहे आणि तू माझ्यात सामावून जाणार आहेस. अखेर मला एक मार्ग सुचला. जर आरशात प्रतिबिंबच तयार झाले नाही तर? आधी मी थोडासाच पापुद्रा खरवडून पाहिला. मला कसलीही इजा झाली नाही. पण त्याचे स्मित किंचित अरुंद झाल्यासारखे वाटले. बस्स! हाच एकमेव उपाय असल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हापासून मी गुपचूप येऊन माझा आरसा भिंतीतून बाहेर काढतो, पापुद्रा खरवडतो आणि परत भिंतीत बसवतो. रात्रीचा पहारेकरी आत फिरकतही नाही. मी निर्विघ्नपणे माझे काम करत होतो आणि अखेर आज, आज ते पूर्ण होईल."

महेशच्या चेहर्‍यावरचे अतिरेकी हास्य आता शब्दशः राक्षसी दिसत होते. अजितला नुसत्याच अणकुचीदार दातांच्या रांगा दिसत होत्या. यात जखमेमुळे गरगरणार्‍या डोक्याचा प्रभाव असण्याची शक्यता होती पण महेशमध्ये काही बदल झाला होता हे नक्की! निर्वाणीचा म्हणून अजितने प्रयत्न केला
"महेश, तू महेश राहिलेला नाहीस. माझा मित्र महेश असा वागत नाही. तो माझ्यावर कधीही हात उगारणार नाहीस. तसेही तुझ्या सिद्धांताला कसलाही शास्त्रीय आधार नाही. त्याचे दुष्परिणामच अधिक दिसत आहेत. महेश ऐक माझं. तू महेश असशील तर माझं, तुझ्या मित्राचं, अजितचं ऐकशील."
"महेश असशील म्हणजे?" महेशचा आवाज चढला होता. "मीच महेश आहे. इथे जर कोणी महेश नसेल तर तो आहे हा....."
त्याने आरशाचे तोंड फिरवले. इतक्या दिवस संपर्कात आल्यामुळे असेल किंवा महेशने पापुद्रा खरवडण्यामुळे असेल पण आरशात आणखी एक महेश दिसत होता. जणू महेश आरशात शोषला गेला होता. आरशातल्या महेशची मुद्रा क्रुद्ध होती. एवढा रागीट चेहरा अजितने कधीच पाहिला नव्हता. त्या रागीट मुद्रेने क्षणभरच का होईना अजित भयाने जागीच थिजला. तो क्षण महेशसाठी पुरेसा होता. त्याने छिन्नी उचलली आणि पापुद्र्याचा अखेरचा तुकडा उचकटला.

..................
..................
..................

भक्कन प्रकाश पडला आणि अजितची शुद्ध हरपली. दुसर्‍या दिवशी त्याचे डोळे उघडले तर तो दर्पणगृहात एकटा होता. महेशचा मागमूसही तिथे नव्हता. त्याच्या आरशाची खोबण रिकामी होती. कपाळाची जखम अजूनही ठसठसत होती. तो भिंतीचा आधार घेत बाहेर पडला. त्याला गुहेतून बाहेर येताना पाहून पहारेकरीही दचकला. त्याला गावात आणून त्याची मलमपट्टी केली गेली. पण त्याला काही केल्या आपण तिथे का गेलो होतो हे आठवत नव्हते. तिथे एक सॅक आणि छिन्नी सापडली. दोन्ही अजितचे नसल्याचे सिद्ध झाले. छिन्नीवर कोणाचेच हातांचे ठसे नव्हते. जणू ती कोणी वापरलीच नाही. त्या सॅकमध्ये एक ड्रायव्हर लायसेन्स होते पण त्यावरच्या पत्त्यावर एक जुनाट, मोडकळीला आलेला वाडा होता. लायसेन्सवरचा फोटो व्हाईटनर लावल्याप्रमाणे पांढरा होता. आणि अजितला डोके खाजवून खाजवूनही महेश कर्त्रे नामक इसम कोण हे लक्षात येत नव्हते.

~*~*~*~*~*~

(अ)नित्य

महेशने डोळे उघडले तेव्हा तो दर्पणगृहातच होता. पण तो एकटा नव्हता. साधीच पण स्वच्छ वस्त्रे नेसलेले आणखी पाचजण त्यासोबत होते. अचानक त्याच्या डोक्यातून चमक गेल्यासारखं वाटलं आणि त्याचे विचारचक्र सुरु झाले. तो इथे काय करत होता, हे लोक कोण आणि, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो स्वतः कोण होता? पण या सर्वांवर विचार करायला त्याला फारसा वेळ मिळाला नाही. त्यापैकी एकजण त्याच्याच दिशेने येत होता. महेश घाबरून काहीसा मागे सरकला. यावर त्याने प्रसन्नपणे स्मित केले आणि म्हणाला,
"मित्र! भयाकुल होण्याची काहीच आवश्यकता नाही. आपण सर्व एकमेकांचे मित्र आहोत. आमच्यापैकीच एका मित्राने आमचा विश्वासघात केला. अर्थात हे स्थळही एक मित्र आहे आणि मित्रांची मदत करणे हे मित्राचे कर्तव्य आहे. तसेच विश्वासघातकी मित्र असू शकत नाही आणि या स्थळी फक्त मित्रच राहू शकतात. त्यामुळे तो नाहीसा झाला. प्रथेप्रमाणे त्याची जागा घेण्यास नवीन मित्र येणार होताच. ये आम्ही तुझीच वाट बघत होतो. ये."
महेश तशाच भारलेल्या अवस्थेत उठला. त्याच्या नेमून दिलेल्या जागेवर बसला. डावी मांडी घालून शरीराला खेटली. उजवा पाय गुडघ्यात मुडपून उभा केला. उजव्या गुडघ्यावर उजवा हात टेकवला, नव्हे रेलला. डावा हात कंबरेपाशी जमिनीवर टेकवला. आपसुकच उजवा पंजा मनगटातून दुमडून जमिनीकडे झुकला. डावा पंजा सपाट, बोटे ताणून शरीरापासून दूर रोखली. नजर समोरच्या आरशावर खिळली. हळू हळू त्याची नजर भावनाशून्य होत गेली आणि आरशातला 'त्या'च्या चेहर्‍यावर प्रसन्न स्मितहास्य खेळू लागले.

(समाप्त)

Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त आहे कथा. दोनदा वाचून काढली.
शेवट नीट कळाला नाही. बरेच प्रश्न पडले आहेत. महेश बाबतीत बाकीच्यांची मेमरी का गेली? तो गायब झाला हे नंतर पण कोणालाच कळले नाही का? अजितला मारणारा खरा महेश होता का , का तो आरशात गेला होता? विश्वासघातकी मित्र म्हणजे नक्की कोण?

मेंदूला झिणझिण्या आणणारे लेखन. ..
एका भागात पूर्ण केल्याबद्दल स्पेशल धन्यवाद.
नाहीतर पुढच्या भागाची वाट बघणे या कथेबाबत त्रासदायक झाले असते.
तुमच्या सर्वच कथा एकदम हटके आहेत. सुचते कसे हे ?????

मस्त कथा! वाचताना एकदम गुंगून गेले कथेत.
तुमचे विशेष धन्यवाद कारण -
- कथा क्रमशः न देता एकसंध दिलीत.
- वाचताना कुठे शुद्ध लेखनाच्या चुका जाणवल्या नाहीत. म्हणजे लेखन इथे सादर करण्याआधी तुम्ही ते निर्दोष असावे म्हणून तेवढी मेहनत घेतली आहे....कंटाळा न करता.

कथा प्रचंड आवडली. पण शेवट नाही समजला.

महेश बाबतीत बाकीच्यांची मेमरी का गेली? तो गायब झाला हे नंतर पण कोणालाच कळले नाही का? अजितला मारणारा खरा महेश होता का , का तो आरशात गेला होता? विश्वासघातकी मित्र म्हणजे नक्की कोण? >>>>>हे प्रश्न मलाही पडलेत.

भन्नाट!
कसलं डिटेलिंग केलंय! चित्रपटाप्रमाणे झरझर डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं.
गूढ आहे... बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. पण मजा आली वाचायला.
शेवटच्या प्रसंगाने वर्तुळ पूर्ण करायचा प्रयत्न करतोय, पण अडखळतोय.

तुफान लिहिलयस पायस!! कथेची लांबी पाहून मला नानू सरंजामेची ‘दीर्घ कथा किंवा लघु कादंबरी‘ आठवली. Happy सॉलिड जमलीय.
गटणे मोड ऑनः कथा वाचायला लागलेला समय- रात्री १० वाजून १० मिनिटे ते १० वाजून २० मिनिटे. कथावस्तू आकर्षक आहे. कथा दोस्तगाव व शहर ह्या दोन भागात घडते Happy
गटणे मोड ऑफ!! लिखते रहो!!!

सर्व वाचकांना धन्यवाद. प्रतिसादांकरिता - चैत्रगंधा, आसा, rmd, जिज्ञासा, अथेना, Vini, धनवन्ती, एस, शैलश्री, अमितव, फेरफटका, maitreyee - आभार.

सर्वच प्रश्नांची उत्तरे मी देणार नाही कारण तसे केल्यास यामागच्या कन्सेप्टचे माझे इंटरप्रिटेशन वाचकांवर लादल्यासारखे होईल. पण काही बाबींचा खुलासा करीत आहे

महेश बाबतीत बाकीच्यांची मेमरी का गेली? तो गायब झाला हे नंतर पण कोणालाच कळले नाही का? अजितला मारणारा खरा महेश होता का , का तो आरशात गेला होता? >>
आरशातली प्रतिमा तयार होते म्हणजे आपली कॉपी तयार होते. संगणकशास्त्रात कॉपीचे दोन प्रकार असतात - डीप कॉपी आणि शॅलो कॉपी. डीप कॉपी डिलीट झाली तरी मूळ ऑब्जेक्ट/डेटा सुरक्षित राहतो, त्याला धक्का लागत नाही. शॅलो कॉपीमध्ये कॉपी आणि मूळ ऑब्जेक्ट लिंक्ड असतात आणि एक नष्ट झाला की दुसराही नष्ट होतो. याचप्रकारचे काहीतरी या आरशांबाबत घडते. जेव्हा आरसा फुटला तेव्हा हार्डवेअरला धक्का बसला आणि परिणामस्वरुप आपले हार्डवेअर म्हणजे शरीर डॅमेज झाले. महेशने सॉफ्टवेअर (पापुद्रा) डिलीट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा डेटा या जगातून पुसला गेला. लिंकिंग शंभर टक्के नसल्याने काही खुणा मागे राहिल्या.

विश्वासघातकी मित्र >> सुरुवातीला 'ज्या'ने पापुद्रा खरवडला आणि इतर पाच साधकांवर हल्ला केला 'तो'.

अरे बापरे! ही वेगळीच गडबड झाली की! संगणक शास्त्र!!
पॉईंटर असायनमेंट होत्येय तोवर ठीक आहे पण चुकीने मूळ डेटा डिलिट झाला वि. पॉईंटर डी allocate झाला किंवा मग डँगलिंग पॉईंटर उरला म्हणजे शून्यात नजर लावून (नल Wink ) बघणारे लोकं. दोन्ही कडे (आरशात आणि जगात) अस्तित्त्व म्हणजे वेगळा थ्रेड स्पॉन झाला, पण त्याच प्रोसेस मध्ये त्यामुळे मेमरी स्पेस शेअर्ड आहे... दिसणं अनुभव इ. शेअर्ड आहेत. प्रोग्रॅम स्पेस वेगळी आहे..सो एक हसतो आणि दुसरा क्रुद्ध होतो.
परत वाचणं आलं. Happy

पायस, तुमच्या कथा नेहमीच आवडतात. ही कथा मात्र थोडी क्लिष्ट वाटली. कदाचित प्रतिसादातून समजेल. पुलेशु!

दोनदा वाचून काढली. भारीच लिहिलय. आजच mirrors सिनेमा पाहिला होता. आरसे आणि प्रतिबिंब रिलेट झाले.

किती अभ्यास करून लिहिलंय हे तुम्ही... खूपच उत्कंठावर्धक कथा. आणि त्यामागची तुमची मेहनतही जाणवते. अर्थात तुमच्या प्रत्येक लेखनात तुमचा अभ्यास दिसतोच.
कथा आवडली. पण शेवटी जरा गोंधळ झाला. प्रतिसाद वाचून समजली.

किती अभ्यास करून लिहिलंय हे तुम्ही... खूपच उत्कंठावर्धक कथा. आणि त्यामागची तुमची मेहनतही जाणवते. अर्थात तुमच्या प्रत्येक लेखनात तुमचा अभ्यास दिसतोच....
सहमत. डिटेल्स, दगडांचे प्रकार, त्यामागचे विज्ञान, ते सर्व डोळ्यासमोर उभे केले तुम्ही.
अप्रतिम कथा.

. खूपच उत्कंठावर्धक कथा. आणि त्यामागची तुमची मेहनतही जाणवते. अर्थात तुमच्या प्रत्येक लेखनात तुमचा अभ्यास दिसतोच....
सहमत. डिटेल्स, दगडांचे प्रकार, त्यामागचे विज्ञान, ते सर्व डोळ्यासमोर उभे केले तुम्ही.
अप्रतिम कथा.>>>>+++1 अगदीच सहमत...

Fantasies are based on facts...

पायस नाव बघून लगेच ओपन केली कथा
खूप छान आहे कल्पना
फक्त आरशांचे थोडे अजून डिटेल्स समजले तर जास्त एन्जॉय करता येईल

Pages