मायाजाळ : २

Submitted by अलंकार on 21 July, 2020 - 07:14

मायाजाळ : २

गाढ झोपेत असताना त्याच्या अंगावर हात टाकला तर हात उशीवर पडला, आधीच त्या प्रसंगाने हादरलेली मी खडबडून जागी झाले.
तो जागेवर नव्हताच, मिट्ट काळोख असताना देखील न घाबरता घरभर वावरणारी मी, लाईट्स तर आधीपासून चालूच होत्या तरीही रूममध्ये एकटी आहे ह्या विचाराने शहारले, मी सरळ रूमच्या दरवाज्याच्या दिशेने धावले, पण दरवाजा बाहेरून बंद होता,बाहेरून कडी घातली होती, मी वेड्यासारखी जोराने दार ठोठावू लागले पण कुणी आवाज दिला नाही कि दार उघडलं नाही.

माझे श्वास वाढले, मला धाप लागली, तो बाहेर भेटला होता तो आता इथे आला तर?? ह्या विचाराने मला इतकी भीती वाटली कि मला हार्ट अटॅक होईल असं वाटलं आणि तेवढ्यात खिडकीवर थाप पडली, माझा श्वास हृदयात अडकला आणि एकाएकी जोर जोरात कुणीतरी बाहेरून खिडकी हलवू लागला, जोरात थापा मारू लागला, काहीच क्षणात तो आत घुसणार होता, खिडकीचा आवाज वाढला, खिडकी पूर्णपणे हालत होती, कडी पूर्णपणे निखळली होती, कडी कोणत्याही क्षणाला तुटून तो आत घुसणार होता, मी कानावर हात ठेऊन जमिनीवर कोसळले, आणि एक जोरदार आवाज होऊन खिडकी उघडली, खिडकीचे तावदान भिंतींना लागून खूप जोरात आवाज झाला आणि मी वर पाहिलं तर तो खिडकीत बसला होता, त्याच रोखलेल्या नजरेने माझ्याकडे पाहत, त्याची नजर पाहून मी जिवाच्या आकांताने किंचाळले.

डोळे उघडले तेव्हा निनाद माझा नवरा माझ्या बाजूला मला आवरत होता, मी माझ्या पलंगावर होते, त्याचा चेहरा पाहून मी त्याला अक्षरशः पलंगावरून ढकलून दिलं, माझ्या धक्क्याने तो खाली पडला, मी आजूबाजूला पाहिलं तर आई बाबा घरातले सगळे माझ्या रूम मध्ये माझ्याकडे भीतीने आणि दयेच्या नजरेने पाहत होते. मी सर्वप्रथम खिडकी पहिली ती तर बंदच होती, कडीदेखील व्यवस्थित होती.

तो उठून पुन्हा माझ्याजवळ येऊन मला समजावू लागला, 'घाबरू नकोस मी आहे, तो नाहीये, बघ माझ्याकडे'
पण मला त्याच्याकडे पाहायची देखील हिम्मत होत नव्हती, मी त्या पुन्हा दूर लोटलं, घरातले सगळे माझ्याजवळ येऊन बसले.
आई माझ्या केसांतून हात फिरवत पदर डोळ्यांना लावत होत्या, बाबाही खूप रडवेले झाले होते.
आई मला थोपटत होत्या, त्यांच्या स्पर्शाने मला खूप बरं वाटलं, मी खूप हिम्मत करून निनादकडे पाहिलं, तो अतीव काळजीने माझ्याकडे पाहत होता, हा माझाच निनाद होता, माझ्या डोळ्यांतून नकळत पाणी वाहू लागलं.
तो हळूहळू माझ्या जवळ येऊन बसला, मी त्याचा हात घट्ट पकडला.
हळूहळू सगळे बाहेर गेले, माझं डोकं त्याच्या मांडीवर ठेवून आई बाबाहि गेले, मी त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि तो कितीतरी वेळ मला जवळ घेऊन रडत राहिला.

सकाळी उठले तर मला छान वाटत होतं, म्हणजे जे झालं त्याविषयी विचार करून भीती जरी वाटत असली तरी त्या घटनांचा विचार करण्याइतकी मनाची तयारी दिसत होती.
मनात असंख्य प्रश्न उभे राहिले, आणि त्यांची उत्तरे निनाद किंवा घरच्यांपाशी असतील असं मला वाटलं.
आम्ही सोबत नाश्त्याला बसलो तेव्हा सगळ्यांनी माझी मनापासून विचारपूस केली, मला जरा बरं वाटत आहे पाहून त्यांना सगळ्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहून मला अजून बरं वाटलं.
मग मी मुद्द्याला हात घातला,
" त्या इमारतीमध्ये काय आहे?? कोण आहे तिकडे??? का तुम्ही तिकडे फिरकत देखील नाहीत, आणि कोणाला जाऊही देत नाहीत??"
सगळे एकमेकांच्या तोंडाकडे भीतीने पाहू लागले.
" आपली मालकीची जागा असूनदेखील, असं काय आहे तिथे ज्यामुळे तुम्ही साधं पाऊलही ठेवत नाही तिथे???"

स्मशानशांततेला तोडत, आई म्हणाल्या कि ती जागा चांगली नाहीये, तिथे जो गेला त्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं. त्यामुळे तू सगळे विचार सोडून दे, आणि ज्या गोष्टीला पाहून इतकी घाबरलीस ते हि विसरून जा, आणि पुन्हा कधीच रात्री बाहेर पडू नकोस.
इतकं म्हणून त्या आणि बाबा उठले, मी निनादला विचारलं, त्याला काही माहित नसल्यासारखी तो उत्तरं देत होता.
उठता उठता निनाद म्हणाला कि
"तिथे मायाजाळ आहे, त्यापासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहा, तू त्यांच्या नजरेत जरी आली असलीस तरी ह्यापुढे ते तुला काहीही नुकसान पोहचवणार नाहीत ह्याची पुरेपूर काळजी आम्ही घेऊ, तू घाबरू नकोस"
हो पण काय आहे तिकडे, कोण आहे??? सांग ना?? आणि मला जो दिसला तो?? कोण होता तो???मी कळवळून विचारलं.

"अगं तिथे काहीच नाहीये, विश्वास ठेव माझ्यावर, तू त्याविषयी विचार विचार करणार नाहीयेस आता ठीक आहे??आणि तुला जे दिसलं ती फक्त माया होती, भास होता,तू फक्त ते विसरून जा, आणि पुन्हा अशी वेड्यासारखी वागू नकोस, प्लिज"

ह्यांच्या गोडगोड़ उत्तरांनी माझं पोट भरणार नव्हतं, माझ्या काळजी पोटी हे सगळे नक्कीच काहीतरी लपवत होते माझ्यापासून, पण आज माझ्यासोबत असं झालं, उद्या इतर कोणासोबत किंवा निनाद सोबत झालं मग?? मग मी करणार??
नाही मी असं होऊ देणार नव्हते, त्याला काही झालं तर मी जगू शकणार नाही.
मला ह्या प्रकरणाचा शोध घ्यायला हवा, आणि ह्याची उत्तरं फक्त एकाच ठिकाणी मिळणार होती,
"त्या इमारतीत " . . .

क्रमशः:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथेचा ओघ कसा चालला आहे ते प्लिज सांगाल का?? म्हणजे मला पुढचा भाग लिहायला खूप मदत होईल,
म्हणजे कथेत भीती आणि रहस्य वाटत आहे कि नाही कि ट्रॅक वरून बाजूला जातेय असं काही . . .

चांगली चालू आहे.
नारायण धारपांच्या 'चेटकीण' या पुस्तकाची आठवण झाली.

कथा छान सुरुय
ओघवती शैली आणि सहज लिखाण भावते. सध्यातरी कथेत भितीदायक वातावरण वाटत नाहीये पण कथानक उत्कंठा निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी ठरले आहे.

तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून खूप खूप आभार, पण चुका देखील दाखवा म्हणजे सुधारणा होईल.