"मराठे सर!"

Submitted by Charudutt Ramti... on 18 July, 2020 - 22:59

आज सकाळी सकाळीच अ.ल.मराठे सर गेल्याची अत्यंत अप्रिय बातमी कळली आणि आधीच फारसं उल्हसित नसलेलं सभोवतालचं वातावरण आणखीनंच उदास होऊन गेलं. मनाचं पिंपळ पान सरळ पंचवीस तीस वर्षं मागे भूतकाळात गेलं. अचानक सोसाट्याचा वादळ वारा सुटावा आणि झाडांची पाने इतस्ततः उडू लागावीत तसे विस्मृतीत गेलेले एकेक दिवस मनाच्या आसमंतात वादळ बनून सैरभर पणे फिरू लागले.

त्यावेळेसचं छोटंस टुमदार मिरज शहर. आणि मिरजेतली आमची विद्यामंदिर प्रशाला. ‘मिरज’ आणि ‘विद्यामंदिर’ हे आमच्या वेळचं, आमच्या वेळचं म्हणजे साधारण ऐशी आणि नव्वदीच्या दशकातलं, जवळ जवळ एक 'समीकरण'चं. आणि त्या वेळ चं अजूनेक दुसरं समीकरण म्हणजे ‘विद्यामंदिर’ आणि आमचे ‘अ.ल. मराठे’ सर! त्याकाळी "तांत्रिक" शिक्षण देणारी विद्यामंदिर ही मिरज शहरातली एकमेव माध्यमिक शाळा. माध्यम अर्थातच 'मराठी'. "तांत्रिक" शिक्षण करून दहावी पास होणं ही पुढे "अभियांत्रिकी" उच्च शिक्षणाची जवळ जवळ पेरणीच. आणि अ.ल.मराठे सर म्हणजे विद्यामंदिर प्रशालेचे तंत्र शिक्षण विभाग प्रमुख. थोडक्यात विद्यामंदिर प्रशालेतून दहावी पास झालेला आणि पुढे अभियांत्रिकीची पदवी मिळवलेला प्रत्येक नाही पण किमान ऐशी टक्के विद्यार्थी हे 'मराठे' सरांच्या नजरे खालून गेलेला असणारंच.

सर म्हणजे किंचित ठेंगणी आणि किंचित स्थूल आकृती आणि तरी सुद्धा एक अत्यंत भारदस्त असं व्यक्तिमत्व. डोळ्यांत कायम फिल्ड मार्शलच्या असावी तशी एकप्रकारची 'जरब' आणि चेहऱ्यावर 'टिळकांच्या सारखा' करारी पणा. उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात मणा मणाचं वजन. युद्धावर निघालेल्या सैन्याच्या एखाद्या तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या सेनानी सारखी त्यांची ती वैशिष्ट्यपूर्ण देहबोली आणि एकंदरच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा "दरारा" पाहून ही व्यक्ती मिरजे सारख्या एका मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळेत “शिक्षक” आहे असं कुणालाही नुसतं सांगून पटलं नसतं.

पाचवीत प्रवेश घेतलेल्या आमच्या शाळेतल्या विध्यार्थ्याला 'मराठे'सर हे इयत्ता सातवी पर्यंत फक्त दुरून ऐकून किंवा लांबून पाहून माहिती असायचे. कारण त्यांच्याशी खरा संपर्क यायचा तो केवळ दहावीच्या बीज गणिताच्या तासाला. पण विद्यामंदिर प्रशाले मध्ये प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विध्यार्थ्याला अप्रत्यक्ष पणे मराठे सरांचा ‘वरदहस्त’ मिळालेला असे. कारण शाळेच्या व्यवस्थापनानं प्रवेश (admission) प्रक्रिये मध्ये मराठे सरांसारखा एक 'अनुभवी' आणि शिक्षण शास्त्रातील एका निष्णात अश्या हाडाच्या शिक्षकाची “पंच” किंवा “न्यायमूर्ती” म्हणून नेमणूक केली होती. कोणत्या विद्यार्थ्याला विद्यामंदिर मध्ये प्रवेश द्यायचा? आणि कुणाला द्यायचा नाही? ह्याचा शेवटचा "शब्द" असे तो फक्त आणि फक्त मराठे सरांचा. बऱ्याच वेळेस "विद्यामंदिर" मध्ये प्रवेश हा मोठा विवादास्पद विषय होई. कारण आमची शाळा ही मिरजेतली एक प्रतिष्ठित मानली गेलेली शाळा. म्हणजे अगदी तुलनाच करायची झाली तर, मुंबईत ‘पार्ले टिळक’ मध्ये मुलाला प्रवेश मिळाल्यावर एखाद्या 'पार्ले'कराला अथवा ‘बालमोहन’ मध्ये मुलीला प्रवेश मिळाल्यावर एखाद्या दादरकराला आणि इकडे पुण्यात ज्ञानप्रबोधिनीत प्रवेश मिळाल्यावर जन्मजात पुणेकराला जितका आनंद होत असे तितकाच आनंद, “विद्यामंदिर” मध्ये मुलाला किंवा मुलीला प्रवेश मिळाल्यानंतर खऱ्या 'मिरज'कराला होत असे.

पण त्यामुळे असं होत असे की, पालक आपल्या पाल्याला विद्यामंदिर मध्ये प्रवेश मिळावा म्हणून जिल्ह्याच्या 'पालक'मंत्र्या पासून ते ‘शिक्षण संचालकांपर्यंत’ कोणाकोणाच्या चिट्ठ्या घेऊन येत. आता ह्या सगळ्या वशिले बाजीत शाळेचा मूळ दर्जा घसरू न देता 'पात्र' विद्यार्थ्याला प्रवेश मिळायलाच हवा आणि त्याचबरोबर गावातल्या गरजू विध्यार्थ्याला सुद्धा शाळेतील बाकावर बसण्याचा हक्क आहे, ह्या साठी ही 'वशिलेबाजी' आणि आमची 'शाळा' ह्या दोन्हीच्या मधोमध अक्षरश: एक भरभक्कम अशी तटबंदी म्हणून कुणी दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये कुणी उभं रहात असेल, तर ते म्हणजे "मराठे सर". मराठे सरांनी " ह्या विद्यार्थ्याला प्रवेश द्या!" असं एकदा म्हंटल की त्यावर मग शाळेचं संचालक मंडळ सुद्धा वाद विवादाच्या फंदात पडत नसे. कारण मराठे सर वदले की ते म्हणजे "ब्रह्म वाक्य!" “चिठ्ठी आई है!” वाल्या शिक्षण संकलकाची एकवेळ समजूत घालता येईल पण प्रवेश प्रक्रियेत " मराठे सरांचा" शब्द म्हणजे अंतिम शब्द. डकवर्थ लुईस सारखा. ‘नियम अजिबात समजला नाही तरी चालेल’ तरी सगळ्यांना तो पाळणं हे क्रमप्राप्त. पण झालं असं की ह्या सगळ्यामुळे, कित्येक गरजू आणि हुशार मुलांना आमच्या शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आमच्या शाळेचे विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रात गुणवत्ता यादीत दरवर्षी आकाशातल्या नक्षत्रांप्रमाणे झळकू लागले.

आमची शाळा स्थापन झाली ती १९४७ साली म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षी. परंतु पहिल्यांदा आमच्या शाळेचे विध्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले ते साल असावं साधारण १९८६-८७. म्हणजे जवळ जवळ चाळीस वर्षं जावी लागली आमच्या शाळेचं नांव S.S.C. बोर्डात झळकायला. आणि त्यानंतर मग मात्र आमच्या शाळेनं कधी मागे वळून पाहिलंच नाही! दरवर्षी एका मागून एक असे किमान एक दोन तरी विद्यार्थी दहावीच्या गुणवत्ता यादीत येतंच राहिले. आमच्या म्हणजे माझ्या १९९२-९३ च्या बॅच मधले तर तब्बल पाच पाच विध्यार्थी आले गुणवत्ता यादीत. आणि ह्या सगळ्याचा परमावधी म्हणजे चक्क आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी संबंध राज्यात पहिली आली ते साल असावं १९९५-९६.

ह्या सगळ्या प्रशालेच्या यशोगाथे मध्ये त्या विद्यार्थ्यांनी जितके कष्ट घेतले त्याहून कितीतरी जास्तच कष्ट उपसले असतील तर ते म्हणजे मराठे सरांनी. कारण ह्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना साधारण आठवी नववी पासूनच निवडक पणे वेचून त्यांच्याकडून दहावीच्या परीक्षेची तयारी करून घेणे आणि त्यांच्या दहावीच्या परीक्षे पर्यंतचं एकंदरच वेळापत्रक अत्यंत काळजीपूर्वक पणे आखणे हा त्यांचा हातखंडा. मग त्यात विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर आलं, विद्यार्थ्यांचे पेपर्स प्रथितयश अनुभवी शिक्षकांच्या कडून तपासून घेणं आलं, आणि ऐन परीक्षेच्या वेळेचं अभ्यासाचं आणि उजळणीचं नियोजन आणि बारकावे सुद्धा आले. दहावीच्या परीक्षेच्या आधी शेवटच्या अडीच तीन महिन्यांत तर हे सगळे “निवडक” विधार्थी चक्क मराठे सरांच्या घरी जाऊन बसत आणि सर त्यांना वैयक्तीक मार्गदर्शन देत असंत. ह्या सगळ्याचा मोबदला असे “रुपये शून्य फक्त”! मराठे सर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या फायनल परीक्षेत पडणाऱ्या गुणांचे अंदाज बांधत आणि ते अंदाज कधी चुकल्याचं कुणाच्याच ऐकिवात नाही. इतका सरांचा ह्या सगळ्या पद्धतीवरती आणि स्वतःच्या आणि विद्यार्थ्यांच्या कष्टावरती गाढा विश्वास.

एकीकडे हे सगळं असं घडत असताना आमच्या मध्यम आणि निम्नमध्यम वर्गीय बौद्धिक स्तरातील विद्यार्थ्यांचं शिक्षण 'छडी' ह्या माध्यमात जे शिरलं ते सुद्धा केवळ मराठे सरांच्या मुळे. माध्यमिक “शिक्षण” म्हणजे फक्त पालकांच्या (बाल) हट्टा पोटी त्यांच्या पाल्यांवर अकाली लादण्यात आलेली केवळ एक सामाजिक जवाबदारी होय” ह्या मौलिक विचारावर गाढा विश्वास असणाऱ्या आमच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेणारे माझ्या सकट बहुसंख्य विद्यार्थी. तिकडे वर्गातील अति महत्वाकांक्षी विद्यार्थी बोर्डात येण्यासाठी बापुडवाणी आणि केविलवाणी धडपड करत असताना, आम्ही मात्र इकडे मराठे सर नावाच्या “एका बलाढ्य आणि अघोरी अश्या दहशत वादी संघटनेशी” जमेल तितकी झुंज देत इंच इंच लढवत होतो. 'मराठे'शाही विरुद्ध आमचा हा लढा आम्ही कायम मोठ्या खंबीर दिलाने लढलो, हार जीत तो दुनियाकी रीत है! “सर्कशीत रिंग मास्टर होण्या ऐवजी ही व्यक्ती चुकून आपल्याला शिक्षक म्हणून का लाभली असावी?” ह्या विषयावर आम्ही अन्यायाने गांजलेल्या विद्र्यार्थ्यांनी कित्येक वेळा चर्चासत्र भरवली असतील. हिरण्यकश्यपू ची आतडी काढून त्याला ठार करणारा “नरसिंह”अवतार आणि विष्णूचा सहावा अवतार मानल्या गेलेले “जमदग्नी” हे दोन पौराणिक कॅरेक्टर्स सुद्धा "रागीट पणाचा" अभिनय कमी पडू नये म्हणून आमच्या मराठे सरांच्या घरी पहाटे पहाटे शिकवणी साठी येत असतील असं आम्हाला त्यावेळी उगाचंच वाटायचं.

सर दहावीला आम्हाला गणित अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने शिकवायचे. मुद्दा हा होता की त्यांनी जमदग्नी किंवा नरसिंहावताराचा त्याग करून साने गुरुजी व्हावं ही आमची अपेक्षा पण आम्ही मात्र साने गुरुजींच्या गोष्टीतल्या "श्याम" सारखे किंवा श्रावण बाळा सारखे मुळीच वागायचो नाही. त्यामुळे मराठे सरांनी आमच्या शी वागताना त्यांची एक “स्वतंत्र” शिक्षण पद्धती अवलंबली होती. त्यात दोष त्यांचा नव्हता, आम्हीच, दक्षिण आफ्रिकेतील वानर अमेरिकेतील झू मध्ये वागतात तसे वागायचो वर्गात त्याला ते तरी काय करणार. आम्हाला आमची बौद्धिक पातळी नसताना सुद्धा विद्यामंदिर मध्ये प्रवेश दिल्यावर इतरांच्या संगतीने सुधारतील ह्या भावनेनं शहाळ्यासारखं मोठं मन असलेले मराठे सर आमच्यासारख्या वानरयोनीत जन्म झाल्यासारखे वागणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी, पुढे जाऊन आमच्याच आयुष्याचा निवडुंग होऊ नये म्हणून स्वतःचं ब्लड प्रेशर वाढवून घेऊन आम्हाला आठवड्यातून किमान दोन दा तरी 'दहावीत आलात गधड्यांनो आता तरी शहाणे व्हा...अरेsss शंकर जोतकर, तिकडे तुझा बाप पहाटे साडेपाच वाजता मिरजेतून सायकलीवर अंधारात माधव नगर पर्यंत जातो रे “कॉटन मिल” मध्ये कामाला, तुझी फी भरता यावी म्हणून , तू नापास झालास दहावीत तर तुला नाही पण तुझ्या बापाला लाज वाटेल जगाला तोंड दाखवायची...अभ्यास कर आणि पास हो...गाढवा!" असं बेंबीच्या देठापासून ओरडून एक पाठीत सणसणीत रट्टा देत. त्यामुळे शंकर जोतकर ते उन्मेष प्रभुणे आणि माझ्यासकट आमच्या सगळ्यांची दहावी पहिल्या फटक्यात सुटली, आणि अपेक्षेच्या मानाने आम्ही बरेच चांगल्या टक्क्यांनी पास झालो ते फक्त मराठे सरांच्या दहशती मुळे.

पाच सहा वर्षांपूर्वी आमच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला त्यावेळी सर भेटले. किंचित थकलेलं, किंचित का? बरंचसं थकलेलं शरीर. पाठीचा कणा मात्र एकदम ते त्यांच्या टेबला वर बाळगत त्या वेताच्या तेल लावलेल्या “रुळा” सारखा एकदम ताठ. थोडा कंप मात्र सुटल्यासारखा वाटला त्यांच्या हाताच्या बोटांना वयोमानानुसार!...ज्या हातानं त्यांनी आमची पाठ अक्षरश: शेकवून काढली वडीलकीच्या अधिकारानं पंचवीस तीस वर्षांपूर्वी त्या राकट हातांना असा कधी काळी कंप सुटेल असं आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि त्यांची अशी वृद्धापवस्था पाहून डोळे आपसूकच पाणावले. मी मान वर करून पण नजरेला नजर न भिडवतंच दाटलेल्या गळ्यानं विचारलं "सर ओळखलंत का?" ते क्षणभर विचारात पडले. मी माझं नांव आणि दहावीच्या पटावरचा रोल नंबर सांगितला. “सर ९२-९३ ची बॅच.” सर लगेच म्हणाले “अरे..म्हणजे तू आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनात दरवर्षी नाटकात कामं करणारा "राम" का रे?" मी फक्त “हो!” असं म्हणालो. "पण तुम्ही तीनचार कार्ट्यांनी गणिताचे तास चुकवून तालमी केल्या अजून लक्षात आहे माझ्या!", असं सर बोलले आणि आम्ही दोघे जोरात हसलो. मी हसलो खरा पण अरे बापरे मराठे सर आणि हसू शकतात विद्यार्थ्यांच्या बरोबर ? असं वाटून मला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि माझ्या डोळ्यात पुढच्याच क्षणी झर दिशी पाणी आलं. ‘सर’ शरीरानं थकले होते पण सरांची विद्यार्थ्यांची नावं त्यांच्या बेंच सकट लक्षात ठेवणारी त्यांची स्मरणशक्ती मात्र एकदम तल्लख त्यांच्या बीज गणिताच्या सुत्रां इतकीच. नमस्कार करायला म्हणून मी वाकलो त्यांच्या पावलांच्या बोटांना स्पर्श करण्यासाठी आणि उगाचंच गंमत म्हणून वाटलं मला , मी वाकलोय खरा पण सर पूर्वीसारखाच पाठीत परत एकदा एक सणसणीत रट्टा देतील, त्यांचे बीज गणिताचे तास चुकवून आम्ही नाटकाच्या तालमी केल्या म्हणून, त्यांच्या सवई नुसार शिक्षा म्हणून. पण नाही! सरांनी त्यांच्या कंप सुटलेल्या हातांनी फक्त माझ्या पाठीवर चार बोटं फिरवली ‘रामाने सेतू बांधून झाल्यावर’ खारी च्या पाठीवर फिरवावीत तशी.

आज सकाळी मराठे सरांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. आणि मनोमन वाटून गेलं, आमच्या मिरजेतल्या विद्यामंदिरचा दहावीचा तो वर्ग, तो फळा अन त्या आमच्या वर्गातला ‘बाक’ अन ‘बाक’ सगळे आज शोकाकुल होऊन आज ढसा ढसा रडत असतील “आपण आज पोरके झालो!” ह्या एकाच भावनेनं.

चारुदत्त रामतीर्थकर
१८ जुलै २०२०. पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@रामतिर्थकर सर खूपच सुंदर लिहिलयत ओ... मला पण माझ्या शाळेतल्या काही सरांची आठवण आली
खूप भरभरुन लीहीलत राव... खारिच्या पाठीवरील बोटे श्रीरामांची बोटे आणि सरांची बोटे , तुमच्या पाठीवर फिरलेली काय सुंदर उपमा !

उत्तम लिहिले आहे रामतीर्थकर. विद्यामंदिरच्या मित्रांच्या ग्रुपवर या लेखाची लिंक दिली आहे.

मला सारखे तुझे नाव कुठे तरी ऐकल्या सारखे वाटायचे. तू 2000 पीव्हीपी बॅच का? अवधूत कुलकर्णी वगैरे बरोबर?

प्रगल्भ, निर्मल, निलुदा आणि वावे , धन्यवाद!

@ टवणे सर : मला सारखे तुझे नाव कुठे तरी ऐकल्या सारखे वाटायचे. तू 2000 पीव्हीपी बॅच का? अवधूत कुलकर्णी वगैरे बरोबर? >>> अगदी बरोबर!

अगदी बरोबर!
>>

ओके, या धाग्यावर अप्रस्तुत आहे तरी.. मी २००३बॅचचा.. माझं पहिलं रॅगिंग तू आणि अवधूतने घेतले होते, बसमध्ये!

टवणे सर >> : मिरज-बुधगांव बस का ? अरे वा:

"माझं पहिलं रॅगिंग तू आणि अवधूतने घेतले होते" >>>अरेरे, मनापासून क्षमा मागतो आता.

टवणे सर मग आता तुम्ही इथे ऑनलाईन रॅगिंग करा. हाकानाका.
कृपया Light 1 Light 1 Light 1 घ्या दोघांनी.
(तशीही आज दिव्याची आवस आहे. Happy )

@टवणे सर तुमच रॅगिंग बापरे Wink

पण खरच इतक्या वर्षांनी भेटलात , ओळखलत आणी ओळख पटण्याची खूण काय ? तर ती लाल बस आणी झालेल रॅगिंग
हा हा हा फारच फनी सर ! @रामतिर्थकर सर तुमची दिलगीरी पण किती गोंडस वाटली ! खरच फार हसू येतय !!