कोरोना आणि चांगुलपणा

Submitted by मोहिनी१२३ on 19 July, 2020 - 14:10

कोरोना frontline warriors चे अभूतपूर्व काम सर्वश्रूत आहेच.

मात्र या काळात समाजाच्या विविध स्तरात माणुसकीचे अद्भूत आविष्कार बघितले.त्यामुळे खूप सकारात्मक वाटले. हे अनुभव मांडायचा एक छोटासा प्रयत्न.

मार्च महिन्यामधे कोरोनाची चाहूल लागायला सुरूवात झाली. २२ मार्च ला जनता कर्फ्यू जाहीर झाला आणि कामवाल्या मावशींना अचानक सुट्टी मिळाल्याचा आनंद झाला.आमच्या दुसर्या कामवाल्या मावशी २ दिवस अगोदरच सुट्टी घेवून गावी गेल्या होत्या.
त्यानंतर दुसर्याच दिवशी २१ दिवसांचा lockdown जाहीर झाल्याने त्यांना मोठी सुट्टी मिळाली.आमच्या कामवाल्या मावशी घरी बसून कंटाळल्या,अस्वस्थ झाल्या. त्यांना काम न करता तसाच पगार घेणे पटत नव्हते. यावेळी अनेक सामाजिक संस्थांचे कार्य जोरात चालू झाले होते. त्यांना जेवणाचे डबे, वाहतुकीकरता गाडी, चालक यांची आवश्यकता होती.त्यावेळी मी या संस्था व आमच्या मावशी यात समन्वयाचे काम करत होते.तसेच त्यांच्या घरासमोरच्या दुकानात पोळ्या देणे, त्यांनी घरून शिवणकाम करणे, कॅालेज शिक्षण झालेल्या त्यांच्या मुलीच्या मदतीने online स्वयंपाक शिकवणे, सोसायटीची पापड-कुरडईची मोठ्या प्रमाणात गटाला order देणे अशा बर्याच पर्यायांची चर्चा झाली.सुदैवाने दुसर्या मावशी गावाला त्यांची शेती कसत आहेत त्यामुळे या काळात पण त्या स्वाभिमानाने पैसे कमावत आहेत,घरच्या माणसांबरोबर आहेत.

या काळात आमची सोसायटी माणुसकीच्या नात्याने सोसायटीच्या सभासदांचीच नव्हे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचीही खूप काळजी घेत आहे.भाजी,फळे यांचा सुरळीत पुरवठा चालू ठेवणे, सुरक्षारक्षकांना सुमारे २२ मार्च पासून काही दिवस जेवण व आत्तापर्यंत आणि पुढेही नियमित दोन्ही वेळचा नाश्ता देणे, त्यांच्या व सफाई कामगारांच्या तब्येतीची काळजी घेणे,नियमांचा योग्य समतोल राखणे, एकामेकांना भावनिक आधार देणे इ.

आमच्या मुलाचे बालरोगतज्ञ cum आमचे family doctor यांनी या काळात क्वचितच दवाखाना बंद ठेवला असेल. त्या टेलिफोनिक आणि whatsapp consultation साठी सुध्दा नेहमी उपलब्ध असतात. आमच्या सोसायटीतील डॅाक्टर मंडळी लहान मुलांची पडणी-धडणी ते जेष्ठ नागरिकांची आजारपणे या सर्वांत सहाय्याला तयार असतात. या गोष्टी lockdown काळात नक्कीच धीर वाढवतात.

सामान्य नागरिकांपासून श्रीमंतापर्यंत अनेकजण गरजूंना विविध मार्गांनी आर्थिक/वस्तूंचे सहाय्य, अन्नदान करत आहेत .रूजुता दिवेकर , डॅा. आनंद नाडकर्णी, अविनाश धर्माधिकारी, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे अनेक जण विनामूल्य व्यावसायिक दर्जाचे ज्ञानदान करत आहेत.
Test Tribe सारखे फेसबुक गट आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या Software Testing च्या परिषदा/उपक्रम अतिशय कमी शुल्क घेवून, काही तिकीटे स्वत: प्रायेजित करून भरवत आहेत.

वैयक्तिक रक्तदान, शिबीरातून रक्तदान, कॅन्सर रूग्णांकरिता केसदान अशा गोष्टी पुरेशी काळजी घेवून पण न घाबरता सुरू आहेत.

घरी बसून सोशल मिडीयाच्या सहायाने मदत करणारा व गरजू व्यक्ती यांच्यात समन्वयाचे काम चांगले सुरू आहे.

केवळ आर्थिक मदत न करता लोकांसाठी तात्पुरता/कायमचा वेगळा उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्याच्या द्रष्टीने ही काही हालचाली चालू आहेत.

दूरचे नातेवाईक, संपर्कात नसलेले मित्रमंडळी व एकटे राहणार्या व्यक्ती यांना स्वत:हून संपर्क साधणे, त्यांची ख्याली-खुशाली विचारणे,त्यांना जमेल तशी मदत करणे या गोष्टी वाढल्या आहेत.

मला या काळाने खूप कृतज्ञ बनवलं, काहीतरी दुसर्यांसाठी चांगले करायला पाहिजे ही जाणीव दिली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users