मायाजाळ : ३

Submitted by अलंकार on 22 July, 2020 - 06:45

मायाजाळ : ३

चार पाच दिवसांनी सगळेजण घडलेला प्रसंग विसरून गेले आणि मी हि तो विचार मनातून काढला आहे असं वागत राहिले.
कुर्ती बनवायला मैत्रिणीकडे चाललेय सांगून मी घरातून निघाले, मी नक्की कुठे चाललीये ह्यावर आई लक्ष देऊन होत्या म्हणून मी नीट रस्त्याने जाऊन उलट्या बाजूने इमारतीच्या मागच्या बाजूला स्कुटी घेऊन गेले. भीती खूप वाटत होती पण मनाची तयारी केली होती कि सोक्षमोक्ष लावायचाच.

३ मजली हि वास्तू खूपच मजबूत वाटत होती, जरा पडझड झालेली दिसत होती पण अजूनही व्यवस्थित होती, मी नेहमीच दुरून पहिली होती, माझ्या घरापासून दोनेक एकर जमीन दूर होती हि इमारत.
मी मागच्या बाजूने अंगणात आले.
अंगणात आल्यावर असं वाटलं जणू हि इमारत एका अजस्त्र राक्षसासारखी कमरेवर हात ठेऊन वाकून त्याच भेदक नजरेने मला निरखून पाहतेय, आणि आपल्या अजस्त्र बाहूंनी मला चिरडू पाहतेय.
आई गं काटाच आला अंगावर, पण मला हिम्मत करावी लागणार होती, आत जावं लागणार होतं.

मी अंगणाची पाहणी केली, एक विचित्र गोष्ट दिसली ती म्हणजे बाहेरच्या भिंतीत गटाराला बंद करायचं असतं तसं चौकोनी झाकण बसवलं होतं पण उद्ध्वस्त झालेलं तुळशी वृंदावन पाहून मी त्या झाकणाकडे आणि इतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं..
समोरचा दरवाजा सताड उघडा होता, मी एक एक करून पायरी चढले आणि आत शिरले.
स्वतःच्या पावलांच्या आवाजाने देखील मनात धडकी भरत होती, पूर्ण घरातील दारे खिडक्या खुल्या होत्या, तीस पस्तीस वर्षांपूर्वी इथे कुणीतरी राहत असल्याच्या खुणा स्पष्ट होत्या.
भांडी, हांडे, चमचे, ताटं, कपडे, कपाट सगळं होतं. मी एकेक करून तीनही मजले पाहून आले पण तिथे कोणीही नव्हतं. मला वाटलं होतं तो मला इथे भेटेल पण तसं घडलंच नाही.
माझी भीती एव्हाना कमी झाली होती, मी पुन्हा पुन्हा सगळं तपासून पाहिलं पण जिवंतपणाच्या काहीच खुणा दिसल्या नाहीत. तिथे फक्त आणि फक्त निर्जीव वस्तू होत्या.मी बाहेर आले आणि सरळ घरी निघून आले.

घरी आल्यावर खूप विचार करून मला असं वाटलं कि हा त्याचा खेळ तर नसेल ना मला फसवायला, कि माझ्याकडून काही चुकी होतेय, घरचे सांगतात कि रात्री बाहेर राहायचं आणि म्हणजे तो जो कुणी आहे तो रात्री सक्रिय होतं तर नसेल ना??
दोन दिवस मी विचार करण्यात घालवले, मी मनाची तयारी केली होती, कि पुन्हा तसंच रात्री बाहेर पडायचं आणि जायचं त्या इमारतीकडे स्वतःहून.

मी झोपलीये पाहून निनाद झोपी गेली, अर्ध्या तासाने मी डोळे उघडले तो शांत झोपला होता, मला त्याला फसवून काही वागायचं नव्हतं पण मला हा एकच पर्याय समोर दिसत होता, हा चाललेला खेळ काही करून थांबवणं गरजेचं होतं.
मी दबक्या पावलांनी घराचं दार उघडलं, समोरचा झोपाळा पाहून मला धडकीच भरली, मी जागीच थरथर कापू लागले, मी पटकन दार लावून घेतलं, त्याच्या समोर जाण्याइतकी हिम्मत कुठून गोळा करणार आहोत आपण?
मी शंकराचं नामस्मरण केलं आणि दार उघडून बाहेर पडले.दूरवर दिसणाऱ्या त्या इमारतीकडे झपझप पावले टाकत निघाले.

काही गोष्टी हिम्मत करून करायच्या असतात पण मी हि गोष्ट मुद्दामहून मूर्खपणा करून करणार होते.
शंकराचं नामस्मरण करत करत अर्ध्या तासात मी तिथे पोहोचले.
दार तसंच उघडं होतं, पहिल्यांदा आले तेव्हा उजेड होता आणि आता निर्भेळ अंधार.
नशिबाने मी टॉर्च सोबत आणला होता. आत जायची हिम्मतच होतं नव्हती, पण जे काही आहे ते अंधारातच अनुभवायला मिळणार होतं त्यामुळे मी आत घुसले. सगळं सामसूम ती शांतता जीवघेणी होती, भीती अंगावर धावून येत होती, भीतीमुळे माझं अंग घामाने निथळत होतं, हृदयाचे ठोके जणू घरातच घुमत आहेत जाणवत होतं.
ह्यावेळेस देखील मला काहीच मिळालं नाही. मला हायस वाटलं, तिथे काहीच नसून निव्वळ अफवा आहेत ह्यावर माझा विश्वास बसला आणि मी बाहेर आले.
मी आनंदात होते तोच मला ते झाकण दिसलं, सहज उत्सुकता म्हणून मी ते उघडण्याचा प्रयत्न केला तर ते सहजपणे उघडलं गेलं.
मी त्यातून डोकावून टॉर्च मारून पाहिलं तर माझा आनंद क्षणात मावळला आणि भीतीची जोरदार सणक मेंदूला मुंग्या देऊन गेली.
माझी बोबडी वळली कारण खाली तळघर होतं, त्यात कसलेसे रिंगण आखले होते, होम हवन असं काहीतरी मांडलं होतं, त्या हवनाच्या बाजूला आहुत्या ठेवलेल्या होत्या, जणू काही कोणाची तरी येण्याची वाट पाहत आहेत आणि ती व्यक्ती आली कि ते हवन विधी पूर्ण होणार होतं.
पण मला धक्का बसला तो त्याला पाहून, हा तो नव्हता कि तोच होता?? उघडा बंब, आडवा पडलेला, डोळे सताड उघडे आढ्याकडे लागलेले, शरीराचा पूर्ण सांगाडा झाला होता, जिवंत होता कि मेलेला कळत नव्हतं, पण चेहरा मात्र निनाद सारखाच.
मी उठून पुन्हा डोकावून पाहिलं, तो तसाच पडलेला होता, मी आता त्याच्या डोळ्यावर टॉर्च धरला पण काही हालचाल नाही, तो श्वासच घेत नव्हता असं मला वाटलं.
काय करू काही कळत नव्हतं, आणि अचानक माझ्याही नकळत मी उठले आणि सरळ त्या रस्त्याने आत तळघरात उतरू लागले, माझ्या स्वइच्छेने मी ते करत नव्हते, पण शरीर आपोआप पुढे चालत होतं आणि आतून काहीतरी मला मागे खेचत होतं, एव्हाना मी सरळ त्याच्या समोर उभे होते त्याच्या कडे एकटक पाहत आणि छताकडे खिळलेली नजर झटक्यात माझ्याकडे वळली, आणि मी भानावर येऊन आकांताने किंचाळले, एका गगनभेदी असुरी हास्याने पूर्ण इमारत गडगडू लागली, मी पळणार तोच त्याने माझा हात घट्ट पकडला, तू आलीस म्हणजे मला हवी असणारी व्यक्ती देखील येणार, माझी वर्षांची तपस्या पूर्ण होणार . . .
मी त्याच्या हाताला झटका दिला, घामाने मी भिजलेली असल्याने त्याच्या पकडीतून माझा हात निसटला आणि आल्या मार्गाने मी विजेच्या गतीने बाहेर पडले, आणि त्याचा आवाज कानात घुमला
"तो आलाय"
समोर पाहतेय तर निनाद धावत समोरच्या दाराने आत घुसला, मी जीव एकवटून धावत त्याला अडवायला गेले तर माझ्या तोंडावर इमारतीचा दरवाजा बंद झाला. . .

क्रमशः :

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरेरे ही नव्हे तर निनाद हवा होता त्याला. आता हिच्यामुळे निनाद अडकला बिचारा.
जाऊदे असेही आता सावित्री आणेल खेचून सत्यवानाला मृत्यूच्या दाढेतून. (अशी टिपिकल स्टोरी नका लिहू काहीतरी वेगळा टर्न येऊ द्या)
बादवे, छान सुरू आहे कथा.