प्रश्न!

Submitted by पराग र. लोणकर on 23 July, 2020 - 09:38

प्रश्न?

नेहमीप्रमाणे साडेपाच वाजता मोबाईलचा अलार्म वाजला आणि मी उठलो. नेहमीप्रमाणे सकाळचा पाउण तासाचा walk आणि तासाभराचा व्यायाम पूर्ण करून आंघोळ-ब्रेकफास्ट करून माझ्या कामाला लागलो. माझी दैनंदिन व्यावसायिक कामं करायला आज मला पाच वाजेपर्यंतच वेळ होता. नंतर आवरून मला एका पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये जायचं होतं.

एका सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने कोरोनाच्या या lockdown काळामध्ये नवोदित कवींसाठी एक काव्यस्पर्धा घेतली होती. या काव्यस्पर्धेत जिंकलेल्यांना पुरस्कार देण्यासाठीचा हा कार्यक्रम होता. आलेल्या दोनेकशे कवितांमधून तीन कवितांची पहिल्या तीन पुरस्कारांसाठी आणि पाच कवितांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली होती. माझ्या कवितेला तिसरा उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालेला होता. तो घेण्यासाठी मला तिथे जायचं होतं.

सगळं आवरून बरोबर सहा वाजता मी माझी जूपीटर घेऊन घराबाहेर पडलो आणि साडेसहाच्या सुमारास कार्यक्रमस्थळी पोहोचलो. रविवार असल्याने पार्किंगसाठी hallच्या बाहेर भरपूर जागा होती. नुकतेच एक वादळ येऊन गेले होते. त्यामुळे तेथे कोणीतरी लावलेली एक स्कुटी खाली पडलेली होती. खरं तर इतरत्र माझी गाडी लावायला खूप जागा होती. पण स्वभाव अन सवय यामुळे मी प्रथम ती पडलेली स्कुटी उचलून मेन standला लावली, त्याच्या बाजूला माझी गाडी लावली आणि मी hallमध्ये प्रवेश केला.

सत्तर-ऐंशी लोक बसतील अश्या छोट्याश्या त्या सभागृहातील बहुतेक खुर्च्या आधीपासूनच भरलेल्या होत्या. सवयीप्रमाणे माझी नजर सगळ्यात मागच्या रांगेकडे गेली. मी आत शिरलेल्या दरवाजापासून सगळ्यात शेवटच्या रांगेतली अगदी टोकाची एक खुर्ची मला रिकामी दिसली. मी तेथे जाऊन स्थानापन्न झालो.

सुरुवातीला संस्थेचे दर महिन्यात करायचे रुटीन कामकाज पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रम चालू झाला. संस्थेने काव्यस्पर्धेशिवायही इतर काही छायाचित्र स्पर्धा वगैरे घेतल्या होत्या. एकेका स्पर्धेचे पुरस्कर्ते जाहीर केले जात होते आणि पुरस्कार विजेते पुढे येऊन त्यांचा पुरस्कार स्वीकारत होते.

काव्यस्पर्धेचे पुरस्कार देणे आता सुरु झाले. सूत्रसंचालन करणाऱ्या युवतीने जाहीर केले- `आता आपण काव्यस्पर्धेत विजयी ठरलेल्या कवितांच्या कवींना पुरस्कार देणार आहोत. प्रत्येक विजेत्याने त्याचे नाव पुकारले गेले कि कृपया व्यासपीठावर यावे. आपला पुरस्कार स्वीकारावा आणि आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. या मनोगतात आपल्याला ही कविता कशी सुचली ते थोडक्यात सांगून विजयी ठरलेली आपली कविताही सादर करावी.`

प्रथम पाचव्या उत्तेजनार्थ क्रमांकाच्या कवितेच्या कवीला, नंतर चौथ्या क्रमांकाच्या कवितेच्या कवीला असे बोलावले जाऊन तिसऱ्या क्रमांकाच्या कवीला, म्हणजे मला बोलावण्यात आले. माझे नाव पुकारले गेले तसा मी व्यासपीठावर चढता झालो. संस्थेच्या माननीय अध्यक्षांकडून माझा सत्कार करण्यात आला. स्मृतिचिन्ह देण्यात आले. सत्कार स्वीकारून मी माझे दोन शब्द बोलण्यासाठी आणि कविता सादर करण्यासाठी डायसपाशी गेलो.

डायसपाशी उभा राहिल्यावर पहिल्यांदाच मला समोर बसलेली सारी मंडळी दिसू शकली. पहिल्याच रांगेत बसलेले डॉ. कामत मला दिसले. ते मला ओळखत नसले, तरी मला ते माहिती होते. अर्थात येथे ते असतील हे मला आधी माहीत नव्हते.

मी बोलायला सुरुवात केली.

`माझा कवितेशी असलेला परीचय अगदी नवीन आहे. नुकतेच माझ्या वडलांचे निधन झाले. माझे वडील माझे सर्वस्व होते. त्यामुळे वेळोवेळी, विविध प्रसंगी त्यांची आठवण मला बैचेन करते. असंच एकदा मन खूप बेचैन असताना अचानक माझ्याकडून माझी ही कविता लिहिली गेली आणि या माझ्या पहिल्याच कवितेस हा पुरस्कार मिळाला. ती कविता मी आता सादर करतो.`

असं म्हणून मी माझी, माझ्या वडलांवर लिहिलेली कविता सादर केली. कवितेच्या शेवटच्या ओळी अश्या होत्या-

`सेवा तुमची करण्यात
कमी जर पडलो असेन मी
मृत्युपश्चात ती करण्यास
मृत्युप्रार्थना करतो मी...`

कविता पूर्ण केली. `धन्यवाद!` असं म्हणून मी कवितेचा कागद घडी घालून खिशात ठेवला. चष्मा केसमध्ये ठेवला आणि अचानक माझ्या हृदयातून तीव्र कळ आली आणि मी व्यासपीठावरच कोसळलो. कार्यक्रमाचे आयोजक माझ्याकडे धावले. डॉ. कामतही लगेच माझ्यापाशी आले. त्यांनी मला तपासले आणि ते सगळ्यांना म्हणाले, `He is no more!`

मी मेलो होतो? मेलो असलो तरी मला डॉक्टरांचे हे बोलणे आणि त्यानंतरचा सगळा कोलाहल ऐकू येत होता. म्हणजे मी माझ्या कवितेच्या शेवटी मृत्यूची केलेली प्रार्थना पूर्ण झाली होती तर! आता वडलांची मृत्युनंतरही सेवा करण्याची माझी इच्छा पूर्ण होणार होती?

हळूहळू आजूबाजूचा कोलाहल कमी कमी होऊ लागला. `पराग... पराग...` अशी हाक मला ऐकू येऊ लागली. तीन-चारदा अशी हाक ऐकू आल्यावर मला समजलं. तो आवाज माझ्या वडलांचा होता. जो आवाज ऐकण्यास ते गेल्यापासून मी आतुर होतो, तोच माझ्या वडलांचा आवाज मला ऐकू येत होता. ते मला बोलवत होते. नक्कीच त्यांचा आत्मा माझ्या आत्म्याला सोबत घेऊन जायला येत होता. मला खूप बरं वाटलं. माझी माझ्या वडलांना भेटण्याची इच्छा आता पूर्ण होणार होती. मी माझे बंद डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. हळूहळू उघडलेही. सुरुवातीला मला खूपच अंधुक दिसत होतं. वडलांना बघण्यासाठी मी उत्सुक होतो. हळूहळू समोरची व्यक्ती मला अधिकाधिक स्पष्ट दिसू लागली तसं माझ्या लक्षात आलं, समोरची व्यक्ती माझे वडील नव्हते. ती तर माझी आई होती. ती म्हणत होती,

`अरे पराग उठतो आहेस ना? रोज साडेपाचला उठतोस. आज साडेसात वाजले तरी झोपून राहिला आहेस. खरं तर असं कधीनव्हे ते तू जास्त झोपला होतास तर उठवावंसंच वाटत नव्हतं. पण असा कधीच तू झोपत नसल्यानं काळजी वाटू लागली. मग उठवलं.`

म्हणजे? मी सारं स्वप्न पाहत होतो?

मी उठलो. उशीर झाल्यानं नेहमीचा walk आणि व्यायाम करायला आता वेळ नव्हताच. मी सारं आटोपलं आणि घरापासून पंधरा मिनिटांवर असलेल्या माझ्या ऑफिसला पोहोचलो. मला पाच वाजेपर्यंतच वेळ होता. नंतर मला पुरस्कार सोहोळ्याला जायचं होतं.

हे आठवलं आणि मी चरकलो. मला माझं सगळं स्वप्न आठवलं. पहाटे पडलेलं स्वप्न! हे स्वप्न खरं झालं तर? तसं मी माझ्या मरणाला घाबरत नव्हतो. अतिशय प्रिय असलेल्या वडलांच्या मृत्युनंतर मलाही मृत्यू यावा अशी प्रार्थना मी अनेकदा केलेली होती. पण आत्ता या आजच्या स्वप्नाच्या झालेल्या आठवणीनं माझ्या डोक्यात वेगळाच विचार आला.

मी त्या दिवशीची सगळी officeची कामं रद्द केली. माझा स्वत:चा व्यवसाय होता. त्यामुळे तसं करणं मला शक्य होतं. मी माझे insurance पेपर्स, mediclaim पेपर्स, इतर investmentsची कागदपत्रे बाहेर काढली. त्या सर्वांची एका फुलस्केप पेपरवर व्यवस्थित नोंद घेतली. माझं काही बरं-वाईट झालं, तर या सर्वांसंदर्भात माझ्या पत्नीनं कोणाकोणाला संपर्क करावा त्यांची नावं, नंबर्स यांचीही व्यवस्थित नोंद त्या कागदावर केली आणि ते सगळे कागद माझ्या टेबलवर ठेऊन वर `कृपया हे पाहावे` असं स्पष्ट शब्दात लिहून ठेवलं.

या सगळ्या नोंदी घेणं, वाटतं तितकं सोपं नव्हतं. अनेक कागदपत्रे शोधण्यातही खूप वेळ गेला. या सर्व गोष्टी झाल्या आणि मी घड्याळाकडे पाहिलं. घड्याळात पाच वाजले होते. मी वेगाने घरी पोहोचलो. माझं सगळं आवरलं आणि मी जुपिटर काढली आणि कार्यक्रमस्थळी पोहोचलो. पार्किंगच्या जागेवर पोहोचलो आणि पाहिलं.

समोर एक स्कुटी आडवी पडलेली होती...

हा मला तसा धक्काच होता. स्वप्नात पाहिल्याप्रमाणेच आडवी झालेली स्कुटी मला समोर दिसत होती. वडलांच्या नुकत्याच झालेल्या मृत्यूमुळे `आपणही आता जगू नये,` असं वाटण्याच्या मन:स्थितीतच सध्या मी असलो तरी ती पडलेली स्कुटी पाहून नाही म्हटलं तरी मी घाबरलोच. पडलेली स्कुटी उचलुच नये असं वाटत असलं, तरी स्वभावानं मला तसं करू दिलं नाही. मी ती स्कुटी उचलली.

Hallच्या दारात आल्यावर आत शिरूच नये असंही मला वाटू लागलं. खूप वेळ तसाच बाहेर घुटमळून शेवटी मी hallमध्ये शिरलो. Hall जवळपास भरलेला होता. माझी नजर शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या खुर्चीवर गेली. ती मला रिकामी दिसली.

धडधडत्या छातीने मी तिथे कसाबसा पोहोचलो आणि त्या खुर्चीवर बसलो.

समोर चाललेल्या प्रत्येक गोष्टीकडे मी फक्त पाहत होतो. सैरभैर झालेल्या मनात फारसं काही नोंदवलं जात नव्हतं.

काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या नावाचा पुकारा चालू झाला, आणि मी थोडासा भानावर आलो. दोन नावांनंतर माझे नाव पुकारले गेले. माझे पाय थरथरत होते. या थरथरण्यामागचे कारण वेगळेच होते, लोकांना मात्र मला व्यासपीठावर जायची सवय नसल्याने, त्या भीतीने माझे पाय थरथरत असावे, मला घाम फुटला असावा असे वाटले असावे.

मी माझा पुरस्कार घेतला. डायसवर आलो आणि समोरच्या लोकांकडे पाहिलं. पहिल्या रांगेतच डॉ. कामत बसलेले मला दिसले. पडलेली स्कुटी, शेवटची रिकामी खुर्ची आणि समोर बसलेले डॉ. कामत. माझ्या स्वप्नात पाहिलेल्या या तीनही गोष्टी प्रत्यक्षात घडलेल्या होत्या. याचा सरळ सरळ अर्थ माझे कविता वाचन झाल्यानंतर मी मरणार हे उघडच होतं.

अचानक माझी सर्व भीती नाहीशी झाली. शेवटी मला हवी तीच गोष्ट घडणार होती. मला माझ्या लाडक्या वडलांना पुन्हा भेटण्याची संधी मिळणार होती. एक प्रकारे मला इच्छामृत्यूच मिळणार होता.

नव्या उत्साहाने मी माझे मनोगत व्यक्त केले. माझी `प्रिय बाबा` ही कविताही वाचून दाखवली. आता `धन्यवाद` म्हटले, की माझी भूतलावरची जीवनयात्रा संपणार होती आणि मी माझ्या बाबांबरोबर वेगळ्याच प्रवासाला निघणार होतो. मी घाबरण्याऐवजी भयानक excite झालो होतो.

`धन्यवाद!` असं म्हणून मी माझ्या कवितेचा कागद घडी करून खिशात ठेवला. चष्मा त्याच्या केसमध्ये ठेवला. आता कोणत्याही क्षणी छातीतून जीवघेणी कळ येणार होती. या कळीस आपल्याला सहन करावं लागणार या विचारानं जरासा घाबरलोही, पण त्यास इलाज नव्हता.

मी डायसवर तसाच उभा होतो. निवेदन करणाऱ्या युवतीने दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याचे नाव घोषित केले होते, तो कवी व्यासपीठावर आलाही होता. मी समोर पाहिलं. मी अजून व्यासपीठावरून खाली का उतरत नाहीये असा प्रश्न साऱ्यांना पडल्याचे माझ्या लक्षात आले. मी भानावर आलो. जड पावलानं मी व्यासपीठावरून खाली उतरलो. पुढील पुरस्कारांचे वितरण होईतो थांबणे अपेक्षित असतानाही क्षणभरही न थांबता मी hallबाहेर पडलो.

स्वप्नात घडलेल्या बाकीच्या सगळ्या घटना जश्याच्या तश्या प्रत्यक्षात घडूनही अपेक्षित शेवट झाला नव्हता. मी मेलो नव्हतो!

का?

मी खूप विचार केला.

मग माझ्या लक्षात आलं.

माझ्या बाबांच्या विद्यार्थी दशेतच त्यांच्या वडलांचा मृत्यू झाला होता. मोठे कुटुंब व गरिबी असल्याने खूप लवकर स्वत:च्या पायावर उभे राहावे लागले. नोकरी करून, खूप कष्ट करून त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे शिकायची इच्छा असून परिस्थितीमुळे शिकता आले नाही. संसारात पडल्यानंतरच्या पन्नास वर्षांच्या त्यांच्या संसाराचे संपूर्ण ओझे विनातक्रार उचलून त्यांनी कधीही कोणतीही तक्रार केली नाही. माझ्या जन्मानंतरच्या त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्यात कायम माझ्या सुखाचाच विचार केला. मग आता त्यांच्याबरोबर जाण्यातच माझे सुख असताना ते मला सोबत घेऊन का गेले नाहीत?

ते गेल्यापासून साऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या मी उचलल्या आहेत. पर्यायच नाहीये. त्या मी अश्याच उचलाव्यात अशी त्यांची इच्छा असावी. नातवावर; म्हणजे माझ्या मुलावरही बाबांचे निरतिशय प्रेम. मला जसा त्यांचा भक्कम आधार होता, तसाच आधार आता मी साऱ्या कुटुंबाला, त्यांच्या लाडक्या नातवाला द्यावा असंच त्यांना वाटत असावं.

`ठीक आहे बाबा. मी तुमची ही इच्छा पूर्ण करेन. हं, पण माझी एक अट आहे. माझ्या या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर मात्र एक क्षणही न थांबता तुम्ही मला घ्यायला यायला हवं.

याल ना मला घ्यायला?`

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फारच छान
काळजाला भिडणारी कथा !

वडिलांविषयी आलेला व त्यांच्याविषयीच्या माझ्या भावना याबाबतचा भाग सारा सत्य आहे. एका काव्यस्पर्धेत मी माझी कविता पाठवली होती. कविता पाठवल्यानंतरच्या काही दिवसात सुचलेला पुढचा सारा कथाभाग हा पूर्णपणे कल्पनाविलास आहे.