धीरे धीरे चल

Submitted by ज्येष्ठागौरी on 8 August, 2020 - 00:11

धीरे धीरे चल...
नुकता
च व्हाट्सअपवर एक गंमतशीर प्रश्न आला होता. तुमची आत्ताची मनःस्थिती कशी आहे हे लगेच,मनात फार विचार न करता सांगा आणि तेही एका सिनेमाच्या नावात!मजेशीर वाटलं आणि मनात आलेला विचार लगेच लिहून टाकला आणि मग इतरांचे प्रतिसाद पाहिले.कोणी लिहिलं होतं इम्तिहान, कोणी हाथ की सफाई ,कोणी खामोशी कोणी गुलाम,कोणी मनमौजी.माझा प्रतिसाद होता जो अगदी त्या क्षणी मनात आला होता तो होता.. "संथ वाहते कृष्णामाई" आपला प्रतिसाद लिहून झाल्यावर मग दुसऱ्यांचा बघितल्यामुळे एक बरं झालं,आधीच मत बनवलं गेलं नाही आणि आपल्याला काय वाटतंय हे क्षणात सांगितल्यामुळे ते बहुदा खरं असावं ह्यावर शिक्कामोर्तब झालं. हा सिनेमा मी फार फार पूर्वी, म्हणजे मी सात आठ वर्षाची असताना दूरदर्शनवर पाहिला होता.त्याची कथा आठवत नाहीये पण त्यातलं हे गाणं मात्र डोक्यात घट्ट बसलं आहे असं दिसतं.ते इतक्या वर्षांनी वर आलं.मला हे गाणं नेमकं का आठवलं हा प्रश्न पडला आणि त्याचं उत्तरही आपोआप मिळालं.
रोज पायाला चक्र लागल्यासारखी गेली तीस वर्षं धावपळ चालू आहे,आणि त्याबद्दल सुतराम तक्रार नाही बरं.पण गती पाचवीला पूजली गेली आहे हे खरंय.मी मुंबईचा लोकल प्रवास करत नाही हे मुद्दाम नमूद करते आणि ते करणाऱ्यांबद्दल आटोकाट आदर बाळगून पुण्याच्या भाऊ आणि बहीण गर्दीत मी माझी दुचाकी किंवा चारचाकी घालत असते.रस्त्यावरची बेशिस्त, रस्त्यांची परिस्थिती ह्या सगळ्यांवर शक्यतो न कंटाळता धडाकून जात असते.कितीही time management ची तत्वे लावून पाहिली तरी कधीतरी गडबड होते,एखादं काम करायचं राहतं, काहीतरी विसरतं,काहीतरी मनासारखं करायचं राहतं हा अनुभव नवीन नाहीये.त्याबद्दल बेफिकिरी नक्कीच नाहीये पण खूप मनाला लागत नाही हेही तितकंच खरं कारण आपण धावपळीत आहोत हे मान्य केलेलं आहे .पण तरीही कुठंतरी आत ती जाणीव असते.छोटी गोष्ट असते,कुणाला भेटायला जायचं असतं, कुणाला मदत करायला जायचं असतं. इच्छा असते पण राहून जातं. जेंव्हा नोकरीतून रजा घेतली जाते ती कुणाचं लग्न,कुणाचं आजारपण ,कधी स्वतःचं आजारपण आणि क्वचित पर्यटनही. पण उसंत हा शब्द नाहीच अनुभवला फार, इतक्या वर्षात.रविवारी घरच्यांसाठी काही खास जरा वेळ लागणारे पदार्थ करणे,थोडी साफसफाई,थोडा धोबीघाट आणि थेट रविवार रात्र हा क्रम अखंड चालू असताना ह्या सगळ्यात अचानक समोर आलं ते हे रिकामपण.सगळ्या कामांना आणि आकृतिबंधाना वेगळं स्वरुप आलं.खूप गोष्टी बदलल्या गेल्या.अचानक आलं असलं तरी हे रिकामपण खूप आनंददायी नाहीये हे तितकंच खरं आहे.आपण सुरक्षित आहोत तरी "आपलं" असणारं आणि कोणीतरी "आपलं नसणारं "कोणीतरी असुरक्षित आहे,त्रास,कष्ट यातना भोगतंय ही कल्पना संवेदनशील मनाला नक्कीच टोचती आहे.पण आहे त्या परिस्थितीत आनंद आणि स्वास्थ्य आणायचा प्रयत्न चालू आहे.भविष्याबद्दल धूसरता आहे त्यामुळे वर्तमानात जगायचा माझ्याबरोबर सगळ्यांचा प्रयत्न आहे हे नक्की.आणि नेमकं ह्याच वेळेला संथ किंवा कमी जलद गोष्टी डोळ्यासमोर येताहेत. आजपर्यंत मी अतिशय जलद होणाऱ्या गतीला गवसणी घालायचा प्रयत्न केला आहे. ह्याला वय,अननुभव, आजूबाजूचं वातावरण हे सगळं कारणीभूत असेलही पण सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आजपर्यंत जलद म्हणजे सर्वोत्तम असं वाटणारी माझी वृत्ती.आपण खूप जलद गतीनं एखादी गोष्ट केली असेल तरंच मी स्वतःला सिद्ध केलं असं वाटणारा कालखंड येऊन गेलाय किंबहुना अशाच कालखंडात चालत असतानाच,ही परिस्थिती आली.जाणिवेसकट स्वीकार हे करुनही काही गोष्टी अवघड गेल्या.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंडायफिरायचं स्वातंत्र्य.ही इतकी महत्वाची गोष्ट होती हे कळलं नाही आत्तापर्यंत आणि बाहेर पडायचं नाही म्हणल्यावर हातातल्या चोवीस तासांना अठ्ठेचाळीस तासांचा ऐवज प्राप्त झाला. सगळ्या गोष्टींची गती सुखदरीत्या मंदावली.नेहमीपेक्षा उशीरा झोपणं आणि उठणं, सावकाश न्याहारी ,मग साफसफाई,जेवण,एखादी डुलकी,संध्याकाळी वाऱ्यात बसणं,रात्री पत्ते हे म्हणजे अगदी पूर्वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वातावरण झालं की!फरक मोठा की हे तुम्ही दुसऱ्याबरोबर वाटू शकत नाही.
कोणी वाळवणं करतंय, कोणी भरतकाम,कोणी बागकाम, कोणी लिहितंय, कोणी चित्र काढतंय आणि हे सगळं आपल्या गतीनं.परिस्थिती बदलली की आपण पुन्हा गतिमान होणार आहोतच पण मनात ह्या संथ दिवसांची सोबत असणार आहे हे नक्कीच.खरंतर माणसाला काही सृजन किंवा रचनात्मक करायचं असेल तर ते सावकाशच करावं लागतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे मग तरीही आपल्याला घाई कशाची असते कोण जाणे!
धीरे धीरे रे मना,धीरे सबकुछ होय
माली सिंचे सौ घडा,रुत आये फल होय
कबीर
Slow living ही संकल्पना इटलीमधून आली, आणि ती म्हणजे fast food ला विरोध म्हणून आणि मग slow living या कल्पनेनी उचल खाल्ली. slow living म्हणजे कूर्मगतीनं काम करणं नव्हे तर योग्य गतीनं काम करणे,कामात वेगापेक्षा गुणवत्तेला महत्व देणे.तास मिनिटे ह्यांचा हिशोब न ठेवता,त्या क्षणांमध्ये आपल्याला काय मिळालं ह्याची जाणीव आणि कृतज्ञता असणं.चार्ली चॅप्लिनचा
Modern Times बघताना, औद्योगिकरणाच्यावेळी जो जीवघेणा वेग जगाने घेतला त्याचं इतकं सुंदर चित्र उभं केलंय. चार्ली चॅप्लिनचा निरागस माणूस जो ह्या वेगाला सामोरा जाताना अक्षरशः वेडा होतो ते बघताना आपण हसतो पण आत कुठेतरी खाक होतो.
आपणही किती उरापोटी पळतोय आणि ते कशासाठी याचं उत्तर जर "सुख "असेल तर ते सुख न पळण्यात आहे हे आत्ताच्या परिस्थितीनं दाखवून दिलं.there is enough for everybody's need but not for everybody's greed हे गांधीजींचं वाक्य अगदी सत्य आहे हे कळायला ही परिस्थिती कारणीभूत झाली.
Multi tasking किंवा एकाच वेळेला दहा कामं करायचा उत्साह किंवा आवाका हा मला परत तपासून पहायला लागणार आहे. मुळात त्याची आवश्यकता आहे का हेच तपासून पाहायला लागणार आहे.परवा माझ्या एका परिचित पण ज्ञानी व्यक्तीनं पुढे येणाऱ्या आर्थिक संकटाबद्दल छोटी टिप्पणी केली आहे ती इथे उद्धृत करते..Irony... A situation in which we focus only on essential things (food, shelter, edu., health) , eliminating or ignoring all the non essential (luxury, travel, entertainment) is called recession...
हे किती खरं आहे.आणि हेच slow living ला लागू पडत आहे.कित्येकदा आपल्या शारीर हालचालीपण अनावश्यक असतात आणि कित्येकदा मानसिक हालचालीसुद्धा. मनाचा वेग तर अफाटंच असतो, "तुझे चालणे अन मला वेदना" हा अनुभव येतोच येतो.तो कमी केला तर संथ आणि स्वस्थ जगायला मदत होईल का?शांतपणे विचार करावा लागेल.संथपणे चालताना वाटचाल करणारा रस्ता स्पष्ट दिसतो,त्यातले खड्डे खळगे आणि त्यातलं सौन्दर्यही!मग आपण नेहमी म्हणतो तसं प्रवास सुंदर असतो,तो असाच हळू व्हायला हवा का?जर पोटासाठी आपण धावपळ करतो तर त्या पोटासाठी खाताना मी इतकी घाई का करते?खाताना पंचेंद्रियांपर्यंत तरी ती भावना पोचते का?इतक्या घाईमुळे माझं इथलं सौन्दर्य बघायचं राहून तर जाणार नाही ना?
धीरे धीरे चल चांद गगन में,कहीं ढल ना जाये रात टूट ना जाये सपने।असं म्हणणारा देव आनंद नेमकं हेच सांगतोय.काळ भराभर सरकतोय तर मीही वेग पकडला तर खूप सुंदर गोष्टी राहून जातील.slow life पासून बाजारात मिळणाऱ्या slow cooker पर्यंत खूप लोक आणि खूप गोष्टी मला सांगू पाहत आहेत की वेग कमी कर आणि जास्त चांगल्या पद्धतीने आयुष्य जग.व्हाट्सअपवरच्या एका पोस्टमुळे मनात आलेलं गाणं .. आणि त्याचे शब्द पुन्हा ऐकले..
संथ वाहते कृष्णामाई...
नदी नव्हे ही निसर्ग-नीती, आत्मगतीने सदा वाहती
लाभहानिची लवही कल्पना नाही तिज ठायी...
किती सुंदर आशयगर्भ शब्द आहेत हे आणि किती खरे! मग ही आत्मगती शोधायला हवी.नक्की सापडेल माझी मला ,जरा प्रयत्न केला तर.मग आपल्याच गतीत पावलं टाकून मग्न होऊन आपण आपल्या आनंदाचं निधान शोधू शकू.परत एकदा mindfulness पाशी आले तर.एक नवीन शब्द वाचला स्वीडिश भाषेतला fika (उच्चार फीका) ह्याचा अर्थ a moment to slow down and appreciate good things in life आणि ह्याच बरोबर एक वाक्य वाचलंJohn De Paula यांचं की Slow down and everything you are chasing will come around and catch you...काहीतरी छान सापडलं..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान. तुमचं लिखाण विचार करायला भाग पाडतं.
सतत गडबडीत असण्याची, मल्टीटास्किंगची इतकी सवय झालेली असते की 'धीरे धीरे' काही केलं की आपण चुकतो आहोत, असं वाटायला लागतं.

छान.