घनश्याम

Submitted by मधुमंजिरी on 12 August, 2020 - 14:45

घनश्याम

जगन्नियंता, तारणहार, सृष्टी चालक
तरीही जन्मापासून नशिबी आलेली वणवण,
वासुदेवा, तुला सुद्धा चुकली नाही रे!
मग आम्हा पामरांची काय कथा?

जन्मदात्यांची ताटातूट, जन्मभूमी मथुरेतून
परक्या मातीत रुजून तिथेच मुळं घट्ट रोवून फुलणं,
नंद - यशोदा - गोकुळात नंदनवन
कालिया मर्दन, पुतना,गोवर्धन पर्वत
आणि कुंजवनी गोप गोपिकांसह रासलीला।
वेड्या राधेला, तिच्या प्रीतीला डावलून
सहजतेने निघालास पुढच्या मुक्कामावर।

त्याच सहजतेने रुक्मिणी हरण करूनही
सत्यभामेच्या प्रेमाचा अव्हेर न करता ही
सोळा सहस्र नारींचा तू स्वीकार, उद्धार केलास।
आणि ज्या कार्यासाठी मानव जन्म घेतलास
त्या धर्म रक्षणार्थ निघालास, त्याच सहजतेने।

कर्ता तूच अन् करविता पण तूच
याचेच प्रत्यंतर देत , शांतीसाठी युद्ध
हा विचार रुजवत, पांडव पत्नी द्रौपदीचा
कृष्णसखा झालास आणि शेवटी फक्त
साक्षीभाव ठेवून शस्त्र न घेता गीता कथनातून
अर्जुनाला कर्माचे महत्त्व पटवलेस,
आणि अमर अविनाशी आत्मा हेच परमसत्य
सांगितलेस , सहजपणे।

आणि सारे स्थिरस्थावर झाल्यावर देखील
यादवी युद्धात निर्वंश होताना तुझी सोन्याची द्वारका
बुडताना पाहिलीस, त्याच सहजतेने,
अन् मृगया करणाऱ्या व्याधाच्या बाणाने
जखमी होऊन मर्त्य जीव सोडलास,
सहजतेने।

स्वीकार! हेच तर सूत्र जीवनाचे आणि
कर्मयोगाचा सिद्धांत शिकवलास,
भूत भविष्य सोडून वर्तमान जगलास,
ना दुःखाने विद्ध, ना आनंदाचे तरंग,
तरीही प्रसंगी सुदर्शन चक्र वापरलेस,
अनंत हस्ते कमलावराने उधळलेस,
तरीही उरलास तू चहूदिशांतून, म्हणून तर
तू घनश्याम- अथांग, अनंत, निस्संग, गूढ,
दूर क्षितिजावर दिसणारा, त्या निस्सीम ओढीने
येणाऱ्याला तुझ्या रंगात रंगवणारा - घननीळा।

मुरली आणि राधा गोकुळातच सोडल्या, तरी
तू मुरलीधर अन् राधेश्याम,
तूच द्वारकाधीश, योगेश्वर, पुरूषोत्तम,युगंधर
तूच सुदर्शन चक्रधारी आणि रणछोडदास पण तूच।
मनमोहन, माधव, केशव, वसुदेवनंदन, माखनचोर आणि
पार्थसारथी देखील तूच! अनाकलनीय, अथांग, अनघ
श्याम - मेघश्याम, घनश्याम!!!

© सौ मंजुषा थावरे (११.८.२०२०)

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लिहीले आहे.
>>>स्वीकार! हेच तर सूत्र जीवनाचे आणि
कर्मयोगाचा सिद्धांत शिकवलास,
भूत भविष्य सोडून वर्तमान जगलास,
ना दुःखाने विद्ध, ना आनंदाचे तरंग,
तरीही प्रसंगी सुदर्शन चक्र वापरलेस,
अनंत हस्ते कमलावराने उधळलेस,
तरीही उरलास तू चहूदिशांतून, म्हणून तर
तू घनश्याम- अथांग, अनंत, निस्संग, गूढ,
दूर क्षितिजावर दिसणारा, त्या निस्सीम ओढीने
येणाऱ्याला तुझ्या रंगात रंगवणारा - घननीळा।>>>> वाह!!