सहज काहीतरी---- आगगाडी बद्दल

Submitted by रेव्यु on 30 July, 2020 - 04:59

लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करून 10-1५ वर्ष झाली आहेत. पण अजूनही कधी रात्री पाऊस पडून जातो आणि दूरवरून ट्रेनची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. कोण बरं प्रवास करत असेल ह्या ट्रेनने असा विचार मनात चमकून जातो. आणि मग मिटल्या डोळ्यांसमोरून सुळेभावी, सुलढाल, सांबरा,क्यार्कोप,घटप्रभा ,खानापूर अन तिथला वाघाचा पुतळा अश्या कित्येक वर्षात न पाहिलेल्या स्टेशनांचे फलाट पळत जातात. दूर कुठेतरी एक किल्ला दिसायला लागतो. सामान कंपार्टमेंटच्या दाराशी नेऊन ठेवायला सगळ्यांची लगबग सुरू होते. त्यातच मी, आई आणि बहिण दिसायला लागतो. काही मिनिटांनी आणखी एक बोर्ड दिसतो - आमच्या आजोळच्या स्टेशनाचा. गाडी हळूहळू जात फलाटाला लागते आणि पुन्हा एकदा जोराची शिट्टी देते. जणू म्हणत असते - "आलं रे तुमचं मुक्कामाचं ठिकाण. बघा, तुम्हाला नीट आणून पोचवलं ना". पण माझं लक्ष कुठे असतं? मी तिथल्या गर्दीत रूमाल हलवून आमचं स्वागत करणार्‍या आजोबांना शोधू लागते. आपल्यातून गेलेली आपली प्रेमाची माणसं स्वप्नातच भेटतात ना?
सामान घेऊन आम्ही स्टेशनाच्या बाहेर पडतो तरी ट्रेन तिथेच उभी असते. सुखरूप पोचवल्याबद्दल तिचे कोणीच आभार मानलेले नसतात. आजोळच्या आठवणींनी पाणावलेल्या माझ्या डोळ्यांसमोर ती अजूनही माझ्या स्वप्नातल्या स्टेशनवर उभी आहे. हे डोळे कायमचे मिटायच्या आधी तिला "थॅंक्यू" म्हणायला मला एकदा जायचंच आहे. खात्री आहे की ती शिट्टी वाजवून मला प्रतिसाद देईल .
बाहेर टांगा घेउन आजोबा नी पाठवलेला सुलेमान उभा असतो अन अस्सल धारवाडी हिंदीत तो सांगत असतो
"भौत दिन हुआ तुम्हे नही आया"
जवळ जातो तर तो टांगा अन सुलेमान धुक्यात अंतर्धान पावलेले असतात.
समोर टॅक्सीवाल विचारत असतो...........???
--

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मलाही आवडलं.
पुणे- कोल्हापूर प्यासिंजर. खिडकीतून बाहेर बघणे मग कोळसा निखाऱ्याचे कण डोळ्यांत जायचे. उलटे पाहिले तर मानेला चटके. मग साडेचारला एकदाचे स्टेशन येणार. लाकडी फळ्याची बाकडी. फारच जुन्या आठवणी जाग्या केल्या.

छान आठवणी जपल्या आहेत.

एक खुप पूर्वी वाचलेली कथा आठवली.
घराच्या एका खिडकीतून यजमानांना त्यांच्या भुतकाळात जाता येत असते. बहुतेक जी.एं.ची कथा होती.

छान लिहिलंय... तुम्ही का नाही पुन्हा प्रवास करत..? मिरजेला येऊन राणी चेन्नम्मा एक्सप्रेस, वास्को-दी-गामा एक्सप्रेस, हरिप्रिया एक्स्प्रेस तुमच्या स्वागताला पुन्हा एकदा शिट्टी वाजवत उभा असलेल्या दिसतील... त्या सर्वजणींना तुम्ही थँक यु म्हणा..!! (अर्थात कोरोनाच्या धक्क्यातुन त्या पुन्हा रुळावर येऊ शकल्यातर Uhoh ).. आणि हो.... आता आगगाडी ची डिझेल गाडी होऊन बरीच वर्षं त्या धावल्याही..पण आता ईलेक्ट्रीक झाल्यात जमा आहेत बरं.. Wink (लॉकडाऊन मुळे निदान पुणे ते मिरज मार्ग तरी वेगाने दुहेरी आणि ईलेक्ट्रीफाईड झाला आहे असं दिसतंय..!! Bw