महारथी कर्ण

Submitted by रूपाली विशे - पाटील on 28 July, 2020 - 08:30

राधेय आणि मृत्यूंजय ह्या कादंबऱ्या वाचताना महाभारतातील सूर्यपुत्राची कहाणी मन हेलावून गेली. महाभारत हा केवळ इतिहास नसून त्यातील प्रत्येक पात्र हे जिवंत वाटते. महाभारत हे माया, प्रेम, राग, द्वेष, लालसा, बंधुप्रेम, मित्रता, अवहेलना, मान-अपमान, उदारता अश्या अनेक मानवी स्वभावाच्या भाव-भावनांचे मिश्रण असलेलं जीवनाचे काव्य आहे असं मला वाटतं. कांदबऱ्या वाचताना प्रत्येक पात्र आपल्याशी बोलतेय असं वाटायचं. असं वाटणं खरतरं ते त्या कांदबऱ्यांच्या लेखकांच यश आहे.कर्णासारख्या महानायकाची कहाणी कवितेत मावू शकणार नाही पण काळजाचा ठाव घेणाऱ्या हया राधेयाची जन्मगाथा काव्यरचनेत मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न...

महारथी कर्ण

करता सेवा महर्षी दुर्वांसाची
मुनी देती कुंतीस पुत्रप्राप्तीचे वरदान
कुतूहलापोटी वरदानाची घेऊनी परिक्षा
कुंती विसरे काळ, वेळ अन् भान...

दुर्वासांचे वरदान ठरे कुंतिभोज
कन्येच्या आयुष्याला शाप
सत्यात उतरे वरदान घाली सूर्यदेव
तिच्या पोटी अभागी मातृत्वाचे माप...

ठेवूनी गंगामातेच्या उदरात
कवच - कुंडल धारित तेजस्वी ते बाळ
फुटलेला पान्हा अन् दबलेला आक्रोश
सोसवेल कसा विवश मातेस हदयातील जाळ...

अधिरथ कोळीयाच्या अन् राधेच्या हाती
नियती देई त्याच्या जीवनाचे सूत्र
राधेय म्हणती सारे त्यास तो
महारथी दानशूर असे सूर्यपुत्र...

सूतपुत्रास नसे माझ्या स्वयंवरात प्रवेश
अपमान अन् निंदा उरात पचवूनी
सूर्यपुत्र भरल्या नेत्री पाही पांचालीचा आवेश...

अपमान अन् अवहेलना न सोडी
त्याच्या दुर्दैवाची साथ
हेरुनी त्याचे क्षत्रियकुळ गुण
दुर्योधन देई त्यास मैत्रीचा हात...

कपटी इंद्र मागे त्यांसकडे कवच-कुंडलाचे दान
असे थोर दानशूर सूर्यपुत्र
करि दान निशाणी स्वः पित्याची
विसरुनी देहभान...

एके दिनी कान्हा सांगे त्यास त्याच्या जन्माचे रहस्य
कुंती असे माता अन् असे तू जेष्ठ पांडव
सोड मैत्र दुर्जनांचे...साथ देऊनी बंधूची
जाऊनी कुरुक्षेत्री रोख मृत्यूंचे तांडव...

ज्याने जोडीले मज संगे संकटात
प्रेमाचे अन् मैत्रीचे प्रेमळ बंध
निकराच्या ह्या क्षणी कसे बदलू मी
सच्च्या अन् निष्ठावंत नात्याचे हे रंग...

राहतील जीवंत तूझे पंच पुत्र
देई कुंती मातेला राधेय वचन
पर असेल एकाच्या भाळी मृत्यूयोग
हरवेल मृत्यूला सूर्यपुत्र किंवा तुझा लाडका अर्जुन...

अहंकार अन् सत्तेच्या संग्रामात
आप्तजन उभे समोर कुरुक्षेत्री
कोण बंधु अन् कोण असे शत्रू
कर्ण पाही अपुल्या भरल्या नेत्री...

शापित राजकुमार तो
नियतीची दृष्टी पडे त्यावर वक्र
रणांगणी धोका देई त्यास
त्याच्या रथाचे दुष्ट चक्र...

बेसावध त्या एका क्षणी
देई कृष्ण अर्जुनास गीतेचा दाखला
करूनी वध असाहाय्य त्या जेष्ठ पांडवाचा
राधेयाच्या त्या वचनाचा मान नियतीने राखला...

धारार्थी पडे तो महानायक
क्षणभर ओशाळूनी थांबे काळ
कलियुगात विसर ना पडे जनांस
अमर असे मृत्यूंजय देई तो जगण्याचे बळ...

सौ. रुपाली गणेश विशे
२५/०७/२०२०

Group content visibility: 
Use group defaults