तुझे सरेना चांदणे

Submitted by माउ on 31 July, 2020 - 23:38

तुझी ओंजळ चाफ्याची
तुझे सोनसळी हसू
नको कोवळ्या पहाटे
कुठे अंगणात दिसू

तुझा हात हातामधे
असे जगणे घडते
मनातल्या वाटेवर
तुझे पाऊल पडते

दिस संपल्यावरही
तुझी भूल इथे राही
घरभर फिरलेले
तुझे चाफा जाई जुई

राती श्वासामधे येती
तुझी सोवळी पैंजणे
चंद्र नभापलिकडे
तुझे सरेना चांदणे

डोळे काजळभरले
कधी ठेव खांद्यावर
तुझ्या स्पर्शात मिळते
माझ्या जन्माचे उत्तर!

-रसिका
०५/१९/२०२०

Group content visibility: 
Use group defaults

क्या बात है !!

फारच सुंदर... Happy
फक्त "सोवळ्या" पैंजणेच्या जागी "सावळी" पैंजणे करणार का ?

सुंदर!
ओंजळ चाफ्याची... सुवास दरवळला.. तुझे सरेना चांदणे- खूप छान.

दिस संपल्यावरही
तुझी भूल इथे राही
घरभर फिरलेले
तुझे चाफा जाई जुई
>>अप्रतिम!!