एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम कविता

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक
इतिहासाकडून आपण नेमकी कोणती शिकवण, कोणता वारसा घेतो? पूर्वसुरींची उद्दिष्टं, त्यामागचा विचार, त्यासाठींचा त्याग, संघर्ष यातलं किती आणि काय येतं आपल्या समजुतीच्या आवाक्यात? आत्मसात काय होतं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांकडे काय पोचवलं जातं? परंपरा संक्रमित होते ती संघर्षाची की स्वतंत्र विचारांची की नुसतीच विभूतीपूजेची? पुढच्या पिढीच्या जडणघडणीत आपलं योगदान काय?
एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक हे आणि असे बरेच प्रश्न मांडते. 'इवली झालेली तलवार', 'आधीच पाठीतून वाकलेले (अनुयायी)', 'हातात पुस्तक असते तर अधिक हिंस्त्र वाटला असता' यांसारख्या प्रतिमा / ओळी अतिशय प्रभावीपणे येतात. शेवटी जगताना असे प्रश्न पडणंच महत्त्वाचं. 'साधी सोपी उत्तरं' असं काही नसतंही आणि नसावंही, नाही का?

याव्यतिरिक्त लक्षवेधी वाटलेली कविता :
कधीतरी.
एखाद्या साध्याच पण प्रामाणिक विचाराने, साध्यासोप्या पण अंत:करणापासून आलेल्या अभिव्यक्तीने तिच्या त्या सच्चेपणाच्या झळाळीमुळेच लक्ष वेधून घ्यावं आणि मग हळूहळू केवळ त्या झळाळीचाच उदोउदो वाढत जाऊन मूळ विचार हरवून जावा यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असेल? मुखवटे मिरवायची/नाचवायची सवय व्हावी आणि चेहरा असं काही नसतंच/नसावंच असं मानायचा प्रघात पडून जावा - असं होतं तेव्हा आपली स्वतःची सामान्यसुद्धा ओळख जपू पाहणार्‍याने कुठे जायचं असतं? समाजाच्या गतानुगातिकतेवर नेमकं भाष्य करणारी कविता.

----------
जाता जाता :
या महिन्यात निवडल्या गेलेल्या दोन्ही कविता एकाच कवीच्या आहेत हा एक योगायोग. या दोन्ही कविता आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिल्या होत्या हा त्याहून मोठा आणि दुर्दैवी योगायोग. या कवीच्या बाकी कविता कोणाला दिसूच नयेत आणि 'मायबोलीला रामराम' म्हणून लिहिलेली कविता तेवढी भलत्याच कारणांसाठी दखलपात्र व्हावी, हा कसला योगायोग? गेल्या महिन्यात सर्वोत्तम म्हणून निवडली गेलेली 'पाऊस बारावाटा' ही कविता अशीच दुर्लक्षित रहावी, आणि निवड झाल्यावर मात्र तिच्यावर अनुकूल अभिप्रायांचा पाऊस बारावाटांनी पडावा हा ही योगायोगच म्हणायचा का?
गुलमोहोरावरच्या आपल्याला न आवडणार्‍या कवितांच्या (आणि कवींच्याही!) दर्जावरून गदारोळ करणं हा जसा आपल्याला हक्क वाटतो तशी चांगल्या लिखाणाची आवर्जून दखल घेणं, थोडा वेळ त्यासाठीही खर्च करणं ही जबाबदारी वाटते का?
'आताशा पूर्वीसारखे लिहिणारे राहिले नाहीत' हे वाक्य किती सहज म्हणतो आपण, पण आताशा पूर्वीसारखे वाचणारे/समजणारे राहिलेत का? आंतरजालासारख्या माध्यमामुळे आपले विचार एकाच वेळी अनेकांसमोर व्यक्त करणं सोपं झालं हे खरं, पण विचार 'पोचणं' इतकं कठीण का झालंय?

या संदर्भात वैभव जोशींची एक कविता आठवली ती त्यांच्या परवानगीने उधृत करत आहे :

कुसुमाग्रज
बरं झालं तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं...
तुम्ही मोठ्या उल्हासाने "कणा" पोस्ट केली असती
अन पापणी लवायच्या आत
तुमच्या आयडी वरच शंका घेणारा प्रतिसाद आला असता
ज्याला अनुमोदन किंवा विरोध म्हणून
चर्चा इतकी रंगली असती की
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

दैव फारच मेहरबान असतं तर
वाचली असती एखाद्या विडंबन करणार्‍याने "कणा"
आणि मारून मोकळा झाला असता
कणाहीन विडंबनाच्या निमित्त्ताने
बायकांना आणखी एक टोमणा.
तुमचा (?) समस्त वाचकवर्ग धावत सुटला असता
पुरुषवर्गाच्या पोस्ट्स गडाबडा लोळायला लागल्या असत्या
स्त्रीवर्गाच्या पोस्ट्सवर पटापट स्माईल फुटलं असतं
मात्र
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

किंवा तुमच्या नशीबी आला असता
एखादा गज़लकार
ज्याने "कणा" या अचानक सुचलेल्या(?)
काफ़ियाशी मिळत्याजुळत्या कवाफ़ी जमवायला घेतल्या असत्या...
किंवा एखादा छायाचित्रकार
ज्याने इंटरनेटवरूनच घेतलेल्या
बाईच्या उघड्या पाठीच्या चित्राशेजारी
तुमच्या कवितेला कट पेस्ट केलं असतं
लोकांनी ते संपूर्ण चित्र म्हणजेच
एक कविता आहे असं जाहीर केलं असतं
मात्र
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

किंवा
"कणा"ची लांबी रुंदी मोजली गेली असती
("खोली" नव्हे , ती 2 D मॉनिटरवर कळत नाही)
किंवा तुमची कविता वाचून कुणालातरी
स्वतःची (काही वर्षांपूर्वी) लिहीलेली कविता आठवली असती
किंवा कुणाला तत्क्षणी सुचली असती
ज्यांना कदाचित
प्रचंड लोकाश्रय मिळाला असता
ज्यांचं कदाचित नवी म्हणून वा
जुनीच पुन्हा पोस्ट केली म्हणून
तोंडभरून कौतुक केलं गेलं असतं
आणि
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

आणि कुसुमाग्रज,
मराठी वाचकांच नशीब जर
अगदीच -- असलं असतं तर
ह्यातलं काही एक घडलं नसतं ...
चंद्र, चांदण्या , प्राजक्त , मोगरा
काहीच दिसत नाही म्हणून
लोकांनी "कणा" कडे ढुंकून पाहिलं नसतं
आणि मराठी साहित्यातलं एक सोनेरी पान
अनुल्लेखाने काळवंडलं असतं...,कायमचं
मागे राहिल्या असत्या
"कणा"च्या लाखो स्पाईनलेस आवृत्त्या
हजारो ऑर्कुट प्रोफाईलस , शेकडो ब्लॉग्ज
ज्यांच्या मालकांनी आयुष्यभरासाठी
"कुसुमाग्रज" हे प्रोफाईल नेम घेतलं असतं ...
आणि मूळ कविता तिच्या कवीसकट हरवून गेली
हे कुणाच्याच लक्षात आलं नसतं
.. अगदी तुमच्यासुध्दा!

आता बोला कुसुमाग्रज
बरं झालं ना तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं ???

- वैभव जोशी.

--------------------------------------------------------------
सर्व कविता वाचून त्यातून वरील कविता निवडण्याचे काम या महिन्यात स्वाती आंबोळे यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

प्रकार: 

दोन्ही कविता खरंच सुरेख आहेत. आणि इतर कवितांची खिल्ली उडवण्याच्या नादात या कवितांकडे दुर्लक्ष झालं, हे खरं. Sad

स्वाती,
ही जाणीव करून दिल्याबद्दल, आणि श्री. वैभव जोशी यांची कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

वैभवची कविता प्रचंड आवडली!

'मायबोलीला रामराम' म्हणून लिहिलेली कविता तेवढी भलत्याच कारणांसाठी दखलपात्र व्हावी, हा कसला योगायोग? गेल्या महिन्यात सर्वोत्तम म्हणून निवडली गेलेली 'पाऊस बारावाटा' ही कविता अशीच दुर्लक्षित रहावी, आणि निवड झाल्यावर मात्र तिच्यावर अनुकूल अभिप्रायांचा पाऊस बारावाटांनी पडावा हा ही योगायोगच म्हणायचा का?
गुलमोहोरावरच्या आपल्याला न आवडणार्‍या कवितांच्या (आणि कवींच्याही!) दर्जावरून गदारोळ करणं हा जसा आपल्याला हक्क वाटतो तशी चांगल्या लिखाणाची आवर्जून दखल घेणं, थोडा वेळ त्यासाठीही खर्च करणं ही जबाबदारी वाटते का?

हे किती बरोबर लिहिलेय. खरोखर या वाईट कवितांना सतत वाईट म्हणुन शेरे लिहिताना एखादी चांगली कवीता आपण वाचत नाही हे खुप चुकीचे आहे हे जाणवले पाहिजे. आणि असल्या कवितांना वाईट आहे म्हणुन प्रतिसाद दिला नाही तरी हरकत नाही. पण चांगल्या कवितेला प्रतिसाद गेलाच पाहिजे असे ठरवले तर चित्र पालटायला वेळ लागणाअर नाही.

स्वाती
अगदी झणझणीत अंजन घातलंस सगळ्यांच्या डोळ्यात( माझ्या सुद्धा, बारा वाटा मी वाचली होती अन आवडली पण होती. पण लिहायचा आळस. ) असो.
बक्षिसपात्र कवितांचे अन कविंचे अभिनंदन!

पण चांगल्या कवितेला प्रतिसाद गेलाच पाहिजे असे ठरवले >> हे खरय. मी पण वाचलेली पहिली कविता नि आवडूनसुद्धा प्रतिसाद दिला नव्ह्ता.

स्वाती, निवड आवडलीच आणि शतानेक अनुमोदक तुमच्या म्हणण्याला.. एखाद्या साहित्याचा दर्जा टिकवायला लेखक आणि वाचक (किंबुहना जागरुक रसिक वाचक थोडे जास्तच, कारण मागणी तसा पुरवठा.. ) जबाबदार आहेत हे खरचं. छान लिहिलय तुम्ही हे!

छान मेसेज दिलाय अगदी थोडक्या शब्दात.
>>गुलमोहोरावरच्या आपल्याला न आवडणार्‍या कवितांच्या (आणि कवींच्याही!) दर्जावरून गदारोळ करणं हा जसा आपल्याला हक्क वाटतो तशी चांगल्या लिखाणाची आवर्जून दखल घेणं, थोडा वेळ त्यासाठीही खर्च करणं ही जबाबदारी वाटते का>><<
अचूक प्रश्ण विचारलाय. पण काय आहे ना कवितांची (कवींची) खिल्ली उडवायला ज्यास्त वेळ जातो बहुधा मग वेळ नाही उरत. Wink

मला स्वताला कविता हा प्रकार कमीच कळतो कारण माझे वाचन(मराठी कवितांचे)हे कमीच आणि चार एक वर्षापुर्वी मायबोलीमुळेच मराठी वाचन सुरु झाल्याने असल्याने त्यामुळे कविता पटकन कळत नाहीत बहुधा. पण उगाच मला समजल्या नाही(किंवा मलाच ज्यास्त समजतं) म्हणून टर उडवण्यापेक्षा जेव्हा जेव्हा वाचते तेव्हा ज्या काही मला समजतील अन कळतील अश्या कवितांना प्रतिसाद देते मात्र. नक्कीच प्रयत्न करते. Happy

अभिनंदन राहेलेच द्यायचे. परीक्षंकाचे आणि विजेत्याचे. Happy

अभिनंदन mess-age चे.

माझ्या बाबतीत तरी असे होते की काही कविता कोणी समजावून दिल्यानंतरच नीट कळतात. 'बारावाटा' आणि 'दादा...' च्या बाबतीत मात्र त्या कवितांपर्यंत पोहोचलोच नाही आधी; त्या तर समजायला अतिशय सोप्या आहेत. पण केवळ त्या निवडल्या गेल्यावरच त्या येथे आहेत हे कळले. इतक्या कवितांमधे एखादी खूप चांगली आली तर सहज निसटून जाते.

वैभव जोशींनी मात्र असे अनेक ठिकाणी न पाळले गेलेले एटिकेट्स अचूक पकडले आहेत.

स्वाती, 'जाता जाता' चं विवेचन खूप छान. पण त्यातही >>>>>गुलमोहोरावरच्या आपल्याला न आवडणार्‍या कवितांच्या (आणि कवींच्याही!) दर्जावरून गदारोळ करणं हा जसा आपल्याला हक्क वाटतो तशी चांगल्या लिखाणाची आवर्जून दखल घेणं, थोडा वेळ त्यासाठीही खर्च करणं ही जबाबदारी वाटते का?<<<

हे सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारं वाटलं.

वैभव जोशींची कविता खूप छान आहे.

वा.. अभिनंदन सर्वांचे...
वैभवची कविता मस्त ! Happy
मेसेजही आवडला.. तसे होत नाही खरे! Sad

www.bhagyashree.co.cc

अभिनंदन कविचे.

आता खरच सांगते, मला स्मारक कविता कळलीच नाही. दोनदा नाही चारदा वाचली. कधी कधी काय होतं कविचं मन कळायला कवी मन लागतं हेच खर.

वैभव जोशींची कविता कळली, पटली म्हणून आवडली आणि मनापासून आवडली.

स्वाती आणि वैभव जोशी, धन्यवाद. सुरेख कविता आहे.
इतक्या कवितांमध्ये उत्तम कविताही निसटून जाते हे खरेच. हे वाईट आहे.

  ***
  Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

  अभिनंदन कवीच आणि शैलेंद्र (म्हणजे शेरलॉक) ह्याच कारण त्यानेच त्याच्या मित्राच्या म्हणजे संदेश ढगे ह्यांच्या कविता इथे उपलब्ध करुन दिल्या. आणि त्याला सर्वात जास्त दु:ख झाल होत त्याच्या मित्रापेक्षाही जेव्हा त्यांना अनुकुल वा प्रतिकुल काहीही प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन.

  मी देखील त्यांच्या सर्व कविता वाचल्या होत्या. फक्त प्रतिसाद १००% अनुकुल नसल्या कारणाने एखादी कविता सोडल्यास बाकीचे प्रतिसाद मी संपर्कातून दिले होते. सगळ्या कवितांमधल्या कल्पना वेगळ्या, वास्तव आहेत. बाकी जे भावल नाही किंवा असु नये अस वाटल ते संपर्कातुन लिहील आहेच म्हणून इथे नाही टाकत.

  बर्‍याचदा वेळेअभावी असही होत की नविन लेखन मधल पहील पान बघीतल जात आणि अशावेळी एखादी चांगली कविता देखील पेज २ वर गेल्या मुळे मागे पडते आणि प्रतिसाद द्यायचा रहातो.

  -------------------------------------------------------------------------------
  Donate Eye - Bring Light to Blind

  संदेशला मी अजुन ही आनंदाची बातमी कळवू शकलो नाही. दिवसभर त्याचा संपर्क बंद असतो. पण आज संध्याकाळी मी या सर्व पानांचे प्रिंट-आउटस त्याच्यापर्यंत (नेहमीसारखेच) पोचवीन. तत्पुर्वी "आर्च" यांच्यासाठी "स्मारक" कवितेमागची कवीची कल्पना / विचार जे "जागु" या आय-डी च्या वि.पु. मध्ये लिहीले होते ते ईथे जसेच्या तसे उद्धृत करत आहे.

  QUOTE

  सर्वप्रथम तुम्ही कविता वाचलीत याबद्दल धन्यवाद !
  माझ्या दृष्टीने शब्दरचनेत बदल नकोत. कारण माझा उद्देश सरळ आहे. अर्थात रचना माझी असल्याने त्यामागची भुमिका मी स्पष्ट करतो.
  दोन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. एक - बुद्धीप्रामाण्य वादी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा गहन विचार करुन, चर्चासत्र घेऊन काहीही न करणारे कृतीशुन्य लोक. असे लोक बहुधा साहित्यीक असतात. कारण त्यांचा पुस्तकांशीच संबंध असतो. आणि दुसरे - धडक कृती करणारे - सैनीक. सैनीक शुर असतात आणि साहित्यीक फक्त बोलण्यातच शुर असतात. त्यामुळे बुद्धीप्रामाण्यवादी लोकांना शारिरीक हिंसा अमान्य असते. पुतळ्याच्या हातातल्या तलवारीमुळे ते अस्वस्थ होतात. कारण यांच्या हातात फक्त पुस्तकचं असते. त्यातले काही थोर विचारवंत - तलवारी ऐवजी पुस्तक हा बदल सुचवून बघतात. पण कृतीप्रामाण्य वाद्यांना हा विचार नकोसा वाटतो. त्यांना शारिरीक हिंसेपेक्षा तथाकथित बुद्धीवाद्यांनी केलेली मानसिक हिंसा जास्त क्रुर वाटते. प्रस्तुत कवी हा देखील या बुद्धीवाद्यांपैकीच - पण मनाने हा षंढपणा अमान्य असलेला. म्हणून तो म्हणतो - दप्तरातुन शस्त्र असलेल्या मुलांची शाळा घेतली. आणि शेवटचं वाक्य या पारंपारिक षंढ विचारांमधुन बाहेर पाडणारं - या देशाला मुठभर अशिक्षीत मुलांची गरज आहे. - कृतीशिल माणसांची गरज आहे.
  बघा पटलं तर !

  UNQUOTE

  या कवीच्या बाकी कविता कोणाला दिसूच नयेत आणि 'मायबोलीला रामराम' म्हणून लिहिलेली कविता तेवढी भलत्याच कारणांसाठी दखलपात्र व्हावी, हा कसला योगायोग? गुलमोहोरावरच्या आपल्याला न आवडणार्‍या कवितांच्या (आणि कवींच्याही!) दर्जावरून गदारोळ करणं हा जसा आपल्याला हक्क वाटतो तशी चांगल्या लिखाणाची आवर्जून दखल घेणं, थोडा वेळ त्यासाठीही खर्च करणं ही जबाबदारी वाटते का?
  'आताशा पूर्वीसारखे लिहिणारे राहिले नाहीत' हे वाक्य किती सहज म्हणतो आपण, पण आताशा पूर्वीसारखे वाचणारे/समजणारे राहिलेत का?

  स्वाती,
  तुम्ही लाख बोललात !! भवभूतीलासुध्द्दा आपल्या नशिबात जे नको होतं, त्यातून कोण कवी सुटलाय?

  दोन्ही कवितांच्या कवीचे अभिनंदन.

  कवीचे अभिनंदन आणि परिक्षकांचे सगळ्यांच्या डोळ्यात सडेतोडपणे झणझणीत अंजन घातल्याबद्दल अभिनंदन Happy
  ************
  धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

  mess-age
  यांच हार्दिक अभिनंदन.. "स्मारक" कविता सुंदर होती यात शंका नाही.
  बाकी वैभव च्या कवितेत सूचित केलेले मुद्दे तसे ईथे जुनेच आहेत तेव्हा"सूज्ञास" अधिक सांगणे न लगे.
  >अचूक प्रश्ण विचारलाय. पण काय आहे ना कवितांची (कवींची) खिल्ली उडवायला ज्यास्त वेळ जातो बहुधा मग वेळ नाही उरत.
  मनुस्विनी, अनुमोदन Happy
  __________________________
  ***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
  अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

  संदेश ढगेंचे हार्दिक अभिनंदन...

  आणि <<<जाता जाता>>> म्हणून जे झणझणीत अंजन घालण्याचे काम केले आहे त्याबद्दल स्वातीचे पण अभिनंदन..

  मी स्वतः कवितांच्या वाटेला फारसा जात नाही कारण फारसे काही कळत नाही.. पण सध्या ज्या पद्धतीने ज्यांना कविता कळते ते प्रतिक्रिया देतात ते वाचून अत्यंत वाईट वाटते..
  प्रत्येकानी काय लिहावे आणि लिहू नये हा वैयक्तिक प्रश्न आहे.. एखादी कविता आवडली नाही तर आवडली नाही म्हणून सोडून द्यायला का जमत नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे... कारण नसताना फुकट वादविवाद करण्याची काही जणांची वृत्ती कविता प्रकारासाठी फार घातक ठरणार आहे..
  =========================
  "हाती घ्याल ते घरीच न्याल"

  मेस एज (संजय) अभिनंदन!
  स्वाती किती मुद्देसूद विवेचन केलेस! वैभव जबरदस्त कविता आहे. फार फार आवडली.

  दोन्ही कविता मस्त
  वैभवची कविता सुद्धा झकास नेहेमीप्रमाणेच. Happy
  ~~~~~~~~~

  कविता चांगली आहे.. कवीचे अभिनंदन!

  <<जाता जाता>> बद्दल माझे मत -
  सगळ्याच कविता सगळ्यांना पहिले सूट कळत नाहीत. कविता वाचून, मनात उतरून त्याचा अर्थ कळणे ही झटपट प्रक्रिया नाही.. म्हणजे बर्‍याच जणांसाठी नाही. म्हणजे इथे देखिल - कॉमनरस - एलाईट अशी प्रतवारी आहे. अभिजनांबद्दल मी बोलणार नाही कारण मी अजून त्या प्रवर्गात नाही.

  एका दिवसात माबोवर किमान १०-१५ कविता येतात. ज्यांना गहन अर्थ कळत नाहीत, ते मग अशा कवितांच्या वाटेला जात नाहीत. पण ज्या कविता सोप्या आहेत आणि/किंवा सुमार आहेत. त्या कवितेची कधी कवीची खिल्ली उडवणे सोप्पे असते जे बरेच जण करतात. हे कोणी चांगल्या कवीकडे दुर्लक्ष करायचे मुद्दाम म्हणून करत नाही, तर स्वाभाविकपणे होतं.

  वैभव जोशींना जाणवलय ते त्यांनी कवितेत मांडलय. छान मांडलय. पण आंतरजाळाची दुसरी बाजू पण आहेच की -

  "कणा" ही कविता अभ्यासक्रमात नसती तर आज किती जणांना माहित असती? इथल्या बर्‍याच कवींच्या कविता आमच्यासारख्यांना नेटमूळेच कळल्या आहेत जरी त्या छापल्या नसतील तरी वाचल्या नक्कीच गेल्या आहेत.

  एका परीने बरे झाले नाही का की कुसुमाग्रजांच्या वेळी नेट नव्हते? नाही तर ते ही रोज दोन चार कविता अपलोड करत राहिले असते. आणि त्यात त्यांची "कणा" लक्षात आलीच नसती.

  किती जणांना विडंबनाची किंवा अजून एकादी त्याच विषयावरची कविता करण्याची प्रेरणा मिळते ती ह्या कविता वाचूनच. हे काय कमी आहे का? आंतरजाल आहेच माहितीसाठी, पुर्वीची माहिती शोधून पुन्हा लोकांसमोर आणण्यासाठी आणि नविन कल्पना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी.

  कवींना लोकाश्रयासाठी नेहमीच जास्त कष्ट करावे लागले आहेत हो. माबोवर पण तसेच चित्र नसेल काय? फक्त फरक इतकाच आहे की इथे सगळ्यांना प्रतिक्रियाही हव्या आहेत. मी म्हणेन पुस्तकांच्या काळी रमत गमत कविता वाचता येत होत्या, मनात उतरेपर्यंत वेळ देता येत होता. आता तासाला ४-५ येतात. मग त्यातले दर्जेदार शोधणे आणि त्यावर प्रतिक्रीया देणे शक्य आहे का?

  हे झाले माझे मत की सुसंस्कृत समाजमन घडवणे ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि त्याला वेळ आणि कष्ट दोन्ही हवेच. समाज अनुकरणप्रिय आहे ह्याचे भानही हवे.

  तुमच्या ह्या उपक्रमामुळे असे कवी लोकांसमोर येतील. त्यांच्या कविता वाचल्या जातील. मान्यवरांच्या प्रतिक्रिया नाहीत, विवेचन नाही तर त्या कवितेचा लोकाश्रय कसा हो वाढेल? मग फक्त चुकीच्या कारणासाठीच कविता प्रकाशझोतात रहातील. तुम्हा कोणाला एकादी कविता आवडली तर सुमार कवी/कवितेएवढीच त्या कवितेची चर्चा करा, अर्थ प्रतिक्रियांमध्ये लिहा. म्हणजे माझ्यासारखे नवखे ते वाचतील आणि त्यांनाही कविता कळायला लागतील.

  खरंतर मला संदेश याची कधीतरी आवडली होती. पण त्यावेळेला प्रतिसाद देणे शक्य झाले नव्हते.
  स्मारक कविता आधी समजलीच नाही... आता वरती त्या कवितेचे विवेचन वाचल्यावर समजली. जी कविता मला समजत नाही तिथे प्रतिसाद काय देणार??
  इतकेच कशाला पण समीर आणि त्याचं बाळ वर "आपल्याला जे वाटतय तेच आहे का अजून काही आहे?" म्हणून काही लिहिले नव्हते.

  मला तरी एप्रिल महिन्यातली पाऊसपान्हा खूप आवडली होती... Happy अर्थात माझी बौद्धिक कुवत तितकीच असेल.

  तुम्हा कोणाला एकादी कविता आवडली तर सुमार कवी/कवितेएवढीच त्या कवितेची चर्चा करा, अर्थ प्रतिक्रियांमध्ये लिहा. म्हणजे माझ्यासारखे नवखे ते वाचतील आणि त्यांनाही कविता कळायला लागतील.
  >>>> जाईजुईला अनुमोदन. चुकीच्या कविताना जास्त प्रतिसाद मिळतात कारण तिथे कवितेवर कुणी चर्चा करतच नाही. अणि चांगल्या कवितेवर कुणीही कसलीही चर्चा करत नाही, म्हणून प्रतिसाद मिळत नाही.

  --------------
  नंदिनी
  --------------

  मान्यवर कविंचे अभिनंदन. Happy

  स्वाती खरच मार्मीक लिहीले आहेस. आता तरी असा प्रकार घडु नये अशी आशा (?) करुया.

  जाईजुई, उत्तम पोस्ट आहे.
  कवींना लोकाश्रयासाठी नेहमीच जास्त कष्ट करावे लागले आहेत हो. माबोवर पण तसेच चित्र नसेल काय? फक्त फरक इतकाच आहे की इथे सगळ्यांना प्रतिक्रियाही हव्या आहेत. मी म्हणेन पुस्तकांच्या काळी रमत गमत कविता वाचता येत होत्या, मनात उतरेपर्यंत वेळ देता येत होता. आता तासाला ४-५ येतात. मग त्यातले दर्जेदार शोधणे आणि त्यावर प्रतिक्रीया देणे शक्य आहे का? >>>
  हे पटले.

   ***
   लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
   खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)

   जाईजुई- तुमचे पोस्ट फार आवडले .
   स्वाती- तू म्हणतेस ते पटले, पण जाईजूई म्हणतात त्यातही खुपच तथ्य आहे.
   पण केवळ तुझ्यामुळेच या कवितांपाशी जाणे होते हे सत्य आहे. त्याबद्दल शतानेक आभार !!

   स्वाती ताई धन्यवाद खुप सुक्ष्म निरिक्षण आहे तुझ दोन्ही कविता छान आहेत
   आणि दिलेल उदा. सुद्धा
   एक सांगा कविता कुठ्ल्या बेस वर निवड्ली जाते तिला आलेल्या प्रतिसादावर कि मुळात तिच्यात असणार्‍या गहन अर्थावर ...

   स्वाति, तुमची धन्य आहे. तुम्ही म्हणजे गवताच्या भार्‍यातून सुई शोधून काढता. एवढ्या सार्‍या कविता(!) पाहूनच जीव दडपतो, त्या वाचायला लागले तर आणखीनच. <<आता तासाला ४-५ येतात.>> त्यातूनहि संयम राखून तुम्ही अचूक चांगल्या कविता निवडता. धन्य आहे.

   जाईजुई यांना १०० टक्के अनुमोदन.

   स्वातीचे अन जाईचे- दोघांचे म्हणणे बरोबरच आहे.
   (कुंपणावर बसण्याचा हा प्रयत्न नाही. हे खरेच आहे, तर त्याला काय करणार?)
   माझ्यापूरते बोलायचे, तर जास्तीत जास्त, त्यातही नवीन आयडींचे लिखाण वाचण्याचा प्रयत्न करतो. आत्यंतिक आवडले, तर उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतेच. फारसे नाही आवडले, तर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे न कळून कधीतरी द्यायची राहून जाते. कारण 'उच्च आहे' आणि 'वाईट आहे' याच्या 'मधली' वाटेल अशा प्रतिक्रियेचा अर्थ 'तुमची कविता वाईट आहे' असा तो कवी काढू शकतो आणि हेच नको असते.

   बाकी कविता खरेच वाईट / अचाट असेल, तर ज्याच्या त्याच्या लिहिण्याच्या / बोलण्याच्या पध्दतीनुसार कवीला सुनावले जाते. (तेही आवश्यकच आहे. कुणी काही बोलत नाही म्हणून हुलमोहरावर महापूर सोडून द्यायचा, असे कितीतरी वेळा होते. आता संख्येचे बंधन घातलेले नाही, हेही खरेच. खरे तर सगळेच खरे. Happy ) अशा प्रतिसादांचे स्वरूप पालटून कधी खिल्ली, तर कधी वाद-भांडणे असे होते, तर त्याला कोण काय करणार? सगळेच छान छान कसे असेल? पण मग याचा अर्थ सरसकट सर्वच कवी नि सर्वच कविता यांची खिल्ली उडवली जाते, असा कृपया काढू नये.

   पुन्हा एकदा माझ्यापूरते- या कवितेची निवड होण्याआधी मेस-एज यांनी निरोपाची कविता टाकल्यामुळे वाईट वाटून त्या कवितेवर 'तुमच्या काही कविता खरंच आवडल्या होत्या. प्रतिसाद द्यायचा राहून गेला. पण प्रतिसाद आले नाहीत, म्हणून निरोपाची भाषा- हे काही पटले नाही.' असा प्रतिसाद मी दिला होता. Happy

   असो. मेस्-एज यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. Happy

   --
   उत्कट-बित्कट होऊ नये.. भांडू नये-तंडू नये;
   असे वाटते आजकाल, नवे काही मांडू नये..!

   जाईजुई, किती व्यवस्थीत मांडलंय! खूप म्हणजे खूपच पटलं आपलं पोस्ट!

   Pages