बस क्रमांक ५४७३

Submitted by अरिष्टनेमि on 18 July, 2020 - 15:33

मागच्या रविवारी वेळ होता तर सहजच ‘Honey, I Shrunk the Kids’ परत एकदा पाहिला. त्यातली ती इवलाली मुलं आणि मधमाशी, फुलपाखरू, कुत्रा. काय काय अजून. आता तसं माणूस लहान करणारं यंत्र कुठं जर मिळालं तर जगात काहीच्या काही होईल. सार्वजनिक वाहतूक किती बदलून जाईल? बस-बीस असलं काही नाही. खूप भारी शॉक-ॲबसॉर्बर असणा-या मोटरसायकलच्या भक्कम कॅरियरला एक शॉकप्रूफ ‘प्रवासी सुटकेस.’ त्यात प्रवासी बसण्याची सुरक्षित सोय. डोळ्यासमोर सगळं एकदम दिसू लागलं.

सातारा-पुणे मोटरसायकल बस डेपोतून निघाली. भुर्रर्र करत फलाटाशी आली अन् जाळीच्या पिंज-यात उभी राहिली. पिंज-याला एक मशीन. लोकांनी पिंज-याला घेराव घालून सीट मिळण्यासाठी गर्दी केली. एखादं आगाऊ पोरगं ताकदीनं पुढं येऊन पिंज-यात आधी घुसू पाहतं. आतला ड्रायव्हर ओरडतो, “लका, लका, लका, लका. लईच घोड्यावं हाईस की रं! आरं दम खा की रं वाईच. जायाचंच हाय की समद्यास्नी. लायनीत या, लायनीत.” लोकांनी मोटरसायकलच्या ‘त्या’ पिंज-यापुढं लाइन लावली. ड्रायव्हरनं पहिल्या माणसाला पिंज-यात घेतलं. पैसे घेऊन तिकीट दिलं अन् मशीनचं बटन दाबलं. सुंईईई करून आवाज झाला अन् प्रवासी एकदम गव्हाच्या दाण्याइतका झाला. मऊ रबराच्या खोल चमच्यात घेऊन ड्रायव्हरनं त्याला उचलून कॅरियरच्या सुटकेसमध्ये ठेवलं. प्रवासी उतरून आपल्या सीटवर बसला. पुन्हा पुढचा प्रवासी.

इतक्या लोकांची तिकीटं काढेपर्यंत सुटकेसमधला एखादा प्रवासी कावळ्यानं पळवू नये म्हणून बारीक जाळीचा पिंजरा आहेच. नुसता कावळाच नाही हो. कधी कधी असंही होऊ शकतं, उन्हाळ्याच्या दिवसात वावटळ आली अन् दोन-तीन प्रवासीच उडून गेले. म्हणजे शोधणार कुठं मग?

तरी ‘अशा छोट्या पिंज-यानं प्रवाशांची गैरसोय होते म्हणून त्याऐवजी स्टँडलाच मोठ्या पिंज-यानं झाकावं आणि स्टँडच्या आत तंबाखूला घातलेली सरसकट बंदी उठवावी’ या दोन मागण्यांसाठी प्रवासी संघटना आगार नियंत्रकांना भेटायला गेलीच. ते होते सुट्टीवर. मग त्यांच्या सहाय्यकानं; ‘अशिश्टंट सायबानंच’, वार्तालाप केला.

अशिश्टंट मॅनेजर साहेबांनी त्यांची बाजू ऐकून घेतली. तोवर टेबलाच्या ड्रॉवरमधून एक ड्रॉपर काढला. थर्मासमधून एक थेंब चहा घेऊन भातुकलीच्या एका नखभर किटलीत टाकला. मग माणसं लहान करायचं यंत्र आणून स्वत:सकट सारी माणसं लहान केली. संघटनावाल्यांच्या मनात धस्स झालं.
"असं का वो सायेब?"

पण साहेबांचा हेतू चांगला होता. त्यांनी सारं उकलून, फोडून सांगितलं.

झालं असं की महामंडळ होतं तोट्यात. आता हे माणसं लहान करायचं मशीन आल्यापासून लोकांनी कर्ज काढून मशीन घेतले होते. त्याचा शोध लागण्यापूर्वी जसे हायवेला लोक ट्रकची वाट पहात उभे रहात आणि एस.टी. चं तिकीट २५-३० रुपये असलं तर ट्रकमध्ये बसून अगदी १०-१० रुपयात जात. शिवाय पाहिजे तिथं एखाद्या वस्तीवर, फाट्यावर उतरून जात. असे लोक आता अशा मशीनजवळ उभे रहात. कोणीही मोटरसायकलवाल्यानं, दूधवाल्यानं दुध घालून जाता-जाता सहज अशा मशीनजवळ जाऊन फक्त सांगायचं, "इंगळवाडीची शीटं हायती का?" समोर २-४ सीट असायचेच. मशीनवाले लगेच त्यांना बारीक करून डबीत भरून देत होते. एस.टी. चा धंदा बसला.

पण तरीही एस.टी.चा प्रवास आजही सुरक्षितच होता. त्यांच्या मोटरसायकल बस शुद्ध पेट्रोलवर धावायच्या. सर्व ‘पॅसेंजर सुटकेसेस’ शॉकप्रूफ होत्या. सुटकेस १० मीटर उंचीवरून पडली तरी प्रवासी सुरक्षित. शिवाय सीटला अत्याधुनिक गायरोस्कोप होते. चढ-उतार, घाट, खड्डा काहीही असो, सुटकेसमधल्या प्रवाशाला काही त्रास जाणवणार नाही. तसं या अनधिकृत मशीनवाल्यांचं काही खरं नव्हतं. त्यांच्या मोटरसायकल रॉकेलवरसुद्धा पळायच्या. जुन्याच सुटकेसला हवेसाठी भोकं पाडून त्यात कापूस अंथरून थर्मोकोल लावून ‘पॅसेंजर सुटकेसेस’ तयार केल्या जायच्या.

यात्रे-जत्रेला, लग्नाच्या सीझनला जेंव्हा गर्दी आवरायची नाही, तेंव्हा आर.टी.ओ.नं तपासण्या कडक केल्या. यात सापडू नये म्हणून अनधिकृत मशीनवाल्यांनी चुन्याच्या डबीत टाकून पॅसेंजर नेले होते. शेवटी सरकारनं चुन्याच्या डबीवर ‘वैधानिक सूचना - केवळ खाण्यासाठी. प्रवाशांसाठी नाही.’ असं लाल रंगात छापणं सक्तीचं केलं. शिवाय कोणत्याही ड्रायव्हरला चुना बाळगायला मनाई केली. मग ड्रायव्हर संघटनेच्या दबावामुळं एस.टी. महामंडळाला ‘मळणी कारागीर’ म्हणून एक पद निर्माण करावं लागलं. ‘ड्यूटीवर जाणा-या ड्रायव्हरला तंबाखू मळून देणे आणि तशी त्याच्या कार्डावर रोज नोंद घेणे’ हे त्याचं काम.

असं चहू अंगांनी आवळल्यावर एस.टी. कशी फायद्यात चालणार हो? म्हणून सर्वत्र पैसे बचत आणि कपातीचं धोरण. आता बघा, पाच माणसाला पाच कप चहा म्हटलं की पंचवीस रुपये झाले की नाही? म्हणून महामंडळानं परिपत्रकच काढलं. ‘आलेल्या अभ्यागतांना लहान करून चहा पाजावा.’ यामुळं एक हाफ चहात; तीन रुपयात, आल्यागेल्यासह अख्खा डेपो आठ दिवस चहा प्यायचा.

तर चहा घेता घेता संघटनेचं म्हणणं ऐकून घेतल्यावर अशिश्टंटसायेब म्हणाले, “तुमी बरूबर म्हंतायसा, खरं आता माजंबी आयकून घ्या की वो. तुमचंबी हायेच की म्हना पॉइंटशीर. समजा बारीक पिंजरं बंद करून मोटं पिंजरं लावाचं का हुईना, पन एकांदा कावळा, उंदीर जर का आतमदी घुसलाच तं? तेला पकडूस्तर खायाचा की वो डजनभर पॅशिंजर? मंग कसं करनार? आमच्या गळ्याला फासच की वो!”

संघटनेच्या माना एकमेकांकडं वळल्या, “ह्यो फेकाय लागलाय” या अर्थानं.

सायबानं अजून नेट लावला.

“बरं समजा तसं नाय का हुईना. आता बगा, कवा कवा काय व्हत आसतंय. आताच काळूबाईच्या जत्रंला, हीऽऽऽ गर्दी. गर्दी म्हनावं का काय गा? मुंगीवानी मानूस. पाय ठिवायला जागा न्हाई. मान्साला मानूस घासतंय वो. जादा गाडी सोडलेली, यात्रा पेशल. शंबराच्या वर तिक्टा फाडून झाल्यावत्या. डायवरनं मोजून पॅशिंजर सुटकेसमदी बसावलं. एक पॅशिंजर; बाईमानूस वो, बसवाय गेला. तवर तिला सोडाय आलेला तिचा मालक, तो येका साईटनी तिला काय सांगाय आला जनू.... आन् गाबडं शिकलं की वो जोरात. धा-पाच शीटं गेली की उडून. गावंनात की वो. डायवर परेशान. लय शोदली. सापडाय तयार न्हाईती की. बरं आता ती आरडत असतीन, पन कुटलं ऐकू याया लागलं वो इतक्या गोंदळात?

संघटनेच्या चेह-यावर आश्चर्य. “अगं आयाया, आता पुढं कसं?”

मॅनेजरनं सस्पेन्स तोडला. “आता मान्सं मोटी करायची मशीन डेपोत येकच. ती बी येळंला बंद. नेमकीच पाटन-सातारा आली होती तीनची. तिचा डायवर पॅशिंजर उतरून मोटी करत व्हता. त्याचं मान्सं मोटी करायचं मशीन आनलं आन् फिरावलं. तवा ही शीटं गावली. पॅशिंजर बसवाय डायवर वाकला होता, तेच्यानं तेच्या खिशात दोन शीटं निगाली. त्याचं टेंशन नाय. तीन तं सप्पा खाली जमिनीवं व्हती. त्याचंबी काय नाय वो यवडं. झाडल्यावं कच-यात निगालीच असती की. पन एका म्हता-याच्या पागुट्यात एक शीट अडाकलं व्हतं. आता बगा, ते धनगराचं म्हातारं व्हतं. ते शीट जर तसंच रायलं आसतं आन् ते घेऊन म्हातारं धनगरवाडीला पवचलं आसतं तं त्याच्या मेंडराच्या केसांत कवा गावलं आसतं वो शीट परत? चिकाटलेलं शीट कवाबी कावळ्यानी गोचडावाणी वडून खाल्लं आसतं का न्हाई? म्हंजे, माजं म्हननं असं का पिंजरा बारीकच बरा. तेच्यानं बाकी मान्सं ल्हान केलेल्या शीटाजवळ न्हाईती जात."

‘खरं खरं’. संघटनेच्या माना आता एकमतानं डोलल्या.

अशिश्टंट सायबांचा आत्मविश्वास वाढला.

“आता ष्ट्यांडच्या आत तमाखूवर बंदी हाय. इचरा का? का? तं आसं एश्टिमेट हाय बगा त्याचं, का समजा एकांदा गडी तमाखू खाऊन पाचकनी थुकला फलाटावं, तं दोन-चार पॅशिंजर जायाचे वो व्हाऊन. पवता आलं तं बरं, न्हाई तं जायाचं की एकांदं जीवानिशी. तेज्यापेक्षा ष्ट्यांडच्या आत तमाखू बंदच. फुल बंदी. बंदी म्हंजे गावली तं जप्त करून फाईनच मारतुय पा-पाश्शे रुपय. आमाला म्हामंडळाला काळजी हाईच की वो पॅशिंजरची.”

हे अगदी बरोबर होतं. महामंडळ प्रवाशांची काळजी घेतच होतं आणि डेपो मॅनेजरसुद्धा एकदम कर्तव्यतत्पर होते. संघटनेचे लोक परत जायला निघाले. “थांबा, थांबा की वो. मोटं व्हवून जा.” असं म्हणून मॅनेजरनं त्यांना मोठं करून निरोप दिला.

स्टँडवर अनाऊन्समेंट सुरू होती. “फलाट क्रमांक एकवरून एक लहान प्रवासी उडून गेलेला आहे. त्यामुळं त्या फलाटावरील सर्व मोठ्या प्रवाशांनी तपासणी पूर्ण होईपर्यंत बाकावर पाय घेऊन बसावे.’

डेपो मॅनेजरच्या डोक्याला काय कमी ताप नव्हता. आधी काय, एका डेपोला माणसं लहान करायचं एकच मशीन. फलाटावर आलेले सारेच प्रवासी लहान करून बसवून ठेवायचे. एस.टी. फलाटाला लागली की हे लहान केलेले प्रवासी तिकीटाच्या पेटीत जाऊन तिकीट घ्यायचे अन् शिडीनं सुटकेसमध्ये जाऊन बसायचे. एस.टी.चा चेकर लहान होऊन तिकीटं चेक करून यायचा.

पण एस.टी.चं तिकीट २०० रुपये असलं तर खाजगीवाले १००-१०० रुपयात शीटं भरत. यामुळं एकदा झालं असं की एक दिवस स्टँडवर प्रवासी लहान करून बसवले होते. खाजगीचा एजंट घुसून त्यानं १००-१०० रुपयात नेतो असं आमिष दाखवून १५-२० पुण्याचे प्रवासी नेले की पळवून. आता हा धंदा बिनबोभाट चालूच होता इतके दिवस. महामंडळानं स्वत:च्या खर्चानं प्रवासी लहान करायचे आणि खाजगीवाल्यांनी पळवायचे, तेसुद्धा आयतेच लहान झालेले. म्हणजे प्रवासी लहान करायच्या खर्चात १०० टक्के बचतच की. पण एजंट कशा-कशात घालून लपवून प्रवासी पळवत असल्यानं एस.टी.च्या लक्षात कधी आलं नव्हतं. नेमकं त्या दिवशी एजंटनं मूठभर प्रवासी उचलून रिकाम्या माचीसमध्ये म्हणजे काडेपेटीत टाकले. त्या गर्दीत चुकून एस.टी.चा चेकरपण उचलला गेला. इकडं चेकर गायब झाल्यानं सारा गोंधळच. शोधू शोधू सापडेना. सारे प्रवासी मोठे करून पाहिले, फलाट झाडून धूळ चाळून झाली, एका ठिकाणी सापडलेलं मुंग्यांचं बीळ उकरून झालं. पण चेकर सापडेना.

तिकडं खाजगीवाल्याचं धाबं दणाणलं. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. तो एजंटवर संतापला, "फुकनाळीच्या, यवढं समजना गेलं व्हय रे तुला? बुरगुंड्या अवलादीच्या. शीटं भराय पाठीवला तं चेकरच उचलून आन्हला. तुझा बा येनार हाय का रं आता निस्तरायला, शिपतुळ्या?”
मंद ‘सा’ नं सुरु झालेल्या या अद्भुत शिव्या पुढं तार सप्तकात मराठीतल्या सा-या वर्ण-व्यंजनांना धार लावून आल्या. पण त्याच्यावर चिडून उपयोग नव्हता. जो उद्योग व्हायचा तो होऊन बसला होता.

खाजगीवाला चेकरच्या हातापाया पडला, रडला, तोंड झोडून घेतलं. त्याला पाच-पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देतो म्हणाला. भाऊ (मा.पं.स. सदस्य) त्याच्याशी बोलले. पण चेकर गडी ऐकेना. आता त्या चेकरनं जर याची तक्रार केली असती तर खाजगीवाला संपलाच असता. पोलिसांनी त्याच्या दुकानाला टाळं लावलंच असतं शिवाय याला जेलमध्ये टाकलं असतं.

आता यातून बाहेर निघायचा एकच मार्ग. त्यानं एजंटला सरळ सांगितलं, “ऐकना की रं बेनं. लय बाराचा हाय. तू आता तिकडं गोडोली नाक्याला जा आन् पुलावं हुबारून दे फुकून याला. जाऊंदे मंग कुटं बी. तेच्या मरनानी मरुंदे, आपल्याला पाप नगं.”

एजंटनं चेकर पुन्हा त्याच माचीसात भरून नेला अन् मालकाची आज्ञा पाळली. फक्त पुलावरून त्याला फुंकून टाकण्याऐवजी तसंच्या तसं माचीस रस्त्याकडेला फेकून आला. थोड्या वेळानं एका पोराला ते माचीस सापडलं. त्यानं त्याला दोरा बांधून गाडी-गाडी खेळत घरी नेलं. घरी कापसाच्या वाती भरून ठेवायला त्याच्या आईनं ते माचीस घेतलं तर त्याच्यात बारीक चेकर तिला दिसला. असा शेवटी तो सापडला.

म्हणून आता तेव्हापासून प्रवासी लहान व्हायच्या आधीच पिंज-यात घेऊन, पैसे घेऊन तिकीट देतात अन् मग लहान करून थेट ‘प्रवासी सुटकेसमध्ये’ बसवतात.

तर ही अशी सातारा-पुणे मोटरसायकल बस एकदाची सातारमधून पुण्याला निघाली. शनिवार दुपार होती. गर्दी भरपूर. १०० सीटच्या सुटकेसमध्ये १०५ प्रवासी. डेपो मॅनेजरनं आग्रह केला म्हणून ड्रायव्हरनं अजून तीन प्रवासी सुटकेसच्या हँडलच्या सापटीत घुसवून दिले. जवळचे, भुईंजचेच होते. घसरून पडायला नको म्हणून वरुन सेलोटेप लावून दिला. गाडी निघाली.

प्रवासी घेत-सोडत खेड-शिवापूर आलं. दोन प्रवासी इथं उतरणार होते. ड्रायव्हरनं प्रवासी उतरवून मोठे केले. तोवर बसणा-यांची तोबा गर्दी.

“एकच शीट हाय. डायरेक पुणे. घ्या की सायेब.” एक म्हणता म्हणता बारा-पंधरा सीट झालेच. ड्रायव्हर वैतागला. एक पोरगं घायकुतीला आलेलं, “घ्या की वो डायवरसाएब. आमी दोगंच नवरा-बायको हाय. दुप्पारच्यानं हुबं –हायलोय, गाडीच मिळना. तुमी आमची बसाची चिंताच करू नगा. निरं मसनीम्होरं हुबं करा. ही क्यारीब्याग आन्हलीय. कसंय बी आडजष्ट हुतो आमी तेच्यात. तुमी सांबाळून हँडेलला लटकून द्या मंजी मंग काय टेंशन नाय. आमी करून घिउ आडजष्ट. कात्रजपवतरच जायाचंय.” असे असे पॅसेंजर कसे कसे ॲडजस्ट करून शेवटी ड्रायव्हर नेतच होता.

बस एकदाची स्वारगेटला पोहोचली. फलाटावर ड्रायव्हरनं प्रवासी मोजून मोठे केले अन् पिंज-याबाहेर सोडले. डेपोत गाडीची एन्ट्री केली. थोडा चहा-नाश्ता केला. स्टँडच्या बाहेरच्या बाजूला असणा-या स्टॉलमधून मळणी कारागीराकडून कार्डावर तीन चिमटी तंबाखू घेतली अन् बज्या डायवरच्या ओळखीनं एक फ्री मिळवून त्याची गोळी बेतोबेत गालात दाबली. एवढं होईस्तोवर स्टँडच्या लाऊडस्पीकरवर घोषणा सुरू झाली,

“संध्याकाळी ६ वाजता सुटणारी पुणे-सातारा बस क्रमांक ५४७३ फलाट क्रमांक ३ वर लागली आहे. जाणा-या सर्व प्रवाशांनी पिंज-यासमोर लाईन लावावी. प्रवाशांना सोडायला येणा-या नातेवाईकांनी लाल रेषा ओलांडून मशीनजवळ जाऊ नये. प्रवाशासोबत ते चुकून लहान झाल्यास, हरवल्यास किंवा चालकाच्या पायाखाली आल्यास महामंडळ जबाबदार नाही. लहान झालेलं माणूस पुन्हा मोठं करण्यासाठी माणशी दोनशे रुपये दंड भरावा लागेल. प्रवाशांनी केवळ अधिकृत वाहनांनीच प्रवास करावा. चुना डबी, कॅरीबॅग यातून प्रवास करणे कायद्यानं गुन्हा आहे.”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा मजेशीर विचार आहेत.
योगायोगाने दोनच दिवसांपूर्वी हनी आई श्रंक द किड पिक्चर मुलीला दाखवला.
त्याच्या आदल्या दिबशी मिस्टर ईंडिया.
दोघांची तुलना करता बारीक होण्यापेक्षा अद्रुश्य होता आले तर बरेच मजेशीर विचार सुचतात. ते जमायला हबे शप्पथ. लाईफ धमाल होईल.

हाहा.
१५ दिवसापूर्वी हनी आय ब्लो द किड पण लागला होता.

धन्यवाद ऋन्मेऽऽष, पाथफाईंडर, mi_anu, टवणे सर
डाउनसायझिंग बद्दल माहिती नाही. पण पाहिन आता. उत्कंठा वाटते आहे.