आशीर्वाद (लघुकथा)

Submitted by तुषार विष्णू खांबल on 21 July, 2020 - 15:01

आशीर्वाद

शब्दांकन :- तुषार खांबल

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक जणांचे हाल होत होते.... सयाजी हा त्यापैकीच एक....

वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित जमिनीचे वाटे झाले.... आणि त्याच्या वाट्याला आलेली जमीन मुलीच्या लग्नासाठी विकून टाकली.... त्यानंतर गावात मोलमजुरी करून कसेतरी कुटुंबाचे आणि स्वतःचे दोन वेळेचे अन्न मिळवीत होता....

कोरोना भारतात आला आणि गावातील कामे बंद झाली... पैसा, जेवण सर्वांचे हाल होऊ लागले... अनेक मुंबईकर गावात आल्याने शेतीच्या कामासाठीही कोणी बोलवत नव्हते.... सावकाराचे कर्जही डोक्यावर वाढत होते... विचार करून करून डोकं सुन्न पडलं होतं... रात्र रात्र जागून निघत होत्या.... अशाच एका रात्री त्याने एक निर्णय घेतला आणि झोपी गेला....

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्याने आपली घरातील सर्व कामे आवरली... माडीवर चढून बैलांसाठी आणलेला वेसणाचा दोर काढून तो पिशवीत कोंबला... त्यानंतर अंघोळी करून देवपूजा केली.... सदाशिवला (मुलगा) जवळ बोलावून त्याला शिक्षणाचे आणि पैशाचे महत्व पटवून देऊ लागला... रोज उठता बसता मुलाला लाथाबुक्क्याने मारणारा आपला नवरा आज काहीसा विचित्र वागतोय असे पार्वतीला वाटू लागले.... पण त्याला विचारावं तर खासकन अंगावर येईल म्हणून ती गप्प राहिली... मुलाशी बोलून नंतर त्याने आपल्या बायकोला बोलावले आणि "बाहेर जात आहे वाट पाहू नकोस" असे सांगितले आणि हातात पिशवी घेऊन तो घराबाहेर पडला....

ढग भरून आले होते.... सोसाट्याचा वर सुटला होता..... झपाझप पावले टाकत तो टेकडीवरच्या म्हसोबच्या देवळात पोचला.... कोरोनामुळे देऊळ बंदच होते त्यामुळे तिकडे हल्ली कोणी फिरकत नसे.... सयाजी देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ आला.... बाहेरूनच त्याने देवाला नमस्कार केला आणि पुढे निघाला... काही पावलांवरच एक मोठ्ठे वडाचे झाड होते... त्या झाडापाशी येऊन तो थांबला.... पिशवीतील दोरखंड बाहेर काढून त्याने तो झाडावर टांगला.... थोडे वर चढून त्या दोरखंडाचा फास बनवून त्याने स्वतःच्या गळ्यात अडकवला.... एव्हाना वाऱ्याला अजून जोर चढला होता... त्याच्या सोबतीला तुफान पाऊस वातावरण भरून टाकत होता.... सायजीने एकवेळ आपल्या संपूर्ण गावावर नजर फिरवली.... दोन्ही हात जोडून त्याने मनोमन सर्वांची माफी मागितली... मन घट्ट केले आणि डोळे बंद करून स्वतःला खाली झोकून दिले.....

वीज कडाडली.... जोराचा वारा आला..... कडकन आवाज होऊन फास लटकवलेली फांदी तुटली.... सयाजी धाडकन जमिनीवर कोसळला.... असे कसे घडले त्याला कळेनासे झाले.... इतक्यात त्या झाडाच्या पानांची सळसळ त्याच्या कानात घुमू लागली आणि काहीसा आवाज ऐकू येऊ लागला.... त्याने नीट ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला त्या झाडाचा आवाज ऐकू येत होता.....

"असा कसा मी तुझा जीव घेऊ??? काय उत्तर देऊ त्या माउलीला जीने काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे तुझ्या उदंड आयुष्याचा आणि सात जन्मांच्या सोबतीचा 'आशीर्वाद' मागितला होता....

सयाजीला आपली चूक उमगली होती.... देवावरचा विश्वास बळावला होता.... तो पुन्हा देवळाजवळ आला आणि आपल्या नवीन जीवनासाठी देवाचे आभार मानले... आत्महत्येचा निर्णय त्याने मनातून काढून आपल्या घराची वाट धरली होती..... आपल्या बायकोला भेटण्याची ओढ त्याच्या मनाला लागली होती.... आणि का नाही..... तिलाच मिळालेल्या आशीर्वादामुळे आज त्याला नवीन जीवन लाभले होते

Group content visibility: 
Use group defaults

व्वा छान कथा. सगळा निसर्गच झाडाच्या मदतीला आला.आपण झाडे तोडण्या्त मग्न आहोत तर निसर्ग आपल्याला जीवनाचा अर्थ शिकवण्यात मग्न !

@बोकलत
झाडाने सांगितले कि गुप्त धन कुठे आहे ते. कथा पुन्हा एकदा वाचा.

धन्यवाद बोकलत.... आपले कुटुंब हेच आपले खरे धन आहे..... आणि त्यात सयाजीला मिळालेलं जीवदान म्हणजे पण एक प्रकारचे धनच म्हणावं लागेल.... म्हणतात ना "सर सलामत तो पगडी पचास"

धन्यवाद आसा
धन्यवाद प्रभुदेसाईजी

छान कथा Happy

हीच बोकलत ह्यांची कथा असती तर तिथे त्याला भूत भेटलं असतं आणि.....................

आणि त्याने सायजीची परीक्षा घेतली असती. त्यात सयाजी पास झाला असता आणि त्याला सोन्याच्या मोहराने भरलेले दोन चार हंडे बक्षीस मिळाले असते....